चातुर्याच्या चार गोष्टी (विद्या सुर्वे-बोरसे)

vidya surve borse
vidya surve borse

मुल्ला नसरुद्दीनच्या गोष्टी वर्तमानाचा अन्वयार्थ लावण्याची नवी दृष्टी देतात. या गोष्टी आपलं जगणंही नव्यानं उजळतात, म्हणूनच जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी आजूबाजूच्या बालगोपाळांना नसरुद्दीनच्या गोष्टी सांगते. नसरुद्दीनची कर्तबगारी ऐकताना मुलांचे डोळे विस्फारलेले असतात. एक प्रकारचं नवल, आश्चर्य त्यांच्या चेहऱ्यावर प्रकटतं. ‘पुढं काय’ ही उत्कंठा आणि वाईट प्रवृत्तीला नसरुद्दीननं दिलेली हूल, तसंच त्या प्रवृत्तीला शिकवलेला धडा मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवतो.

बालपणी वाचलेल्या पुस्तकांमधल्या ज्या गोष्टी आणि किस्से लक्षात राहिले त्यात मुल्ला नसरुद्दीन हा एक. नसरुद्दीनचं व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा एकदम वेगळं आहे. त्याची कुणाशीच तुलना होऊ शकत नाही. बिरबल, तेनालीरामन, शेखचिल्ली, अल्लाउद्दीन, राजपुत्र ठकसेन, सिंदबाद, गलिव्हर, टारझन, मोगली... कुणाशीही नसरुद्दीनची तुलना अशक्य आहे.
नसरुद्दीन हाडा-मांसाचा माणूस आहे. अत्यंत सामान्य आणि कफल्लक. तो चतुर आहे; पण धूर्त नाही. तो तत्त्वज्ञ आहे आणि हे त्याच्या गावीही नाही, तो बदला घेतो; पण सूडबुद्धीनं नव्हे. तोही पैशामागं धावतो; पण तो लोभी नाही आणि धनाचं गाठोडं जेव्हा जेव्हा त्याला गवसलं तेव्हा तेव्हा त्यानं त्यातली पै न् पै परोपकारात दान केली. कफल्लकपणा नसरुद्दीननं मुकुटासारखा मिरवला.

नसरुद्दीनचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या शौर्यकथा निव्वळ योगायोगातून घडलेल्या आहेत. तो फारच शक्तिशाली होता, बलवान होता हे त्याच्या शौर्यकथांमधून कुठंही सिद्ध होत नाही. जगज्जेता भारतीय पहिलवान गामा यांच्याविषयी मागं एक लेख वाचला होता. कुस्तीतल्या त्यांच्या निर्णयक्षमतेविषयी आणि अचाट शक्तिसौष्ठवाविषयी. त्यांना रोजच्या आहारात २९ लिटर दूध, पाऊण लिटर गावरान तूप, अर्धा किलो लोणी, एक किलो बदाम, सहा किलो फळं लागत असत. त्यांच्या खुराकावर शंभर वर्षांपूर्वी रोज दीडशे रुपये खर्च होत. हे वर्णन अवाक् करणारं होतं.
त्या तुलनेत नसरुद्दीन म्हणजे अगदीच भाजी-भाकरीवाला, खरं तर पाव-गोश्तवाला साधा माणूस; पण त्याचं सामान्यत्वच त्याला असामान्य ठरवतं, त्याची सुख-दु:खं त्याला इतरांशी जोडून ठेवतात.

नसरुद्दीननं पुष्कळ माणसं जोडली; पण जिवाभावाचे म्हणता येतील असे त्याच्या आयुष्यात दोनच जण होते. एक म्हणजे त्याचं प्राणप्रिय गाढव आणि दुसरी त्याची बायको गुलजान. हे दोघंही त्याच्या आयुष्यात सावलीसारखे राहिले. त्यामुळे नसरुद्दीनला आयुष्यात कधी पोकळी जाणवली नाही. नसरुद्दीन त्याच्या कार्य-कर्तृत्वामुळे राजसत्तेच्या मनातून उतरला, सुलतानाच्या रागाचा बळी ठरला, हद्दपार केला गेला, निर्वासिताचं जिणं अनेक वेळा त्याच्या वाट्याला आलं; पण तो कधीही एकाकी पडला नाही. मायेची पाखर घालणारी मंडळी काळजासारखी त्याच्यापाशी राहिली.
नसरुद्दीनला समजून घेताना, आपल्या जवळच्या माणसांची सोबत, त्यांचं अस्तित्व आणि त्यांनी परस्परांवर टाकलेला विश्वास मला खूपच मोलाचा वाटतो. आपल्या आजूबाजूची माणसं जेव्हा अशी सावली म्हणून जवळ असतात तेव्हा जगण्याला जिव्हाळ्याचा स्पर्श लाभतो आणि तो प्रत्यक्ष कृतीतून प्रवाहित होत राहतो.

नसरुद्दीनचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या अस्तित्वाला कोणताही राजस्पर्श नाही, अलौकिकत्वाची पुटं त्याच्या वर्तनावर चढलेली नाहीत. सुलतानाचे, सावकाराचे सैनिक, गुप्तहेर मागं लागतात तेव्हा तो सामान्य माणसाप्रमाणे या गल्लीतून त्या गल्लीत धावत सुटतो, इथं-तिथं लपत फिरतो, आजूबाजूच्या कोलाहलाचा भाग बनून गर्दीत मिसळून जातो.
त्याला बिरबलासारखा राजाश्रय लाभलेला नाही. तो सिंदबादसारखा धाडसी नाही. तो शेखचिल्लीसारखा बावळट नाही. तेनालीरामन जसा प्रसिद्ध होता तसा नसरुद्दीनसुद्धा जनमानसात प्रसिद्ध होता. मात्र, त्याचं चातुर्य कुठल्या संस्कृतपंडिताप्रमाणे विद्वज्जड नाही.

नसरुद्दीनची गोष्ट त्याची एकट्याचीच गोष्ट नाही. ती बुखारा शहराची, तिथल्या निद्रिस्त राजसत्तेची, लुटारू सावकारांची, मुजोर अधिकारीवर्गाची आणि पिचलेल्या दरिद्री माणसांचीही गोष्ट आहे. एका अर्थानं ती कोणत्याही समाजाच्या वर्तमानाचीच गोष्ट आहे आणि त्यामुळे जगभरातल्या लोकांना तो आवडतो, आपलासा वाटतो. नसरुद्दीन हा परिघावरच्या शोषितांच्या जीवनातला आशेचा किरण आहे. जगभरातल्या विविध देशांनी या व्यक्तिमत्त्वावर आपला दावा केला आहे. ‘मुल्ला नसरुद्दीन हा आमच्या देशात होऊन गेला,’ असं सांगणारे देश आजही आहेत.
शहरातल्या दास्यात जखडलेल्या जनतेसाठी, लोखंडकाम करणाऱ्यांसाठी, मातीची भांडी बनवणाऱ्यांसाठी, याचकांसाठी
नसरुद्दीन हा ढालीसारखा आहे. तो शस्त्राचे वार स्वत:वर झेलतो आणि इतरांना वाचवतो. बुखारा शहरातला तत्कालीन व्यापार, धर्मशाळा, संरक्षणपद्धती, धर्मव्यवस्था, करपद्धती, गुलामांचे बाजार यांचं दर्शन ‘मुल्ला नसरुद्दीनच्या कथा’ घडवतात. बगदाद, इस्तंबूल, बख़्शी सराय, दमिश्क, तेहरान, अखमेज, तिफलिस अशा अन्य शहरांचंही राजकारण आणि व्यापार यांचाही परिचय नसरुद्दीनच्या कथांमुळे होतो. या कथांमधली शहरं जगाच्या नकाशात शोधणं हा माझा बालपणीचा आवडता छंद होता. गलिव्हर, सिंदबाद आणि इतरांच्या कथाही नकाशावाचनासाठी मदतीच्या ठरू शकतात.
नसरुद्दीनच्या कथा या बालसाहित्याचा भाग कशा काय झाल्या असाव्यात असा प्रश्न पडतो. केवळ नसरुद्दीनच नव्हे, तर बिरबल आणि तेनालीरामनसुद्धा भारतीय बालसाहित्यात कसे एकजीव झाले असावेत? यामागची समाजाची मानसिकता काय असेल? चातुर्यकथा केवळ चातुर्य थोडंच सांगतात? त्या समाजाचा दांभिक चेहराही उघडा करून दाखवत असतात! ‘समाजात अशी फसवणारी माणसं असतात, तेव्हा तूही चतुर होऊन जग’ असा बोध अपेक्षित असेल का? मग वयानं मोठी झालेली मंडळी नीट का वागत नाहीत? ती आपलं वर्तन का सुधारत नसतील? समाजाच्या मानसिकतेमधला दुभंगलेपणा यामुळे उघड होतो. दुटप्पीपणासुद्धा अधोरेखित होतो.   
बालसाहित्य हे व्यापक जीवनदर्शन घडवत नाही असं ज्यांना वाटतं त्यांनी नसरुद्दीनच्या गोष्टी आणि त्या गोष्टींचा अनेकांनी केलेला विस्तार वाचला पाहिजे, असंही दुसऱ्या पातळीवर सांगता येईल.

बुखारामधला जफर हा सावकार एकदा पाण्यात बुडत असतो. काठावर बरीच गर्दी असते आणि गर्दीतील काही लोक बुडणाऱ्याला ‘हात दे! हात दे!’ असं म्हणत असतात, बुडणारा मात्र ‘मदत करा!! मदत करा!!’असं ओरडत पाण्यात गटांगळ्या खात असतो. नसरुद्दीन त्याच रस्त्यानं जात असतो. तो सगळं दृश्य पाहतो आणि म्हणतो : ‘बुडणारी व्यक्ती एकतर पुढारी असणार किंवा बडा अधिकारी असणार किंवा अन्य मोठी असामी असणार. कुणाला काही देणं
अशा व्यक्तींना माहीत नसतं. अगदी मरतानादेखील ते कुणालाही आपला हात देणार नाहीत.’  
नसरुद्दीन पाण्याच्या काठाजवळ जातो आणि म्हणतो : ‘हा माझा हात घे’. 'घे' हा शब्द ऐकताच बुडणारा जफर सावकार सगळा जीव एकवटून प्रयत्न करतो आणि नसरुद्दीनचा हात पकडतो. सावकाराला नसरुद्दीन वाचवतो. मात्र,
आपलं स्वतःचं जीवन आणि शहरातल्या सर्वसामान्यांचं जीवन याच सावकारामुळे
अगदी नरक झालं आहे हे जेव्हा त्याला नंतर कळतं, जाणवतं तेव्हा सावकाराचा जीव वाचवल्याचं नसरुद्दीनला दु:खही होतं.

म्हटलं तर ही फार साधी कहाणी आहे आणि म्हटलं तर ती एकूणच मानवी प्रवृत्तीवर भाष्य करणारी व वर्तमानातही लागू पडावी अशी कहाणी आहे.
नसरुद्दीनच्या अशा शेकडो कथा वाचकांना माहीत असतात.
आणखी एक बाब म्हणजे, सांगोवांगी चालत आलेल्या आणि जगभर पसरलेल्या या कथा वाचताना त्यांचा विस्तार आणि त्यांत झालेली सरमिसळही मजेशीर वाटते. नसरुद्दीनच्या चातुर्यकथा वाचता वाचता मध्येच त्यांचा तोंडवळा अकबर-बिरबलाच्या गोष्टीसारखा, मध्येच ठकसेनाच्या कहाणीसारखा वाटतो. गंगाराम पटेल आणि बुलाखीच्या गोष्टी उत्तरेकडे  लोकपरंपरेत सांगितल्या जातात. त्यांचे किस्से सांगणारी मंडळी
नसरुद्दीनच्या कहाणीतही ते किस्से
एकत्रित करून सांगत असतात.  
लोककथांमध्ये जेव्हा एका नायकाच्या आयुष्यातल्या घटनांचं दुसऱ्या नायकाच्या जीवनातल्या घटनांशी साम्य आढळतं तेव्हा ते नायक समाजात किती एकजीव झाले आहेत याचाही अनुभव येतो.

मुल्ला नसरुद्दीनची गोष्ट वर्तमानाचा अन्वयार्थ लावण्याची नवी दृष्टी देते. ती आपलं जगणंही नव्यानं उजळते, म्हणूनच जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी आजूबाजूच्या बालगोपाळांना नसरुद्दीनच्या गोष्टी सांगते. नसरुद्दीनची कर्तबगारी ऐकताना मुलांचे डोळे विस्फारलेले असतात, एक प्रकारचं नवल, आश्चर्य त्यांच्या चेहऱ्यावर प्रकटतं. ‘पुढं काय’ ही उत्कंठा आणि वाईट प्रवृत्तीला नसरुद्दीननं दिलेली हूल, तसंच त्या प्रवृत्तीला त्यानं शिकवलेला धडा मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवतो.
चातुर्याच्या अशा चार शहाण्या गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात म्हणूनच आपले चेहरे उजळलेले असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com