खेळा आणि खेळू द्या (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याकरता आपण सगळ्यांनीच नियमितपणे व्यायाम करायला हवा आणि मुलांना कोणताही खेळ खेळण्याकरता प्रोत्साहन द्यायला हवं. अभ्यास असो वा इतर कोणतंही कारण देऊन मुलांना मैदानावर खेळण्याकरता जाण्यापासून रोखणं तब्येतीच्या दृष्टीनं मारक ठरू शकतं. म्हणूनच जेव्हा कधी खेळण्याकरता मैदानं खुली होतील तेव्हा मुलांना मैदानाकडे धाव घेण्याकरता पालकांनी पुढाकार घ्यायला हवा. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याकरता विविध औषधं घेण्यापेक्षा खेळून तंदुरुस्ती वाढवून आतली शक्ती मजबूत करणं हा राजमार्ग दीर्घकाळ टिकणारा आहे.

कोविड 19 महासाथीनं जे जागतिक संकट निर्माण झालं, त्यात लॉकडाऊनचा प्रकार सगळ्यांनाच त्रासदायक ठरला. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ आपण सगळे इमानदारीत घरात बसून दर थोड्या कालखंडानंतर कोविड 19च्या बातम्या आणि त्याची निराश करून टाकणारी आकडेवारी बघत ऐकत आहोत. तेच ते विषय आणि तेच ते वाढणारे आकडे ऐकून कंटाळा यायला लागला आहे. यातून बाहेर पडण्याचे दोन मार्ग आहेत ते म्हणजे नियमांचं काटेकोर पालन करणं आणि दुसरा म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं. सगळे जाणकार तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवा सांगत असताना मला "रोज दहा हजार रुपयांची बचत केली, तर महिन्यात तीन लाख आणि वर्षाला 36 लाख बचत खात्यात जमा होतील,' या सल्ल्याची आठवण होते; पण रोज दहा हजार रुपयांची बचत करणं म्हणजे काय खाऊची गोष्ट आहे की काय? अगदी तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं म्हणजे हापूसचा आंबा कापून खाऊन टाकण्याइतकी सोपी गोष्ट आहे की काय? सगळे डॉक्‍टर्स सांगतात, की रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली, तर करोनाच काय कोणत्याही विषाणूशी लढा द्यायला शरीर बचावतंत्र तयार करेल. चौरस आहारासह चांगल्या सवयींसोबत रोगप्रतिकारक शक्ती विकसित करायचा मला एकच राजमार्ग दिसतो तो म्हणजे खेळा आणि खेळू द्यात.

खेळ निखळ आनंदाचा झरा
अनादी काळापासून मानवानं विविध खेळांचा अंतर्भाव आपल्या रोजच्या जीवनात केला होता. शारीरिक तंदुरुस्तीबरोबर खेळ प्रत्यक्ष खेळणाऱ्याला आणि तो बघणाऱ्याला प्रचंड आनंद देऊन जातात याचा शोध लागायला मानवाला वेळ लागला नाही. साहजिकच खेळ मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला. फ्रान्स, इजिप्त या दोन देशांतल्या काही गुहांमधल्या हजारो वर्षांपूर्वीच्या चित्रांत मानव कुस्ती खेळत असल्याचं दिसलं आहे. ग्रीस देशातून विविध खेळांच्या स्पर्धा विविध देशांदरम्यान भरवण्याची प्रथा चालू झाली- ज्याला आपण ऑलिंपिक गेम्स म्हणतो. थोडक्‍यात खेळाचं मोल मानव जाणून आहे. तेव्हापासून ते आत्तापर्यंत खेळाचा आनंद घेणं ही कृती अव्याहतपणे चालूच आहे.
एक सेकंद विचार केला, तर आपल्याला लक्षात येतं, की खेळ आपल्या मनाला तजेला देतात. मनातले नकारात्मक विचार दूर करायला मदत करतात. खेळून झाल्यावर आलेल्या थकावटीनंतर दुखणाऱ्या अंगात गोड शहारे निर्माण करतात. खेळाची तुंबळ लढत बघताना आपण देहभान हरपून जातो. रोजच्या आयुष्यातील त्रास आपण विसरून जातो. भारतात तर करोडो लोक भारतीय संघ जिंकल्यावर मिळणारा आनंद समाधानाची पुंजी म्हणून जपतात- कारण बाकी त्यांच्या वाट्याला फक्त खस्ता लिहिलेल्या असतात. म्हणूनच कदाचित आपल्या रोजच्या जीवनात घडलेल्या गोष्टी लक्षात राहतच असं नाही; पण शाळेच्या संघाकडून खेळताना रंगलेला सामना किंवा निव्वळ रसिक म्हणून भारत-पाकिस्तान लढतीचे सगळे रंजक क्षण कायमस्वरूपी मनात कोरले जातात. भारतानं विश्वचषक जिंकल्याच्या गोड आठवणींचे रोमांच मनातल्या कोपऱ्यात अत्तरासारखे दरवळत असतात, तर दुसरीकडे जावेद मियॉंदादने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून केलेला पराभव मनावर कायमचा ओरखडा ठेवून जातो. हे लक्षात ठेवा किंवा हे विसरून जा असं कोणी सांगावं लागत नाही- ते आपोआप घडतं.

तरीही अडथळे फार
वर नमूद केलेले मुद्दे अगदी सगळ्यांच्या मनातले असले आणि भारत सरकार खेळ प्राधिकरणाच्या माध्यमातून मनापासून प्रयत्न करत असलं, तरी खेळाकरता अडथळे फार असंच चित्र किमानपक्षी शहरांमधून दिसत आहे. निष्णात होमिओपॅथी डॉक्‍टर आणि मान्यताप्राप्त कौन्सेलर मीनल सोहनी यांच्याशी या विषयाबद्दल चर्चा केली असता त्यांनी काही मुद्द्यांवर मस्त प्रकाश टाकला. डॉ. मीनल सोहनी म्हणाल्या ः ""भारतीय अभ्यासक्रमात दहावीचं महत्त्व खूप वाढलं आहे. पालकांना स्पर्धात्मक युगाची सतत धास्ती वाटत असते- ज्यानं ते बहुतांशी मुलांना नववीनंतर खेळापासून दूर करून अभ्यासावरच लक्ष केंद्रित करायला भाग पाडतात. तसं बघायला गेलं, तर नेमका तोच काळ असतो ज्यात मुलांची शारीरिक जडणघडण होत असते आणि मनाची अवस्था दोलायमान असते. आपण ज्याला "टीन एज' म्हणतो ते आधुनिक काळात वयाच्या नवव्या वर्षी चालू होत असतं हे आपण लक्षात घेत नाही. खेळ विचारांमध्ये सकारात्मकता आणतात हे सगळ्यांना पक्कं माहीत असून फक्त अभ्यासावर भर दिला जातो- तिथंच गणित चुकायला लागते.''

हे ऐकताना मला डेक्कन जिमखाना क्‍लबच्या क्रिकेट विभागात घडलेला किस्सा आठवला. एक मुलगा तीन वर्षांच्या क्रिकेट प्रशिक्षणानंतर चांगली प्रगती दाखवू लागला होता. प्रशिक्षक खूश होऊन त्या मुलाकरता पुढील योजना बनवत असताना त्याच्या आईनं त्याला प्रशिक्षणापासून दूर करायचा निर्णय घेतला- कारण तो मुलगा नववीमध्ये गेला होता. त्या मातेला मुलाच्या दहावीच्या वर्षाची तयारी अगोदरपासून करायची होती. प्रशिक्षकांनी समजावून सांगायचा प्रयत्न केला- ज्याला अजिबात यश आलं नाही. तीच आई त्याच मुलाला दहावी चालू असताना परत क्‍लबवर घेऊन आली- कारण तिच्या कानावर पडलं होतं, की चांगल्या स्तरावर खेळ खेळणाऱ्या मुलांना पाच टक्के मार्क जास्त बोनस म्हणून दिले जातात. मोलाचं दीड वर्ष त्या मुलाला खेळापासून दूर नेल्यानं तो राज्याच्या संघाकडून खेळण्याचं स्वप्न हरवून बसला होता. या उदाहरणातून पालकांचं प्राधान्य बदलल्याचं दिसून येतं- ज्याचा विपरीत परिणाम पाल्यावर झाला. मुलांना वाढवताना पालक त्यांच्या कल्पना आणि अपेक्षा यांचा सत्य परिस्थितीशी असलेला संबंध पडताळून बघतात का हाच खरा गहन प्रश्न उभा राहतो.

मोठे खेळाडू काय करतात?
लॉकडाऊनच्या काळात महान खेळाडू आपल्या पाल्यांबाबत काय विचार करतात हे जाणून घ्यायची संधी मिळाली, त्यांचे अनुभवाचे बोल असे होते. विश्वनाथन आनंदचा मुलगा अखिलही बुद्धिबळ खेळतो. त्याचसोबत त्याला नाचायलाही आवडतं. ""गेल्या वर्षी त्यानं आपणहून खूप सराव करून शाळेच्या नृत्याच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. माझ्याकरता तो क्षण मोलाचा होता. अखिलला मी आणि माझी पत्नी अरुणा जास्त शिकवायला जात नाही. जे करशील त्यात झोकून देत मेहनत कर आणि सातत्य ठेव इतकंच सांगतो. खेळ असो वा अभ्यास आपण मुलांना निकालाचं दडपण न टाकता ते करत असलेल्या मेहनतीचा आनंद घ्यायला शिकवायला हवं, असं मला वाटतं,'' विश्वनाथन आनंद म्हणाला.
राहुल द्रविडचा मुलगा समित बंगळूरच्या क्रिकेट वर्तुळात चांगला फलंदाज म्हणून हळूहळू नावारूपाला यायला लागला आहे. ""वडील म्हणून तो कसा खेळतो, काय कामगिरी करतो याकडे माझं आणि विजेताचं लक्ष असतं; पण आम्ही पहिल्यांदा सामन्यात काय घडलं, कोण जिंकलं कोण हरलं हे विचारतो आणि मग त्याच्या कामगिरीबद्दल विचारतो. समितनं आपण सांघिक खेळ खेळत असल्यानं प्राधान्य संघाच्या कामगिरीवर असायला हवं हे जाणलं पाहिजे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची तुलना माझ्या खेळाशी होऊ नये म्हणून प्रयत्न करतो. समित असो, वा अन्वय दोघांनाही अभ्यासाबरोबर खेळाची गोडी लागावी म्हणून मी आणि विजेता आग्रही राहतो.''

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन कसा खेळतो रे...काय क्षमता आहे त्याची ...खेळेल का भारताकरता, असे प्रश्न मला हमखास विचारले जातात. मला काही वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. भारतीय संघ परदेश दौऱ्यावर असताना सचिननं मला हॉटेलवर बोलावून घेतलं, तेव्हा तो जाम भडकला होता. चौकशी करता असं समजलं, की अर्जुन पुण्यातल्या एका मैदानावर साधा सामना खेळायला गेला असताना आठ टीव्ही चॅनेल्सनी ओबी व्हॅन पाठवून चित्रीकरण करून त्याची मोठी बातमी करायला सुरुवात केली होती. त्यावेळी अर्जुन जेमतेम 12 वर्षांचा होता. ""लहान आहे रे अजून.. का त्याच्यावर दडपण टाकता आहात आणि त्याचा परिणाम इतर मुलांवरही होणार. सांग तुझ्या मित्रांना, की मी विनंती करतो आहे हे लगेच थांबवा. त्याला मनमोकळेपणानं खेळाचा आनंद घेऊदेत,'' सचिन वैतागून म्हणाला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत सचिननं अर्जुनला फक्त मेहनत करण्यावरून आग्रह धरला आहे. तो काय पातळीवर क्रिकेट खेळेल याची चर्चा त्यानं अर्जुनबरोबर केलेली नाही. जर सचिन तेंडुलकर आपल्या मुलाला फक्त खेळून देऊन आनंद घ्यायची मुभा देतो, तर आपण तसंच नको का करायला?
दिल्लीसारख्या महानगरात राहत असूनही वीरेंद्र सेहवागनं एक गोष्ट हुशारीनं केली आहे ती म्हणजे छतरपूर भागात मोठी जागा घेऊन त्या मानानं जास्त खोल्यांचं टोलेजंग घर न बांधता व्यायामशाळा, पोहण्याच्या तलावापासून क्रिकेट पिच बनवण्याइतपत मोकळी जागा आवारात ठेवली आहे. ""दोन महिनेसे हम सब लॉकडाऊन में है... मी याचा फायदा असा करून घेतला आहे, की मी मोठा मुलगा आर्यवीर आणि लहान मुलगा वेदांतला रोज संध्याकाळी तीन तास भरपूर खेळवून घाम गाळायला लावत आहे. आम्ही तिघं रोज संध्याकाळी क्रिकेट खेळतो- ज्यात मी दोघांना धावा पळण्याचं तंत्र शिकवत भरपूर पळायला लावतो. मला मुलांना पहिल्यांदा तंदुरुस्त बनवायचं आहे. माझ्या सेहवाग इंटरनॅशनल स्कूलमध्येही आम्ही अभ्यासाबरोबरीनं खेळाला महत्त्व देतो,'' असं सेहवागनं सांगितलं.

आपण हे करूयात
रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याकरता आपण सगळ्यांनीच नियमितपणे व्यायाम करायला हवा आणि मुलांना कोणताही खेळ खेळण्याकरता प्रोत्साहन द्यायला हवं. खेळून झाल्यावर घाम येईल असा कोणताही खेळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरता चांगला ठरेल. शहरांतल्या पालकांमधली अनावश्‍यक सुरक्षेची भावना मुलांकरता मारक ठरत आहे. अभ्यास असो वा इतर कोणतंही कारण देऊन मुलांना मैदानावर खेळण्याकरता जाण्यापासून रोखणं तब्येतीच्या दृष्टीनं मारक ठरू शकतं. म्हणूनच संभाव्य धोका टाळण्याकरता जेव्हा कधी खेळण्याकरता मैदानं खुली होतील तेव्हा मुलांना मैदानाकडे धाव घेण्याकरता पालकांनी पुढाकार घ्यायला हवा. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याकरता विविध औषधं घेण्यापेक्षा खेळून तंदुरुस्ती वाढवून आतली शक्ती मजबूत करणं हा राजमार्ग दीर्घकाळ टिकणारा आहे, असं नाही का वाटत तुम्हाला?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com