संवेदनशीलता रुजवायला हवी... (स्वप्नील जोशी)

swapnil joshi
swapnil joshi

मुलांची मनं आरशासारखी स्वच्छ असतात. आपण जशी प्रतिमा बनवत जाऊ, तशी ती बनत जाते, त्यामुळं पालकांनी जबाबदारीनं ती बनवली पाहिजे. अनेकजण म्हणतात, पालक मुलांना जन्म देतात; पण मला नेहमी असं वाटतं, की मुलं पालकांना जन्म देतात. मुलांना त्यांच्या वयाचं होऊन आपल्या वयाचं तत्त्वज्ञान शिकवणं म्हणजे पालकत्व होय!

आयुष्यात मी आज जो काही आहे, तो माझ्या पालकांमुळंच आहे. आपले पहिले शिक्षक, गुरू हे पालकच असतात. केवळ माझ्याच नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत पालकांचा मोठा वाटा असतो. आईचे प्रत्यक्षरीत्या आणि वडिलांचे अप्रत्यक्षपणे चोवीस तास, तीनशे पासष्ट दिवस संस्कार सुरू असतात. ते आपले पहिले हीरो म्हणजे आदर्श असतात. माझ्या आई-वडिलांकडून मी असंख्य गोष्टी शिकलोय. त्यांपैकी त्यांच्याकडून शिकलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘माणुसकी’ होय. माझ्याकडं असलेली दयाळू वृत्ती, समोरच्याबद्दल वाटणारी आस्था त्यांच्याकडून माझ्यात आली आहे.

माझ्या आजपर्यंतच्या वाटचालीत आई-वडिलांनी मला कधीही, 'हे करू नकोस' किंवा 'हे कर' असं सांगितलं नाही. इंग्रजीत एक म्हण आहे, ‘डोन्ट गिव्ह देम फिश, टीच देम टू कॅच वन.’ याचा अर्थ, ‘मुलांना रोज डिशमध्ये मासे तयार करून वाढले, तर मुलं मासे पकडायला कसं शिकतील? त्यामुळं रोज त्यांना मासे देऊ नका, तर मासे पकडण्याची कला शिकवा.' थोडक्यात, मुलांना सगळं रेडिमेड द्यायचं नाही, तर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आवश्यक असणारे कष्ट त्यांना समजले पाहिजेत, हे माझ्या पालकांचं तत्त्व होतं. ते त्यांनी कृतीतून मला शिकवलं. मी जेव्हा, अमूक एक गोष्ट करायची आहे असं त्यांना सांगायचो, तेव्हा प्रत्येक वेळी ते मला त्या गोष्टीचे फायदे आणि तोटे समजावून सांगत असत. हे करण्यामुळं तोट्यापेक्षा फायदा अधिक आहे, तेव्हा ते तू करायला हरकत नाही, किंवा यामध्ये फायद्यापेक्षा तोटा अधिक आहे, तेव्हा ती गोष्ट तू करू नयेस असं आम्हाला वाटतं; पण निर्णय जो काही असेल तो तू ठरव, असं ते सांगायचे. असं सांगितल्यानंतर मात्र, मी घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांनी मला कधीच योग्य निर्णय की अयोग्य निर्णय असं बोलून दाखवलं नाही. काही वेळा त्यांना माहीत असायचं, की मी घेतलेला निर्णय चुकीचा आहे; पण त्याबद्दल त्यांनी मला कधी मुद्दामहून टोकलं नाही. ‘बघ आम्ही तुला सांगितलं होतं ना, चुकीचं आहे, करू नकोस म्हणून,’ असं पठडीतलं वाक्य ऐकवलं नाही. यामागची त्यांची भूमिका मला फारच विलक्षण वाटते. त्यांचं म्हणणं असायचं, की ‘निर्णय घेईपर्यंत तो आपला स्वतःचा असतो; पण एकदा घेतल्यानंतर तो संपूर्ण कुटुंबाचा असतो. आपण सर्वांनी कुटुंब म्हणून त्यामागं उभं राहिलंच पाहिजे.’ हे समीकरण जर मी माझ्या मुलांबरोबर साधू शकलो, तर फार मजा येईल, असं मला नेहमी वाटतं.

आई-वडिलांच्या अशा भूमिकेमुळं माझ्यात निर्णय घेण्याची क्षमता खूप लवकर आली. तसंच, चुकीचे निर्णय पचवायची आणि त्याच्यातून शिकून पुढं जायची सवयपण मला लवकर लागली. शेवटी मीदेखील माणूसच आहे, त्यामुळं चुका होणारच ! काही वेळा मी घेतलेले निर्णयही चुकले; पण ते निर्णय माझे होते. ज्या चुका मी केल्या, त्यांचं प्रायश्चित्त मी भोगलं, त्यातून मी शिकलो आणि समृद्ध झालो. एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून घडण्यासाठी याची मला फार मदत झाली. म्हणूनच माझ्या आई-बाबांची मला याबद्दल खूप कमाल वाटते. अनेकदा मुलांच्या चुकलेल्या निर्णयाबद्दल त्यांना पालकांकडून टोचून बोललं जातं किंवा मुलांच्या अगदी लहान-मोठ्या निर्णयात सतत हस्तक्षेप केला जातो. मी काही मित्रांच्या बाबतीत हे बघितलं आहे. मुलं मोठी झाली आहेत, त्यांना मुलं झाली आहेत, ती मुलंही मोठी झाली आहेत; पण तरीसुद्धा त्यांचे पालक आपली मतं त्यांच्या मुलांवर लादत असतात. असं माझ्या आई-वडिलांनी कधीच केलं नाही. खूप लहान वयापासून माझा हा अनुभव आहे. त्यांनी नेहमी, ‘हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, यातून तुला काय वाटतं ते तू कर,’ असंच सांगितलं. माझा निर्णय चुकला असं त्यांना वाटत असलं तरी त्यांची, ‘ठीक आहे, आपण करून बघू,’ अशीच भूमिका होती आणि प्रत्येक वेळी मी घेतलेल्या निर्णयात ते पाठीशी उभे होते. ‘बघ! आम्ही तर म्हणत होतो, करू नकोस,’ अशी भूमिका त्यांनी कधीच घेतली नाही. ते नेहमी माझ्याबरोबर राहिले. त्यामुळं चुकीच्या निर्णयामुळं आलेली संकटं हलकी झाली. कारण, माणसांचा सहभाग वाढला, की त्याच्या खांद्यावरचा भार आपोआप कमी होतो. यामुळं झालेली चूक सुधारून पुढं जाण्यासाठी मला खूप मदत झाली.

अभिनय क्षेत्राशी संबंधित सगळे निर्णय माझे होते. अगदी लहानपणापासून हे पक्कं होतं. ही कामं तू कर किंवा करू नकोस, हेदेखील आई-बाबांनी कधी सांगितलं नाही. दोन जाहिरातींच्या बाबतीत मात्र मला आई-वडिलांनी एक सल्ला दिला होता, तो मला आवर्जून सांगावासा वाटतो. एका मोठ्या ब्रँडच्या फेअरनेस क्रीमची जाहिरात माझ्याकडं आली होती. साधारण सात-आठ वर्षांपूर्वी दुनियादारीनंतर मला ही ऑफर आली होती. त्या वेळी वडील मला म्हणाले, "मी तुला कधी सांगत नाही; पण या वेळी मनापासून सांगावंसं वाटतं, की फेअरनेस क्रीमची जाहिरात तू करू नये. कारण, गोरं असणं किंवा नसणं याच्यात तुमचं कर्तृत्व शून्य आहे. आई-वडिलांच्या जीन्समुळे तुमचा रंग ठरत असेल, तर गोरं किंवा काळं असण्यात तुम्ही काय केलं आहे? त्यामुळं तू याला मोठं करू नकोस." दुसऱ्या वेळी माझ्याकडं एक मोठा जगप्रसिद्ध शीतपेयाचा ब्रँड आला होता. महाराष्ट्रात जाहिरात करायची होती, त्यासाठी त्यांना एक मराठी चेहरा हवा होता. त्या वेळी आई म्हणाली, "आम्ही तुला कधी कोल्ड्रिंक पिऊ दिलं नाही, कारण ते मुलांसाठी वाईट असतं आणि तू जाहिरातीत थेट त्याचं समर्थन करशील. तेव्हा ती जाहिरात तू करू नयेस, असं मला वाटतं." खरंतर या जाहिरातीत खूप पैसा होता; पण माझ्या पालकांची या जाहिराती न करण्यामागची भूमिका, त्यांचा विचार मला खूप सखोल आणि महत्त्वाचा वाटला आणि मला त्याचं कौतुकही वाटलं. म्हणून मी या दोन्ही जाहिराती केल्या नाहीत. त्या केल्या असत्या, तर काही लाख रुपयांनी मी नक्कीच श्रीमंत झालो असतो; पण त्यात मजा नव्हती आणि पैसा काय, केव्हाही कमवता येईल. काही तत्त्वं जगताना महत्त्वाची ठरतात.

प्रत्येक पिढीनुसार पालकत्वाच्या भूमिकेत बदल होत असतो. माझ्या आणि माझ्या पालकांच्या पिढीतही फरक नक्कीच आहे. जे प्रश्न माझा दोन वर्षांचा मुलगा राघव मला सहज विचारतो, ते मी अजूनही माझ्या आई-वडिलांना विचारू शकत नाही. एखादी गोष्ट मी नाही करायला सांगितली, तर ती का नाही करायची? असा पहिल्यांदा त्याचा प्रश्न समोर येतो. माझ्या लहानपणी हा ‘का’ अस्तित्वात नव्हता. आई-वडिलांनी नाही सांगितलं तर नाही करायचं, हे मनाशी पक्कं असायचं; पण आताची पिढी खात्री झाल्याशिवाय आपण सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीवर पटकन विश्वास ठेवत नाही. कुठल्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवत नाही. तुम्हाला ती गोष्ट मुलांना पटवून द्यावी लागते. पटवून देणं शक्य झालं, तरच मुलं तुम्ही सांगितलेलं ऐकतात. हा फरक मला दोन पिढ्यांमध्ये जाणवतो. प्रत्येक पिढीत अशाप्रकारे फरक जाणवतोच. प्रत्येक आधीच्या पिढीला वाटतं, की या पिढीचं काही खरं नाही; पण गाडी पुढं जातच असते.
मी अतिशय आनंदी आणि पालकत्व एन्जॉय करणारा पालक आहे. मुलांशी खेळणं, त्यांच्याशी संवाद साधणं, या गोष्टी मला खूप आवडतात. पालक झाल्यानंतर तुमचा संयम कमालीचा वाढतो, तुमची समजून घेण्याची क्षमता खूप वाढते. मला नेहमी असं वाटतं, की लहान मुलांना तुम्ही व्यवस्थित सांभाळू शकलात, समजून घेऊ शकलात, त्यांचं समाधान करू शकलात, तर जगात कोणालाही तुम्ही समाधानी करू शकाल. कॉर्पोरेट क्षेत्र असो वा इतर कोणत्याही प्रकारच्या माणसांना हाताळू शकाल. मुलांशी योग्य प्रकारे संवाद साधता आला, तर समस्या सोडवण्याची आपली क्षमता नक्कीच वाढते. गेल्या पाच महिन्यांच्या संपूर्ण लॉकडाउनच्या काळात मी हे अनुभवलं आहे. दोन वर्षांच्या राघवला बाहेर का नाही जायचं, हे समजावून सांगताना हरतऱ्हेचे प्रयत्न करावे लागले. कारण कोरोना, संसर्ग या गोष्टी त्याला सांगितल्या तरी पटण्यासारख्या नव्हत्या, त्यामुळं त्याला पटेल अशाप्रकारची वेगवेगळी कारणं मला या वेळी त्याला सांगावी लागत होती. ते करताना माझी भरपूर दमछाक होत होती.

पालक म्हणून मुलांना ‘चांगला माणूस होणं’ शिकवलं पाहिजे, असं मला वाटतं. कारण बाकी सगळं शिकवण्यासाठी शाळा आहेत, कोचिंग क्लासेस आहेत. त्यांना माणूस म्हणून संवेदनाशील होणं, त्यांच्यात ते रुजवणं, ही काळाची गरज असणार आहे. मुलांना सहभाव, सहकार शिकवला पाहिजे. कारण आताच्या मुलांना कम्युनिटी लिव्हिंगची सवयच राहिलेली नाही, ते त्यांना शिकवणं खूपच महत्त्वाचं आहे. कारण घरात सगळं असतं. सर्व प्रकारची खेळणी असतात, टीव्ही असतो, मोबाइल असतो, मग बाहेर खेळायला कशाला जायचं, असं त्यांना वाटतं. माझ्या मुलांना, मायरा व राघवला बिल्डिंगच्या खाली खेळायला जायचं, हे समजवायला मला बराच वेळ खर्च करावा लागला होता. मुलांना इतर मुलांमध्ये खेळू द्यावं; मारामारी, पडझड, हेवेदावे, भांडणं या गोष्टी होऊ द्याव्यात. कारण या गोष्टींमधूनच मुलं जगात वावरायचं कसं हे शिकत असतात. या वेगवेगळ्या भावना त्यांना अनुभवू द्याव्यात, या भावनांना कसं हाताळायचं हे त्यांचं त्यांना समजू द्यावं. जगण्यासाठी हे गरजेचं आहे. हल्ली गॅजेटचा जमाना आहे; पण मायरा व राघव अजून लहान आहेत, त्यामुळं त्यांना मोबाइल, आयपॅड या वस्तूंना हात लावायची परवानगी नाही. ते फोन घेणार नाहीत यासाठी आम्ही प्रयत्न करतो; पण आता काळच असा आहे, की आपण जास्त वेळ त्यांना यापासून दूर नाही ठेवू शकत. पण शक्य होईल तोपर्यंत हे पाळायचं, असं ठरवलं आहे. मुलं घरात टीव्ही बघतात; पण त्याची वेळ ठरलेली असते. शिवाय, काय बघायचं यावरही बंधन आहे.

मुलांचं मन आरशासारखं स्वच्छ असतं. आपण जशी प्रतिमा बनवत जाऊ तशी ती बनत जाते. त्यामुळं पालकांनी जबाबदारीनं ती बनवली पाहिजे. मुलं आपल्याला खूप काही शिकवत असतात. आपणच शिकवलेलं आपल्यावर गुगली टाकतात. अलीकडचीच गोष्ट आहे, आमच्याकडं सकाळी उठून ब्रश झाल्यावर देवाला नमस्कार करण्याची पद्धत आहे. मी सकाळी उठलो, ब्रश करून बाहेर आलो आणि माझे बाबा काहीतरी सांगत होते म्हणून सोफ्यावर येऊन बसलो. तेवढ्यात मायरा मला म्हणाली, ‘‘बाबा तू ब्रश केलास?’’ मी म्हणालो, ‘‘हो.’’ तिचा पुढचा डायलॉग, ‘‘मग तू बाप्पाला नमस्कार नाही केलास? तू बॅड बॉय आहेस. सकाळी ब्रश झाल्यावर पहिलं बाप्पाला नमस्कार केला नाहीस, तर तुझा दिवस चांगला कसा जाणार?’’ ते ऐकून मी मनात म्हटलं, की अगं मीच तुला हे शिकवलं आहे; पण त्या वेळी मला ऐकून घ्यावंच लागलं. अशाप्रकारे मुलं रोज काहीतरी शिकवतच असतात; पण ते शिकण्यात मजा येते.

लोकं असं म्हणतात, की पालक मुलांना जन्म देतात; पण मला नेहमी असं वाटतं, की मुलं पालकांना जन्म देतात. मी मायरा जन्मल्यानंतर पहिल्यांदा तिला हातात घेतलं ना, तेव्हा मला ही भावना अधिक प्रकर्षानं जाणवली. त्या वेळी आपण वडील झाल्याची खूप छान आणि त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव झाली. मुलांना त्यांच्या वयाचं होऊन आपल्या वयाचं तत्त्वज्ञान शिकवणं म्हणजे पालकत्व होय! कारण पालकांनी आपल्या वयानुसार ते तत्त्वज्ञान सांगितलं, तर ते मुलांना कळणार नाही. तत्त्वज्ञान त्यांना कठीण भाषेत सांगितलं, तर ते उपयोगाचं नाही. आपलं तत्त्व त्यांच्या शब्दांत, त्यांच्या वयाचं होऊन सांगणं, हे मोठं कौशल्य असतं. पालक म्हणून ती भाषा, ते कौशल्य तुम्हाला आलं पाहिजे, मुलांच्यातलं एक होऊन त्यांना घडवता आलं पाहिजे, माझ्या मते हे ‘पालकत्व’ आहे.

(शब्दांकन : मोना भावसार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com