झालं काय; होणार काय? (सुनंदन लेले)

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
रविवार, 5 जानेवारी 2020

भारतीय क्रीडारसिकांसाठी २०२० हे वर्ष अतिशय रंजक असणार आहे. महिलांच्या आणि पुरुषांच्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धांबरोबर टोकियो ऑलिपिंक्सही याच वर्षात होणार आहे. या स्पर्धांना भारतातले खेळाडू कसे सामोरे जात आहेत, कशी तयारी करत आहेत याचा आढावा आणि सरत्या वर्षातल्या कामगिरीचंही विश्वेषण.

भारतीय क्रीडारसिकांसाठी २०२० हे वर्ष अतिशय रंजक असणार आहे. महिलांच्या आणि पुरुषांच्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धांबरोबर टोकियो ऑलिपिंक्सही याच वर्षात होणार आहे. या स्पर्धांना भारतातले खेळाडू कसे सामोरे जात आहेत, कशी तयारी करत आहेत याचा आढावा आणि सरत्या वर्षातल्या कामगिरीचंही विश्वेषण.

भारतीय खेळजगताकरता २०१९ हे वर्ष चांगलं गेलं. वैयक्तिक असो वा सांघिक खेळ, भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. सुरू झालेलं नवीन वर्ष खूप अपेक्षा घेऊन दाखल झाले आहे. होय! सन २०२० कडून खेळचाहत्यांना खूप अपेक्षा आहेत- कारण आधी महिलांचा आणि नंतर पुरुषांचा टी-२० विश्वकरंडक याच वर्षात होणार आहे आणि त्याच्या अगोदर बरोबर मध्ये टोकियो ऑलिंपिक्स होत आहेत. भारताचे महिला आणि पुरुष दोन्ही क्रिकेट संघ टी-२० विश्वकरंडकात धमाल उडवायची शक्यता दाट आहे. टोकियो ऑलिंपिक्समध्ये काही मोजक्या खेळ प्रकारांत भारतीय खेळाडू पदकाला गवसणी घालणारी कामगिरी करतील, अशी दाट शक्यता वाटते आहे. म्हणूनच २०२० हे वर्ष खेळ प्रेमींकरता उत्साहाचं भरतं आणत आहे.

मागे वळून पाहता
गेल्या वर्षातल्या चांगल्या कामगिरीवर नजर टाकणं गरजेचं आहे. सरत्या वर्षातली सर्वांत कमाल कामगिरी अर्थातच पी. व्ही. सिंधूनं केली. तिनं विश्वविजेतेपदाला गवसणी घातली तेव्हा. वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सिंधू पहिली महिला खेळाडू ठरली. त्याच स्पर्धेत साई प्रणीथनं कांस्यपदक जिंकून कमाल कामगिरी केली.
नेमबाजीच्या खेळ प्रकारांत भारतीय खेळाडूंचा बोलबाला होता. सन २०१९च्या विश्व नेमबाजी स्पर्धेत भारतीय संघातले मनू भाकेर, इलावनील आणि दिव्यांश सिंग पन्वर यांनी अशी काही जबरदस्त कामगिरी केली, की भारताला तीन सुवर्णपदकांसह अव्वल मानांकन मिळालं. त्याच खेळात सौरभ चौधरीनं विश्वविक्रम करत सुवर्णपदक जिंकत ऑलिंपिक्स स्पर्धेकरता नाव पक्कं केलं.
गेल्या वर्षी बॉक्सिंगच्या खेळातली कामगिरीही सरस झाली. विश्व स्पर्धेत अमित फंगलनं रौप्यपदक पटकावून कमाल केली. इतक्या मोठ्या स्पर्धेत पदक पटकावणारा तो पहिला भारतीय बॉक्सर ठरला. मनीष कौशिकनं कांस्यपदक पटकावलं. महिलांनी बॉक्सिंगच्या खेळात जागतिक स्पर्धेवर ठसा उमटवणं कायम ठेवलं. मंजू रानीनं रौप्य, तर मेरी कोम, लवलीना आणि जमुना बोरो यांनी कांस्यपदकांची कमाई करून बॉक्सिंग रिंग गाजवली.
त्याचबरोबर लक्षणीय प्रगती कुस्तीमध्ये दिसून आली. गेल्या वर्षी जागतिक कुस्ती स्पर्धेत पाच पदकांची कमाई आपण केली. दीपक पुनियाचं सुवर्णपदक थोडक्यात गेलं; पण अशा मोठ्या स्पर्धेत रौप्यपदकही कमी नक्कीच नव्हतं. रवी कुमार, बजरंग पुनिया, विनेश फोगट बरोबरीनं आपल्या मराठी मल्लानं म्हणजे राहुल आवारेनं कांस्यपदकांची कमाई केली.
याचाच अर्थ असा, की बॉक्सिंग, बॅडमिंटन, नेमबाजी या खासकरून तीन खेळ प्रकांरात भारतीय खेळाडूंनी चांगली प्रगती दाखवली आहे. स्पोर्टस् अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियानं विचारपूर्वक ऑलिंपिक टास्क फोर्सची निर्मिती केली आहे आणि मोजक्या खेळ प्रकारांवर नियोजन करून चांगल्या खेळाडूंना प्रशिक्षणाचं पाठबळ दिलं आहे. असं करताना चांगला निधी सरकारनं खूप अगोदर उपलब्ध करून दिला आहे. भारतातल्या चांगल्या प्रशिक्षण संस्था, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ एका दिशेला वाटचाल करतील याकडे लक्ष दिलं. थोडक्यात सांगायचं, तर टोकियो ऑलिंपिक्सकरता भारतीय खेळ प्राधिकरणानं सुनियोजित मेहनत केली आहे, हे मान्य करावं लागेल.

क्रिकेटमध्ये काय घडलं?
भारतीय संघाच्या कसोटी क्रिकेटकरता वर्ष २०१९ भन्नाट गेलं. कारण आठ कसोटी सामन्यांपैकी सात सामने आपण जिंकलो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळलेल्या २९ सामन्यांपैकी आठ हरलो, दोन सामने निकालाविना गेले आणि उरलेले १९ सामने आपण जिंकलो. टी-२० क्रिकेटबद्दल बोलायचं झालं, तर २०१९ या वर्षात भारतीय संघानं १७ सामने खेळले- ज्यातले नऊ सामने जिंकले.
सरत्या वर्षाबद्दल बोलताना विराट कोहली म्हणतो : ‘‘आपण क्रिकेटच्या तीनही प्रकारांत दमदार कामगिरी केली. विश्वकरंडक स्पर्धेतला आपला खेळ उत्तमच होता. न्यूझीलंड संघाविरुद्ध पहिल्या दिवशी सामन्यात रंग भरलेला असताना पावसानं घोळ घातला. दुसऱ्या दिवशी म्हणजे १० जुलैला फक्त ३० मिनिटं आमचा खेळ चुकला आणि सगळ्या कष्टावर पाणी पडलं. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी फारच चांगला मारा केला आणि आमच्या चुका होत गेल्या. तो अत्यंत महत्त्वाचा उपांत्य सामना आपण गमावला. त्याचा अपवाद वगळता आपण खरंच सर्वांगीण चांगला खेळ संपूर्ण वर्षभर करून दाखवला आहे.’’
विराट कोहलीच्या बोलण्यात सत्य असलं, तरी विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतला तो पराभव खरंच जीवघेणा होता.

यंदा काय होणार?
सुरू झालेलं वर्ष भारतीय खेळजगताकरता सर्वार्थानं मोलाचं असणार. एकाच वर्षात ऑलिंपिकसह दोन टी-२० विश्वकरंडक खेळवले जाणार आहेत आणि भारतीय खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची रास्त अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. टोकियो ऑलिंपिक्स स्पर्धेत पी. व्ही. सिंधूकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. मान्य आहे, की विश्वविजेतेपदाला गवसणी घातल्यानंतर सिंधूच्या कामगिरीत घसरण झाली; पण खात्रीलायक सूत्रांकडून समजलं आहे, की सिंधू परत एकदा पुलेला गोपीचंदसोबत जोरदार मेहनत करून ऑलिंपिक्स स्पर्धेच्या तयारीला लागली आहे. ‘‘होय. टोकियोला सर्वोत्तम खेळ करून सुवर्णपदकाला गवसणी घालायचा माझा मानस आहे. त्याकरता माझ्या खेळातला चुका सुधारण्याकरता मी झटत आहे. माझे प्रशिक्षक संभाव्य प्रतिस्पर्ध्यांचा अभ्यास करून त्यांच्या चालींना काटशह कसा देता येईल, हे ठरवून नवीन बदल माझ्या खेळात करत आहे. काही नवीन फटके अंगी बाणवणं आणि बचावाचं तंत्र सुधारत आहे. दमसास कसा टिकेल याचा विचार करून व्यायामावर भरपूर भर दिला जात आहे. मोठ्या सामन्यात सर्वोत्तम खेळाडूंसमोर यश मिळवायचं झालं, तर मला संयम वाढवणं गरजेचं आहे. तोच संयम ठेवण्याकरता वेगळे व्यायाम विचार चालू आहेत. मी इतकंच सांगीन, की वर्ष २०२० खास बनवण्यासाठी आम्ही झटत आहोत,’’ असे विचार सिंधूनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मांडले आहेत. ऑलिंपिक्स स्पर्धेच्या सुवर्णपदकाच्या ध्यासानं पछाडलेली सिंधू टोकियोला चमत्कार करेल, असा विश्वास वाटतो आहे.
टोकियोला होणाऱ्या स्पर्धेत मोठ्या अपेक्षा आपल्या नेमबाज आणि बॉक्सींग खेळाडूंकडून ठेवायलाच पाहिजेत. गेली दोन वर्षं याच खेळाडूंवर भारत सरकारनं सुयोग्य पद्धतीनं मेहनत घेतली असल्यानं त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. आता फक्त सर्वांत मोठ्या स्तरावर आणि मानाच्या स्पर्धेतलं दडपण बाजूला झुगारून सर्वोत्तम कामगिरी करून दाखवायची जिद्द खेळाडूंनी बाळगणं गरजेचं आहे.
टोकियो ऑलिंपिक्स स्पर्धेनंतर सर्वांत मोठं आकर्षण अर्थातच दोन टी-२० विश्वकरंडकांचं असेल. फेब्रुवारी- मार्च महिन्यात महिलांचा टी-२० विश्वकरंडक होणार आहे. सध्या भारतीय महिला संघ ज्या तडफेनं खेळतो आहे, त्याचा विचार करता सगळ्यांना ८ मार्चला म्हणजेच जागतिक महिला दिनी भारत- ऑस्ट्रेलिया अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर रंगेल, अशी आशा आहे. हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, जेमिमा रॉडरिग्ज् आणि नवी क्रिकेट तारका शेफाली वर्मा भारतीय संघाला नवी उंची गाठून देण्याकरता कष्ट करत आहेत. माजी खेळाडू डब्ल्यू. व्ही. रमन उणिवा शोधून त्यावर उपाय योजून महिला संघाला योग्य मार्गदर्शन करत आहे.

सर्वांत मोठे आव्हान
सरतं वर्ष विराट कोहलीच्या संघाकरता भन्नाट गेलं यात शंका नाही. तरीही २०२० या वर्षातलं आव्हान जरा जास्तच मजेदार असेल. याचं कारण आहे, की भारतीय संघानं २०१९ मध्ये त्यामानानं कमकुवत संघांशी मुकाबला केला आहे. येत्या वर्षाची सुरुवातच न्यूझीलंड दौऱ्यानं होत आहे. न्यूझीलंड संघासमोर त्यांच्या अंगणात होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांत भारतीय संघाचा खरा कस लागेल. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात टी-२० विश्वकरंडक रंगेल. विराट कोहलीला बाकी यश भरपूर हाती लागलं असलं, तरी आयसीसी स्पर्धांमध्ये कोहली फलंदाज म्हणून आणि कर्णधार म्हणून म्हणावा तसा चमकलेला नाही. मुख्य ५० षटकांचा विश्वकरंडक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी-२० विश्वकरंडक या तीनही मानाच्या आयसीसी स्पर्धांत भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली विजेता ठरलेला नाही. जिद्दी विराटला ही गोष्ट चांगलीच खटकत आहे. म्हणूनच २०२० मधल्या टी-२० विश्वकरंडकाचं आव्हान कसं पेलायचं, याचा विचार कोहली आत्तापासून करत असणार.
त्यापेक्षा मोठं आव्हान नंतर असेल. भारतीय संघ टी-२० विश्वकरंडकानंतर लगेच यजमान ऑस्ट्रेलियासमोर चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. गेल्या दौऱ्यात भारतीय संघानं मालिका जिंकली, तेव्हा डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ शिक्षा भोगत होते. मनात खुन्नस ठेवणारे ऑसी खेळाडू भारतीय संघाला धोबीपछाड टाकायला टपून बसले आहेत. याचा विचार करता चार कसोटी सामन्यांची मालिका खूप मोठं आव्हान भारतीय संघासमोर उभं करणार आहे.
एकंदर विचार करता वर्ष २०२० भारतीय खेळरसिकांकरता कसं मजेचं असणार आहे याचा हा आढावा. तेव्हा कॅलेंडरवर तारखा आखून राखून ठेवा आणि विविध स्पर्धांचा आनंद घ्यायला सज्ज होऊयात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sunandan lele write tokyo olympics 2020 india article