esakal | संकटांशी ‘सामना’ (सुनंदन लेले)
sakal

बोलून बातमी शोधा

sunandan lele

कोकण किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या गावांमधल्या घरांत सोलर दिवे लावण्याच्या उपक्रमासाठी ‘दिवा लागू दे रे देवा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. इतर कलाकारांबरोबर सचिन तेंडुलकर, स्मृती मानधना, केदार जाधव आणि अजिंक्य रहाणे यांनी त्यांच्या कारकिर्दीत कठीण प्रसंग कसे आले आणि त्यातून त्यांनी मार्ग कसा काढले, याबाबतचे किस्से सांगितले. या प्रेरणादायी प्रसंगांविषयी...

संकटांशी ‘सामना’ (सुनंदन लेले)

sakal_logo
By
सुनंदन लेले sdlele3@gmail.com

कोकण किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या गावांमधल्या घरांत सोलर दिवे लावण्याच्या उपक्रमासाठी ‘दिवा लागू दे रे देवा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. इतर कलाकारांबरोबर सचिन तेंडुलकर, स्मृती मानधना, केदार जाधव आणि अजिंक्य रहाणे यांनी त्यांच्या कारकिर्दीत कठीण प्रसंग कसे आले आणि त्यातून त्यांनी मार्ग कसा काढले, याबाबतचे किस्से सांगितले. या प्रेरणादायी प्रसंगांविषयी...

कोकण किनारपट्टीला ‘निसर्ग’ वादळानं दिलेला तडाखा भयानक मोठा होता. ज्या गावी आपण फिरायला जातो, त्या कोकणातल्या जागांची ‘निसर्ग’नं काय अवस्था करून ठेवली हे फोटोतून बघितल्यावर हादरायला होतं. कोकणी माणूस संकट आलं, तरी डगमगत नाही, की मदत मागायला हात पुढं करत नाही. काही भागांत लोकांनी पाण्याच्या भरलेल्या टाक्या पतंगासारख्या उडून कोसळलेल्या बघितल्या आहेत. मग ज्या कोकणात आपण निसर्गाचा आनंद घ्यायला जातो, त्याला ‘निसर्ग’ वादळानं झोडपून काढल्यावर आपणहून मदतीचा हात पुढे केला नाही तर काय अर्थ आहे? मला कल्पना आहे, की बऱ्याच समाजसेवी संस्थांनी आपणहून मदत केली आहे. विचार मनात आला, की ज्या गरीब घरांत संध्याकाळी, रात्री अंधाराचं साम्राज्य असतं, त्या कोकण किनारपट्टीवरच्या गरिबांच्या घरात आपण सोलर दिवे लावू शकतो का- जेणेकरून त्यांच्या घरात प्रकाश पसरेल.

मग कलाकार मित्र- मैत्रिणींना फोन केला; तसंच हक्काच्या खेळाडूंनाही मदतीची साद घातली आणि २ ऑगस्ट रोजी ‘दिवा लागू दे रे देवा’ हा कार्यक्रम ऑनलाईन सादर केला आणि सोलर दिवे लावण्याकरता निधी उभारला. या कार्यक्रमात चार खेळाडूंनी त्यांच्या कारकिर्दीत कठीण प्रसंग कसा आला आणि त्यातून त्यांनी मार्ग कसा काढला हे किस्से सांगत स्पष्ट केलं. तीच चार मोजकी उदाहरणं मला तुमच्यापर्यंत पोचवावीशी वाटली.

सचिन तेंडुलकर :
भारतीय संघ सन २००३-०४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला असतानाची गोष्ट मला आठवते. त्यावेळी माझी फलंदाजी उत्तम होत होती आणि मनात विचार येत होता, की ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सांगावं, की या दौऱ्यात तुमची गाठ माझ्याशी आहे. ब्रिस्बेन सामन्यात मला माझ्या लाडक्या (!) पंचांनी राखी बांधली. मी बाद नसताना मला बाद दिलं. नंतरच्या अ‍ॅडलेड सामन्यात चांगली फलंदाजी जमत असताना मी बाद झालो. तिसऱ्या कसोटीत मेलबर्नला तसंच झालं. त्यानंतर मला जरा वैतागायला झालं होतं- कारण चांगली फलंदाजी होत असल्याचा विश्वास असताना मोठी खेळी उभारता येत नव्हती.
मला आठवतं, त्यावेळी माझा भाऊ अजितबरोबर संवाद झाला. तो म्हणाला होता, की फलंदाजीच्या तंत्रात काही चूक दिसत नाहीये. थोडी गडबड होत आहे ती कोणत्या चेंडूवर कोणता फटका मारायचा याच्या निवडीची. अजित म्हणाला, की ‘कोणताही गोलंदाज तुला बाद करतो आहे असं दिसत नाहीये. तू मला सिडनी कसोटीत नाबाद राहून दाखव.’ मग मी अजितला तसा शब्द दिला. विचार पक्का केला आणि ठरवलं, की सिडनी कसोटीत मनावर ताबा ठेवायचा. उजव्या बाजूला फटका मारायचाच नाही. आक्रमक फटका मारायला जायचं नाही. उजव्या बाजूला मला फटके मारायला आवडतात आणि मला जमतात; पण त्या कसोटीत मी नियंत्रण ठेवलं. परिणाम असा झाला, की त्या कसोटीत मी दोनही डावांत बाद झालो नाही. पहिल्या डावात मी नाबाद २४१, तर दुसऱ्या डावात नाबाद ६० धावा केल्या.
या उदाहरणाचा संदर्भ आत्ताच्या परिस्थितीशी लावायचा झाला, तर मी इतकंच सांगीन, की प्रत्येकाला आत्ता नेहमीच्या किंवा आवडणाऱ्या गोष्टी करता येत नाहीयेत, हे मान्य आहे. आपल्यावर खूप बंधनं आहेत; पण आपण फक्त आपलाच विचार करणार का सगळ्यांचा करणार? सिडनी कसोटीत मी संघाचा विचार केला आणि नैसर्गिक आक्रमक खेळाला आवर घातला. परिणाम चांगलाच झाला ना. तसंच आहे काहीसं सध्याच्या घडीला. आपण जर सगळ्यांनी बंधनं आणि शिस्त पाळली, तर शेवटी यश आपल्यालाच मिळणार आहे. आपण सगळे म्हणजे एक भारतीय संघ आहोत. सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धची लढाई जिंकायची आहे. कठीण परिस्थितीतून जाताना कोणीही निराशा मनात आणायची नाहीये आणि स्वप्न बघणं सोडायचं नाहीये. पाच विश्वकरंडक स्पर्धांत अपेक्षित यश मिळालं नाही, तरीही मी आशा सोडली नाही आणि सहाव्या प्रयत्नात मला यश लाभलं. लक्षात ठेवा, की आपल्या सगळ्यांना कोरोनावर मात करून कष्ट करून स्वप्नांचा पाठलाग करायचा आहे.

स्मृती मानधना :
बहुतांश लोकांकरता चांगल्या गोष्टी यशाचे पल्ले प्रवासातले मैलाचा दगड ठरतात. माझ्याकरता माझ्या गुडघ्याला झालेली दुखापत टर्निंग पॉइंट ठरली. झालं काय, की मी ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग खेळायला गेले होते. पहिली बिग बॅश लीग पहिल्यांदा खेळतानाही मला बरेच काही शिकायला मिळाले. नवीन संघ, नवीन खेळाडू, नवीन वातावरण होतं. कोणी कोणाशी जास्त बोलायचं नाही. सगळं काही शिस्तीला धरून. तसं राहून खेळणं हाच माझ्याकरता धडा होता. जणू काही ते सोशल डिस्टन्सिंग होतं. आता मागे वळून बघताना मला जाणवतं आहे, की त्यातून किती शिकले. बऱ्याच वेळा एखादा चांगला सिनेमा बघायला आपण मित्र- मैत्रिणीला भेटणं टाळतो. आता जेव्हा सगळ्यांना घरीच बसावं लागतं आहे, तेव्हा समजतं आहे, की आपल्या लोकांना भेटणं किती छान असतं आणि मोलाचं असतं.
दुसऱ्या बिग बॅश लीग खेळायला गेले असताना स्पर्धेच्या अगदी सुरुवातीला माझ्या गुडघ्याला जबरदस्त दुखापत झाली. दुखापतीवर मोठी शस्त्रक्रिया करून मग मला घरी परतावं लागलं. मोठा क्रिकेट मोसम माझ्यापासून दूर गेला, म्हणून मी चार दिवस रडत बसले होते. नंतर मला जाणवलं, की रडून दुखापत बरी होणार नाही, की आपल्याला कोणी मैदानावर नेणार नाहीये. मैदानावर जोमानं परतायचं असेल, तर दु:ख मागं सारून दुखापतीतून बरं व्हायला प्रयत्न करावे लागतील. मग मी फिजिओ आणि ट्रेनरशी बोलून मार्ग आखला. गुडघ्यावर ऑपरेशन केल्यावर मैदानावर पाऊल ठेवायला सहा महिने लागतात. माझ्याकडे पाचच होते कारण पाच महिन्यांनी वर्ल्डकप होता- जो मला अजिबात चुकवायचा नव्हता. मी निग्रह केला आणि योग्य व्यायाम जोमानं करून; तसंच आहारावर लक्ष देऊन पाच महिन्यांत दुखापतीतून सावरले आणि एकही सराव सामना न खेळता सरळ वर्ल्डकपचा सामना खेळले. केलेल्या मेहनतीनं मला साथ दिली आणि त्या पहिल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध चांगली खेळी करून संघाला विजयी करायला मोलाचा वाटा उचलता आला.
मला वाटतं, की कोरोना संकटातून जात असताना अवस्था बिकट आहे. रडून चालणार नाहीये. आपल्याला परत जोमानं उभं राहून यशाचा मार्ग शोधायचा आहे. ज्या गोष्टी आत्ता त्रासदायक वाटतात, त्यावर मात केली, की याच काळाची आठवण आपण काढणार आहोत, की कसं महासाथीच्या संकटाला आपण सामोरं गेलो.

केदार जाधव :
महेंद्रसिंह धोनीबरोबर खेळाचं माझं स्वप्न साकारल्यानंतर मला त्यानंच मोठ्या प्रेमानं चेन्नई सुपर किंग्ज् संघात सामील करून घेतलं. मी हरखून गेलो होतो. स्पर्धेच्या सुरुवातीलाच आमचा सामना बलाढ्य मुंबई इंडियन्सबरोबर होता. कर्णधारानं माझ्यावर विश्वास टाकत मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं होतं. त्या सामन्यात थोडा जम बसला असताना माझ्या मांडीच्या मागच्या स्नायूंना म्हणजेच हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली. पळणं तर सोडाच; पण हालचाल करतानाही असह्य वेदना व्हायला लागल्या. सामन्यात असं नाट्यमय वळण आलं, की दुखापतग्रस्त अवस्थेत मला फलंदाजीकरता मैदानावर परत यावं लागलं. तेसुद्धा दडपणाखाली शेवटचं षटक खेळून संघाला गरज असणाऱ्या धावा करण्याचं आव्हान होतं.
नको त्या वेळी दुखापत झाल्याचं दु:ख विसरून मी मैदानात आलो. समोर फिरकी गोलंदाज इम्रान ताहीर फलंदाजीला होता. मी तीन चेंडू जरा नजर बसवण्याकरता घेतले तेव्हा बहुतांश लोकांना मला दडपण झेपलं नसल्याचं वाटलं. एक सांगतो तुम्हाला- मला आत्मविश्वास होता, की कोणतातरी मोठा फटका मारून विकेट गमावण्यापेक्षा नजर बसवून मग गोलंदाजावर हल्ला चढवायची क्षमता माझ्यात होती. मी चौथ्या चेंडूवर बरोबर षटकार मारला आणि पाचव्या चेंडूला सीमापार धाडून संघाला विजयी केलं.
मला यातून शिकायला मिळालं, की काही वेळा नको त्या वेळी आपल्याला मोठी अडचण येते. जर मेहनतीचं पाठबळ तुमच्या मागं उभं असेल, तर त्या कठीण काळातही तुमचा विश्वास डळमळत नाही. मन शांत ठेवून संकटाचा सामना केला, तर शेवटी यश मिळतंच हे मला त्या प्रसंगातून दिसून आलं. माझ्याकरता तो सामना, तो प्रसंग, ते संकट आणि शेवटी हाती आलेली ती संधी बरंच काही शिकवून गेली. मी म्हणीन, की कोरोना संकटातून जात असताना कित्येक लोकांना नोकरीत, व्यवसायात असंच संकट सामोरं ठाकलं असेल- ज्यानं चिडचिड होत असेल. पण, संयम ठेवला आणि आत्मविश्वास कायम असला तर परत उसळी मारता येते हे मी नक्की सांगतो.

अजिंक्य रहाणे :
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला असताना घडलेला हा किस्सा आहे. माझ्या कसोटी कारकिर्दीचा तो सुरुवातीचा काळ होता. समोर डेल स्टेनसारखा अत्यंत वेगवान निष्णात गोलंदाज गोलंदाजी करत होता. विकेटही वेगवान गोलंदाजांना थोडी साथ करत होती. आमच्या काही महत्त्वाच्या फलंदाजांना गोलंदाजांनी दर्जेदार मारा करून बाद केलं होतं. त्या डावादरम्यान डेल स्टेननं तिखट मारा करताना मला कधी खांद्यावर, तर कधी चक्क हेल्मेटवर चेंडूचा दणका दिला होता. हेल्मेटवर चेंडू लागल्यावर डेल स्टेननं मला सांगितलं, की ‘या पातळीवर खेळायची तुझी क्षमता दिसत नाही... तू आत जा बॅग पॅक करून बस.’ त्याचा प्रयत्न मला चिडवायचा होता. मलाही राग आला होता. वाटलं, की आक्रमक पवित्रा घेऊन त्याच्यावर हल्ला चढवावा. नंतर मी भानावर आलो आणि समजून चुकलो, की रागाच्या भरात खराब फटका मारून विकेट गमावणं संघाला परवडणारं नाही. त्याच वेळी लंच टाइमकरता खेळ थांबला. मला आठवतं, की त्या दरम्यान मी काहीच खाल्लं नाही. मी शांत एका कोपऱ्यात बसून विचार करत होतो, की पाय घट्ट रोवून फलंदाजी करून संघाला अडचणीतून बाहेर कसं काढायचं.

नंतर फलंदाजी करतानाही मला डेल स्टेनचा चेंडू रपकन् बरगडीत बसला. मी कुठं लागला हे कळू न देण्याकरता आघात जास्त झालाच नाही असं दाखवलं. तो अगदी जवळ येऊन मला न्याहळत होता. परत फिरताना म्हणाला, की ‘माझी पाठ वळल्यावर चोळलंस तरी हरकत नाही- कारण तुला चेंडू चांगलाच लागला आहे.’ मी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्या खेळीत मी लढत दिली. दर्जेदार वेगवान गोलंदाजाला तिखट खेळपट्टीवर खेळायची हिंमत दाखवली म्हणून त्या खेळीचं मोठं समाधान मला लाभलं.
आत्ता परिस्थिती सगळ्यांनाच तसेच फटके देत आहे, याची कल्पना आहे. आपला उद्देश मोठा आहे, हे लक्षात ठेवावं लागेल आणि स्वत:बरोबर आपल्या कुटुंबाचा, ऑफिसचा, व्यवसायाचा विचार करावा लागेल. देशाचा विचार करावा लागेल आणि आघात सहन करून लढत देणं चालू ठेवावं लागेल. क्रिकेटच्या खेळानं हे नक्की शिकवलं आहे, की चांगली असो, वा वाईट- कोणतीच अवस्था कायम राहत नाही. सध्या जरी अवस्था बिकट असली, तरी ही फेजही जाणार आहे हा विश्वास कायम ठेवा आणि शिस्त पाळून लढाई चालू ठेवा.

खेळाडू मैदानावरील प्रसंगाची सध्याच्या परिस्थितीशी सांगड कशी बेमालूमपणे घालतात हे ऐकून हुरूप आला. कोरोनाशी लढा देताना हे प्रसंग बरेच काही शिकवून जातात आणि नव्यानं लढायला आशा निर्माण करतात, असं वाटतं ना तुम्हाला?