sunandan lele
sunandan lele

‘आयपीएल’चा मनोरंजन मंत्र... (सुनंदन लेले)

कोरोनामुळं जगात अनेक बदल झाले. विविध देशांच्या अर्थकारणाला धक्का देणाऱ्या या महामारीनं ‘आयपीएल’ होणार की नाही अशी परिस्थिती निर्माण केली; परंतु ही स्पर्धा या संकटालाही पुरून उरली. प्रेक्षकांविना खेळ हे अशक्य वाटणारं दृश्यदेखील कोरोनामुळं प्रत्यक्षात आलं. मात्र, स्पर्धा घ्यायचीच, या जिद्दीनं ‘बीसीसीआय’नं ही स्पर्धा भारताबाहेर घेऊन शो मस्ट गो ऑन हे तत्त्व तर पाळलंच; पण कोरोनावर हा मनोरंजनाचा मंत्र असल्याचंही स्पष्ट केलं.

इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच ‘आयपीएल’ ही स्पर्धा धमाल आणि आयोजन करायला वरून जेवढी सोपी दिसते, तितकी ती सोपी नक्कीच नाही. २००८ मध्ये या स्पर्धांना सुरुवात झाल्यापासून ‘आयपीएल’नं अनेक अडथळ्यांचे टप्पे पार केले. २००९ मध्ये भारतात लोकसभेच्या निवडणुका होणार असल्यानं ‘आयपीएल’ दक्षिण आफ्रिकेत भरवावी लागली आणि बीसीसीआयनं ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली. अगदी तशीच परीक्षेची वेळ भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर कोरोनाच्या समस्येनं उभी केली. २०२० या वर्षातली आयपीएल होणार की नाही, अशी शंका मनात येत असताना, बीसीसीआयनं कंबर कसली आणि अखेर २०२० मधली ‘आयपीएल’ स्पर्धा कालपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरूदेखील झाली.

थक्क करणारं अर्थकारण
कित्येक लोक ‘आयपीएल’ म्हणजे क्रिकेटचं बाजारीकरण झाल्याचं टीका करत आयपीएलच्या नावानं बोटं मोडतात. पण सत्य असं आहे, की बीसीसीआयनं क्रिकेटच्या लोकप्रियतेचा फायदा घेत, योग्य वेळी योग्य पावलं उचलल्यानं खुल्या आर्थिक धोरणाचा सर्वांत जास्त फायदा भारतीय क्रिकेटला मिळाला. २००८ मध्ये ‘आयपीएल’ सुरू झाली, तेव्हा दिल्लीत मुख्य कार्यालय असलेल्या ‘डीएलएफ’ कंपनीनं पहिल्या पाच वर्षांकरिता आयपीएलच्या मुख्य प्रायोजकत्वाचे हक्क दोनशे कोटींना विकत घेतले. २०१३ मध्ये पुढील पाच वर्षांकरिता पेप्सी कंपनीनं हे हक्क घेतले. पेप्सीनं हक्क मधेच सोडले, ज्यावर ‘विवो’ या मोबाईल कंपनीनं झडप घातली आणि २०१६-१७ या दोन वर्षांकरिता १९८ कोटी रुपये मोजले. त्याच विवो कंपनीनं २०१८ सालापासून ५ वर्षांचा मुख्य प्रायोजकत्वाचा करार करताना दरवर्षी ४४० कोटी देण्याची मजल मारली.
जगाला २०२० मध्ये मात्र कोरोनाच्या संकटानं घेरलं आणि दुसरीकडं देशाच्या सीमेवर चिनी सैन्यानं कुरापती काढणं सुरू केलं. चिनी कंपन्यांवर भारतीय जनतेचा रोष वाढत गेल्यानं विवो कंपनीनं मुख्य प्रायोजकत्वाच्या हक्कांवर पाणी सोडलं आणि आता ‘ड्रीम ११’ या कंपनीनं जवळपास २२० कोटींना तेच हक्क विकत घेण्याची तयारी दाखवली. याचाच अर्थ असा, की यंदाची आयपीएल ‘ड्रीम ११ आयपीएल’ अशी संबोधली जाणार आहे.

‘आयपीएल’च्या वाढत्या अर्थकारणाचा आधार घेत ‘बीसीसीआय’नं जवळपास सर्व संलग्न राज्य संघटनांची स्वत:च्या मालकीची आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदानं उभारली. दुसरा फायदा म्हणजे, देशातल्या अनेक खेळाडूंनी प्रथम श्रेणीत उत्तम कामगिरी केल्यानं ‘आयपीएल’मध्ये प्रवेश करणार्‍या खेळाडूंची अर्थकारणाची बाजू मजबूत झाली. तिसरी बाब म्हणजे, २५ पेक्षा जास्त रणजी खेळलेल्या खेळाडूंपासून ते कसोटी खेळलेल्यांपर्यंत तमाम माजी खेळाडूंना प्रत्येक महिन्याला निवृत्तिवेतन मिळू लागलं. ‘आयपीएल’च्या अर्थकारणानं बीसीसीआय, राज्य संघटना आणि आजी-माजी खेळाडूंना आर्थिक स्थैर्य आलं, हे नाकारून चालणार नाही.

सर्व काही अजब
‘आयपीएल’ स्पर्धा म्हणजे जणू क्रिकेटचा महोत्सव असतो. प्रेक्षकांबरोबर आजी-माजी खेळाडू सामन्यांचा आनंद घेतात. दुसऱ्या बाजूला प्रायोजकही स्पर्धेची वाट बघतात, जेणेकरून त्यांना आपल्या महत्त्वाच्या लोकांना खास वागणूक देता येईल. कोणत्याही आयपीएल संघाला प्रायोजकत्व देताना करारात ‘मीट अँड ग्रीट’ म्हणजेच खेळाडू हजर असताना छोटेखानी कार्यक्रम करून, त्यांना अत्यल्प काळ का होईना, भेटण्याचा मुद्दा मांडलेला असतो. कोट्यवधी रुपये मोजून प्रायोजक होणारी प्रत्येक कंपनी खेळाडूंसोबत काही क्षण घालवायची वाट बघत असते. २०२० आयपीएल स्पर्धेत तसं काहीच करता येणार नाहीये. खेळाडूंना कोणालाच भेटता येणार नाहीये. या सगळ्याचा काय विपरीत परिणाम होणार, हे काळच आपल्याला समजावणार आहे.
दुसरा मुद्दा येतो प्रेक्षकांचा. ‘मी होतो ना काल सामन्याला,’ हे वाक्य कॉलर ताठ करून सांगण्यात मजा घेणारे लाखो क्रिकेट आणि खासकरून आयपीएल चाहते दिसतात. प्रेक्षक हे स्पर्धेची जान असतात. पट्टीच्या गायकाला, योग्य तान घेतल्यावर प्रेक्षकांकडून मिळणारी ‘दिलखुलास दाद’ आयुष्यभरासाठी संजीवनी असले. तीच गोष्ट ‘आयपीएल’ मधला सामना खेळताना निर्णायक क्षणी अफलातून कामगिरी केल्यावर प्रेक्षक जो गलका करतात, त्या नशेची आहे. खेळाडू खासगीत मान्य करतात, की प्रेक्षकांची भरभरून मिळालेली दाद म्हणजे रक्त उसळवणारा क्षण असतो. अशक्य ते शक्य करून दाखवणारी कामगिरी करताना येणारा थकवा प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त पाठिंब्यानं पळून जातो. यंदा सामन्याला प्रेक्षकांना हजर राहायला परवानगी नसणार, ही गोष्टच अभूतपूर्व आहे. सामना सुरू असताना म्युझिक सिस्टिमवर प्रेक्षकांचा आवाज काढण्याचा प्रयत्न केला जाणार असला, तरी त्यात काही जीव नसेल. खेळाडूंना आता प्रेक्षकांच्या, चाहत्यांच्या प्रेमाचं खरं मोल कळेल.

तिसरा मुद्दा आहे माध्यमांचा. नेहमीप्रमाणे टीव्हीवर सामने दाखविण्याकरिता स्टार स्पोर्ट्स चॅनेलनं सर्व तयारी काळजीपूर्वक केली आहे. मोजके समालोचक तिकडं जाऊन पोहोचले आहेत. मात्र यंदा कोरोना संकटाचा विचार करून थेट पत्रकारांना स्पर्धेचं वार्तांकन करायची परवानगी नाकारली गेली आहे. म्हणजेच टीव्हीवर दिसणाऱ्या सामन्याकडं बघून पत्रकारांवर बातम्या लिहिण्याची वेळ येणार आहे. सामन्यानंतरची पत्रकार परिषद ऑनलाइन घेतली जाणार आहे, हे समजल्यावर खेळाडूंशी संपर्काचा मुद्दा पार बाजूला पडतो. अगदी काही मोजक्या पत्रकारांकडंच खेळाडूंचे मोबाईल नंबर किंवा व्हॉट्सअ‍ॅप नंबर आहेत, तेच पत्रकार कधीतरी खेळाडूंशी संपर्क साधू शकतात, बाकीच्यांना स्पर्धेचं वार्तांकन दुर्बिणीतून बघून जणू करावं लागणार आहे.

कोरोनाचं सगळंच अजब
केवळ पर्याय नसल्यानंच ‘बीसीसीआय’नं भारतातून स्पर्धा हलवून संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्पर्धा घेण्याची योजना आखली. निर्णयानंतर सगळी तयारी सुरू झाली. खेळाडूंना दुबईच्या विमानात पाऊल ठेवण्याअगोदर २-३ वेळा कोरोना चाचणी करावी लागली. दुबईमध्ये उतरताक्षणी विमानतळावर चाचणी झाली आणि मगच खेळाडूंना आत सोडण्यात आलं. त्यानंतर सगळेजण विलगीकरण कक्षात होते आणि मग परत दोन चाचण्या करण्यात आल्या. "संयुक्त अरब अमिराती’मध्ये घशातील थुंकीची चाचणी केली जात नाही. दरवेळी फक्त नाकातील द्रवाची चाचणीच ग्राह्य धरली जाते. इतके वेळा नाकात काडी खुपसली गेली आहे, की नाकाला भोक पडायची वेळ आली आहे,’’ अजिंक्य रहाणे गप्पा मारताना सांगत होता. सामन्याच्या समालोचनासाठी गेलेल्या व्यक्तींनाही याच अग्निदिव्यातून पार जावं लागत असल्याचं हर्षा भोगले यांनी सांगितलं.
दुबईला पोहोचण्यात चेन्नई सुपर किंग्जचा संघ अग्रभागी होता. त्या संघातील दोन खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे काही सदस्य कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली. घाबरगुंडी उडालेल्या सुरेश रैनानं दुबईमधून पळ काढला. वेगवान गोलंदाज दीपक चहरला खरंच बाधा झाली होती आणि तो दहा दिवसांत बरा झाला. बिचार्‍या ऋतुराज गायकवाडला कोरोना झाल्याची कोणतीही लक्षणं दिसत नसताना तो नेमका अडकला. त्याच्या सलग तीन चाचण्या पॉझिटिव्ह आल्यानं त्याला १६ दिवस एकांतवासात घालवावे लागले आहेत. सुरेश रैना नसल्यानं ऋतुराजला चांगल्या संधीची अपेक्षा निर्माण झाली असताना, कोरोना चाचणीनं त्याला दगा दिला आहे. ‘‘मैदानात उतरून हातात बॅट असताना, कोणत्याही दर्जेदार गोलंदाजाला तोंड देत चांगली कामगिरी होईल का नाही, याची कधी धास्ती वाटत नाही; पण कोरोना चाचणीचा निकाल काय लागतो, याचं दडपण फार त्रास देत आहे.’’ संपर्क केला असता वैतागलेल्या ऋतुराज गायकवाडनं सांगितलं. आशा आहे, की ऋतुराजच्या मागं लागलेलं हे कोरोनाचं ग्रहण लवकर सुटेल आणि तो मैदानात पिवळा जर्सी घालून, धोनीसोबत खांद्याला खांदा लावून खेळताना दिसेल. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या ऋतुराज गायकवाडला आयपीएल खेळताना सगळ्यांना बघायचं आहे.

आहे मनोहर तरी...
या स्पर्धांसाठी काय केलं नाही. कोरोनाच्या धास्तीनं विविध टप्प्यांवर काळजी घेतली गेली आहे. तसं पाहायला गेलं तर अशक्य वाटणारी आयपीएल स्पर्धा खरंच होत आहे... खेळाडूंची ने-आण अगदी चार्टर विमानानं करण्यात आली आहे... बहुतांशी खेळाडू कोरोना चाचणीतून मुक्त झाले आहेत... तर पंचतारांकित हॉटेल किंवा रिसॉर्टला सगळ्या संघांच्या वास्तव्याची सोय करण्यात आली आहे... प्रत्येक खेळाडूला स्वतंत्र खोली देण्यात आली आहे... खाणं-पिणं, व्यायाम सराव सगळ्याची तैनात ठेवण्यात आली आहे... प्रत्येक संघानं वास्तव्य असलेल्या हॉटेलचाच मोठा हॉल घेऊन त्याचं रूपांतर टीम रूममध्ये केलं आहे, ज्यात मनोरंजनाची म्हणजेच नाच-गाणं, खेळ वगैरे सर्व सोय केली आहे... पण खेळाडू म्हणत आहेत, आहे मनोहर तरी...
‘‘आम्ही रहात असलेल्या हॉटेलपासून अगदी चालत ५ मिनिटांच्या अंतरावर जगप्रसिद्ध दुबई मॉल आहे; पण आम्हाला बाहेर पडायची परवानगी नाहीये. जास्तीत जास्त दोन खेळाडू एकमेकांना भेटून गप्पा मारू शकतात किंवा जेवण करू शकतात, त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याची परवानगी नाहीये. बिग बॉस कार्यक्रमात असतात, तसे ट्रॅकर आम्हाला देण्यात आले आहेत. कोणीही बाहेरचा माणूस जवळ आला, तरी त्या मशिनमधून आवाज यायला लागतो. संघ व्यवस्थापन आमच्या हालचालींवर अगदी एका जागी बसून डोळा ठेवू शकत आहे त्या यंत्रामुळं,’’ एका नावाजलेल्या खेळाडूनं आपली व्यथा सांगितली.

‘‘आम्ही सगळे व्यावसायिक खेळाडू आहोत, त्यामुळं आयपीएलसारख्या स्पर्धेत कशी शिस्त पाळून खेळायचं, याची कल्पना आम्हाला आहे. तरीही मला वाटतं, की २०२० ची आयपीएल सर्वार्थानं वेगळी असणार. प्रेक्षकांविना आयपीएल होईल असं मला कोणी सांगितलं असतं, तर मी त्याला वेड्यात काढलं असतं. आता ती वस्तुस्थिती होणार आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना जरा त्याची आता सवय झाली असेल; पण भारतीय संघातल्या खेळाडूंना प्रेक्षकांच्या आवाजी पाठिंब्याची खूप सवय झाली आहे. प्रेक्षकांविना खेळाडूंना जोश कायम ठेवायला खूप वेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत. वाइटात एकच गोष्ट चांगली आहे ती म्हणजे, प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडूला सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच हॉटेलातील एकाच खोलीत सलग दोन महिने राहायचं आहे. रोज रोज प्रवास नाही... हॉटेल बदलणं नाही की पॅकिंग-अनपॅकिंग नाही. रहात असलेली खोली आमचं घर होणार आहे जणू काही दोन महिने. क्रिकेटपासून लांब रहावं लागल्यानं सर्व खेळाडूंना दर्जेदार क्रिकेट सामन्याची तहान लागली आहे. तयारी पूर्ण झाली आहे, आता प्रतीक्षा बिगूल वाजण्याची आहे,’’ बेंगलोर रॉयल चॅलेंजर्सचा कप्तान विराट कोहली गप्पांच्या ओघात सांगून गेला.

कालपासून आयपीएल २०२० स्पर्धा चालूही झाली आहे. इतके दिवस आयपीएलच्या काळात नवीन सिनेमे प्रदर्शित व्हायचे नाहीत. यंदा तो प्रकारपण नाही, कारण अजून सिनेमागृहं बंदच आहेत. याचाच अर्थ, सर्वांत लोकप्रिय हक्काच्या करमणुकीला सुरुवात झाली, ज्याचं नाव ड्रीम ११ इंडियन प्रीमिअर लीग आहे. यालाच म्हणतात, ‘शो मस्ट गो ऑन’.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com