esakal | "संकटाचा चेंडू टोलवू या' (सुनंदन लेले)
sakal

बोलून बातमी शोधा

sunandan lele

"आपल्याला आपल्या देशाला संकटातून बाहेर काढायचं आहे. सरकार करत असलेल्या उपाययोजनांना सर्वार्थानं साथ देऊयात. नवा चेंडू जास्त हलतो, तसा हा आजार त्रास देतो आहे. आपण आत्ता फक्त घरी थांबून या संकटाचा चेंडू टोलवू या. एकदा का संकटाची तीव्रता कमी झाली आणि कोरोनाला देशातूनच नाही, तर जगातून हाकलून लावलं, की मग सुखी तंदुरुस्त जीवनाची टकाटक बॅटिंग करूयात...' बहुपैलू क्रिकेटपटू रोहित शर्मा यानं "सकाळ'शी खास संवाद साधत व्यक्त केलेलं मनोगत.

"संकटाचा चेंडू टोलवू या' (सुनंदन लेले)

sakal_logo
By
सुनंदन लेले

"आपल्याला आपल्या देशाला संकटातून बाहेर काढायचं आहे. सरकार करत असलेल्या उपाययोजनांना सर्वार्थानं साथ देऊयात. नवा चेंडू जास्त हलतो, तसा हा आजार त्रास देतो आहे. आपण आत्ता फक्त घरी थांबून या संकटाचा चेंडू टोलवू या. एकदा का संकटाची तीव्रता कमी झाली आणि कोरोनाला देशातूनच नाही, तर जगातून हाकलून लावलं, की मग सुखी तंदुरुस्त जीवनाची टकाटक बॅटिंग करूयात...' बहुपैलू क्रिकेटपटू रोहित शर्मा यानं "सकाळ'शी खास संवाद साधत व्यक्त केलेलं मनोगत.

जसं त्याचं खेळणं तसंच त्याचं बोलणं. सरळ साधं सोपं आणि एकदम बिनधास्त. जितक्‍या सहजी तो चांगल्या गोलंदाजाचा अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू प्रेक्षकांत भिरकावून देतो, तितक्‍याच सहजी तो विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देतो. अगदी कोणताही बडेजाव न करता. तो सहजी बोलायला तयार होत नाही; पण बोलायला तयार झाल्यावर नखरेही करत नाही.... होय. मी "हिटमॅन' रोहित शर्माबद्दल बोलत आहे. कोरोना व्हायरस आटोक्‍यात यावा म्हणून संपूर्ण भारतात लॉकडाऊन पाळला जात असताना "एकंदर परिस्थितीबद्दल बोल ना रे,' अशी विनंती केली असता रोहित शर्मा "सकाळ'शी बोलायला तयार झाला. त्याच्याशी फोनवरून झालेली बातचीत झाली. त्यात रोहितनं सक्तीच्या विश्रांतीपासून ते सचिन तेंडुलकरसोबतच्या तुलनेपर्यंतच्या तमाम सगळ्या मुद्दयांवर गप्पा मारल्या. त्याचं हे मनोगत त्याच्याच शब्दांत...

""न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान तौरंगाला सामना खेळत असताना मला दुखापत झाली. मला हलताही येत नव्हतं- जे तुम्ही पत्रकार म्हणून बघितलं. मात्र, सामना खेळत असताना मनात विचार फक्त सर्वस्व झोकून देऊन फलंदाजी करण्याचे असतात. म्हणून दुखापत झाल्यावरही मी थोडा वेळ त्याच जोमानं फलंदाजी करायचा वेडा प्रयत्न केला. जेव्हा खेळणं शक्‍य नाही, हे कळून चुकलं, तेव्हा गपचूप आत आलो आणि मग लगेच मायदेशी परतलो. क्रिकेटपासून दूर जात विश्रांती घेतली. दुखापत बरी होण्याकरता शिस्तबद्ध प्रयत्न केले. आता मागं वळून बघताना मला समजतं आहे, की आम्हा खेळाडूंना विश्रांतीची किती आवश्‍यकता असते. भारतीय संघाचं वेळापत्रक किती व्यस्त असतं, ते तुम्हाला चांगलं माहीत आहे- कारण बहुतांशी सर्व सामन्यांचं वार्तांकन करायला तुम्ही मैदानावर हजर असता. दोन सामन्यांदरम्यान किंवा दोन मालिकांदरम्यान थोडा अवधी असतो; पण त्या काळातही क्रिकेटचे विचार मनातून जात नाहीत. आपल्या खेळात सुधारणा कशी करायची; तसंच मागच्या सामन्यात काय झालं आणि पुढच्या सामन्यात काय करायचं आहे याचे विचार मनात पिंगा घालतच असतात. थोडक्‍यात सांगायचं, तर खेळत नसलो, तरी खरी विश्रांती त्या काळात मिळत नाही.
""आत्ता कसं सगळं ठप्प झालं आहे. संपूर्ण देशातच नव्हे, तर जगात लॉकडाऊन झालं आहे. खेळाडू- मग तो कोणत्याही खेळाचा असो- त्याला व्यायामाकरता, सरावाकरता आणि सामन्याकरता मैदान गाठणं क्रमप्राप्त असतं. सध्याच्या परिस्थितीत कोणीच बाहेर पडायचं नाहीये. घरात करून करून किती व्यायाम करणार मला सांगा. मग काय व्यायाम करून झाला, की खरी विश्रांती... असंच चालू आहे. पुढं कधी काय होणार आहे, कोणालाच काही कल्पना, अंदाज नाही. त्यामुळे मनात कोणतेच विचार येत नाहीत. अशावेळी घेतलेली विश्रांती किती सुंदर पद्धतीनं उपयोगी पडते, याचा अनुभव मी सध्या घेतो आहे.

कुटुंबाबरोबर वेळ
""भारतीय संघाकडून खेळताना आम्ही सतत घराबाहेर असतो. जेव्हा तुम्ही एकटे असता म्हणजे लग्न झालेलं नसतं- तेव्हाची गोष्ट वेगळी असते. मात्र, जेव्हा तुमची फॅमिली यंग असते तेव्हा सतत कुटुंबापासून लांब राहणं कठीण जातं. अगदी खरं सांगतो- ज्याचा माझ्या पत्नीला कदाचित राग येईल; पण जेव्हा तुम्हाला बाळ होतं, तेव्हा त्याच्यापासून लांब राहणं जास्त कठीण जातं. दौऱ्यावर असताना मी माझ्या पत्नीइतकाच मुलीला मिस करतो. वाईटात चांगली गोष्ट अशी, की मला आत्ताच्या घडीला माझी मुलगी समायराबरोबर भरपूर वेळ घालवता येतो आहे. तिच्याबरोबर खेळता येत आहे. हे क्षण मौलिक आहेत- कारण हे दिवस परत येत नाहीत- लहान मुलांच्या आयुष्यातले. मुलंसुद्धा हेच क्षण मनात साठवून ठेवतात. त्या अर्थानं हा ब्रेक मस्त काम करतोय. कुटुंबाची सुरक्षितता बघणं हेच माझं काय सगळ्यांचंच प्राथमिक उद्दिष्ट आहे.

रिसेटचं बटण दाबलं
""हे सगळं बोलत असताना मला असाही भास होतो आहे, की निसर्गानं "रिसेट'चं बटण तर नाही ना दाबलं. बघा ना. जगात काही भागात ओझोन आवरणाला छिद्रं पडली होती. गेल्या दोन महिन्यांत त्यात सुधारणा झाली आहे. मुंबईचं तर काय सांगू तुम्हाला. नुसता वारा येत नाहीये, तर गार वारा अनुभवायला मिळतो आहे. आकाशही निळंभोर दिसत आहे. आकाशात तारे दिसतात, हे मुंबईकरांना प्रथमच समजत असावं. मी गंमतीनं असं म्हणीनस, की सध्या मुंबईकर "ऑर्गेनिक झोप' घेत आहेत. म्हणजे तुम्ही जरा वरच्या मजल्यावर राहत असलात, तर चक्क एसी काय पंखाही न लावता झोपता येत आहे. असं समजलं आहे, की लॉकडाऊनच्या काळात जगातलं प्रदूषण झपाट्यानं कमी झालं आहे. सकाळ झाली, की एरवी भारतातल्या शहरांत फक्त वाहनांचा गोंगाट ऐकू यायला लागतो. मात्र, आता सध्या चक्क पक्षांची किलबिलाट ऐकायला येते आहे. मलबार हिल्स भागात चक्क लांब पिसाऱ्याचे मोर फिरताना दिसत आहेत. हे सगळंच अजब आहे.
""मी विचारांनी एकदम सकारात्मक माणूस आहे. मला सध्याच्या खराब काळात झालेले काही बदल स्वागतार्ह वाटत आहेत. किती धकाधकीचं आयुष्य आपण सगळे जगत होतो. किती ताणतणाव मनावर घेत जगत होतो. प्रत्येकाला आता थोडंतरी समजून चुकलं असेल, की अनावश्‍यक स्पर्धेचा वेग कमी करणं नितांत गरजेचं आहे. म्हणून म्हटलं ना, मला भास होतो आहे, की निसर्गानं "रिसेट'चं बटण दाबलं आहे बहुतेक.

वेडी चर्चा
""सध्या क्रिकेट सामने नसल्यानं बरेच पत्रकार जुने काही सामने परत जगत आहेत. त्याच्याबद्दल लिहीत आहेत. ते ठीक आहे; पण एक मुद्दा कुणी तरी उपस्थित केल्याचं कानावर आलं, की सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये महान एकदिवसीय फलंदाज कोण आहे. छे छे. हा काय चर्चेचा विषय आहे? काय सांगू तुम्हांला. "असा घडला सचिन' हे पुस्तक वाचून मला माझ्या आयुष्याची दिशा मिळाली. त्यांच्यासोबत काही वर्षं एका संघातून खेळता आलं, हे माझं भाग्य आहे. किती शिकलो मी त्यांच्याकडून.
""मला इतकंच कळतं, की जगात कुठंही क्रिकेटच्या खेळाबद्दल बोलणं चालू झालं, की पहिलं नाव सचिन तेंडुलकरचं पुढं येतं. माझ्याकरता सचिन तेंडुलकर हे क्रिकेटचे खलाशी आहेत. त्यांनी नवीन शोध लावले, म्हणून पुढच्या पिढीतील खेळाडूंना त्या जागा माहीत झाल्या. उदाहरणार्थ- एकदिवसीय सामन्यात द्विशतकं केली जाऊ शकतात, दोन्ही क्रिकेट प्रकारांत दहा हजार धावांचा टप्पा पार केला जाऊ शकतो, 24 वर्षं कोणी खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळू शकतो; एक-दोन नव्हे, तर तब्बल दोनशे कसोटी सामने कोणी खेळू शकतो... आणि सर्वांत कमाल म्हणजे शंभर आंतरराष्ट्रीय शतकं कोणी करू शकतो. सचिन तेंडुलकर यांनी आपल्याला हे सगळं अशक्‍य ते शक्‍य करून दाखवलं आहे. त्या माणसाशी माझीच काय कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. माझ्याकरता आदर्श एकच आहे- तो म्हणजे सचिन तेंडुलकर!! आणि कायमस्वरूपी तोच राहील.

सगळ्यांचं योगदान महत्त्वाचं
""कोरोना व्हायरसच्या संकटाचा कोणी एकटा सामना करू शकत नाही, असं हे जगव्यापी संकटआहे. माझ्यापरीनं मी संकट संपावं म्हणून शिस्त पाळतो आहे. सरकारनं नेमून दिलेल्या नियमांचं पालन मनापासून करतो आहे. मला शक्‍य आहे, तितकं आर्थिक मदतीचं योगदान दिलं आहे. पण मला वाटतं, की सगळ्यांचं योगदान महत्त्वाचं आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, की देणगी देताना कोणी किती दिली हे बघत बसू नका, की त्याची चर्चा करू नका. प्रत्येकानं आपापल्या परीनं देणगी द्या. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं, तर आपल्याला कोरोना व्हायरस नावाच्या संघाला पराभूत करायला मोठा धावफलक उभारायचा आहे. कोण मोठी देणगी देऊन शतक ठोकेल, तर कोणी अत्यंत गरजेच्या 10-20 धावा करेल. अखेर सगळ्यांनी योगदान द्यायचं आहे, हे लक्षात ठेवा.

जरा विचार करा
""आपण सगळे स्वतःपुरताच विचार करतो आहोत का? एकदा आरशासमोर उभे राहून मनाला प्रश्न विचारून बघा. आपण आपल्या पुढच्या पिढीकरता काय मागं ठेवून जायचा प्रयत्न करतोय? निसर्गाला फुलवतो आहे, की निसर्गाची अपरिमित हानी करतो आहोत? काय पाऊलखुणा आपण मागं ठेवून जात आहोत? आपण निसर्गाच्या देणग्यांचा गैरवापर करतो आहोत. विचार करा- पाणी इतकं महत्त्वाचं आहे मानवी जीवनात. मला सांगा आपण पाण्याला आवश्‍यक आदर देतो का? नुसता स्वत:चा किंवा आजचा विचार करून आता नाही चालणार.
""म्हणून एवढंच म्हणीन, की आपल्याला आपल्या देशाला या संकटातून बाहेर काढायचं आहे. मुलांकरता शाळा चालू करायच्या आहेत. कामगारांकरता रोजगार चालू करायचे आहेत. अर्थव्यवस्थेला चालना द्यायची आहे. सर्व खेळांत चांगल्या कामगिरीची मुसंडी मारायची आहे. तेव्हा सरकार करत असलेल्या उपाययोजनांना सर्वार्थानं साथ देऊयात. क्रिकेटच्या भाषेत सांगू का? कोरोना व्हायरसची खेळपट्टी जरा गडबड करते आहे. नवा चेंडू जास्त हलतो, तसा हा आजार त्रास देतो आहे. आपण आत्ता फक्त घरी थांबून या संकटाचा चेंडू "वेल लेफ्ट करूयात.' एकदा का संकटाची तीव्रता कमी झाली आणि कोरोनाला देशातूनच नाही, तर जगातून हाकलून लावलं, की मग सुखी तंदुरुस्त जीवनाची टकाटक बॅटिंग करूयात.

loading image