ध्यास आणि श्वास (विद्या सुर्वे-बोरसे)

vidya surve borse
vidya surve borse

आपलं सगळं शिक्षण, आपली सगळी धडपड ही जीवन आनंदी व्हावं यासाठीच असते. ध्यास आणि श्वास यांची एकरूप झालेली कथा आपल्याला त्या मुक्कामावर घेऊन जाते. यशाकडे आणि आनंदाकडे जाण्याचे मार्ग आडगावाच्या उदाहरणातही असू शकतात. उत्तुंग भरारीसाठी आपण आपलं स्वतंत्र, आपल्या आवडीचं आकाश शोधलं पाहिजे.

सुधा मूर्ती हे बहुपैलू व्यक्तिमत्त्व आहे. विख्यात सामाजिक कार्यकर्त्या, अभियंता, ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या अध्यक्षा, शाळांना संगणक उपलब्ध करून देणाऱ्या चळवळीच्या प्रणेत्या, लेखिका...असे हे पैलू आहेत.
‘आजीच्या पोतडीतल्या गोष्टी’, ‘सुकेशिनी आणि इतर कथा’, ‘थैलीभर गोष्टी’ ही आणि अशी इतरही त्यांची अनेक पुस्तकं भारतातल्या विविध भाषांमधल्या बाल-कुमारवाचकांची आवडती पुस्तकं आहेत. ‘सर्वात सुखी कोण?’ अशी त्यांची एक कुमारकथा आहे. एकदा एक राजा आपल्या प्रजेला विचारतो : ‘तुम्ही सुखी आहात नं?’ राज्यातले सर्व स्त्री-पुरुष राजाला होकारार्थी उत्तर देतात. मात्र, दुसऱ्या दिवशी जेव्हा राजा या जनतेची परीक्षा घेतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ‘जनतेच्या मनातला लोभ, हव्यास, धनसाठा करण्याची वृत्ती, फुकट लाटण्याची मानसिकता ही काही संपलेली नाही. सारं काही असूनही ती पुन्हा नव्या, तसंच गरजेच्या नसणाऱ्या वस्तूंच्या मागं धावत आहे. जोपर्यंत हाव आहे तोपर्यंत सुख नाही.’ सुधा मूर्ती यांची ही गोष्ट दहावी-बारावीच्या परीक्षेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर हटकून आठवली.

कितीही गुण मिळाले तरी ते कमीच, असं चित्र पाहायला मिळत आहे. ज्यांना कमी गुण मिळाले त्यांना उपदेशाचे डोस पाजले जात आहेत आणि जे नापास झाले त्यांचं तर विचारूच नका. एकीकडे त्यांचा घरी-दारी उद्धार होत असतो आणि दुसरीकडे ‘नापासांची गोष्ट’ सांगून त्यांना अब्दुल कलाम यांच्यापासून ते नागराज मंजुळे यांच्यापर्यंतची उदाहरणं दिली जात असतात. सगळ्या टोकाच्या बाबी सुरू असतात. प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातून उदाहरणं देत असतो. मला प्रश्न पडतो, कशासाठी हे सारं? उत्तम नोकरीसाठी. कशासाठी नोकरी? पैशांसाठी. कशासाठी पैसा? सुखासाठी-आनंदासाठी. दहा वर्षांनंतरच्या सुखासाठी आजचा आनंद का गमावून बसायचा? दहा वर्षांनंतर आनंदी होणार आहोत या ईर्ष्येनं धावत राहण्यापेक्षा आनंदी असण्याच्या मार्गावरून चालत राहिलं तर? आनंदी असण्याच्या मार्गाचा पत्ता कुठल्याच पुस्तकात नाही. कोणतेच सर, बाबा, बुवा, महाराज तो सांगणार नाहीत. आनंदाच्या मार्गाची कुठली परीक्षा नाही की त्या परीक्षेत पहिलं आल्यानंतर आनंदाचा मार्ग सापडावा. आनंदाच्या मार्गाची किल्ली आपल्याच हाती असते. ती असते आपल्या आवडी-निवडीत.

अमुक एक व्यक्ती दहावी-बारावीत अयशस्वी झाली तरी ती पुढं जीवनात यशस्वी होते, नव्हे इतरांसाठी मार्गदर्शक होते, हे कसं काय शक्य होतं? याची कारणं शोधायला गेलं तर लक्षात येतं की अशा व्यक्तींपैकी प्रत्येकानं आपली आवड ओळखली. आवडीच्या त्या क्षेत्रात झोकून देऊन काम केलं. कोणतंही क्षेत्र असो, ध्यास आणि श्वास हे एकरूप झाल्याशिवाय यश गवसत नाही. ‘यशस्वी माणसं आपली शिडी आपल्याबरोबर घेऊन चालत असतात,’ असं म्हटलं जातं. हीच ती आनंदाची शिडी आहे. ही असते प्रत्येकाजवळ; पण ‘आपल्या हाती ती आहे,’ हे खूप कमी जणांना कळतं.
नापास लोक यशस्वी होत नसतात तर परिश्रमी, अभ्यासू, जिद्दी आणि चिकाटीनं पुढं जात राहणारे लोक यशस्वी होत असतात हे नेहमीच लक्षात घेतलं पाहिजे. ज्यांना गुण मिळाले त्यांनी गुणांसाठी मेहनत केली होती, ज्यांनी यश मिळवलं त्यांनी यशासाठी मेहनत केली होती. ही मेहनत जर आपल्या आवडीच्या क्षेत्रात असेल तर हसत हसत मार्ग सरतो आणि यश हेच आपला पत्ता विचारत दारात येऊन उभं राहतं.
पालकांनी आपल्या मुलांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन त्यांना भरारी घेऊ दिली पाहिजे. सात पिढ्यांत जे कुणाला जमलं नाही ते ध्येय आपला पाल्य निश्चित गाठू शकतो हा विश्वास असायला हवा. या पार्श्वभूमीवर मला राहुल अल्वारिस यांची गोष्ट आठवली.
***

गोव्यातल्या एका छोट्याशा गावातला मुलगा. जवळच असलेल्या म्हापशालासुद्धा तो दहावी होईपर्यंत कधी एकटा गेला नव्हता. दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होताच तो एक निर्णय घेतो : ‘आता वर्षभर शाळा-महाविद्यालयाकडे पाहायचंदेखील नाही...खूप भटकंती करायची आणि ज्या गोष्टी शालेय अभ्यासाचा भाग नव्हत्या; पण ज्या आपल्या आवडीच्या आहेत, ज्यांचा आपल्याला छंद आहे अशा गोष्टी या वर्षभरात शिकायच्या.’
‘मला आता वर्षभर मनासारखं जगायचं आहे,’ हे तो आई-वडिलांना सांगतो आणि आई-वडीलही त्याच्या या विचाराला होकार देतात. केवळ होकार देऊन थांबत नाहीत तर त्याला मदतही करतात. त्याच्या या ‘सुटी’साठी आपल्या जवळच्या मित्रांनी सहकार्य करावं अशी विनंती त्यांना करतात. आपल्या सोळा वर्षांच्या मुलाला उमलून येता यावं असा अवकाश निर्माण करून देतात.

अल्वारिस यांनी ‘फ्री फ्रॉम स्कूल’ या पुस्तकात हे सगळं कथन केलं आहे. हे पुस्तक मी जेव्हा हाती घेतलं तेव्हा, हे एखादं बोधप्रद किंवा नवा प्रयोग मांडणारं तात्त्विक पुस्तक असावं की काय अशी मला शंका आली. मात्र, हे पुस्तक म्हणजे, जे कोशातून बाहेर पडू पाहत आहे अशा फुलपाखराचं, ज्याला नुकतंच मिसरूड फुटू लागलं आहे अशा पौगंडावस्थेतल्या मुलाचं, उंच झेप घेण्याची आणि विस्तीर्ण आकाशात मुक्त विहार करण्याची स्वप्नं ज्याच्या डोळ्यांत आहेत अशा किशोरवयीन मुलाचं आत्मकथन आहे हे लक्षात आलं आणि मी त्याच्या अनोख्या, साहसी राज्यात हरवून गेले. हे जगही ‘ॲलिस इन वंडरलँड’ इतकंच मनोहारी आहे हे जाणवलं.
निवेदन, डायरीवजा काही भाग आणि केलेल्या कार्याचं प्रत्यक्ष उपयोजन अशा तीन स्तरांवर ‘फ्री फ्रॉम स्कूल’ची मांडणी आहे. एकूण चौदा छोट्या छोट्या प्रकरणांद्वारे अल्वारिस यांनी त्यांचं हे अनुभवकथन मांडलं आहे.

दहावी पास झालेल्या या मुलानं शाळेपासून दूर जात, अनौपचारिक शिक्षणाच्या वाटेवर कोणतं जगणं अनुभवलं असेलं? तर हा मुलगा सुरुवातीला म्हापशाच्या एका दुकानात राहिला. मासेविक्रीचं हे छोटं दुकान. दुकानात येणारी ग्राहकमंडळी ठरलेली, नित्याची. दुकानदारकाका मत्स्यालयांची निर्मिती आणि विक्रीही करत. राहुलनं या काळात माशांवरची पुस्तकं वाचून काढली. मत्स्यालय कसं तयार करायचं हे तो शिकला. काचेची खरेदी, योग्य आकारात काचा कापणं, कोणत्या जागेवर टँक मांडावा, त्याची प्रकाशयोजना, पाण्याची गाळणी कुठं ठेवायची, कोणत्या प्रकारचे मासे असावेत, त्यांची संख्या किती असावी, त्यांची जोपासना कशी करावी? अशा अनेक बाबी त्यानं या दुकानात काम करता करता शिकून घेतल्या. ‘माशांना त्यांच्या आकाराच्या प्रमाणात खाद्य लागतं; पण बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त खाद्य त्यांना दिलं जातं. या जास्तीचा खाद्यामुळे पाणी गढूळ आणि प्रदूषित होतं; परिणामी मासे मारतात,’ ही गोष्ट निरीक्षणातून त्याच्या लक्षात आली. नरभक्ष्यी ‘पिरान्हा’पासून ‘ब्लॅक घोस्ट’पर्यंत विविध माशांची माहिती अगदी सहजपणे पुस्तकाच्या या भागात येते.

पुढचे काही दिवस शेतीची कामं करण्यासाठी राहुलनं शेतातच मुक्काम केला. नांगरणी, जमीन सारखी करणं, पेरणी, खत टाकणं अशा अनेक बाबी तो शिकला. अल्वारिस यांनी लिहिलंय : ‘नांगर चालवणं वाटतं सोपं; पण तसं नाही, त्यालाही कौशल्य आणि ताकद लागते. त्याचंही एक तंत्र आहे. नांगर दोन बैलांच्या मधून चालला पाहिजे. बैलांच्या पायाला तो लागता कामा नये. नांगर चालवताना त्यावर आवश्यक तेवढाच जोर टाकावा लागतो. फाळ जमिनीत जास्त खोल रुतूनही चालत नाही किंवा फार वरती राहूनही जमत नाही. नांगर चालवताना बैलांकडेही लक्ष असावं लागतं. बैलांना योग्य दिशेनं वळवावं लागतं, बांध आला की नांगर उचलून घ्यावा लागतो. महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही परके आहात असं बैलांना वाटता कामा नये. नाहीतर ते तुमच्या सूचना ऐकतच नाहीत.’ अशी निरीक्षणं अगदी सूक्ष्म आणि वाचताना गंमत वाटावी अशी आहेत.
गावातल्या मुलांना हे ज्ञान अगदी बालपणापासून मिळालेलं असतं आणि शहरातल्या मुलांना हे आयुष्यभरही कळत नाही, त्यांना त्याची गरजही वाटत नाही. परिणामी, एका निर्मितिप्रक्रियेच्या आनंदाला ती पारखी होतात. नंतरच्या काही महिन्यांत वनस्पतींच्या प्रदर्शनाचा अनुभव राहुलनं घेतला. साळगाव आणि सिओलिमच्या प्रदर्शनांत सेंद्रिय शेती, गांडूळखत, कॅक्टस यांच्याविषयी माहिती त्याला मिळाली. अळंबी-उत्पादनाच्या दोन दिवसांच्या अभ्यासवर्गातही तो सहभागी झाला.

पुढं राहुल काही दिवस केरळला गेला. केरळच्या जंगलांची, प्राणी-पक्षी यांची त्यानं केलेली निरीक्षणं त्याच्या संशोधकवृत्तीची साक्ष देतात. पुण्यातलं सर्पोद्यान, चेन्नईमधली गांडूळशेती, कोळ्यांवरचं संशोधन, मगरीची बँक, क्रॉक बँक याशिवाय बंगळुरू, पुड्डुचेरी या ठिकाणचे अनुभवही राहुलनं पुस्तकात नोंदवले आहेत. या अनुभवांमध्ये थरार आहे. साप, कासव आणि मगरींच्या संगतीत असताना त्यांनी राहुलला अनेकदा वेदनादायी चावे घेतले याबद्दल मुळातून वाचायला हवं.

अल्वारीस यांचं ‘फ्री फ्रॉम स्कूल’ मी हाती घेतलं आणि ते सगळं वाचून झाल्यावरच खाली ठेवलं. सोळा वर्षं वयाच्या मुलाचं हे पुस्तक सभोवतालाकडे पाहण्याची ‘नजर’ देतं. पालकांनी आपल्या पाल्याला जग समजून घेण्यासाठी कसा हातभार लावावा हेही त्यातून कळून येतं.
अल्वारिस यांचे हे अनुभव जून १९९५ ते जून १९९६ या काळातले आहेत. अल्वारिस सध्या काय करत असावेत असा प्रश्न मग मला साहजिकच पडला. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो कोणताही पालक विचारू शकतो. तर, त्या प्रश्नाचं उत्तर असं की अल्वारिस यांना आज लेखक, छायाचित्रकार आणि वन्यजीव-अभ्यासक म्हणून देशभर मान्यता आहे. ‘द कॉल ऑफ द स्नेक’ आणि ‘बर्ड् स ऑफ गोवा’ अशी इतर पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. देश-विदेशांतले अनेक महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आनंदी आहेत.
***

आपलं सगळं शिक्षण, आपली सगळी धडपड ही जीवनात आनंद मिळावा यासाठीच असते. म्हणूनच सांगावंसं वाटतं, ध्यास आणि श्वास यांची एकरूप झालेली कथा आपल्याला त्या मुक्कामावर घेऊन जाते. यशाकडे आणि आनंदाकडे जाण्याचे मार्ग आडगावाच्या उदाहरणातही असू शकतात. उत्तुंग भरारीसाठी आपण आपलं स्वतंत्र, आपल्या आवडीचं आकाश शोधलं पाहिजे. नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com