मनाला घाण लागू नये म्हणूनही जप! (विद्या सुर्वे-बोरसे)

vidya surve borse
vidya surve borse

पुस्तकं ही कधीच एकेकटी नसतात, ती विचारांचा प्रवाह निर्माण करत जात असतात. ‘श्यामची आई’ आपल्या आत श्रद्धा जागवत असेल, तर डॉ. राजेंद्र भारुड यांची आई आपल्या मनात स्वाभिमान जागवते, लढण्याची उमेद निर्माण करते. श्याम आणि राजेंद्र या दोघांचं जीवन हे कृतज्ञतेनं काठोकाठ आहे. आपल्या मातेविषयीची, मातृभूमीविषयीची, मातृभाषेविषयीची त्यांच्या जीवनातली कृतज्ञता आपल्याला सामग्र्यानं जाणवत राहते.

आई आली व तिनं माझं अंग पुसलं.
ती म्हणाली : ‘‘देवाची फुलं काढ.’’
मी म्हटलं : ‘‘माझे तळवे ओले आहेत; त्यांना माती लागेल. माझे तळवे पूस.’’
‘‘तळवे रे, ओले असले म्हणून काय झालं? कशानं पुसू ते?’’ आई म्हणाली.
‘‘तुझे ओचे धोंडीवर पसर, त्यावर मी पाय ठेवीन. पाय टिपून घेईन व मग उडी मारीन. मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली. पसर तुझा ओचा,’’ मी हट्ट धरून म्हटलं.
‘‘हट्टी आहेस हो श्याम, अगदी. एकेक खूळ कुठून शिकून येतोस कुणास ठाऊक! हं, ठेव पाय.’’ आईनं आपले ओचे धोंडीवर पसरले. मी माझे पाय त्यावर ठेवले. नीट टिपून घेतले व उडी मारली. आईचं लुगडं ओलं झालं, त्याची मला पर्वा नव्हती. तिला थोडंच ते त्या वेळेस बदलता येणार होतं? परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये, त्याची हौस पुरवावी म्हणून तिनं आपलं लुगडं ओलं करून घेतलं. ती मुलासाठी काय करणार नाही, काय सोसणार नाही, काय देणार नाही?
मी घरात गेलो व देवाची फुलं काढू लागलो. आई निरांजन घेऊन आली व म्हणाली : ‘‘श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस; तसाच मनाला घाण लागू नये म्हणूनही जप हो. देवाला सांग, शुद्ध बुद्धी दे म्हणून.’’

सानेगुरुजी यांच्या ‘श्यामची आई’मधला हा सुपरिचित संवाद. ‘श्यामची आई’ हे मराठी बालसाहित्यातलं नि:संशय अनमोल लेणं आहे. या पुस्तकानं महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या घडवल्या. सन १९३३ मध्ये नाशिक इथल्या तुरुंगात असताना सानेगुरुजी यांनी या कथा लिहिल्या, नंतरच्या तीन-चार वर्षांत त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं आणि तेव्हापासून या पुस्तकाच्या लाखो प्रती मराठी घराघरात वाचल्या गेल्या, वाचून दाखवल्या गेल्या. एक काळ असाही होता की संध्याकाळी दिवेलागणीनंतर किंवा जेवण झाल्यानंतर झोपण्यापूर्वी मध्यमवर्गीय घरात या कथा लहान मुलांना आवर्जून सांगितल्या जात. कथा ऐकता ऐकता साऱ्या घरा-दाराचे डोळे तेव्हा पाणावत, डबडबून येत. आईची महती हा या गोष्टींचा विषय आहेच; पण आई समजून घेता घेता या गोष्टी जिव्हाळ्याचे संस्कार, प्रेम आणि कृतज्ञतेचे संस्कार बाल-कुमारमनावर करत असत. या गोष्टी वाचून घरातल्या लहान आणि थोर दोघांच्याही डोळ्यांत अश्रू उभे राहत. कदाचित म्हणून सानेगुरुजी यांचा उल्लेख ‘रडके साहित्यिक’ असा वर्षानुवर्षं केला गेला. मात्र, असा उल्लेख करणाऱ्यांनी सानेगुरुजींचं विपुल साहित्य बहुधा वाचलेलं नसतं. सानेगुरुजींनी सत्तरपेक्षा अधिक पुस्तकं लिहिली. या पुस्तकांचे विषय आणि वाङ्मयप्रकार भिन्न भिन्न आहेत. पत्रे, निबंध, कथा, कादंबरी, कवितांपासून चरित्रं आणि भाषांतरापासून तत्त्वज्ञानापर्यंत त्यांनी संचार केला. ‘इस्लामी संस्कृती’, ‘कला आणि इतर निबंध’, ‘कुरल’ या तमिळ महाकाव्याचं भाषांतर, ‘भारताचा शोध’ हे पंडित नेहरू यांच्या ग्रंथाचं भाषांतर, ‘महात्मा गौतम बुद्ध’ हे चरित्र, ‘दिल्ली डायरी’, ‘सुंदर पत्रे’, ‘पत्री’ हा कवितासंग्रह, ‘मानवजातीची कथा’ हे भाषांतर, ‘गोड गोष्टी’, ‘भारतीय संस्कृती’ अशी बहुविध ग्रंथसंपदा सानेगुरुजी यांच्या नावे आहे. त्यांना हिंदी, इंग्लिशबरोबरच तमिळ आणि बंगाली या भाषा येत होत्या. ‘आंतरभारती’ची त्यांची संकल्पना नव्या, एकजीव भारताचं स्वप्न पाहणारी होती. ‘साधना’ हे साप्ताहिक त्यांनी सुरू केलं. भारतीय स्वातंत्र्याची चळवळ असो अथवा समाजोद्धाराची चळवळ असो, सानेगुरुजी हे जीवनातल्या सगळ्या आघाड्यांवर लढवय्ये होते. ‘हस रे माझ्या मुला’सारखी अलवार कविता लिहिणारे सानेगुरुजी ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो,’ ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे,’ ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान’ या इतर कवितांमधून क्रांतीची बीजं पेरताना दिसतात. पंढरपूरच्या विठ्ठलमंदिराची दारं हरिजनांसाठी खुली व्हावीत यासाठी त्यांनी सन १९४६ मध्ये उपोषण केलं होतं, त्यानंतर विठ्ठलमंदिराची दारं सर्वांसाठी उघडली गेली. अस्पृश्यता, जातिप्रथा, उच्च-नीचता, अनिष्ट रूढी यांना सानेगुरुजींनी आयुष्यभर कडाडून विरोध केला. व्यक्तिगत जीवनात सानेगुरुजी हे ‘बोले तैसा चाले’ याचं मूर्तिमंत उदाहरण होते.

सानेगुरुजींविषयी हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी ‘श्यामची आई’च्या संदर्भात अत्यंत विकृत मिम्स समाजमाध्यमांतून प्रसारित करण्यात आल्या होत्या. त्याची पुढची पायरी म्हणून सानेगुरुजींना दलितविरोधीही ठरवलं गेलं. मोडतोड करून उतारे, संवाद सादर केले गेले. समाजविघातक शक्तींचं असं वर्तन केविलवाणं आणि अशोभनीय आहे. यातून काहीही साध्य होणार नाही. चिखलफेक केल्याचं समाधान काही विकृत लोकांना मिळेल एवढंच. हिंदीतले प्रेमचंद यांच्यावरही असेच आरोप काही वर्षांपूर्वी करण्यात आले होते. त्यातून त्यांची प्रतिमा अजून लखलखीत झाली. सानेगुरुजींचं लेखनही आगामी काळात नवं तेज घेऊन पुन्हा सर्वांसमोर येईल.

‘पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस; तसाच मनाला घाण लागू नये म्हणूनही जप’ हे आईनं श्यामला सांगितलेले उद्गार आजच्या काळात स्वत:ला पुनःपुन्हा सांगत राहण्याची आवश्यकता आहे. आपण अशा काळात राहत आहोत जिथं केवळ आंधळी शर्यत आहे, स्वार्थाचे मतलबी वारे वाहत आहेत, थोरा-मोठ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं चारित्र्यहनन सुरू आहे, विशिष्ट समूहाच्या श्रद्धास्थानांवर चिखलफेक केली जात आहे, सामाजात तेढ निर्माण होईल अशी विधानं जाणीवपूर्वक केली जात आहेत, अविवेकी जथे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांची विचारप्रक्रिया बाधित करत आहेत...लोक इतरांकडे जातीच्या, धर्माच्या चष्म्यातून पाहू लागले आहेत...लिंग-जात-धर्म-प्रांत-भाषा यांवरून व्यक्तीचं मूल्यमापन केलं जात आहे. ‘मनाला घाण लागू नये म्हणूनही जप’ हे उद्गार अशा काळात विसरता कामा नयेत.

याच विषण्ण दिवसांत नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांचं ‘मी एक स्वप्न पाहिलं!’ हे आत्मकथन वाचनात आलं. ही गोष्टही आईची आणि मुलाची गोष्ट आहे. भिल्ल सामाजातले डॉ. भारुड यांच्या जिद्दीची, दुर्दम्य इच्छाशक्तीची, अव्याहत परिश्रमांची कहाणी म्हणजे ही आत्मकथा. आदिवासी पाड्यातला एक मुलगा जिल्हाधिकारी होतो ही स्वप्नवत् गोष्ट एकाएकी घडलेली नसते. हा प्रवास अनेक खाचखळग्यांनी आणि मानापमानांनी भरलेला असतो. म्हणूनच अशा कथा सांगणारी पुस्तकं सतत जवळ बाळगायची असतात. पुस्तकं ही कधीच एकेकटी नसतात, ती विचारांचा प्रवाह निर्माण करत जात असतात. ‘श्यामची आई’ आपल्या आत श्रद्धा जागवत असेल, तर डॉ. भारुड यांची आई आपल्या मनात स्वाभिमान जागवते, लढण्याची उमेद निर्माण करते. श्याम आणि राजेंद्र या दोघांचं जीवन हे कृतज्ञतेनं काठोकाठ आहे. आपल्या मातेविषयीची, मातृभूमीविषयीची, मातृभाषेविषयीची त्यांच्या जीवनातली कृतज्ञता आपल्याला सामग्र्यानं जाणवत राहते. ध्येयाला कष्टाची झालर असेल तर ते ध्येय सूर्यासारखं तेज घेऊन येत असतं हे डॉ. भारुड यांची कहाणी वाचताना जाणवतं.

दहावी-बारावीचे निकाल घेऊन नवी पिढी दर वर्षीप्रमाणे खुल्या जगात आली आहे. तिनं ‘श्यामची आई’ वाचलं असेल याबद्दल खात्री देता येणार नाही; पण आगामी काळात या पिढीनं डॉ. भारुड यांचं ‘मी एक स्वप्न पाहिलं!’ हे पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे. ध्येयनिश्चिती आणि त्यासाठी करावा लागणारा संघर्ष यांची ओळख या टप्प्यावर व्हायलाच हवी, तरच तरुणांचे तांडे दिशाहीन होणार नाहीत, तरच आजूबाजूच्या मोहमयी जगाची भूल त्यांना पडणार नाही.

डॉ. भारुड यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे : ‘जर मी हातामधल्या मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसलो असतो, समाजमाध्यमांत माझी दु:खं उगाळत कहाणी सांगत बसलो असतो, ‘माझ्या वाट्याला आलेला संघर्ष खूप मोठा आहे,’ एवढंच म्हणत राहिलो असतो, तर माझ्या ध्येयापर्यंत मी पोहोचू शकलो नसतो. मला एवढंच माहीत होतं, की माझी परिस्थिती मला बदलायची आहे आणि त्यासाठी रात्रीचा दिवस करून, न थकता, न हरता केवळ अभ्यास करायचा आहे.’

दिवस भयावह आहेत हे खरंच; पण या दिवसांत सानेगुरुजी आणि डॉ. राजेंद्र भारुड या दोघांची पुस्तकं आपल्याला जगण्याचं बळ देतात, ‘लढ’ म्हणतात आणि सांगतात : ‘मनाला घाण लागू नये म्हणूनही जप!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com