महाभयंकर पर्वाचा आरंभ (संदीप वासलेकर)

संदीप वासलेकर
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

तलवारीपासून बंदुकीकडे, बंदुकीपासून बाँबकडे, नंतर अण्वस्त्रांकडे व आता कृत्रिम प्रज्ञेकडे असा आपल्या संहारक तंत्रज्ञानाचा प्रवास होत गेला. काही धोरणांमुळे अथवा अपघातामुळे चूक झाली तर येत्या काही वर्षांत कृत्रिम प्रज्ञेची शस्त्रं, अण्वस्त्रं आणि क्षेपणास्त्रं यांच्या संयुक्त वापरानं मनुष्यसृष्टी काही तासांत भस्मसात होऊ शकते. मानवाच्या इतिहासातल्या सर्वात भयंकर पर्वाचा आरंभ झाला आहे.
यातून जर मानवी जीवन वाचवायचं असेल तर विवेकबुद्धी हाच एक मार्ग होय.

तलवारीपासून बंदुकीकडे, बंदुकीपासून बाँबकडे, नंतर अण्वस्त्रांकडे व आता कृत्रिम प्रज्ञेकडे असा आपल्या संहारक तंत्रज्ञानाचा प्रवास होत गेला. काही धोरणांमुळे अथवा अपघातामुळे चूक झाली तर येत्या काही वर्षांत कृत्रिम प्रज्ञेची शस्त्रं, अण्वस्त्रं आणि क्षेपणास्त्रं यांच्या संयुक्त वापरानं मनुष्यसृष्टी काही तासांत भस्मसात होऊ शकते. मानवाच्या इतिहासातल्या सर्वात भयंकर पर्वाचा आरंभ झाला आहे.
यातून जर मानवी जीवन वाचवायचं असेल तर विवेकबुद्धी हाच एक मार्ग होय.

इस्राइलच्या सैन्याकडे ‘हार्वी’ नावाचं एक यंत्र आहे. ते आकाशात सोडलं तर आसपासच्या परिसरातल्या रडारचा वेध घेतं. शत्रुपक्षाचं रडार कुठं आहे हे या यंत्राला कृत्रिम प्रज्ञेमुळे (Artificial Intelligence) समजलं तर ते यंत्र इस्राइलच्या सैन्याची परवानगी न घेता स्वतःहूनच रडारच्या जवळ जाऊन त्यावर बाँब टाकून रडार नष्ट करतं.

पुढं कधी युद्ध होईल तेव्हा युद्धाच्या आधी इस्राइल अशी दोन-तीन डझन ‘हार्वी’ यंत्रं शत्रूच्या प्रदेशात सोडेल व तिथली सर्व रडार नष्ट करील. काही तासांनी इस्राइलचं विमानदल त्या विभागावर बिनधास्त हल्ला करेल. शत्रुपक्षाकडे रडार नसल्यानं इस्राइलच्या विमानांना मोकळं आकाश मिळेल व ती विमानं शत्रूवर मोठा हल्ला करू शकतील. इस्राइलमध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात कृत्रिम प्रज्ञा वापरून शस्त्रास्त्रं निर्माण करण्याचे कारखाने निघाले आहेत.

हे असं असूनही इस्राइल बिलकूल सुरक्षित नाही. इस्राइलच्या उत्तर सीमेवर लेबनॉन आहे. इस्राइलच्या सीमेच्या जवळ व लेबनॉनच्या दक्षिण भागात हिज्बुल्ला ही दहशतवादी संघटना आहे. तिच्याकडे एक लाखाहून अधिक अग्निबाण व क्षेपणास्त्रं आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अग्निबाणांचा व क्षेपणास्त्रांचा साठा अन्य कुठल्या देशांकडेही बहुतेक नसावा. इस्राइलनं जर हिज्बुल्लावर हल्ला केला तर हिज्बुल्ला सर्वच्या सर्व एक-सव्वा लाख अग्निबाण आणि क्षेपणास्त्रं केवळ इस्त्राइलच्या अणुबाँब करण्याच्या केंद्रावर अथवा जलशुद्धीकरण केंद्रावर टाकून इस्त्राइलला भस्मसात करू शकते अथवा किमान पाणीपुरवठा बंद करून जेरीस आणू शकते. परिणामी, या दहशतवादी संघटनेपासून इस्त्राइल सावध आहे व फार काही कारवाई करू शकत नाही.
इस्त्राइल, इराण, लेबनॉन, हिज्बुल्ला यांच्यात कृत्रिम प्रज्ञेची शस्त्रास्त्रं, अण्वस्त्रं व क्षेपणास्त्रं या सर्वांची सरमिसळ करून छोटं वा मोठं युद्ध होऊ शकतं; पण हा ‘साईड शो’ झाला.

कृत्रिम प्रज्ञेमुळे खरा बदल अमेरिका, रशिया, चीन या तीन राष्ट्रांच्या डावपेचांमध्ये होत आहे. यापुढे स्वतःहून शत्रूचा विध्वंस करू शकणारे निर्णय घेणारी स्वयंचलित शस्त्रास्त्रं तयार करण्यासाठी या तीन राष्ट्रांत चढाओढ सुरू झाली आहे. भविष्यातल्या युद्धांमध्ये सैन्याचे अधिकारी धोरणं ठरवतील; परंतु अनेक निर्णय कृत्रिम प्रज्ञेनं चालणारी स्वयंचलित शस्त्रास्त्रंच घेतील.
मानवानं स्वतःहूनच विनाशाचे निर्णय घेण्याची शक्ती स्वयंचलित यंत्रांच्या हाती स्वाधीन करणं म्हणजे मानवतेचा ऱ्हास होण्याचं लक्षण आहे. जर स्वयंचलित यंत्रं, अण्वस्त्रं व क्षेपणास्त्रं यांचा एकत्रित वापर झाला तर मानवाचाच अंत होण्याची शक्‍यता आहे.

संहार करण्याचे निर्णय कृत्रिम प्रज्ञेवर चालणाऱ्या स्वयंचलित शस्त्रांवर व क्षेपणास्त्रांवर सोपवल्यामुळे आपली सृष्टी अजून २५-३० वर्षांपलीकडे सुरक्षित राहील याची हमी नाही.
सुमारे दोन लाख वर्षांपूर्वी आधुनिक मानवाचा जन्म झाला. आज जी मानवी संस्कृती आहे त्या स्थितीपर्यंत पोचण्यासाठी एवढा प्रचंड कालावधी गेला. या काळात अनेक स्थित्यंतरं झाली. सुमारे सत्तर हजार वर्षांपूर्वी मानव हा आफ्रिका खंडातून बाहेर पडून जगभर पसरला. पुढे राज्य, समाज, गाव, धर्म, राष्ट्र या कल्पना उदयाला आल्या. या संकल्पनांमधून मानवी समाजाची रचना झाली. आपलं आयुष्य सुधारत गेलं. विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या प्रगतीमुळे जीवन अधिकाधिक सहज व सुकर होत गेलं. मात्र, त्याचबरोबर वैज्ञानिक प्रगतीतून संहारक शक्तीही वाढत गेली.

तलवारीपासून बंदुकीकडे, बंदुकीपासून बाँबकडे, नंतर अण्वस्त्रांकडे व आता कृत्रिम प्रज्ञेकडे असा आपल्या संहारक तंत्रज्ञानाचा प्रवास होत गेला. आता काही धोरणांमुळे अथवा अपघातामुळे चूक झाली तर येत्या काही वर्षांत कृत्रिम प्रज्ञेची शस्त्रं, अण्वस्त्रं आणि क्षेपणास्त्रं यांच्या संयुक्त वापरानं मनुष्यसृष्टी काही तासांत भस्मसात होऊ शकते. मानवाच्या इतिहासातल्या सर्वात भयंकर पर्वाचा आरंभ झाला आहे.
यातून जर मानवी जीवन वाचवायचं असेल तर विवेकबुद्धी हाच एक मार्ग आहे. ‘आमच्या क्षेत्राचा व आमच्या क्षमतांचा राजकीय गैरवापर करून जगात विध्वंस करू नये’ असं आवाहन कृत्रिम प्रज्ञेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे चार हजार शास्त्रज्ञांनी व तंत्रज्ञांनी केलं आहे. जगातल्या सुमारे १५० देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ठराव संमत करून अण्वस्त्रांवर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी केली आहे. स्वयंचलित विध्वंसक शस्त्रास्त्रांवर बंदी घालावी म्हणून एक जागतिक चळवळ उभी राहिली आहे.

असं असलं तरी जगातले १२ देश कृत्रिम प्रज्ञेची शस्त्रास्त्रं, अण्वस्त्रं व क्षेपणास्त्रं यांचा साठा करण्याची अभिलाषा व हट्ट धरून आहेत. त्यांच्याकडे पाहून इतरही काही देश त्या मार्गानं जाण्याचा विचार करत आहेत. अतिरेकी राष्ट्रवाद, धर्मप्रेम व महासत्ता यांचं वारेमाप आकर्षण या देशांतल्या सर्वसामान्य लोकांमध्ये आहे. मनुष्यसृष्टी सन २१०० पर्यंत अस्तित्वात असेल की त्याआधीच मानवाचा अस्त झालेला असेल हे काही देशांतलं शस्त्रप्रेम व अतिरेकी भावना, कृत्रिम प्रज्ञेतून होऊ शकणारे अपघात व या सर्वांवर मात करण्याची मानवाच्या विवेकबुद्धीची क्षमता यावर अवलंबून असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sundeep waslekar write nuclear terrorist article