मुलांचं मित्र व्हावं... (वंदना गुप्ते)

vandana gupte
vandana gupte

मी आई झाल्यावर, माझी आई किती महान होती, हे मला प्रकर्षानं जाणवू लागलं. त्याचबरोबर दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद घेता आला, तर माणूस खूप सुखी होतो असं मला वाटतं. आपल्या वागण्यातून, निरीक्षणातून मुलं जे काही शिकतात, त्यातूनच त्यांच्यावर संस्कार होत असतात. पालकांचं वर्तन बरोबर नसेल, तर ते पालक मुलांवर चांगले संस्कार करू शकत नाहीत. तुमची भाषा, तुम्ही काय बोलता, कसं वागता, लोकांशी कसं बोलता... या सगळ्या गोष्टी संस्कारांसाठी खूप महत्त्वाच्या असतात.

एकमेकांशी कायम प्रामाणिक राहायचं, ही महत्त्वाची गोष्ट आम्ही आमच्या आई-वडिलांकडून शिकलो. आम्हा चौघी बहिणींना आमच्या पालकांचं कायम हे सांगणं असायचं, की जे काही तुमच्या आयुष्यात घडत असेल, ज्या कोणी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येत असतील, मित्र-मैत्रिणी या सगळ्यांबद्दल आम्हाला सांगा, जेणेकरून आमचं तुमच्यावर लक्ष राहील आणि आम्ही उगाचंच तुम्हाला टोकणार नाही. रोज संध्याकाळी आराम खुर्चीत बसून वडील आम्हाला विचारायचे, ‘‘तुम सुबह आठ बजे निकली, कहाँ कहाँ गयी थी, कौन कौन मिला?’’ हे ते अगदी सहजपणानं हसत हसत विचारायचे. वडील उत्तर प्रदेशचे असल्यामुळं हिंदीतून बोलायचे. धाक म्हणून नाही; पण किती वाजता जाते, किती वाजता येते, या सर्व गोष्टींकडं त्यांच लक्ष असायचं. संध्याकाळी सातच्या आत घरात यायचं, हा त्यांचा नियम होता. तुमच्या आयुष्यात काहीही वेडंवाकडं घडलं, एखादा मुलगा तुम्हाला आवडला असेल, किंवा नसेल आवडला आणि मागे लागला असेल, अशी कोणतीही गोष्ट असो, ती प्रत्येक गोष्ट तुम्ही आम्हाला सांगा, हे त्यांनी आम्हाला सांगून ठेवलं होतं.

अभ्यासापासून ते वैयक्तिक गोष्टींपर्यंत सर्वकाही सांगा, हे त्यांचं सांगणं होतं आणि ते आम्हाला मोकळेपणानं सांगता येईल, असं वातावरणही त्यांनी ठेवलं होतं. त्यांच्या या मोकळ्या; पण शिस्तबद्ध वातावरणामुळं आई-वडिलांशिवाय दुसरं कुणीही विश्वासाचं आणि जवळचं माणूस मिळणार नाही, हे आम्ही खूप लवकर समजलो. घडून गेलेल्या कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटून घ्यायचं नाही, हीदेखील वडिलांची शिकवण होती. एखादी वस्तू तुटली-फुटली तर, ‘‘अरे बापरे! आता काय होईल!!’’ असं फार दुःख वाटून घ्यायचं नाही. ‘‘जाने दो, छोडो, उसका लाइफ उतनाही था," असं ते म्हणायचे. म्हणजे जो भूतकाळ क्लेशकारक असतो, तो विसरून जायचा, असं त्यांचं म्हणणं असायचं. मला मुलं झाली, तेव्हा या शिकवणुकीचा मी सखोल विचार करायला लागले. संस्कारांचे धडे कुणी समोर बसवून देत नाही, आई-वडील त्यांच्या वागणुकीतून, विचारांतून, एखादी गोष्ट सहजपणे विचारताना, सांगताना, नकळतपणे आमच्यावर संस्कारच घडवत होते. त्यांनी आपल्यावर किती सहज आणि नकळत संस्कार केले, हे मी पालक झाल्यावर मला समजू लागलं. त्या काळात इतक्या मोकळेपणानं; पण नको तितकं स्वातंत्र्य न देता मुलींना वाढवणं, ही खूप मोठी गोष्ट होती. आम्हाला करिअर निवडीचं स्वातंत्र्य होतं; पण माणिकबाईंच्या मुली असलो आणि वडील स्वतः फिल्म इंडस्ट्रीत असले, तरीसुद्धा त्यांनी आम्हाला चित्रपटात काम करू दिलं नाही. नाटकात काम करा, बाकी ज्याच्यात तुम्हाला आवड आहे ते काहीही करा, आम्ही कुठली बळजबरी करणार नाही, हे त्यांचं सांगणं होतं. फक्त चित्रपटात काम करायचं नाही, ही अट होती. ज्या वेळी तुम्ही पूर्णपणे समजूतदार व्हाल, आपलं चांगलं-वाईट तुम्हाला समजायला लागेल, तेव्हा तुम्ही या क्षेत्रात जाऊ शकता, असं त्यांनी सांगितलं होतं. यामागे मुलींची सुरक्षितता जपणारे वडील, हीच त्यांची भूमिका होती.

आई तर आमची मैत्रीणच होती. ती ज्याप्रकारे घर, संसार आणि करिअर सांभाळायची आणि त्यासाठीचं तिचं टाइम मॅनेजमेंट, ही मोठी कमाल होती. लहान असताना तिचं हे कौशल्य समजत नव्हतं; पण लग्नानंतर घर, संसार, नाटकं वगैरे करताना माझ्या लक्षात ते यायला लागलं आणि मी नकळतपणे तिचं अनुकरण करू लागले. आईच्या वर्तणुकीतूनच या सर्व गोष्टी कशा सांभाळायच्या हे शिकले. माझ्या संसाराच्या जबाबदाऱ्या वाढत जाताना मला ही शिकवण खूपच उपयोगाची ठरली. आई-वडील इतके व्यग्र असायचे, तरी आम्ही तुमच्याजवळ नाही, असं कधी त्यांनी जाणवू दिलं नाही. गरज असेल तेव्हा प्रत्येक वेळी ते हजर असायचे. त्यांनी आम्हाला हॉस्टेलवर नाही ठेवलं, तर घरी राहता यावं म्हणून आजोळी ठेवलं. कारण आजोळी जे संस्कार होतील, ते तुम्हाला शेवटपर्यंत उपयोगात येतील, असं त्यांचं म्हणणं होतं. आम्ही पुण्यात एकत्र कुटुंबात राहात होतो. मला नेहमी वाटतं, की एकत्र कुटुंबात बालपण गेलं, की ते खूप सकस आणि वैविध्यपूर्ण होतं. माणसांशी जुळवून घेत आपण कसं एकोप्यानं राहायचं, हे तिथं समजतं. एकत्र कुटुंब म्हणजे मोठ्या समाजाचं छोटं रूप असतं. पुण्यात आमचे आजी-आजोबा, मामा-मामी, त्यांची मुलं असे सर्वजण आम्ही एकत्र होतो. हुजूरपागा शाळेत आम्ही शिकलो. पुण्याचे सांस्कृतिक संस्कार व्हावेत, असं आई-वडिलांचं मत होतं. सर्वांगानं मुलींना इथं शिकायला मिळेल, हाही विचार यामागे होता.
माहेरच्यांप्रमाणेच आईनं सासरच्यांचंही नातं तेवढंच प्रेमानं जपलं होतं. मे महिन्यात आम्हाला सुट्टी लागली, की आम्ही सगळे पुण्याहून मुंबईला यायचो. तिथं वडिलांकडची, अलाहाबादची माणसं असायची. एका छोट्या घरात अक्षरशः आम्ही वीस-बावीस माणसं एकत्र राहायचो. माणसांची समृद्धी आम्ही खूप अनुभवली.

काळानुसार मला आईच्या व माझ्या वैयक्तिक भूमिकेपेक्षा पालकत्वाच्या भूमिकेत खूप फरक जाणवतो. तसं आमचं दोघींचं आयुष्य खूपच सारखं गेलं, असं म्हणता येईल. मी जवळपास सगळंच आयुष्य आईचं अनुकरण करत जगले; मात्र माझ्यापेक्षा आईची साधना जास्त खडतर होती. कारण तिला रोज रियाज करावा लागायचा, अभ्यास करावा लागायचा, ते मला करायला लागत नाही. एकदा नाटक बसलं, की प्रयोग करून घरी यायचं, असं मला चालतं; पण गायिका असल्यानं, तिला सातत्यानं रियाज करावा लागत होता. गायिका असली तरी आई प्रत्येक कलेचा आदर करायची. माझं प्रत्येक नाटक तिनं वीस-पंचवीस वेळा बघितलं असेल. तिला प्रत्येक गोष्टीचं कौतुक होतं, नवीन येणाऱ्या पिढीचं कौतुक होतं. नव्या पिढीच्या मुलांच्या गाण्याच्या क्लासेसना ती जाऊन बसायची, ती मुलं कशी गात आहेत हे पाहायची. मुलांच्या स्पर्धांना, नव्या कलाकारांच्या गाण्यांच्या मैफिलींना जायची. माणिकबाई आपल्यासमोर बसल्या आहेत, हे बघून त्या कलाकारांना आनंद व्हायचा, त्यांचा हुरूप वाढायचा. या सर्व गोष्टी ती आनंदानं करायची.

पूर्वीच्या तुलनेत आजच्या पालकत्वामध्ये फरक पडला आहे, कारण एकूणच सभोवतालच्या बदललेल्या सामाजिक परिस्थितीचा जगण्यावर परिणाम झाला आहे आणि त्यात बदल घडला आहे. या बदलामुळे अडाणी लोकांची संख्या जास्त झाल्याची मला खंत वाटते. सुशिक्षित लोकांपेक्षा अशिक्षित लोक जास्त आहेत. दहावी-बारावीपर्यंत शिक्षण घेऊन कुठंही मॉल वगैरेमध्ये नोकरी धरायची. थोडं इंग्रजी बोलता यायला लागलं, की पटकन नोकरी मिळते, हातात पैसा येतो, त्यामुळं आपण कोणीतरी आहोत, अशी भावना मुलांमध्ये वाढीस लागते. परिणामी मुलं आई-वडिलांचा, मोठ्यांचा आदर, कदर करत नाहीत; स्त्रियांचा आदर करत नाहीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी शालेय शिक्षणामध्येच या सगळ्यांकडं बघण्याचा दृष्टिकोन काय असला पाहिजे, याचे धडे दिले पाहिजेत.

वैयक्तिक पातळीवर पालकत्वाची भूमिका निभावताना मला शारीरिक नाही; पण मानसिक क्लेश खूप सोसावे लागले. कारण, मुलांच्या शाळेतील अथवा इतर कार्यक्रमांच्या वेळी, त्यांच्या वाढदिवसाच्या वेळी, सुट्टीच्या दिवशी मला माझ्या व्यवसायामुळं हजर राहता यायचं नाही. माझे नाटकाचे प्रयोग असले म्हणजे जावंच लागायचं, ते रद्द करता यायचे नाहीत. त्या काळी मी महिन्यातून चाळीस-बेचाळीस प्रयोग करत होते. वर्षातून एक नाटक घेतलं तरी आधीच्या नाटकांचे प्रयोगपण असायचेच. यामुळं प्रशांत (दामले) मला गंमतीनं म्हणायचा, "आज अमुक नाटकाचा प्रयोग आहे बरं का!" व्यग्र असले तरी मी मुलांचं सगळं करण्याचा प्रयत्न करायचे, नाटकाव्यतिरिक्त उरलेला सगळा वेळ त्यांनाच द्यायचे. माझी उणीव भासू नये यासाठी आटोकाट प्रयत्न करायचे. यामध्ये मनाचं फार द्वंद्व व्हायचं. त्यावेळचा एक प्रसंग माझ्या कायमचा लक्षात राहिला आहे. मुलं शाळेत शिकत होती. त्यांचं स्नेहसंमेलन होतं. मी फॅन्सी ड्रेससाठी दोघांची मस्त तयारी करून, कपडे घालून, काय बोलायचं याची तालीम आदल्या दिवशी करून घेत होते. त्या वेळी अभिजित इतक्या सहजपणे म्हणाला, "उद्या तू नसशीलच ना कार्यक्रम बघायला?" तो हे अतिशय सहज म्हणाला; पण माझ्या मनाला ते खूप लागलं. कारण, ‘माझं नसणं’ हे त्यानं ‘गृहीत’ धरलं होतं. त्या वेळी मला खूप मानसिक त्रास झाला. त्यानंतर मात्र मी माझ्या प्राथमिकता बदलत गेले. मुलांचे वाढदिवस, त्यांच्या शाळेतील कार्यक्रमांचे दिवस, त्यांच्या सुट्टीचे दिवस हे माझ्या सुट्टीचे दिवस बनत गेले. माझ्या सणावाराच्या कल्पनाही मी सगळ्या बदलून टाकल्या. मुलांच्या कोणत्याही महत्त्वाच्या दिवशी प्रयोग करायचा नाही, असं मी ठरवलं. तोपर्यंत नाट्यक्षेत्रात माझ्या शब्दाला थोडं वजनपण आलं होतं. त्यामुळं तारखा ठरवणं, थोडं मागेपुढं करता येऊ लागलं होतं. सामान्यपणे असणारा चोवीस तासांचा दिवस माझ्यासाठी छत्तीस तासांचा होता. पुण्याला रात्रीचा साडेनऊचा प्रयोग असेल, तर तो साधारण दहाला सुरू व्हायचा, एकपर्यंत संपायचा. सगळं सामान आवरून निघेपर्यंत साडेतीन व्हायचे. पुढं घाटातला प्रवास करून, दादरला उतरून जुहूला घरी पोहोचायला सात वाजायचे. घरी आल्यावर मुलांना शाळेसाठी तयार करणं वगैरे करण्यात माझा दिवस लगेच सुरू व्हायचा. बसमध्ये झोप झाली असो वा नसो, दिवस मात्र सुरू व्हायचा. घरात कामाला बाई होती; पण मी आल्यावर मी ती जबाबदारी घ्यायचे. मी व्यावसायिक अभिनेत्री असले, तरी माझ्या कमाईवर घर चालत नव्हतं. सगळ्यांची मनं सांभाळत, घरातील जबाबदाऱ्या सांभाळत व्यवसाय सांभाळावा लागत होता. त्यामुळं पालकत्वाची जबाबदारी खूप मानसिक क्लेशाची, कष्टाची होती. शारीरिक कष्टाबद्दल मला कधीच त्रास वाटला नाही. मला काम करण्यासाठी घरून संपूर्ण पाठिंबा होता. माझे पती शिरीष, सासू-सासरे, बहिणी सगळ्यांचा पाठिंबा होता. मी दौऱ्यावर असले, की सासूबाई, बहिणी यांपैकी कोणीतरी घरी येऊन राहायचं. घरचा पाठिंबा असल्याशिवाय संसार सांभाळून स्त्री एवढ्या मोठ्या प्रमाणात काम नाही करू शकत. मला तो नक्कीच मिळाला.

आपल्या वागण्यातून, निरीक्षणातून मुलं जे काही शिकतात, तेच संस्कार त्यांच्यावर होत असतात. पालकांचं वर्तन बरोबर नसेल, तर ते पालक मुलांवर चांगले संस्कार करू शकत नाहीत. तुमची भाषा, तुम्ही काय बोलता, कसं वागता, लोकांशी कसं बोलता... या सगळ्या गोष्टी संस्कारांसाठी खूप महत्त्वाच्या असतात. नाती जपणं, सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं, ही जाणीव पालकांनी मुलांमध्ये रुजवावी लागते. या गोष्टी मी अगदी नेटानं केल्या. त्यामुळं दोन्ही मुलं सगळ्यांशी अतिशय चांगल्या प्रकारे नाती जोडून आहेत. सध्या कोरोनाच्या काळात दोन्ही मुलं आमचे शिक्षक झाली आहेत. हे करू नका, ते करू नका, असं सांगताना फक्त छडी हातात घ्यायचीच त्यांनी बाकी ठेवली आहे. थोडक्यात, अतिशय प्रेमानं ते आमची काळजी घेत आहेत. स्वप्ना सध्या वेस्ट इंडीजला आहे. तिचं लग्न झालं असून, तिला मुलगाही आहे. अभिजितनं अमेरिकेतून इंजिनिअरिंग केलं आहे. तिथं दोन वर्षं नोकरी केल्यावर तो मुंबईत आला. इथंही त्यानं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी केली. आता त्यानं व्यवसाय सुरू केला आहे. थीम पार्क वगैरे तयार करण्यासारखी क्रिएटिव्ह कामं तो करतो. सध्या लॉकडाउनच्या काळात तो एडिटिंग शिकत आहे. दोन्ही मुलांना शिक्षणाचं, करिअरचं आमच्याकडून पूर्ण स्वातंत्र्य होतं. पालकत्व हे मैत्रीपूर्ण असावं. तुम्ही जोपर्यंत मुलांचे मित्र होत नाही, तोपर्यंत ती तुमच्याशी मोकळेपणानं बोलणार नाहीत. तुम्ही जेवढी बंधनं घालाल, तेवढी मुलं त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार. बंधनं न घालता, त्यांच्यावर योग्य ते लक्ष ठेवून, त्यांच्या कलानं घेत, योग्य दिशा देणं हे पालकत्व होय. थोडक्यात, पालकांनी मुलांचं फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड बनलं पाहिजे.

(शब्दांकन : मोना भावसार )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com