बालसाहित्यातल्या प्राणिकथा आणि ‘एकल कोल्हा' (विद्या सुर्वे-बोरसे)

vidya surve borse
vidya surve borse

छाती फुटेपर्यंत, रक्त ओकेपर्यंत धावण्याच्या स्पर्धा जागतिकीकरणीनं सर्वांसाठी जागजागी तयार केल्या आहेत. स्वत्त्व गमावून केलेल्या लढाईत विजय मिळाला तरी तो अर्थहीन असतो हे सत्य योग्य वेळी, योग्य भाषेत सांगण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाला ठाऊक असणारं हेच सत्य कोनकी या कोल्ह्याची गोष्ट सांगते.

प्राणिकथा या बालसाहित्याचा अविभाज्य भाग आहेत. परिचित आणि अपरिचित प्राणी बालकथा-कवितांमधून डोकावत असतातच. बाल-कुमारांनाही त्यांचा लळा असतो. एकेका प्राण्याच्या निमित्तानं मानवाचंच स्वभावदर्शन अशा साहित्यातून घडतं. बहुतेक प्राणिकथांमधला जंगलचा राजा सिंह हा उदार असतो, मुंगी कष्टाळू असते, लांडगा क्रूर असतो, कोल्हा धूर्त असतो, कुत्रा विश्वासू असतो, डोमकावळा हावरट असतो, हत्ती मायाळू असतो, माकड खोडकर असतं...अशी अनेक उदाहरणं देता येतील. ‘इसापनीती’, ‘पंचतंत्र’ यांतल्या कथांमधून आणि लोककथांमधून घडणारं पशू-पक्षी-प्राणिसृष्टीचं दर्शन बाल-कुमारांना आपलंसं वाटणारं आहे. मुलांनी ‘मोगली’ आणि ‘टारझन’ डोक्यावर का घेतले? त्यामागंही बालकांना पशू-पक्ष्यांविषयी वाटणारं आकर्षण हेच कारण आहे.

काही वर्षांपूर्वी मी जपानी कथा वाचल्या होत्या. त्या वेळी कोल्हा या प्राण्यानं माझं लक्ष वेधून घेतलं. योगायोगानंच एकामागोमाग एक अशा आठ-दहा जपानी कथांमध्ये कोल्हा भेटत गेला. मीही नकळत या कोल्ह्याचा पाठलाग करत गेले आणि लक्षात आलं, की जपानी बालसाहित्यात आणि लोकसंस्कृतीत कोल्ह्याचं स्वतंत्र स्थान आहे. प्राचीन, मध्ययुगीन काळापासून कोल्ह्याच्या कथा जपानी लोकमानसाचा अविभाज्य भाग झाल्या आहेत. आपल्याकडे असतो तसा हा कोल्हा धूर्त, लबाड नाही. आपल्याकडचा कोल्हा हा खूपदा गमतीशीर होतो, हास्यास्पदही होतो. ‘ब्लू फॉक्स’ किंवा ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’मधला कोल्हा आपल्या विनोदाचा विषय होतो. जपानी कथेत मात्र तसं नाही, तिथं भेटणारा कोल्हा हुशार आहे, विद्वान आहे. रूप पालटण्याची आणि मानवी वेश धारण करण्याची कला त्याला अवगत आहे. असा हा कोल्हा मानवी जीवनात येतो तो विश्वासू मित्र म्हणून, प्रामाणिक जोडीदार म्हणून, तरुण मुला-मुलींच्या आणि प्रौढ स्त्री-पुरुषांच्या रूपात तो भेटतो. त्याचं प्रत्येक रूप मोहक आहे. अविस्मरणीय आहे आणि मनात रेंगाळत राहणारं आहे.

सुबोला जोजी, आवा नाओको, ख्रिस्तोफर किन्साईद, कॅरेन स्मेअर्स, किमिको अमन अशा लेखकांच्या कथांमधून भेटणारा कोल्हा त्याच्या विविध रूपांत खुणावत राहिला होता. त्यातही आवा नाओको यांची ‘कोल्ह्याची खिडकी’ विलक्षण होती. आपल्याकडच्या लोककथांशी नातं सांगणारी. याच दरम्यान ताजीमा शिंजी यांचा एकटा, एकाकी कोल्हा भेटला. उषःप्रभा पागे यांनी या कोल्ह्याची - ‘एकल कोल्ह्या’ची - कथा मराठीत भाषांतरित केली आहे.

एका छोट्याशा टेकडीवर, बिळात राहणाऱ्या कोल्ह्याची आणि त्याच्या स्वप्नाची, स्वप्नामागं छाती फुटेपर्यंत धावण्याची आणि अंती त्याच्या उद्ध्वस्त होण्याची ही करुण कथा आहे. रडवणाऱ्या, उदास करणाऱ्या करुण कथा बालसाहित्याचा भाग असाव्यात काय असा प्रश्न कदाचित उपस्थित होऊ शकेल. शेल सिल्वरस्टाईन यांच्या ‘द गिव्हिंग ट्री’ हे जगप्रसिद्ध पुस्तक किती तरी प्रकाशकांनी प्रकाशनार्थ नाकारलं, त्यामागं त्यातली करुण कहाणी हेच एकमेव कारण होतं. अशा गोष्टी मुलांना सांगू नयेत असं कित्येकांना वाटत असतं. मात्र, ज्यामुळे आपलं अंतःकरण द्रवेल, आपण थोडं थांबून आपल्या धावपळीचा विचार करायला लागू, आत्मपरीक्षण करावं असं आपल्याला ज्यामुळे वाटेल असं कोणतंही साहित्य बाल-कुमारांच्या हाती द्यायला हवं. जीवनाचा समग्र पट मांडणाऱ्या, जीवनाच्या उद्दात्ततेचं दर्शन घडवणाऱ्या, व्यापक समाजभान निर्माण करणाऱ्या साहित्यकृती मुलांच्या हाती देणं अत्यंत आवश्यक आहे. बलुतं (दया पवार), गावकी (रुस्तुम अचलखांब), उचल्या (लक्ष्मण गायकवाड), उपरा (लक्ष्मण माने) ही आत्मकथनं मी शाळकरी वयात वाचली होती. सभोवतीच्या दाहक वास्तवाकडे पाहण्याची दृष्टी त्यामुळे आपोपाप विकसित होत गेली. कणव नव्हे, तर सहानुभाव आणि भगिनीभाव त्यातून विकसित झाला.
* * *

कोनकी हे त्या ‘एकल कोल्ह्या’चं नाव आहे. तो बिळात राहत असे. ते बीळ एका टेकडीवर होतं आणि त्या टेकडीवर काही उच्चभ्रू माणसं कधी कधी गोल्फ खेळण्यासाठी येत असत. त्यांच्याकडे पाहून कोनकीला वाटे, की आपणही माणूस व्हावं, उद्योगपती व्हावं, खूप पैसा कमवावा आणि जे जे खावंसं- प्यावंसं वाटतं ते ते विकत घ्यावं...हे असं शिकारीच्या मागं धावणं चांगलं नाही. कोनकीच्या आईला मुलाची घालमेल समजते. ‘तुझ्या मनात काय विचार सुरू आहेत हे मला कळतंय,’ असं ती त्याला म्हणतेदेखील. ती त्याला समजावते. माणूस होण्याच्या वेडापासून परावृत्त करू पाहते.

‘कोल्हा एकदा माणूस झाला की पुन्हा मुळ रूपात परतू शकत नाही आणि माणूस झालेला कोल्हा टेकडी उतरून खाली गेल्यानंतर पुन्हा कधीच परतलेला नाही,’ असं सांगून आई कोनकीला थांबवू पाहते. मात्र, कोनकी आईकडे, तिच्या सांगण्याकडे, पूर्वीच्या हकीकतींकडे दुर्लक्ष करतो. प्रत्येक कोल्ह्याला पाठ असलेला माणूस होण्याचा मंत्र कोनकी पुटपुटतो आणि अखेर कोनकी कोल्हा हा माणूस होतो! तो शहरात येतो, त्याला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळते. ‘कोंबड्या, उंदीर, ससे यांच्यामागं मी पळू शकतो,’ हे कोनकीनं मुलाखतीच्या दरम्यान दिलेलं उत्तर कंपनीच्या मालकाला पुरेसं असतं.

कोनकी खूप काम करतो, मन लावून काम करतो. कोनकीच्या वाट्याला एक समृद्ध जीवन येतं. तो सुटीच्या दिवशी आईला भेटायला जात असे आणि जाताना तिच्यासाठी काही खाद्यही विकत नेत असे. त्याची आई कोल्ही त्याच्याकडे मायाळू नजरेनं पाहत राही.

आपण फरच्या कारखान्यात काम करत आहोत असं नंतर एके दिवशी कोनकीच्या लक्षात येतं. जंगलातल्या प्राण्यांना ठार मारून, त्यांची कातडी सोलून, त्यांपासून विविध प्रकारचे कोट आणि कपडे त्या कारखान्यात तयार केले जात असतात. ज्या दिवशी कोनकी एका कोल्ह्याचं टांगलेलं कातडं पाहतो तेव्हा तो रात्रभर झोपू शकत नाही.
प्राण्यांच्या टांगलेल्या कातड्यांची भयप्रद दृश्यं कोनकी मोठ्या प्रयत्नानं जाणीवपूर्वक विसरू पाहतो. कारखान्याला नफा हवा आहे...नफ्यासाठी चांगला माल हवा आहे...खूप प्राणी हवे आहेत...नवे प्राणी हवे आहेत...आणि एके दिवशी कंपनीच्या हितासाठी, भांडवली स्वार्थासाठी, कोनकी हा शिकाऱ्यांना आणि शिकारी-कुत्र्यांना घेऊन आपल्या त्या छोट्या टेकडीवर जातो. गोल्फच्या टेकडीवर. कुत्रे पाठलाग करत राहतात. गवतात सळसळीची एक रेष तयार होत जाते. बंदुकीतून गोळी सुटते आणि एक धष्टपुष्ट कोल्हा मरून पडतो. त्याच्या गालांवर अश्रूंचे ओघळ असतात. कोनकी त्याच्याकडे पाहणं टाळतो. कंपनीचे मालक कोनकीचं तोंडभरून कौतुक करतात. ‘असा सुंदर, चंदेरी कोल्हा आपण कधीच पाहिला नव्हता,’ हे ते पुनःपुन्हा सांगतात. कोनकीला आता जास्त पैसे मिळणार असतात, ऐश्वर्य लाभणार असतं; पण त्यासाठी त्यानं स्वतःच्याच आईला गोळी घातलेली असते. ती मरून पडलेली कोल्ही ही त्याची आईच असते!
या घटनेनंतरचा कोनकीचा विलाप अर्थहीन असतो. तो ‘कोन कोन कुई कुई’ करत रडू लागतो; पण त्याचं रडू आता निरर्थक असतं.

लेखक शिंजी सांगतात : त्यानंतर कोनकी पुन्हा कुणालाच दिसला नाही...पण तुम्ही जेव्हा केव्हा ‘कोन कोन कुई कुई’ असा आवाज ऐकाल, तेव्हा तुमच्या गावातलाच दुसरा कुणी कोनकी रडत असतो!’
ही कथा प्रतीकात्मक आहे हे उघड आहे. आधुनिक माणूस डोळ्यांपुढे ठेवून शिंजी यांनी ही कोल्ह्याची कथा सांगितली आहे हे सहजच लक्षात येतं. ही कथा कोनकीच्या उद्ध्वस्त होण्यामुळं, त्याच्या अविचारामुळं अंगावर येते हे खरं; पण त्याचबरोबर ती आपल्याला आत्मपरीक्षण करायलाही भाग पाडते...आपणही असेच धावत सुटलो आहोत काय, हा विचार वाचक करू लागतो. केवळ लिओ टॉल्स्टॉय यांची ‘माणसाला किती जमीन लागते?’ ही एकच कथा आपल्याला आठवत नाही, तर आजोबांना जिवंत पुरण्यासाठी खड्डा खोदणाऱ्या वडिलांचं अनुकरण करणारा छोटासा निष्पाप मुलगाही आपल्याला आठवतो. कुण्या प्रिय व्यक्तीसाठी आईचं काळीज कापून तिच्याकडे धावत सुटलेला आणि तो ठेचकाळून पडल्यानंतर ‘बाळा, फार लागलं तर नाही ना?’ असा प्रश्न त्या बाळाला विचारणारं आईचं काळीजही आठवतं. धावणं वाईट नाही; पण धावण्याच्या आंधळ्या स्पर्धेत सहभागी होण्याचे तोटे ही कथा ठळकपणे मांडते
आजूबाजूला अशीच स्पर्धा सुरू आहे.

सध्याच्या कोरोनाकाळानं या धावण्याच्या स्पर्धेतला फोलपणा उघड केला असला तरी लोकांचे डोळे उघडले आहेत असं चित्र आज तरी आजूबाजूला दिसत नाही. जागतिकीकरणानं अशा छाती फुटेपर्यंत, रक्त ओकेपर्यंत धावण्याच्या स्पर्धा सर्वांसाठी जागजागी तयार केल्या आहेत. स्वत्त्व गमावून केलेल्या लढाईत विजय मिळाला तरी तो अर्थहीन असतो हे सत्य योग्य वेळी, योग्य भाषेत सांगण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाला ठाऊक असणारं हेच सत्य कोनकीची गोष्ट सांगत आहे. बालसाहित्यातल्या बहुधा सगळ्याच प्राणिकथा असाच तर आलाप करत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com