रामबाण उपाय (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

असीम फाउंडेशननं काश्मीर खोर्‍यातील अनंतनाग जवळच्या डोरू गावात आगळीवेगळी स्पर्धा १९ राष्ट्रीय रायफल्ससोबत भरवली होती. क्रिकेट स्पर्धा भरवली तर त्यात विशेष काय... चारच संघांची स्पर्धा झाली तर त्यात विशेष काय... पण जेव्हा हीच स्पर्धा काश्मीरच्या चार महिला संघांमध्ये झाली, तेव्हा मग याचं महत्त्व कळतं. होय, काश्मीर खोर्‍यातील पहिली महिलांची क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा मान म्हणा किंवा धाडस म्हणा, हे असीम फाउंडेशननं १९ राष्ट्रीय रायफल्स युनिट बरोबर करून दाखवलं. या उपक्रमाला इरफान पठाण आणि सचिन तेंडुलकरनं पाठिंबा दिला होता.

मे-जूनचा काळ असेल, जेव्हा ‘आयपीएल’ होणार का नाही, ही चर्चा कानावर पडत होती आणि आता नवरात्र सुरू झालं असताना आयपीएल स्पर्धा निम्म्याच्या पुढं सरकली आहे. सामने बघताना मजा येत आहे; पण काहीतरी चुकल्यासारखं सतत वाटत राहत आहे. प्रेक्षकांविना ‘आयपीएल’ स्पर्धा हे सत्य समोर उभं ठाकलं असलं, तरी ते स्वीकारायला मन धजावत नाही.

खूप वेळा मला खेळावर प्रेम करणारे लोक हमखास प्रश्न विचारतात, की क्रिकेटचं भारतात इतकं अवडंबर का माजवलं जातं... क्रिकेटवरील अतिरेकी प्रेमामुळं बाकी खेळांवर अन्याय होत नाही का... आयपीएल हा खेळ नसून व्यवसाय झाला आहे का..? क्रिकेटचं भारतात अवडंबर नाही; पण जरा जास्तच प्रेम आहे, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळं बाकी खेळांवर अन्याय होतो, हे विधान मात्र मला अजिबात मान्य नाही.

जरा विचार करून बघा, मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाच्या साथीचा आपण सगळे सामना करतो आहोत. मार्चपासूनच लॉकडाउन सुरू झाल्यानं आपल्या सगळ्याच हालचालींवर मर्यादा आल्या. अर्थव्यवस्थेला जो प्रचंड धक्का बसला, त्यानं घराघरांत समस्या निर्माण झाल्या. बरेच दिवस आपण फक्त कोरोनाच्या बातम्या आणि त्याचे मन भयावह करून सोडणारे आकडे बघत बसलो. त्यानंतरचे दोन महिने सुशांतसिंग राजपूतच्या निधनाच्या बातमीनं माध्यमांचं जग व्यापून गेलं. त्यातून भारत देशाला शेजारी राष्ट्र अनावश्यक सतावण्याचा प्रकारही सुरू आहे. एकंदरीतच वातावरण गढूळ झालं होतं. अत्यंत नकारात्मक वातावरणात नकारात्मक बातम्या भर घालत होत्या. सगळीकडंच निराशेचं वातावरण काजळी धरू लागलं होतं. अशावेळी बीसीसीआयनं उचल खाल्ली आणि अनेक अडथळे पार करून संयुक्त अरब अमिरातीमध्ये २०२० या वर्षातली आयपीएल भरवण्याचा धाडसी निर्णय घेतला. प्रचंड मोठं आर्थिक नुकसान सहन करूनही बीसीसीआयनं पाऊल पुढं टाकलं. १९ सप्टेंबर रोजी पहिला आयपीएल सामना रंगला तेव्हापासून लोक नकारात्मक बातम्या बघण्याचं सोडून आयपीएल सामने बघू लागले. जाहिरातदार मनाचा हिय्या करून आयपीएल सामन्यांदरम्यान जाहिराती करू लागले, ज्यानं आर्थिक व्यवहारांना हळूहळू चालना मिळू लागली.

तुमचा विश्वास बसणार नाही; पण भारतात असलेल्या करोडो टीव्हींमध्ये ३ पैकी एका टीव्ही संचावर आयपीएलचा पहिला सामना बघण्याचा लोक आनंद घेत होते. एक ना दोन १५८ दशलक्ष लोकांनी पहिल्या सामन्याला टीव्ही प्रेक्षक म्हणून हजेरी लावली. हे आकडे विस्मयकारक आहेत. भारताकरिता क्रिकेट या कठीण काळात ‘लाख दु:खों की एक दवा’ मला वाटत आहे. लोकांच्या मनात घर करू बघणारी निराशेची काळी किनार दूर करण्यात क्रिकेटचं असलेलं छोटंसं योगदान नाकारून चालणार नाही.

सामन्यांचा झोपाळा
२०२० मधली आयपीएल स्पर्धा विविध रंग दाखवत आहे. प्रत्येक वर्षी सातत्यानं चांगली कामगिरी करणार्‍या चेन्नई सुपर किंग्ज् संघाला पराभवाचे चटके सहन करावे लागत आहेत. तसंच, कागदावर तगड्या दिसणार्‍या किंग्ज् इलेव्हन पंजाब संघाला अपयशानं घेरलं आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे संघ काही पराभव पचवून चांगली कामगिरी करण्याची हिंमत दाखवून गेले आहेत. हैदराबादचा संघ कधी उत्तम, तर कधी सुमार खेळ करताना लय पकडण्याशी पाठ शिवणीचा खेळ केला आहे. दिमाखदार सातत्यपूर्ण कामगिरी फक्त मुंबई इंडियन्सचा संघ करत आला आहे. स्पर्धा निम्मा टप्पा पार करून पुढं सरकली असताना सर्व संघांना शेवटच्या चार संघांत कोणाची वर्णी लागणार याची चिंता भेडसावायला लागली आहे.

तरुणाईनं छाप पाडली
ज्या संघांनी बर्‍यापैकी चांगली कामगिरी सातत्यानं केली आहे, त्यांच्या तरुण खेळाडूंनी अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली आहे. कोलकाता संघातील शुभमन गिल, नागरकोटी आणि मावी या तिघांनी मस्त छाप पाडली आहे. राजस्थान संघाच्या अंकित त्यागी आणि राहुल टिवातीयानं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रियम गर्ग आणि रियान पराग योग्यवेळी निर्णायक खेळी करायची तयारी दाखवत आहेत. मला या सगळ्या तरुण खेळाडूंचं जाम कौतुक वाटत आहे. जगातील नामांकित माजी खेळाडू प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करत आहेत आणि काही दर्जेदार महान आजी खेळाडूंसोबत खांद्याला खांदा लावून याच तरुण खेळाडूंना मोठ्या स्तरावर खेळता येत आहे. संधीचं सोनं करण्याकरिता हीच तरुणाई जिवाचं रान करताना बघून भारतीय क्रिकेटचं भवितव्य उज्ज्वल असल्याचा विश्वास वाटत आहे.

दुखापतींचं ग्रहण
आयपीएल स्पर्धा सुरू होत असतानाच मी लेखातून कल्पना दिली होती, की संयुक्त अरब अमिरातीमध्ये यंदाची आयपीएल स्पर्धा होणार असल्यानं वातावरणाचा मोठा परिणाम खेळाडूंवर होणार आहे. प्रत्येक संघानं स्थानिक गरम हवेशी जुळवून घ्यायला चांगले भरपूर दिवस सराव केला. तरीही ४० डिग्रीच्या तापमानात आणि कधीकधी प्रचंड उकाड्यात सामना खेळणं खेळाडूंकरिता भलतंच आव्हानात्मक ठरत आहे. खेळाडू म्हणत आहेत, की कधीकधी एका षटकात २ धावा २ वेळा धावून केल्या, की लागणारी धाप संपायला जास्त वेळ लागतो आहे. कितीही पाणी प्यायलं तरी इतका घाम शरीरातून जातो आहे, की मोठी खेळी केलेल्या फलंदाजाला सामन्यानंतर बक्षीस समारंभाला हजर राहण्याइतपत त्राण अंगात राहत नाहीयेत. ईशांत किशन आणि एबी डिव्हिलियर्सनं सर्वोत्तम खेळीनंतर सामनावीराचं बक्षीस मैदानात येऊन स्वीकारलं नाही, इतकं ते दमले होते असं समजलं.

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत बर्‍याच खेळाडूंना दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. मिशेल मार्श बिचारा पहिल्याच सामन्यानंतर दुखापतीनं मायदेशी परतला. अश्विनला विचित्र दुखापत झाली, ज्यातून तो सावरला हे त्याचं भाग्य म्हणावं लागेल. आता स्पर्धा निर्णायक वळणावर जात असताना रिषभ पंत आणि भुवनेश्वर कुमारला दुखापतीनं ग्रासलं आहे. नको त्या वेळी प्रमुख खेळाडूंना दुखापतीनं जायबंदी करू नये, याकरिता सर्वच संघांचे सपोर्ट स्टाफ अविरत काम करत आहेत. गंमत म्हणजे, दुखापती चेंडू लागून किंवा इतर कोणत्या आघातानं होत नाहीयेत, तर अत्यंत अनपेक्षित प्रकारे होत आहेत. स्पर्धा होत असलेल्या तीनही स्टेडियमचं मैदान बाहेर टीव्हीवर अगदी हिरवंगार दिवस असलं, तरी त्याच्या खालची माती ही माती नसून रेती आहे. या रेतीत हात-पाय अडकून खेळाडूंना विचित्र दुखापती होत आहेत. निर्णायक सामन्यात कोणाला दुखापत होऊ नये म्हणून काळजी घेण्याबरोबर प्रार्थनाही केल्या जात आहेत.

मनं जोडणारा खेळ
काही वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या उरी गावच्या काला पहाड ब्रिगेडनं असीम फाउंडेशनसोबत एक मजेदार उपक्रम केला होता. भारतीय सैन्य आणि स्थानिक नागरिक यांच्यात समन्वय असावा म्हणून काम करणार्‍या असीम फाउंडेशननं उरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा काला पहाड ब्रिगेडच्या नितांत सुंदर मैदानावर भरवली, ज्यात १० संघ सहभागी झाले होते. ज्या परिसरात स्थानिक नागरिक तणावामुळं फिरकत नव्हते, त्या मैदानावर अंतिम सामना बघायला ८ हजार लोक जमा झाले. मग उरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत चांगलं काम करणार्‍या निवडक मुलांचा संघ पुण्यात आणून असीमनं प्रशिक्षणासोबत चांगले सामने दिले.

याच आठवड्यात असीम फाउंडेशननं काश्मीर खोर्‍यातील अनंतनाग जवळच्या डोरू गावात आगळीवेगळी स्पर्धा १९ राष्ट्रीय रायफल्स सोबत भरवली होती. क्रिकेट स्पर्धा भरवली तर त्यात विशेष काय... चारच संघांची स्पर्धा झाली तर त्यात विशेष काय... पण जेव्हा हीच स्पर्धा काश्मीरच्या चार महिला संघांच्यात झाली, तेव्हा मग महत्त्व कळतं. होय, काश्मीर खोर्‍यातील पहिली महिलांची क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा मान म्हणा किंवा धाडस म्हणा हे असीम फाउंडेशननं १९ राष्ट्रीय रायफल्स युनिट बरोबर करून दाखवलं. या उपक्रमाला इरफान पठाण आणि सचिन तेंडुलरकनं पाठिंबा दिला होता.

क्रिकेट हा भारतात नुसता खेळ नसून, तो माणसांना आणि त्यांच्या मनांना जोडणारा दुवा आहे, असंच या उपक्रमातून दिसून येतं. एकीकडं आयपीएल स्पर्धेनं लोकांच्या मनातील निराशा दूर व्हायला मोठी मदत झाली आहे. दुसरीकडं काश्मीरच्या मुलींना पहिल्यांदा स्थानिक क्रिकेट स्पर्धेत भाग घेता आला, जी भारतीय सैन्यानं आयोजित केली होती. थोडक्यात, क्रिकेट म्हणजे अगदी रामबाण मलम वाटतं. कोणत्याही व्याधीवर उपाय करणारं रामबाण औषध. कोणाला खूप आवडत असेल, तर कोणाला कमी; पण क्रिकेटचा आधार प्रत्येकाला असतोच. हो की नाही?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com