साक्षर असणं म्हणजे... (विद्या सुर्वे-बोरसे)

vidya surve borse
vidya surve borse
Updated on

साक्षरता म्हणजे केवळ अक्षरओळख नव्हे. साक्षरता म्हणजे जागृती, स्वत:चीच नवी ओळख. जिला स्वत:चा मार्ग योग्य प्रकारे कळतो आणि प्रसंगी जी इतरांनाही मार्गदर्शन करू शकते ती व्यक्ती साक्षर असते. हे खूप साधं आहे.

बसस्थानकातल्या गाडीवर लावलेली गावांच्या नावाची पाटी वाचण्याइतकं सोपं आहे आणि म्हणूनच त्याकडे कधी कधी दुर्लक्ष होण्याची शक्यता असते!

ही महिन्यापूर्वीची घटना आहे.
त्या दिवशी माझा दहावीतला मुलगा इंटरनेटवर दहावी-बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांची माहिती शोधत होता.
अचानक त्यानं प्रश्न केला : ‘‘आई...अगं, हे कोण आहेत?’’
त्यानं एक नाव उच्चारलं. ज्यांचं नाव त्यानं घेतलं ते महाराष्ट्रातलं नामांकित आणि चळवळीत अग्रेसर असलेलं व्यक्तिमत्त्व आहे. जातिअंत-वर्गलढा-स्त्रीदास्य याबद्दल त्यांची व्याख्यानं निरनिराळ्या ठिकाणी होत असतात. विद्यापीठीय चर्चेतही त्यांचं नाव सन्मानानं घेतलं जातं. मी मुलाला त्यांच्याविषयी माहिती दिली. सामाजिक चळवळी, वैचारिक भूमिका या संदर्भानंही त्याच्याशी बोलत राहिले.
* * *

काही वेळानंतर मोबाईल माझ्या हाती देत त्यानं मला आणखी एक प्रश्न विचारला : ‘‘विद्वान माणसं मग अशी भाषा का वापरतात?’’
मी मोबाईलचा स्क्रीन पाहिला, माझं फेसबुक अकाउंट स्क्रीनवर दिसत होतं. होमपेजवर दिसत असणाऱ्या विशिष्ट पोस्टकडे त्याचा निर्देश होता. मी उत्सुकता म्हणून पोस्ट वाचली. ती नेहमीप्रमाणे विशिष्ट मताचा आग्रह धरणारी होती. लोक आपापल्या विचारांना घट्ट चिकटून असतात, त्यांना ते ‘भूमिका’ असं नाव देतात,
जगाचं अवलोकन ते सतत आपल्या या विशिष्ट भूमिकेतून करत असतात. इतरांना भलं-बुरं ठरवत असतात. फेसबुकवर आणि इतर समाजमाध्यमांत तत्काळ प्रतिक्रिया देण्याच्या सवयीतून भाषावापराचं भान राहत नाही. सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर भाषावापराचे संकेत जाणीवपूर्वक आणि कसोशीनं पाळले पाहिजेत; पण तसं घडत नाही आणि मग वैयक्तिक टीका-टिपण्णी करत भाषेचा स्तर घसरत जातो. विद्वान म्हणून गणल्या जाणाऱ्या लोकांकडूनही हे प्रमाद घडतात तिथं सर्वसामान्यांच्या पोस्टविषयी न बोललेलं बरं. माझ्या मुलाचा निर्देश अशाच एका पोस्टकडे होता. पोस्टमध्ये सर्वसामान्य भारतीय नागरिकांची बाजू मांडली जात आहे असं चित्र तयार करण्यात आलं होतं. आपण सर्वसामान्यांचे पाठिराखे आहोत; तथापि, सत्ता मात्र सर्वसामान्यांना निरनिराळी आमिषं दाखवून दिशाभूल करत आहे अशा थाटात ते सगळं विवेचन होतं. पोस्ट नेहमी जशी असते तशीच होती. तथापि, तिची सुरुवात एका आक्षेपार्ह शब्दानं होत होती, शब्द अश्लील नव्हता, बीभत्स नव्हता; पण असंसदीय होता. मुलं बोलताना सहज जे शब्द वापरतात त्यापैकी तो एक  होता; पण असे शब्द विद्वानांच्या तोंडी शोभत नाहीत.
माझा मुलगा म्हणाला : ‘‘माझा शत्रू जर मला ‘मित्रा’ अशी हाक घालत असेल आणि विशिष्ट काम करण्याची योग्य त्या शब्दात विनंती करत असेल आणि दुसरीकडे माझा जवळचा कुणी जाहीरपणे एखादा निंदा करणारा शब्द वापरत मला वास्तवाची जाणीव करून देत असेल. तर मी कुणाचं ऐकावं? अशा वेळी निंदादर्शक शब्द वापरणाऱ्या माझ्या मित्रापेक्षा, ती दुसरी व्यक्ती मला जास्त आपली वाटेल. तुम्हाला जर शब्द नीट वापरता येत नसतील तर तुमचं ज्ञान काय कामाचं?'(मुलानं एवढे अवघड शब्द वापरले नाहीत; पण त्याच्या म्हणण्याचा आशय काहीसा असाच होता).
दहावीत शिकाणाऱ्या मुलाचं बोलणं ऐकून मी विचारात पडले. भाषेविषयी आपण दारातच काय, घरातसुद्धा किती जागरूक असायला हवं असं क्षणभर वाटून गेलं.
 * * *

मला एक जुना प्रसंग आठवला.
एक सेवानिवृत्त गृहस्थ भेटले होते. ते म्हणाले : ‘‘अलीकडे मुलांना शिस्त राहिली नाही. आमच्या काळात असं नव्हतं. अशा मुलांसाठी काहीतरी करायला हवं असं मला सतत वाटतं. तुम्हाला काय वाटतं? या मुलांना काय शिकवता येईल?’’
त्यांनी मला प्रश्न केला. मी त्यांच्याकडे अचंबित होऊन पाहत राहिले.
मी त्यांना म्हणाले : ‘‘तुम्हाला जर मुलांसाठी खरंच काही करायचं असेल तर तुम्ही मुलांना शिकवण्याच्या फंदात पडू नका. त्यांना त्यांचं जगणं जगू द्या. ते शिकतील जे शिकायचे आहे ते.’’
माझ्या या विधानावर साठी ओलांडलेले ते आजोबा इरेला पेटले. म्हणाले : ‘‘असं कसं? काहीतरी शिकवावं तर लागणारच, त्याशिवाय शिस्त कशी लागेल? आमच्या काळात असं नव्हतं. या मुलांना ना भीती, ना मोठ्यांविषयी आदर.’’
मी त्यांचं बोलणं मध्येच तोडलं.
मी म्हणाले : ‘‘मुलांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन तुम्ही बदलण्याची गरज आहे. मुलं, विशेषत: लहान मुलं, त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातून शिकत असतात. आपल्या सभोवतालच्या माणसांना पाहून ती घडत असतात. तुम्ही जर तोंड वाकडं करून त्यांच्याकडे पाहणार असाल तर तीही तुमच्याशी तोंड वाकडं करूनच बोलणार. कारण, तोंड कसं वाकडं करायचं हे तुम्ही त्यांना शिकवलं आहे! ‘आता मी शिकवणार' असं म्हणून चालत नसतं. तुमच्या दैनंदिन आचरणाचा मोठा परिणाम घरातल्या मुलांवर होत असतो. तुम्ही त्यांच्याशी चिडून बोलणार, रागावणार आणि त्यांनी मात्र तुमच्या प्रश्नांची उत्तरं शांतपणे द्यावीत अशी तुमची अपेक्षा असेल तर तिचा काही उपयोग नाही. मुलं चोवीस तास शिकत असतात. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अगदी लहान वयात तर केवळ आई-बाबा, आजी-आजोबा, शेजारी, नातेवाईक यांच्या अनुकरणातूनच मुलं शिकत असतात. आपली मुलं ही आपलीच आवृत्ती असतात. आपण योग्य वागलो तर मुलंही योग्य वागतील. तेव्हा त्यांना काहीही शिकवत न बसता, शिकण्यासारखं एक पोषक वातावरण तुम्ही निर्माण करायला हवं. नाही का?’’
ते आजोबा पाणी पिण्याच्या निमित्तानं बाहेर गेले आणि पुन्हा परतलेच नाहीत.
* * *

समाजात ज्येष्ठ आणि विचारी लोक म्हणून वावरणाऱ्या लोकांनी भाषेविषयी आणि प्रत्यक्ष वर्तनाविषयी विचार करण्याची वेळ आली आहे असं मला मुलाच्या प्रश्नामुळे जाणवलं. आणि मग लक्षात आलं की अद्यापही आपण पुरेसे साक्षर झालेलो नाहीत.
साक्षरता म्हणजे केवळ अक्षरओळख नव्हे. साक्षरता म्हणजे जागृती, स्वत:चीच नवी ओळख. जिला स्वत:चा मार्ग योग्य प्रकारे कळतो आणि प्रसंगी जी इतरांनाही मार्गदर्शन करू शकते ती व्यक्ती साक्षर असते. हे खूप साधं आहे.
बसस्थानकातल्या गाडीवर लावलेली गावांच्या नावाची पाटी वाचण्याइतकं सोपं आहे आणि म्हणूनच त्याकडे कधी कधी दुर्लक्ष होण्याची शक्यता असते! म्हणजे, हे आपल्या फलाटावर उभ्या असलेल्या चुकीच्या मार्गावरच्या गाडीत बसून प्रवास करण्यासारखं आहे. पाटी पाहायचा कंटाळा करणं किंवा ती पाठीमागच्या बाजूनं वाचणं किंवा ‘फलाटावर उभी आहे ना, मग असेल हीच’ असं गृहीत धरणं यामुळे कठीण प्रसंग ओढवतात. हे साक्षर असल्याचं लक्षण नाही.
भाषेच्या वापराचं तसंच आहे. भाषासाक्षर असणं म्हणजे केवळ भाषा बोलणं नव्हे, तर योग्य शब्दाची निवड योग्य जागी करणं होय.
भाषासाक्षरता येणं म्हणजे संभाषणकौशल्य व्यवस्थितपणे आत्मसात झालेलं असणं.
जलसाक्षरता, माध्यमसाक्षरता, लिंगभावविषयक साक्षरता, आरोग्यसाक्षरता असे निरनिराळे
शब्दप्रयोग आपल्या आजूबाजूला होत असतात तेव्हा त्यात जागृती हा अर्थ अनुस्यूत असतोच.
सर्वत्र पाणीटंचाई असते आणि आपण बदाबदा पाणी सांडत असतो किंवा गाड्या धूत असतो हे जलसाक्षर नसल्याचं लक्षण आहे. व्हाॅट्सअॅप, फेसबुक आणि तत्सम समाजमाध्यमांत आपण मनात येईल ते, वाटेल त्या शब्दात लिहीत असतो, आपल्या शब्दांचा कुणावर काय परिणाम होईल याचा जराही विचार करत नसतो, याला माध्यमसाक्षरता म्हणता येणार नाही. किंवा समाजात जर जागोजागी स्त्री-पुरुष असा भेद होत असेल, एखादी व्यक्ती स्त्री आहे म्हणून तिला डावललं जात असेल अथवा तिच्याविषयी निरनिराळे प्रवाद निर्माण करण्यात येत असतील तर लिंगभावविषयक साक्षरता पुरेशी झालेली नाही असं म्हणण्यास पुष्कळच वाव आहे.
सध्या ‘कोरोनाकाळ’सुरू आहे.
‘घरातच राहा’ असं आवाहन सरकार आणि डॉक्टर नागरिकांना पुनःपुन्हा करत आहेत. कोरोनाबाधितांचे आकडे एकेका शहरात तीन अंकी, चारअंकी होत आहेत. बातम्या ऐकताना आणि वाचताना धस्स होत आहे आणि तरी काही
नागरिक रस्त्यांवर फिरत राहताना दिसतात.
यांना आरोग्यसाक्षर कसं म्हणता येईल?  
आपण जे वर्तन करतो त्याचं अनुकरण आपल्या आजूबाजूला असणारी आपली लहान मुलं करत असतात. आपलं वर्तन खरोखरच जबाबदारीचं आहे का? मग मुलांना बेजबाबदार म्हणून कसं चालेल?
मला प्रश्न पडला, बुद्धिजीवी म्हणवला जाणारा वर्ग आज समाजमाध्यमांत जी भाषा सर्रास वापरत असतो, जी उथळ विधानं करत असतो, तशीच भाषा, तसेच शब्द मुलं वापरू लागली तर? आणि दहावीतल्या मुलानं तर सांगूनच टाकलं आहे, ‘जो माझ्याशी सभ्य भाषेत बोलेल त्याच्याच बरोबर मी असणार आहे.’
म्हणून वाटतं, आता खरोखर वेळ आली आहे पुन्हा एकदा आरशात पाहण्याची आणि ‘साक्षर’ असणं म्हणजे काय हे समजून घेऊन, आपण खरोखरच साक्षर आहोत काय, हे स्वत:लाच विचारण्याची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com