डेटासज्जतेची नवी भरारी (सुश्रुत कुलकर्णी)

सुश्रुत कुलकर्णी sushrutkulkarni@gmail.com
रविवार, 31 मे 2020

इंटरनेटवरून काही सेकंदांत एक हजार चित्रपट डाऊनलोड करणारी एक नवी चिप विकसित झालेली आहे. एकीकडे सगळं जग डेटाकेंद्रित होत असताना डेटाचा वेग हाही अतिशय महत्त्वाचा घटक बनत आहे आणि बनत राहणार आहे. डेटासज्जतेची ही भरारी कुठपर्यंत पडसाद उमटवू शकते याचा वेध.

इंटरनेटवरून काही सेकंदांत एक हजार चित्रपट डाऊनलोड करणारी एक नवी चिप विकसित झालेली आहे. एकीकडे सगळं जग डेटाकेंद्रित होत असताना डेटाचा वेग हाही अतिशय महत्त्वाचा घटक बनत आहे आणि बनत राहणार आहे. डेटासज्जतेची ही भरारी कुठपर्यंत पडसाद उमटवू शकते याचा वेध.

"खिशात पैसा आणि इंटरनेटची बॅंडविड्‌थ या गोष्टी किती जास्त प्रमाणात असल्या तरी अपुऱ्याच पडतात,' असं तंत्रज्ञान क्षेत्रात म्हटलं जातं. कोरोनानंतरच्या काळात खिशातल्या पैशाचा भरवसा नाही; पण इंटरनेटचा वेग मात्र अचाट वाढणार आहे हे नक्की!

नुकतंच ऑस्ट्रेलियामधल्या तीन विद्यापीठांनी अत्यंत वेगवान इंटरनेट विकसित केलेलं आहे. याचा वेग किती प्रचंड असावा? तर या इंटरनेटच्या जोडणीतून सुमारे एक सेकंदात एक हजार चित्रपट डाऊनलोड करता येतात. ऑस्ट्रेलियामधल्या मोनॅश, स्विनबर्न आणि आरएमआयटी या विद्यापीठांनी हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. मोनॅश विद्यापीठाचे बिल कॉरकॉर्न, आरएमआयटीचे अर्नान मिचेल आणि स्विनबर्नचे डेव्हिड मॉस यांनी एका लेसर किरणांवर आधारित असणाऱ्या उपकरणाद्वारे 44.2 टेराबिट प्रती सेकंद इतका महाप्रचंड डेटा संक्रमित करण्यात यश मिळवलं आहे. सोलिटॉनच्या स्फटिकांचा वापर करून हे साध्य करण्यात आलेलं आहे. एरवी असं संशोधन प्रयोगशाळांपुरतंच मर्यादित राहतं. मात्र, या अतिवेगवान इंटरनेटच्या जोडणीवर ऑस्ट्रेलियातल्या वीस लाख लोकांचं इंटरनेट चालू शकेल अशा प्रकारची प्रत्यक्ष वापराची चाचणी घेऊन झाली आहे. जगभरात दरवर्षी ऑप्टिकल फायबरच्या वापरात 25 टक्के वाढ होताना दिसत आहे. नेहमीच्या फायबर तंत्रज्ञानाला मायक्रो कोम्ब चिपची जोड दिल्यानं होणारे सकारात्मक परिणाम येत्या काळात तुमच्या आमच्या आयुष्यापर्यंत येऊन पोचणार आहेत. हे तंत्रज्ञान लवकरच सगळ्या जगभर पसरेल.

आणखी वेगवान इंटरनेट हवं कशाला?
सध्याच्या कोरोना साथीमध्ये प्रत्येक जणच घरून काम करतो आहे. इंटरनेट नसतं, तर आज काय परिस्थिती ओढवली असती याचा जरा विचार करून पाहा. आज इंटरनेटखेरीज आपलं पानही हलत नाही. सध्या प्रत्येकजण घरून काम करत असल्यानं एकंदरीतच इंटरनेटवर अभूतपूर्व ताण आलेला आहे. अनेक जणांना दिवसा इंटरनेट पुरेशा वेगानं काम करत नाही असा अनुभव आला असेल. आगामी काळातही लोक परस्परांपासून शक्‍य तेवढं अंतर ठेवूनच काम करणार आहेत. त्यामुळं इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस वाढत जाईल. आता स्काईप किंवा व्हॉट्‌सऍपचा वापर करून दूरध्वनी करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. ही सगळी माहिती पारंपरिक टेलिफोन कंपन्यांद्वारे पुढं नेली जात नाही. तर इंटरनेटद्वारेच तिचं वहन केलं जातं. व्हॉट्‌सऍपसारख्या साध्या सोप्या माध्यमातूनही आता ध्वनी आणि व्हिडिओ यांच्याद्वारे एकमेकांना संदेश पाठवण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. काही काळापूर्वी सोशल मीडियावर शब्दांच्या माध्यमातून संदेश लिहिला जात असे. सध्या मात्र इन्स्टाग्राम आणि टिकटॉक या माध्यमातून फोटो किंवा व्हिडिओच्या माध्यमातून संदेश पोस्ट करण्याकडं तरुणाईचा कल दिसतो. यासाठीही मोठ्या प्रमाणात इंटरनेट सेवा वापरली जाते. कोट्यवधी वापरकर्ते दररोज असं करत असल्यामुळं अंतिमतः या साऱ्याचा ताण इंटरनेट सेवेवर पडतच असतो.

कोरोनाच्या साथीचा परिणाम शिक्षण क्षेत्रावरही झालेला आहे. आता बहुसंख्य शाळांनी आणि क्‍लासेसनी इंटरनेटवरून शिकवायला सुरुवात केलेली आहे. एमआयटी, हार्वर्ड केंब्रिज यांसारख्या जगप्रसिद्ध विद्यापीठांपासून ते प्रवेशपरीक्षा देणाऱ्या लहानमोठ्या कोचिंग क्‍लासेसपर्यंत सर्वजण इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन क्‍लासरूमद्वारे शिक्षण देत आहेत. ऑफिसमधले कर्मचारी झूम, मायक्रोसॉफ्ट टीम्स, स्लॅक यांसारख्या साधनांचा वापर करून परस्परांच्या संपर्कात राहत आहेत. खास करून झूम आणि गुगल युनिट यांसारख्या व्हिडिओ मीटिंग्जमुळं इंटरनेटवर मोठा ताण येतो आहे. लोक घरी राहून इंटरनेट वापरत असल्यामुळं केवळ केबल ब्रॉडब्रॅण्ड सेवाच नव्हे, तर मोबाईल डेटा सेवेमधीलदेखील मोठी वाढ झालेली दिसते. एकंदरच जगात वेगवेगळ्या कारणामुळं इंटरनेटच्या वापरात ऐंशी टक्के वाढ झालेली आहे.

इंटरनेटचा वेग अपुरा का पडतो आहे?
इंटरनेट वापराची सुरुवात सुरुवातीला टेलिफोन लाईन्सचा वापर करून झाली. तांब्याच्या तारांनी बनलेल्या, सगळीकडं अगोदरच पसरलेल्या टेलिफोनच्या जाळ्यातून इंटरनेट वापरलं जाऊ लागलं. मुळात या तारा आणि टेलिफोनसाठीच्या सगळ्या पायाभूत सुविधा ध्वनिसंदेशांचं वहन करण्यासाठी बनवलेल्या असल्यामुळे त्यांद्वारे डेटा किती वेगानं प्रवास करू शकणार याला काही अंगभूतच मर्यादा होत्या. पुढं इंटरनेटसाटी स्वतंत्र केबल्सचं जाळं टाकून त्याद्वारे ब्रॉडबॅन्ड तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात वापरलं जाऊ लागलं. या ब्रॉडबॅन्ड जाळ्यातून डेटा विजेच्या वेगानं वाहून नेला जाऊ लागला. अर्थात विजेच्या वेगालाही काही मर्यादा आहेतच. त्याहून जास्त वेग आहे प्रकाशाचा. त्यामुळं सन 2010नंतर प्रकाशाच्या साहाय्यानं डेटा वाहून नेण्याचं म्हणजे ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात वापरलं जाऊ लागलं. आता तर मोठ्या शहरात अगदी घरगुती वापरासाठीसुद्धा एफटीटीएच म्हणजे फायबर टू द होम हे तंत्रज्ञान वापरलं जातं.

शास्त्रज्ञांना तर वेगवान इंटरनेटसाठी अशा ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञानाच्या साह्यानं चालवलं जाणारं इंटरनेटही पुरणार नाही असं वाटतं. त्यामुळं त्यांनी लेझर तंत्रज्ञानावर इंटरनेट विकसित करायला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या या प्रयोगामध्ये "मायक्रो कोम्ब' हे तंत्रज्ञान वापरण्यात आलं. यासाठी एका ऑप्टिकल चिपचा वापर करण्यात आलेला आहे. सध्या ऐंशी लेझर उपकरणांची जागा ही एकच नवी चिप घेईल. गेली दहा वर्षं अशा मायक्रो कोम्ब चीप्सचं विकसन वेगानं सुरू आहे. प्रत्यक्ष ग्राहक वापरत असलेल्या इंटरनेट जोडण्यांवर याची चाचणी यशस्वीरीत्या घेण्यात आलेली आहे.

येत्या दोन-तीन वर्षांत केवळ ऑफिसमध्ये काम करण्यासाठी नव्हे, तर वर्क फ्रॉम होम करण्यासाठी वेगवान इंटरनेट तर लागणार आहे. शिवाय त्यासोबत मनोरंजनासाठी लागणारं स्ट्रीमिंग आणि सोशल मीडिया याकरताही त्याची गरज आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारखे सोशल मीडिया असोत किंवा युट्यूब, ऍमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्‍स, वूट, डिस्ने हॉटस्टार, अल्ट बालाजी यांसारखे डिजीटल माध्यमातून मनोरंजन आणि बातम्या पुरवणाऱ्या "ओव्हर द टॉप' (ओटीटी) सेवा असोत, प्रत्येकाला वेगवान इंटरनेट जोडणीची गरज आहे. सध्या कोरोनाच्या साथीमध्ये या सेवांवर ग्राहकांच्या अतिवापरामुळे मोठा ताण आलेला आहे. अनेक मनोरंजन पुरवणाऱ्या कंपन्यांनी तर उच्च गुणवत्ता असणाऱ्या एचडी गुणवत्तेच्या प्रसारणाऐवजी कमी गुणवत्तेचं प्रसारण करायला सुरुवात केली आहे. कोट्यवधी वापरकर्त्यांनी एचडी गुणवत्तेचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केल्यास अतिताणामुळे कंपन्यांचे सर्व्हर बंद पडू नयेत यासाठी ही खबरदारी घेण्यात आलेली आहे.

मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक बदल
कोरोनाच्या साथीनंतर मनोरंजनाच्या क्षेत्रात सर्वाधिक बदल घडून येतील असं म्हटलं जातं. एकेकाळी नाटक, सिनेमा ही एकत्र जाऊन करण्याची, समूहानं आनंद घेण्याची गोष्ट होती. कोरोनानंतर मात्र आता प्रत्येक जण मनोरंजनाचा आनंद आपापल्या वैयक्तिक उपकरणावर म्हणजे स्मार्टफोनवर किंवा लॅपटॉपवर घेताना दिसतो आहे. कुटुंब स्मार्ट टीव्हीवर ओटीटीवरचे कार्यक्रम एकत्रित पाहतं.
ओटीटीचा जगभरात सर्वाधिक जास्त वापर आशिया खंडात होतो. सुमारे साठ टक्के प्रेक्षक आशियामध्ये आहे. त्यामुळे साहजिकच जगभरातल्या मनोरंजन कंपन्यांची नजर या मोठ्या ग्राहकावर असल्यास आश्‍चर्य नाही. एकट्या युट्यूबवरच दर सेकंदाला दोनशे तासांचे व्हिडिओ अपलोड केले जातात. आज डिस्ने हॉटस्टार, नेटफ्लिक्‍स आणि ऍमेझॉन प्राईम यांसारख्या मनोरंजन कंपन्यांकडे लाखो तासांचा मनोरंजन कंटेंट उपलब्ध आहे. वापरकर्ता केवळ काही क्‍लिक्‍स वापरून मनोरंजन घरबसल्या मिळवू शकतो. कंपन्यांना आपला सगळाच मनोरंजनाचा डेटा कायमच डेटा सेंटरमध्ये सज्ज ठेवावा लागतो. भारतात ओटीटी आशय पुरवणाऱ्या कंपन्यांचं एकत्रित बाजारमूल्य 21 अब्ज रुपये इतकं आहे.

सध्या वितरणासाठी तयार असलेले सिनेमे अजून सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होण्याकरता बराच कालावधी जाणार आहे. जर कोरोनाच्या साथीमुळं एकपडदा सिनेमागृह किंवा मल्टिप्लेक्‍सेस दीर्घकाळ बंद ठेवावी लागली, तर हे सारे सिनेमे डिजिटल मंचावर रिलीज करण्याखेरीज पर्याय राहणार नाही. त्यामुळं ओटीटीचा आणि इंटरनेटचा वापर आणखी मोठ्या प्रमाणात वाढेल. लवकरच सिनेमागृह किंवा मल्टिप्लेक्‍सेसच्याऐवजी लोक छोट्या केवळ 10-15 लोकांसाठी असणाऱ्या सिनेमागृहांना प्राधान्य देऊ लागतील. काही लोक तर स्वतःच्या घरात खासगी सिनेमागृहंदेखील तयार करून घेतील. या सगळ्यांना दर्जेदार मनोरंजन पुरवणार कोण? अर्थातच त्यासाठी अतिवेगवान इंटरनेट जोडीची गरज आहे. थेट निर्मात्याच्या ब्रॉडकास्ट कंट्रोल रूममधून छोट्याशा खासगी सिनेमागृहांमध्ये किंवा व्यक्तींच्या घरांमध्ये असणाऱ्या थिएटर्समध्ये चित्रपट प्रक्षेपित होऊ लागतील. आपण मोबाईलवर ज्याप्रमाणे नेटफ्लिक्‍स बघतो, त्याचीच ही भव्य स्क्रीनवर पाहण्याची आवृत्ती असेल. यामधून सहजी "4 के' गुणवत्ता असणारं चित्र आणि अगदी सिनेमा थिएटरसारखा ध्वनी यांचा अनुभव आपल्याला होम थिएटरमध्ये घेता येईल.

वापरकर्त्यांच्या सवयींचा अभ्यास
ओटीटी सेवा लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे या कंपन्या वापरकर्त्याच्या सवयींचा अत्यंत बारकाईनं अभ्यास करतात. वापरणारी व्यक्ती कुठल्या भागातील आहे, ती स्त्री आहे की पुरुष, त्यानं आधी कुठलेकुठले कार्यक्रम पाहिले यानुसारच त्याला मनोरंजनाचे नवे पर्याय पुरवले जातात. साहजिकच आपल्या आवडीनुसार मनोरंजन पुरवलं जात असल्यानं वापरकर्ते त्या ओटीटी मंचाचा वापर आणखी वाढवतात. या साऱ्यामध्ये डेटाची मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाण होत असते.
नेटफ्लिक्‍सचे सहसंस्थापक रिड हेस्टिंग्ज यांना एका पत्रकारानं त्यांच्या स्पर्धकांबद्दल विचारलं होतं. त्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं ः ""आमचे तीन प्रमुख स्पर्धक आहेत - ऍमेझॉन, युट्यूब आणि झोप.'' म्हणजेच माणूस न झोपता जास्तीत जास्त किती काळ अशा ओटीटी मंचावर आशय बघत राहील त्यावर या कंपन्यांचा नफा अवलंबून असतो. अर्थातच ही सेवा सतत सुरू राहण्यासाठी वेगवान इंटरनेट जोडणीची गरज असते.
याआधी इंटरनेट पुरवठा करणाऱ्या सेवा महानगरांमध्ये एकवटल्या होत्या. आता सगळीकडेच इंटरनेटचा वापर वाढलेला असल्यामुळे त्यांना ग्राहकाच्या नजीक आपली डेटा सेंटर्स असतील याची काळजी घ्यावी लागते आहे. गेमिंग, आय रेझोलेशन स्ट्रीमिंग, व्हर्च्युअल रिऍलिटी यांसारख्या गोष्टींकरता वेगवान इंटरनेटची गरज असते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जसजसा वाढत जाईल तसतशी स्मार्ट उपकरणंही वाढत जातील. इंटरनेटचा वेग जसा वाढेल तशा स्वयंचलित म्हणजे आपण फक्त जिथं जायचं ठिकाण आहे, ते टाकलं की आपल्याला पोचवणाऱ्या चालक नसलेल्या मोटारी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात येतील.

फाइव्ह जी आणि पुढे...
भारतात लवकरच भारतात मोबाईल क्षेत्रात 5जी तंत्रज्ञानाचा वापर सुरू होईल. 4जी तंत्रज्ञानानं झालेली डेटा क्रांती आपण पाहतोच आहोत. अगदी आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांपासून ते कष्टकऱ्यापर्यंत प्रत्येकजण आता जी नेटवर्क वापरतो आहे. या नेटवर्कमुळं देशात मनोरंजनाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. समाजाच्या सर्व स्तरांतल्या लोकांना आपापल्या आवडीनुसार मनोरंजन हवं असतं.
भारत आता "ट्रिलियन डॉलर डिजिटल इकॉनॉमी'कडं वाटचाल करतो आहे. अर्थात ही प्रगती साध्य करण्यासाठी आता नवं तंत्रज्ञान आणि इंटरनेट यांखेरीज पर्याय नाही. त्याकरता भारतामध्ये आगामी काळात 5 जी तंत्रज्ञानाबरोबरच ऑप्टिकल इंटरनेट जोडणी यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. मायक्रोकोम्ब तंत्रज्ञानामुळं आता टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात मोठी क्रांती होऊ पाहते आहे. शास्त्रज्ञांनी विकसित केलेलं हे तंत्रज्ञान आगामी काळात सारं चित्र बदलून टाकेल यात शंका नाही.

ओव्हर द टॉप (ओटीटी) म्हणजे नेमकं काय?
काही मनोरंजन कंपन्या इंटरनेटद्वारे ऑडिओ, व्हिडिओ आणि अन्य प्रकारचा आशय पुरवत असतात. हा आशय पुरवण्यासाठी त्यांना मोबाईल किंवा केबल इंटरनेट कंपनीशी कुठल्याही प्रकारचा व्यावसायिक किंवा तांत्रिक करार करण्याची गरज नसते. या कंपन्या अशा प्रकारचा करार न करता "वरच्या वरच' सेवा पुरवत असल्यामुळं त्यांना "ओव्हर द टॉप' (ओटीटी) सेवा म्हटलं जातं. ओटीटी कंपन्या काही गोष्टी फुकट, तर काही गोष्टी शुल्क आकारून ग्राहकांना पुरवतात, यालाचा "फ्रीमियम' (Freemium) बिझनेस मॉडेल म्हटलं जातं. उदाहरणार्थ, नेटफ्लिक्‍स या ओटीटी सेवापुरवठादाराला व्होडाफोन, एअरटेल किंवा जिओ यांच्याशी कुठलाही व्यावसायिक किंवा तांत्रिक करार करण्याची गरज नसते. वापरकर्ता ही सेवा कुठल्याही इंटरनेट पुरवठादाराच्या माध्यमातून पाहू शकतो.

(संदर्भ : नेचर, सायन्स डेली, स्विनबर्न विद्यापीठ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sushrut kulkarni write internet data article