बालसाहित्याची चर्चा आणि चिंतन (विद्या सुर्वे-बोरसे)

vidya surve borse
vidya surve borse

बालसाहित्याविषयीचा विचार हा ग्रंथव्यवहारालाही चालना देत असतो. ‘येत्या वर्षभरात आजूबाजूच्या मुलांना मी दहा पुस्तकांची ओळख करून देईन आणि त्यांच्याकडून ती वाचून घेईन’ हा निश्चय प्रत्येकानं केला तर आगामी काळात मुलांच्या संदर्भातलं ग्रंथव्यवहाराचं चित्र पुष्कळच बदललेलं असेल.

मध्यंतरी मला एक मेसेज आला. नगरच्या महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक असलेले सुधाकर शेलार यांचा तो मेसेज होता. मराठी बालसाहित्यातील नियतकालिकं आणि बालनायक यांच्याविषयी त्यांना माहिती हवी होती. ‘साहित्यसंशोधन : वाटा आणि वळणे’ हे शेलार यांचं पुस्तक गेल्या वर्षी प्रकाशित झालं आणि काही महिन्यांतच पहिली आवृत्ती संपली.
या क्षेत्रातल्या अभ्यासकांना अशा पुस्तकाची आवश्यकता होती.
साहित्यप्रकार आणि साठोत्तरी प्रवाह यासंदर्भानं उपयुक्त माहिती या पुस्तकामुळे नव्या संशोधकांना उपलब्ध झाली. या पुस्तकाच्या दुसऱ्या सुधारित आवृत्तीत ‘बालसाहित्याचे संशोधन’ हा अधिकचा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे. याअनुषंगानं शेलार यांना काही संदर्भ पुरवले. मराठी बालसाहित्याच्या संदर्भात ही एक आशादायी घटना आहे, असं मला वाटलं.

बहुतेक समीक्षक-संशोधक-अभ्यासक जेव्हा मराठी साहित्यव्यवहाराबद्दल बोलत असतात तेव्हा ‘बालसाहित्य’ या प्रकाराकडे त्यांच्याकडून कळत-नकळत दुर्लक्ष होत असतं. मोठ्यांचं बालसाहित्याचं वाचन पूर्णत: थांबलेलं आहे किंवा त्यांना बालसाहित्य फारसं महत्त्वाचं वाटत नाही अशा दोन शक्यता आहेत. मराठीतल्या ज्येष्ठ किंवा महत्त्वाच्या लेखकांच्या लेखनाची संपादनं जरी चाळली तरी या संपादनांमध्ये
त्यांचं बालसाहित्य पूर्णत: दुर्लक्षिलेलं दिसेल. उदाहरणार्थ : राजा ढाले यांच्याविषयी लिहिताना त्यांनी बालकांसाठी लिहिलेल्या कविता आणि छोट्या कथा यांच्याकडे लक्ष जातंच असं नाही. चंद्रकांत खोत यांचा ‘चनिया-मनिया बोर’ हा कथासंग्रह किशोरवयीन मुलांसाठी एक भन्नाट पर्वणी आहे; पण खोत यांच्या कादंबरीविषयी आणि कवितेविषयी भरभरून लिहिणारे या संग्रहाचा उल्लेखदेखील करत नाहीत. भारत सासणे हे मराठी दीर्घ कथेला नवा पैलू देणारे सन १९८० नंतरचे महत्त्वाचे कथाकार आहेत. सासणे यांनी दीर्घ कथेच्या अवकाशात केलेले प्रयोग हे एकूणच मराठी कथेचा परीघ विस्तारणारे आहेत. सासणे यांनी बालकांसाठीही नाटुकली लिहिली आहेत. ‘जंगलातील दूरचा प्रवास’, ‘टुण टुण बेडकाचा प्रवास’ या त्यांच्या किशोरकादंबऱ्या अफलातून आहेत. ‘समशेर कुलूपघरे’च्या रूपात त्यांनी एकविसाव्या शतकाचा बालनायक मराठी बालसाहित्याला दिला. मात्र, सासणे यांच्या बालसाहित्याची चर्चा झाली आहे असं दिसत नाही. इतकंच नव्हे तर, साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार लाभूनदेखील लीलाधर हेगडे, अनिल अवचट यांच्या बालसाहित्याची दखल गांभीर्यानं घेतली गेली आहे असं चित्र नाही.

बंगाली भाषेतला प्रत्येक मोठा लेखक लहान मुलांसाठी आवर्जून लिहीत असतो. लहान मुलांसाठी लिहिल्याशिवाय लेखक म्हणून मान्यताच नाही असं तिकडचं दृश्य आहे. रवींद्रनाथ टागोर ते सत्यजित राय अशी कितीतरी बंगाली लेखकांची नावं सांगता येतील, ज्यांनी ‘भारतीय बालसाहित्य’ आकाराला आणलं. हिंदीतही प्रेमचंद ते विनोदकुमार शुक्ल अशी एक फळी उभी आहे, जिनं मुलांसाठी भरभरून लिहिलं. मराठीत निराळं चित्र आहे असं नाही. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, शान्ता शेळके, रत्नाकर मतकरी यांनी प्रौढ वाचकांप्रमाणेच लहानांच्याही मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तथापि, चांगल्या समीक्षकांअभावी त्यांचे हे प्रयत्न दुर्लक्षिले जात आहेत.

‘बालसाहित्यः आकलन आणि समीक्षा’ हे माझं पुस्तक सन २०१५ मध्ये अनिल अवचट यांच्या हस्ते प्रकाशित झालं. प्रकाशनसोहळ्याला ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’तले मराठीचे प्राध्यापक प्रा. मनोहर जाधव, ‘गरवारे बालभवन’च्या शोभा भागवत, मराठवाड्यातून पृथ्वीराज तौर, कोकणातून मदन हजेरी उपस्थित होते.
‘मुलांसाठी लिहिलेली पहिली मराठी बालसाहित्यसमीक्षा’ अशा शब्दांत जाधव यांनी या प्रकाशनसमारंभात पुस्तकाचा उल्लेख केला. खरं तर हा सुखावणारा उल्लेख होता. मात्र, मराठी बालसाहित्याचं मुद्रणयुग सुरू होऊन दोनशे वर्षं उलटून गेल्यानंतरसुद्धा मुलांसाठी लिखित पातळीवर स्वतंत्रपणे वाचनविचार रुजवला गेला नाही अशी खंत मला जाणवत राहिली. जिथं मराठी बालसाहित्याची योग्य समीक्षा फारशी नाही तिथं मुलांसाठी समीक्षा असणं किती अवघड. मुलांसाठी स्वतंत्रपणे साहित्यसमीक्षा लिहावी असं का बरं कुणाला वाटलं नसेल? ‘समीक्षा आणि वाङ्मयीन टीकेचा व्यवहार हे मुलांचं क्षेत्र नाही,’ असं आपण गृहीत धरून चाललो आहोत का...मुलांसाठी लिहायचं तर बाळबोध भाषेतच लिहायचं असं आपल्यातल्या अनेकांना अजूनही वाटत असावं का...आपण वाचलेल्या उत्तमोत्तम साहित्यकृती मुलांनी स्वतःहून वाचाव्यात यासाठी काय काय करता येऊ शकेल असा विचार बहुतेकजण का करत नसतील...असे अनेक प्रश्न मला पडले. समीक्षक हा जाणकार वाचक असतो. या जाणकार वाचकाचं बालवाचकांकडे लक्ष का जात नसावं? मुलांच्या पातळीवर जाऊन कलाकृतीमधली सौंदर्यस्थळं त्यांना उलगडून दाखवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी बालसाहित्याचं गंभीर वाचन होण्याची गरज आहे.

आपल्याकडे बालसाहित्याची समृद्ध परंपरा आहे. या परंपरेचा अल्पस्वल्प इतिहास लिहिला गेला आहे. गोपीनाथ तळवलकर, देवीदास बागूल, मालतीबाई दांडेकर, लीलावती भागवत, लीला दीक्षित, विश्वास वसेकर, मंगला वरखेडे यांनी यासाठी श्रम घेतले आहेत. इतिहासलेखन करताना महत्त्वमापन आणि मूल्यमापन असा एक अपरिहार्य टप्पा असतोच...लेखक आणि कलाकृती यांची तुलना मनात असते...लेखकाचं वेगळेपण नोंदवणारी चिकित्सक विधानंही इतिहासलेखक करत असतो. त्यामुळे न्याय्य वाङ्मयेतिहासलेखन करण्यासाठी इतिहासलेखक हा उत्तम समीक्षक असायलाच हवा. तेव्हाच ज्याचं त्याचं माप ज्याच्या त्याच्या पदरात जातं.

बालसाहित्यसमीक्षेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे, विविध पुस्तकांवर लिहिलेलं आस्वादात्मक लेखन. नीलिमा गुंडी, रजनी हिरळीकर, नरेंद्र लांजेवार, हेरंब कुलकर्णी, अशोक देशपांडे, नामदेव माळी, राजा शिरगुप्पे, सदानंद पुंडपाळ, बबन शिंदे, प्रशांत गौतम यांनी अशा प्रकारचं लेखन केलं आहे. मुलांसाठीच्या विविध नियतकालिकांमध्ये आणि पुरवण्यांमध्ये अशा पद्धतीचं लेखन प्रकाशित होत असतं. कलाकृतीकडे वाचकांना आकर्षित करून घेण्याच्या दृष्टीनं हे लेखन महत्त्वाचं आहे. पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावना किंवा पुस्तकाचं मलपृष्ठ इत्यादी ठिकाणी लिहिलेला प्रशंसापर असा मजकूर यांचाही समावेश या पद्धतीच्या आस्वादात्मक लेखनात करावा लागेल. मैत्री नरेंद्र लांजेवार, मथू सावंत, दयासागर बन्ने यांनी विविध बालसाहित्य-कलाकृतींना शाळकरी विद्यार्थ्यांनी दिलेला वाचकप्रतिसाद संपादित केला आहे. विद्यार्थ्यांमधूनच बालसाहित्याचे समीक्षक निर्माण करण्याचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. देवकर्ण मदन हे मार्क्सवादी दृष्टीनं साहित्यसमीक्षा लिहिणारे समीक्षक. अलीकडच्या काळात त्यांनी बालसाहित्यासंदर्भात केलेल्या नोंदी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. लेखक आणि वाचक या दोहोंच्या पातळीवर मदन यांचं विवेचन दिशादर्शक आहे.

बालसाहित्याच्या संदर्भानं प्रकाशित-संपादित ग्रंथांच्या प्रस्तावना आणि त्यांतले लेख यांचा विचार अधिक नीटपणे समीक्षा म्हणून करता येईल. मंदा खांडगे, लीला दीक्षित, विजया वाड, स्वाती काटे, मदन हजेरी, मधुकर वाकोडे, सुरेश सावंत, नंदकुमार मोरे यांनी संपादित केलेली पुस्तकं यादृष्टीनं चाळता येतील. ‘बालसाहित्याचं अंतरंग’, ‘मराठवाड्याचे बालसाहित्य: आकलन आणि समीक्षा’, ‘बालशिक्षण, बालसाहित्य : विविध आयाम’, ‘बालकुमारसाहित्य : आशय आणि लयतत्त्व’, ‘मराठी बालसाहित्य: विचार आणि दर्शन’, ‘मुलांची चित्रकला आणि आपण’, ‘चला लिहू या’, ‘मुलांचे ग्रंथालय’ अशी अनेक पुस्तकं बालसाहित्याविषयी विस्तारानं बाजू मांडताना दिसतील.

बालसाहित्याच्या संशोधनाच्या आणि समीक्षेच्या विकासात मदत होते ती विद्यापीठीय आणि अकादमीय चर्चासत्रांची व परिसंवादांची. मुंबई किंवा अन्य ठिकाणी या विषयावर वर्षातून एक तरी चर्चासत्र साहित्य अकादमी आयोजित करत असते. डॉ. रमेश वरखेडे यांनी नाशिकमधल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज इंजिनिअरिंग’च्या व ‘कळवण महाविद्यालया’च्या वतीनं मराठी बालसाहित्यावर अत्यंत महत्त्वाचं चर्चासत्र काही वर्षांपूर्वी आयोजिलं होतं. नांदेड इथल्या ‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा’नं यासंदर्भात उचललेलं पाऊल हे इतर विद्यापीठांना अनुकरणीय आहे. नांदेड विद्यापीठ हे बालकांना व बालसाहित्याला व्यासपीठ मिळवून देण्याचं कार्य नियमितपणे करत आहे. केवळ मराठीच नव्हे, तर संस्कृत, उर्दू, हिंदी, कानडी, पंजाबी, तेलगू, इंग्लिशसमवेत फ्रेंच आणि स्पॅनिश या भाषांतलं बालसाहित्य आज कोणत्या टप्प्यावर आहे, याविषयीची चर्चा नांदेड विद्यापीठानं घडवून आणली होती. गुजरातमधल्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठा’नंही भारतीय भाषांतल्या बालसाहित्याचा सर्वांगीण वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यातली ‘भाषा’ ही संस्था बालसाहित्याचा विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवण्यासाठी निरनिराळे उपक्रम आयोजित करत असते. ‘सुंदर माझी शाळा’चे गणेश घुले यांनी, मुलांसाठी विचार करणारे विविध क्षेत्रांतले अभ्यासक ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून एकाच मंचावर आणले आहेत. या सर्व प्रयत्नांनी बालसाहित्यविषयक विचाराला अलीकडच्या काही वर्षांत गती मिळाली हे खरं आहे.

किरण केंद्रे, शुभदा चौकर, सुभाष विभूते, राजीव तांबे, पृथ्वीराज तौर हे बालसाहित्याचा सातत्यपूर्ण अभ्यास करणारे काही समीक्षक-संपादक आहेत. उपक्रमशीलता आणि प्रयोगशीलता यांची सांगड घालून मुलांच्या पुस्तकांचा विचार ही मंडळी मांडत आहेत.

बालसाहित्याच्या संदर्भात लेखन करणाऱ्या काही समीक्षकांचा व उपक्रमांचा उल्लेख मी या लेखात केला. ही नामावली परिपूर्ण नाही. ही संख्यासुद्धा तशी अल्पच आहे हेही इथं मला लक्षात आणून द्यायचं आहे. मुलांसाठी पुस्तकांचं आकलन, आस्वाद आणि मूल्यमापन करणाऱ्या जाणकार वाचकांची संख्या वाढली पाहिजे.

बालसाहित्याविषयीचा विचार हा ग्रंथव्यवहारालाही चालना देत असतो. ‘येत्या वर्षभरात आजूबाजूच्या मुलांना मी दहा पुस्तकांची ओळख करून देईन आणि त्यांच्याकडून ती वाचून घेईन’ हा निश्चय प्रत्येकानं केला तर आगामी काळात मुलांच्या संदर्भातलं ग्रंथव्यवहाराचं चित्र पुष्कळच बदललेलं असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com