श्रमसंस्कृती आणि मुलांवरचे संस्कार (विद्या सुर्वे-बोरसे)

vidya surve borse
vidya surve borse

आज जेव्हा आपण कष्टकऱ्यांची अप्रतिष्ठा करतो तेव्हा विज्ञान आणि श्रम यांचं पुरेसं आकलन आपल्याला नाही हाच त्याचा अर्थ निघतो. अण्णा भाऊ साठे यांनी ‘ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून श्रमिकांच्या तळहातावर उभी आहे,’ असं जे विधान केलं होतं आणि महात्मा गांधीजींपासून अनेकांनी श्रमाचं जे श्रेष्ठत्व कथन केलं होतं ते नीटपणे खाली झिरपलं नाही असंच म्हणावं लागेल. मात्र, श्रमांची प्रतिष्ठा राखण्याचे संस्कार आजच्या मुलांवर योग्य शब्दांतून वेळीच करण्याची गरज आहे. नाही का?

प्रसंग एक :
एका बड्या यशस्वी व्यक्तीची प्रकट मुलाखत सुरू होती. निरनिराळे प्रश्न विचारले जात होते. समोर बसलेले होते शाळकरी विद्यार्थी. त्यांच्या डोळ्यांत अपार कुतूहल. उत्सुकता. आपणही मोठं झाल्यानंतर यशस्वी व्हायचं असा आशावाद.
‘तुमच्या शाळेतल्या जडणघडणीविषयी सांगा... ’ प्रश्न विचारला जातो.
यशस्वी झालेली व्यक्ती उत्तर देते :
‘‘बालपणी मी फार हुशार नव्हतो. एकाच वर्गात दोनदा नापास झालो तेव्हा वडिलांनी ‘घरातली गाई-गुरं सांभाळ, ’ असं सांगितलं. दहा महिने गुरं सांभाळली. एके दिवशी वडिलांनी बोलावलं. म्हणाले : ‘शिकला नाहीस तर आयुष्यभर ढोरं वळावी लागतील. शेतात मर मर मरावं लागेल. शाळा शिक, डॉक्टर हो.’ मलाही या सगळ्यातून बाहेर पडायचंच होतं. मी मन लावून अभ्यास केला आणि शेती-मातीतून बाहेर आलो. यश मिळत गेलं, एकेक पायरी चढत गेलो. नाव मिळालं, संपत्ती मिळाली, आराम मिळाला.’’ बडी यशस्वी व्यक्ती पुढंही खूप काही बोलत राहिली.
मला ते बोलणं ऐकू आलं नाही. मी विचार करत राहिले...

प्रसंग दोन :   

शासनाच्या धोरणाला विरोध म्हणून विद्यार्थ्यांच्या काही
संघटना रस्त्यावर उतरल्या. त्यांनी रस्ते झाडून काढले, बूटपॉलिश केलं, भाज्या विकल्या. विद्यार्थ्यांची छायाचित्रं वर्तमानपत्रांत छापून आली. विद्यार्थ्यांकडून आणि अन्य समाजघटकांकडूनही निषेध नोंदवताना केली जाणारी अशी कृत्ये आपल्याला नेहमी दिसतात.
मी तेव्हाही विचारात पडले...

‘टर्निंग द पॉट, टीलिंग द लँड : डिग्निटी ऑफ लेबर इन अवर टाईम्स’ या पुस्तकाचे लेखक
कांचा इलय्या यांनी काही प्रश्न विचारले आहेत. ते प्रश्न मला एकदम आठवले. श्रमाविषयी हा असा दुर्व्यवहार, ही अनास्था कशामुळे? आंदोलनात बूटपॉलिश करणाऱ्या या विद्यार्थ्यांना खरोखरच बूट-चप्पल तयार करता येतात का? भाजी विकणाऱ्या विद्यार्थ्यांना शेत नांगरता येतं का? किंवा पेरणी करता येते का? भांडीकुंडी विकणाऱ्यांना मातीची घागर तयार करता येते का? रस्ते साफ करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या काळात तरी शहरात मरून पडलेल्या प्राण्यांचे मृतदेह शहराबाहेर नेऊन टाकले आहेत का?
इलय्या यांनीच या प्रश्नांची उत्तरंही दिली आहेत. ते म्हणतात : ‘विद्यार्थ्यांनी असं काहीही केलेलं नाही आणि त्यांनी प्रयत्न केला असताच तर त्यांना यश मिळालं नसतं. पेरणी करणं किंवा मातीचा माठ तयार करणं सोपं नाही, ती एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. श्रमाशी संबंधित विज्ञानाशी विद्यार्थ्यांचा परिचय नसल्यामुळे निषेध किंवा विरोधासाठी सोंग घेऊन, सांकेतिक पद्धतीनं ते अशी कामं जेव्हा करतात तेव्हा त्यातून या कामांचं दुय्यमत्वच ते सूचित करत असतात. ’
अण्णा भाऊ साठे यांनी,
‘ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून श्रमिकांच्या तळहातावर उभी आहे, ’ असं जे विधान केलं आहे आणि महात्मा गांधीजींपासून अनेकांनी श्रमाचं जे श्रेष्ठत्व कथन केलं आहे ते नीटपणे खाली झिरपलं नाही असंच म्हणावं लागेल.
पाहणाऱ्यांनी नेहमीच कष्टकरी, श्रमिक हा दुःखी आणि कष्टी अवस्थेत पाहिला. शेतकरी आत्महत्या करताना पाहिला आणि ऑफिसातला अधिकारी-कर्मचारीवर्ग कमी श्रमात ‘छानछोकीची जिंदगी’ जगताना पाहिला. याचा परिणाम असा झाला की श्रमिकांच्या घरात जन्म घेतलेल्या मुलांनाही श्रमापासून पळ काढून जिथं शारीरिक श्रम नाहीत आणि बौद्धिक संपदा (?) आहे अशा क्षेत्रांत जाण्याची ओढ लागली. त्यांच्या आई-वडिलांनीही त्यांना ‘शेती-मातीपासून दूर राहा’असाच सल्ला दिला. मला खूपदा वाटतं, यामुळे आपल्या समाजाची फार मोठी हानी झाली आहे.
‘नापीक हात केले या क्रमिक अक्षरांनी
बेकार रक्त ताजे गावी सडाया लागले’
अशी ओळ कुठल्या तरी कवितेत वाचली होती.   

वास्तव असं आहे की शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या बहुसंख्यांना शारीरिक कष्ट नकोसे झाले आहेत. त्यामुळे दिवसभर ते थांब्यावरच्या बाकावर, हॉटेलच्या बाकावर अथवा चौकातल्या कट्ट्यावर बसून राहतील; पण काम करणार नाहीत. आणि उलटपक्षी, ते ज्या ठिकाणी राहत असतात त्या ठिकाणी श्रमाला मोठी मागणी असते. असं असूनही ते श्रम करू इच्छित नाहीत!

इलय्या यांचं ‘टर्निंग द पॉट...’ हे पुस्तक याच अस्वस्थतेतून जन्मलं. हे पुस्तक विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांनाही श्रमाविषयी प्रतिष्ठा बाळगायला शिकवतं. विज्ञान आणि श्रम यांच्या आकलनाची अपूर्व दृष्टी देतं. ही दृष्टी ‘नई तालीम’ वगळता अन्य शाळांत अभावानंच शिकायला मिळते.  
अभय बंग यांनी आपल्या शाळेविषयी आणि तिथल्या श्रमाच्या पावित्र्याविषयी जे लिहिलं आहे तेही वाचायलाच हवं.
वर उल्लेखिलेले दोन प्रसंग पाहता, निर्मितिशील कष्टांविषयी मनात असणारा तिरस्कार विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या कृतीमधून
व्यक्त होतो. यशस्वी व्यक्तीच्या अनुभवकथनातूनही शेतीकडे पाहण्याचा दुय्यम दृष्टिकोनच प्रकट होतो. असं का झालं असावं? याचं कारण, आम्ही आमच्या भावी पिढ्यांना श्रमाचा सन्मान शिकवला नाही. आपण श्रमिकांना जातिव्यवस्थेच्या उतरंडीत बांधून टाकलं आणि त्यांना सन्मानाचं स्थान न देता खालचं स्थान दिलं. शारीरिक कष्ट आणि बौद्धिक श्रम यांच्यामध्ये आपण फारकत केली, त्यामुळे पालकांनीसुद्धा आपल्या पाल्यांमध्ये कष्टाच्या कामांविषयी नकारात्मकता रुजवली.
इलय्या यांचं पुस्तक वाचल्यानंतर श्रमिक-कष्टकरी समूहांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. आदिवासी, मेंढपाळ, शेतकरी, चर्मकार, कुंभार, विणकर, धोबी, नाभिक या श्रमिकांकडे पाहण्याची नवी दृष्टी इलय्या देतात.
जातव्यवस्थेनं श्रमिकांची कौशल्यं युगानुयुगं दडवून ठेवली आहेत. कष्टकऱ्यांकडे असणारा वैज्ञानिक दृष्टिकोन दुर्लक्षित केला आहे. कष्टकरी समूहांनी उभ्या केलेल्या कला-उद्योग-तंत्रज्ञान यांच्याविषयी इलय्या यांचं पुस्तक वेगळंच भान देतं.  
उदाहरणार्थ : आदिवासी लोक वनस्पतींच्या दहा हजारांपेक्षा अधिक जातींचा उपयोग करतात...त्यातल्या आठ हजार वनस्पती औषधांसारख्या उपयोगात आणल्या जातात...३२५ वनस्पती कीटकनाशकांसाठी...४२५ वनस्पती डिंक आणि रंगांसाठी, ५५० वनस्पती वस्त्रांसाठी उपयोगात आणल्या जातात.... वनस्पतींच्या साडेतीन हजार जाती या खाण्यायोग्य आहेत...हे सगळं आपल्याला माहीत आहे का?
आदिवासींनी जगाला हे सांगितलं हे आपल्याला ठाऊक नसतं.
आदिवासी लोक हे आमचे पहिले लोकशिक्षक आहेत. त्यांनी झाडांच्या औषधी गुणधर्मांशी आपला परिचय करून दिला. जगाची पायाभूत खाद्यान्नसंस्कृती विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

&&&

पशुपालन करणाऱ्या समाजानं आपल्याला दूध, दही, लोणी आणि तुपाचं उत्पादन करणं शिकवलं. त्यांच्यामुळेच लोकरीची वस्त्रं आणि शेतीसाठी खत शक्य झालं. दुधापासून दही तयार करणं ही वैज्ञानिक बाब आम्हाला पशुपालन करणाऱ्या स्त्रियांनी शिकवली. चर्मकार समाजानं चर्मशोधविज्ञानाचा पाया घातला. चर्मोद्योग हा प्राचीन उद्योग आहे. कदाचित जगाच्या पाठीवरचा पहिला उद्योग. त्यांनी वाद्यं तयार केली, लहान मुलांसाठी खेळणी निर्माण केली, वस्त्रं तयार केली. मृत पशूच्या शरीरावरचं चामडं फाटणार नाही अशा पद्धतीनं काढून घेणं ही कला आहे आणि ती प्रयत्नानं शिकावी लागते.
बूट, चप्पल, दोरी, बेल्ट, बॅग, तबला, डफ अशा असंख्य वस्तू त्यांनीच तर निर्मिल्या आहेत.
नाभिक हे आमच्या समाजातले पहिले चिकित्सक/शल्यचिकित्सक
होते असं म्हणता येईल. त्यांनी शारीरिक स्वच्छतेचं केवळ महत्त्वच आपल्याला सांगितलं असं नाही, तर आपल्या वस्तऱ्याच्या साह्यानं त्यांनी शल्यक्रियाही केल्या. आधुनिक वैद्यकशास्त्राचा उदय होईपर्यंत प्राचीन काळापासून नाभिक हेच छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया करत असत. या समूहातल्या स्त्रियांनी प्रसूतीच्या वेळी अडलेल्या गावातल्या स्त्रियांना मोकळं केलं. त्या अत्यंत कुशल सुईणी असत. बाळ आणि बाळंतीण यांची सुरक्षा त्यांनी पिढ्यान् पिढ्या सांभाळली.

धोबी समाजानंही आपल्याला रोगराईपासून दूर ठेवलं. त्यांनी कपड्यांवरचे केवळ डाग स्वच्छ केले नाहीत, तर ते कपडे निर्जंतुकही केले. धोबी समाजानंच पहिल्या रासायनिक साबणाचा शोध लावला. विणकरांनी चरख्याचा, हातमागाचा शोध लावला आणि कपड्यांची निर्मिती केली. कपड्यांवर चित्रकारी करून कलेच्या क्षेत्रातही योगदान दिलं.
कुंभार समाजानं माती जिवंत केली. पहिला साक्षर समूह म्हणूनही कुंभार समाजाचा उल्लेख करता येऊ शकेल. कारण, प्राचीन काळी अक्षरं खापरावर कोरली जात असत. दळणवळणासाठी विकसित होण्याअगोदर कुंभारवर्गानंच चाकाचा  शोध लावला आणि विकास केला. त्यांनी पक्की भांडी निर्मिली म्हणून माणूस संचय करू शकला. एका जागी थांबून कृषिकार्य करणारे शेतकरी होते म्हणून संस्कृती निर्माण झाली. निरीक्षण आणि परीक्षण करून  शेतकऱ्यांनी अन्नधान्याच्या प्रजातींचं संशोधन केलं. शेती हे एक विज्ञान आहे. जमिनीचा पोत, ॠतूंचा अभ्यास, पेरणी अशी शेतीमधली प्रत्येक क्रिया ही वैज्ञानिक आहे. आपला कदाचित विश्वास बसणार नाही; पण भारतात आज तांदळाच्या दोन लाख जाती आहेत. त्यातल्या वीस हजार या एकट्या छत्तीसगढमधल्या आहेत.
‘टर्निंग द पॉट...’ या पुस्तकात श्रम आणि धर्म, श्रम आणि लिंगभाव यासंदर्भानंही मांडणी करण्यात आलेली आहे. श्रमिक समूहांना प्रचलित शिक्षणपद्धतीपासून बाजूला केल्यामुळे, स्त्रियांच्या वाट्याला दुय्यमत्व दिल्यामुळे भारतीय समाज विज्ञानापासून
विलग झाला. देशाचा पुढच्या हजार वर्षांचा प्रवास याच अवस्थेत होत गेला.
आज जेव्हा आपण कष्टकऱ्यांची अप्रतिष्ठा करतो तेव्हा विज्ञान आणि श्रम यांचं पुरेसं आकलन आपल्याला नाही हाच त्याचा अर्थ निघतो. वर उल्लेखिलेले दोन्ही प्रसंग घडताना, त्याबद्दलची छायाचित्रं पाहताना श्रमसंस्कृतीचं महत्त्व मला आठवत राहिलं. आजच्या वर्तमानात मुलांवर हे संस्कार योग्य शब्दांतून वेळीच करण्याची गरज आहे. नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com