चला, मुलांबरोबर पुन्हा एकदा! (विद्या सुर्वे-बोरसे)

vidya surve borse
vidya surve borse

वाचणारी मुलं जेव्हा पुढं चालत जात असतात तेव्हा ती एकटी नसतात. त्यांच्याबरोबर पुस्तकं, त्यांमधले विचार आणि आश्वासक शब्द चालत असतात. वाचणारी मुलं जेव्हा ध्येयासाठी झुंज देत असतात तेव्हा वाचलेल्या पुस्तकांचं बळ त्यांच्या पाठीशी असतं आणि त्यांच्याबद्दल थोरांनी दाखवलेला विश्वास त्यांच्या बाजूनं मैदानात उतरलेला असतो.

स्क्रीनवर ते दोघं दिसतात. कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तींच्या अंगावर असावेत असे कपडे. पाठीमागं काही तुरळक पुस्तकांची पांढरी भिंत. पुस्तकांची गजबज-दाटी नाही. पुस्तकं अंगावर येत नाहीत. वाचणाऱ्याच्या भिंतीवर असावीत तेवढी पुस्तकं. तुम्ही पुस्तकांच्या कुठल्याशा दुकानात अथवा
किंवा एखाद्या ग्रंथालयात
नाही आहात ही जाणीव
पाहणाऱ्याला व्हावी इतकीच पुस्तकं. ते सहज बोलू लागतात : ‘हाय, आय ॲम बराक ओबामा.’
सोबतची व्यक्ती म्हणते, ‘अँड, आय ॲम मिशेल.’
लय जमून आलेल्या गाण्यासारखं ते दोघं बोलू लागतात. बराक ओबामा एक वाक्य म्हणतात : ‘वेलकम टू ‘लाइव्ह फ्रॉम लायब्ररी.’
टुडे वुई थॉट वुई रीड यू अ स्टोरी.’ मिशेल संगत करतात : ‘आय रिमेम्बर माय फर्स्ट ट्रिप टू लायब्ररी.’
आणि वयाच्या चौथ्या वर्षी काढलेल्या पहिल्या ग्रंथालयकार्डाच्या स्मृती मिशेल जागवतात. ग्रंथालयं, विशेषत: सार्वजनिक वाचनालयं ही समाजाच्या जीवनात आणि घडणीत किती महत्त्वाची असतात यावर बराक ओबामा थोडं प्रतिपादन करतात. ‘शिकागो पब्लिक लायब्ररी’च्या ‘लाइव्ह फ्रॉम लायब्ररी’ या मालिकेत ते दोघं बोलत असल्याचं आपल्या लक्षात येतं. ओबामादम्पती तिला आवडणारी गोष्ट मुलांसाठी वाचून दाखवते. एखाद्या कसलेल्या नटाच्या सफाईदारपणे दोघंही ही गोष्ट सादर करतात. गोष्टीचं शीर्षक आहे : ‘वर्ड कलेक्टर’.
पीटर रेनॉल्ड यांनी लिहिलेली ही गोष्ट. गोष्टीच्या निवडीची कारणमीमांसा करून बराक ओबामा म्हणतात : ‘मला शब्द आवडतात.’
श्रोते-प्रेक्षक गालातल्या गालात हसतात. त्यांचं म्हणणं खरंच आहे. एका राजकीय नेत्याचं शब्दांवर प्रेम असणं साहजिकच आहे. शब्द किती तोलून-मापून, विचारपूर्वक, नेमके वापरावे लागतात हे ओबामा यांच्यासारख्या जागतिक पातळीवरील नेतृत्वाला चांगलंच ठाऊक असतं.

पुढची चार-सहा मिनिटं मी गोष्टीत हरवून गेले. संग्रह करण्याचा अनेकांना छंद असतो. कुणी पोस्टाची तिकिटं गोळा करतं, कुणी जुनी नाणी, कुणी आगपेट्यांची कव्हर्स, कुणी शंख-शिंपली, कुणी पानं, कुणी पंख-पिसं, कुणी रंगीबेरंगी गोट्या, कुणी गाणी जमवतं.
ओबामा जी गोष्ट सांगत आहेत तिच्या नायकाला शब्द गोळा करण्याचा छंद आहे. नाद असणारे शब्द, राग आणणारे शब्द, भावनिक बनवणारे शब्द, विचारात पाडणारे शब्द...शब्दांच्या विविध रूपांशी, अर्थांशी आपला सहजपरिचय होत जातो. आपण गोष्टीबरोबर प्रवाहत जातो...

ओबामा यांची गोष्ट सांगून संपली तेव्हा मला पंडित जवाहरलाल नेहरू यांची आठवण झाली. महात्मा गांधीजी ते एपीजे अब्दुल कलाम अशी नेतृत्वाची मोठी फळी मला आठवून गेली. बाल-कुमारांवर माया पांघरणारे असे हे सगळे नेेते होते. ही सगळीच व्यक्तिमत्त्वं आपल्या कामात सदैव व्यग्र होती; पण त्यांनी त्यांच्या व्यग्रतेतून बालकांसाठी वेळ काढला. वेळ मिळेल तेव्हा आणि स्वतंत्र वेळ काढून गांधीजी, नेहरू, कलाम हे मुलांमध्ये मूल होऊन मिसळले. त्यांनी मुलांशी वेळोवेळी संवाद साधला, मुलांना गोष्टी सांगितल्या, त्यांच्यासोबत कविता म्हटल्या, त्यांना आपल्या आयुष्यातल्या खऱ्याखुऱ्या हकीकती सांगितल्या आणि शाळेत शिकणाऱ्या मुलांना स्वप्नं दिली. या मोठ्या माणसांनी आपली स्वप्नं मुलांच्या डोळ्यांत पेरली.

‘स्वयंपूर्ण भारत’ हे गांधीजींचं स्वप्न होतं, ‘संपन्न भारत-उज्ज्वल भारत’ हे नेहरूंचं ध्येय होतं आणि ‘२०२० मध्ये भारत महासत्ता व्हावा’ हे कलाम यांचं स्वप्न होतं. ज्या ज्या मुलांना ही स्वप्नं या महनीय व्यक्तिमत्त्वांच्या तोंडून ऐकण्याचा योग आला ती ती सगळीच मुलं त्या वाटेवर पुढं जात असलेली आपल्याला दिसतील. गेल्या सत्तर वर्षांत आपण काय कमावलं याचा हिशेब काढायचा ठरवला तर अनेक चांगल्या गोष्टी हाती येतील. यशाची अनेक शिखरं आपण पादाक्रांत केली. या यशाच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे बालकांना, कुमारांना आणि तरुणांना सोपवलेली स्वप्नं.
शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये माझं अनेकदा जाणं होतं. मी विद्यार्थ्यांशी हितगुज करते. अगदी छोट्या वाडीवरच्या मुलाशी बोलतानाही हे जाणवतं की कलाम यांच्या ‘अग्निपंख’ या पुस्तकानं सगळ्या पिढीवर गारुड केलं आहे. कलाम यांची पुस्तकं वाचून, भाषणं ऐकून गेल्या वीस वर्षांतल्या तरुणाईला पंख फुटले. मी वाडीवरच्या त्या मुलाला विचारते: ‘तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं आहे?’ तो उत्तर देतो : ‘मला डेंटिस्ट व्हायचं आहे’. त्याच्या लेखी आदर्श असणाऱ्या व्यक्तीचं नाव मी विचारते. तो कलाम यांचं नाव घेतो. मग मी विचारते : ‘डेंटिस्टच का व्हायचं आहे?’
तो उत्तर देतो : ‘वेल्हाण्याच्या आजीचे दात पडू लागले आहेत. मी दातांचा डॉक्टर होईन आणि पुन्हा तिला नवीन दात बसवीन, म्हणजे तिला जराही त्रास होणार नाही.’

विशिष्ट ध्येय का गाठायचं याचं जे उत्तर मुलानं दिलं तिथं मला ‘अग्निपंख’चा संस्कार जाणवला. आपलं ध्येयं त्यानं सामाजिक उत्तरदायित्वाशी जोडून टाकलं होतं. मला अमुक व्हायचं आहे, कारण त्यातून मला समाजाची सेवा करायची आहे, लोकांच्या व्याधी, त्यांची दु:खं, त्यांच्या वेदना दूर करायच्या आहेत हे भान असे थोर आदर्शच निर्माण करू शकतात. खुज्या माणसांच्या प्रदेशात असे ‘हिमालय’ असतात म्हणून जगणं सुंदर होत असतं. पैसा हेच जिथं सर्वस्व आहे अशा जगात ही उत्तरं शालेय विद्यार्थ्यांच्या तोंडून येतात तेव्हा आशेची झाडं अजून उभी आहेत याचा प्रत्यय येतो.
वीणा गवाणकर यांचं ‘एक होता कार्व्हर’, विठ्ठल कामत यांचं ‘इडली, ऑर्किड आणि मी’, अच्युत गोडबोले यांचं ‘किमयागार’, जयंत नारळीकर यांचं ‘चार नगरांतले माझे विश्व’, प्रकाश आमटे यांचं ‘प्रकाशवाटा’, विश्वास नांगरे पाटील यांचं ‘मन में है विश्वास’, नरेंद्र जाधव यांचं ‘आमचा बाप आणि आम्ही’, डॉ. जे. जी. वाडेकर यांचे ‘सर्जननामा’, अभय बंग यांचं ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ ही मराठीतली अशी काही पुस्तकं आहेत ज्यांनी असंख्य तरुणांच्या जीवनाची दिशा बदलून टाकली.
वाचणारी मुलं जेव्हा पुढं चालत जात असतात तेव्हा ती एकटी नसतात. त्यांच्याबरोबर पुस्तकं, त्यांमधले विचार आणि आश्वासक शब्द चालत असतात. वाचणारी मुलं जेव्हा ध्येयासाठी झुंज देत असतात तेव्हा वाचलेल्या पुस्तकांचं बळ
त्यांच्या पाठीशी असतं आणि त्यांच्याबद्दल थोरांनी दाखवलेला विश्वास त्यांच्या बाजूनं मैदानात उतरलेला असतो.

छत्रपती शाहूमहाराज, गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वप्नं पेरली होती. स्वातंत्र्याच्या आसपासच्या काळात ज्या शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या त्या या महनीयांच्या स्वप्नांतून उगवून आलेल्या आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर मामासाहेब जगदाळे, पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे, कर्मवीर काकासाहेब वाघ, विनायकराव पाटील अशी महाराष्ट्राला सुसंस्कृत करणारी एक मोठी फळी या थोरा-मोठ्यांचा विचारवारसा घेऊन अविरत कष्टली असं लक्षात येईल. थोरांचा स्पर्श हा असा परिसाचा स्पर्श असतो. त्यानं अवघं जीवनच सोन्याचं होऊन जातं. ही एक साखळी आहे, ती सतत पुढं पुढं चालत राहते. चांगली व्यक्तिमत्त्वं ही दिव्यासारखी असतात. ती इतरांना प्रज्वलित करतात. ‘ज्योत से ज्योत जलाते चलो,’ असा उजेडाचा हा प्रवास असतो. तो सदैव तिमिराकडून तेजाकडे जात असतो.  

कलाम म्हणाले होते : ‘तरुणांना आदर्श वाटतील अशा राजकीय व्यक्तिमत्त्वांची संख्या कमी होत आहे.’
हे वास्तव आहे आणि ते चिंताजनक आहे. राजकीय व्यक्तिमत्त्वांचा मोठाच परिणाम समाजावर होत असतो. या ना त्या निमित्तानं बालक आणि किशोर या दोन वयोगटांपुढं राजकीय व्यक्तिमत्त्वे सदैव येत असतात.
राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या तुलनेत एखादा वैज्ञानिक, संशोधक, चित्रकार, संगीतकार
या वयोगटापुढं त्या प्रमाणात येत नाही. आपल्याकडे
सत्ताधीश आणि त्यांचे राजकीय विरोधक ज्या प्रमाणात चर्चेच्या केंद्रस्थानी असतात त्या प्रमाणात विचारवंत आणि शास्त्रज्ञ चर्चेच्या केंद्रस्थानी नसतात.
राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या वर्तनाचा मोठाच परिणाम बालकांवर होत असतो. त्यामुळे या सर्वांनी बालकांचा विचार करून आपली कृती करायला हवी.
ओबामा हे बालकांसाठी वेळ काढू शकतात, कलाम हे विद्यार्थ्यांसाठी वेळ काढू शकतात, तर मग इतर मंडळींनाही असा वेळ काढणं हे काही फार अवघड नाही.
सत्तेच्या प्रमुख पदांवर असणाऱ्या राजकीय व्यक्तींनी मुलांसाठी वेळ काढणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्या औपचारिकता बाजूला सारून त्यांनी मुलांना गोष्टी सांगितल्या पाहिजेत, त्यांच्यासोबत गाणी म्हटली पाहिजेत! मुलांना पत्रं लिहिली पाहिजेत. कधीतरी गावच्या सरकारी शाळेतल्या वर्गांत जाऊन तासभर बसलं पाहिजे. वेळात वेळ काढून अधूनमधून आपल्या आत असणारं मूल राजकीय नेतृत्वानं बाहेर काढून त्याला मनमुराद खेळू दिलं पाहिजे! वाड्या-तांड्यावरच्या मुलांच्या समस्या कदाचित यामुळे नेतृत्वाला कळतीलच; पण त्यापेक्षा मोठी गोष्ट अशी घडेल की ही छोटी भेट मुलांच्या भावविश्वात असंख्य स्वप्नांची पेरणी करेल.

ओबामा यांनी सांगितलेली गोष्ट मी कधीच विसरू शकणार नाही. कारण, ती केवळ शब्दांपुरती मर्यादित गोष्ट नव्हती, ती स्वप्नांची गोष्ट होती. अशी संधी आपल्याकडच्या विद्यमान राजकीय व्यक्तिमत्त्वांनीही साधायला हवी. नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com