vidya surve borse
vidya surve borse

शिरीषकुमारचं हौतात्म्य आठवताना... (विद्या सुर्वे-बोरसे)

देशाला स्वातंत्र्य मिळालं; पण आज देश भ्रष्टाचारानं पोखरला गेला आहे, त्याच्याविरोधात उभं राहणं आणि आपल्या वाट्याला जे काम आलं आहे ते समर्पित भावनेनं करत राहणं म्हणजेच आजच्या काळातली देशभक्ती आहे.

नंदुरबारचा शिरीषकुमार बालवीर होता...त्याचं देशावर निरतिशय प्रेम होतं. त्याचं हौतात्म्य आठवताना आपण स्वत:ला प्रश्न विचारू या : ‘आमचं देशप्रेम तेवढंच पवित्र आहे काय? शिरीषकुमार याच्यासारखंच आम्हीही उज्ज्वल भारताचं स्वप्न पाहिलं आहे काय?’

स्थळ : नंदुरबार, दिनांक : नऊ सप्टेंबर १९४२.
म्युनिसिपल हायस्कूलची आठव्या वर्गाची तुकडी. पंधरा-सोळा वर्षांचा मुलगा आपल्या वर्गमित्रांना तावातावानं काही सांगत आहे...त्याच्या शब्दाशब्दात अंगार आहे...त्याच्या मनात त्वेष आहे, चीड आहे...सत्ताधारी ब्रिटिशांविरुद्ध, त्यांच्या जुलमी राजवटीविरुद्ध राग आहे...आपलं भाषण संपता संपता त्यानं जोरदार घोषणा दिली : ‘भारत माता की...’ , ‘जय...’ म्हणत इतरांचे आवाज त्याच्या घोषणेत मिसळले. त्याला स्फुरण चढलं, मग दुसरी घोषणा... ‘वंदे...’ ‘मातरम्...’ त्याला वर्गमित्रांचा प्रतिसाद लाभला. हळूहळू सगळे विद्यार्थी शिस्तीत शाळेबाहेर पडले. नंदुरबारमध्ये त्या काळात ती एकमेव शाळा होती. सगळा देश स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनानं भारलेला होता. ज्याच्या त्याच्या मुखी ‘चले जाव’ हाच एकमेव नारा. महात्मा गांधीजींनी रणशिंग फुंकलं होतं : ‘करा किंवा मरा.’

सामान्यातला सामान्य भारतीय माणूस नव्या जिद्दीनं स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात स्वत:ची आहुती देण्यासाठी पुढं निघाला होता. ब्रिटिशांना गावोगावी विरोध होत होता. सूर्यास्त माहीत नसलेल्या ब्रिटिश साम्राज्याचा पाया खिळखिळा होऊ लागला होता. सर्व स्तरांतून विरोध होत होता आणि विद्रोहाची ज्वाला दिवसेंदिवस अधिकाधिक प्रज्वलित होत चालली होती. ता. नऊ ऑगस्ट १९४२ रोजी गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी क्रांतीचा एल्गार पुकारला. त्याला नऊ सप्टेंबर रोजी एक महिना होत होता. यानिमित्तानं म्युनिसिपल हायस्कूलमधल्या आठवीच्या विद्यार्थ्यांनी नेतृत्व करत मोर्च्याचं आयोजन केलं होतं. दिसायला चिमुरडी असणारी मुलं स्वातंत्र्यासाठी वेदीवर जाण्यास सज्ज झाली होती. चौदा-सोळा वर्षांच्या मुलांच्या अंगी हत्तीचं बळ आलं होतं. मोर्चा शाळेबाहेर आला, सराफा बाजारातून पुढं सरकला, मोर्च्यानं गणपतीमंदिर ओलांडलं, प्रत्येकाच्या ओठावर ‘भारत माता की जय’ , ‘वंदे मातरम्’ या घोषणा होत्या. मोर्चा माणिक चौकात आला. चौकात ब्रिटिश पोलिसांची सशस्त्र फौज उभी होती. पोलिसांच्या हातात बंदुका होत्या. मोर्चा आपल्याच धुंदीत चालत चालत चौकात आला. मोर्च्याच्या अगदी समोर शिरीषकुमार मेहता हा पंधरा वर्षांचा तेजस्वी डोळ्यांच्या मुलगा होता. त्यानं आपल्या दोन्ही हातांनी तिरंगा फडकवत ठेवला होता. ‘मागं फिरा’ पोलिसांनी आदेश दिला. मोर्चा एक पाऊलदेखील मागं हटला नाही. पोलिसांनी मोर्च्यातल्या मुलींवर बंदुका रोखल्या. पोलिस शाळकरी विद्यार्थ्यांना धाक दाखवू लागले. मोर्चेकरी काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. गडबड झाली. कुणीतरी पोलीस अधिकाऱ्याला सुरा भोसकला. लागलीच गोळीबाराचा आदेश निघाला. लाठीमार सुरू झाला. पोलीस दात-ओठ खात मोर्चेकरी विद्यार्थ्यांवर तुटून पडले. मुलींवर बंदुका रोखलेल्या होत्याच. शिरीषकुमार मेहता पुढं झाला व म्हणाला : ‘हिंमत असेल तर माझ्यावर गोळ्या चालवा.’
त्यानं पोलिसांना समोरासमोर आव्हान दिलं. तिरंगा हातात उंच पकडला आणि ‘भारत माता की जय’ म्हणत सगळा जीव एकवटून घोषणा दिली. पिसाळलेल्या पोलिसांनी गोळ्या झाडल्या. धाड...धाड...धाड! तिन्ही गोळ्यांनी शिरीषकुमारच्या छातीचा वेध घेतला.
शिरीषकुमार धारातीर्थी पडला. देशासाठी हुतात्मा झाला. या घटनेत अनेक मोर्चेकरी जखमी झाले. शिरीषकुमारसमवेत धनसुखलाल वाणी, घनश्यामदास शहा, लालदास शहा आणि शशिधर केतकर यांनाही हौतात्म्य आलं.
* * *

तुम्ही जर कधी नंदुरबारला गेलात तर तुम्हाला शहराच्या मधोमध हुतात्मा चौक लागेल. हाच तो कधीकाळचा माणिक चौक. याच चौकात शिरीषकुमार या बालवीरानं देशासाठी प्राणाहुती दिली.
ऑगस्ट-सप्टेंबर हे महिने आले की शिरीषकुमार यांची जीवनकहाणी मला न चुकता आठवते. माझं सगळं बालपण धुळे जिल्ह्यातल्या साक्रीला गेलं. शाळेत शिरीषकुमार यांची वीरगाथा मी कैकदा ऐकली आहे. ही कथा ऐकताना प्रत्येक वेळी बाहू स्फुरण पावत असत. देवाचे वेल्हाणे या गावाची सरपंच झाल्यानंतर जेव्हा ध्वजारोहणाच्या निमित्तानं मला शाळेतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली तेव्हा मी आवर्जून त्यांना शिरीषकुमारची ही कथा सांगितली. तेव्हाही समोरचे शाळकरी विद्यार्थी एका नव्या उमेदीनं उमलून आलेले मला दिसले. शिरीषकुमारची कथा ही स्वातंत्र्याचा आणि देशप्रेमाचा अर्थ सांगणारी अजरामर कथा आहे. चिमुरड्या वयाचा शाळकरी मुलगा या कथेचा नायक आहे, त्यामुळे प्रत्येक शाळकरी मुलाला ही कथा स्वत:च्या आतला नायक शोधायला भाग पाडते. ही कथा मुलांच्या डोळ्यांत उज्ज्वल भविष्याची स्वप्नं पेरते. शाळकरी वयात ज्या मुलांना स्वप्नं पडतात आणि
जी मुलं त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी झटतात ती एके दिवशी आपलं ध्येय गाठतातच.
कोणती असतात बरं शाळकरी मुलांची स्वप्नं? मुलांशी आपुलकीनं संवाद साधलात तर लक्षात येतं की छोट्या-मोठ्या गावांतल्या बहुसंख्य मुलांना आजही डॉक्टर, इंजिनिअर, वकील किंवा शिक्षक व्हायचं आहे.
जिल्हाधिकारी किंवा पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणारा एखादा असतो. ज्यांना देशाच्या सीमेचं रक्षण करण्याची इच्छा असते असे काहीजण असतात. अमुकच का व्हायचंय याची फारशी सुस्पष्ट नसली तरी काहीसा अंदाज घेता येऊ शकेल अशी उत्तरही त्यांच्याकडे असतात. आजूबाजूच्या लोकांची सेवा करणं, आई-बाबांना सुखी ठेवणं, आजी-आजोबांना आजारपणात मदत करणं, गावासाठी रस्ता बांधणं, देशसेवा करणं अशी कोवळी उत्तरं आपल्या हाती येतात. ही उत्तरं खूप प्रामाणिक असतात.
***

मध्यंतरी ‘सर्जननामा’ हे डॉ. जे. जी. वाडेकर यांचं आत्मकथन वाचत होते. जालना जिल्ह्यातल्या मंगू जळगावचा एक मुलगा आपल्या आईचा आजार बघतो, आपण तिला वाचवू शकलो नाही ही असहाय्यता अनुभवतो. आईच्या कलेवराला साक्षी ठेवून तो शपथ घेतो : ‘आई, मी सर्जन होईन आणि शेकडो-हजारो मातांचे प्राण वाचवीन.’ हा मुलगा पुढं डॉक्टर होतो, मराठवाड्यातल्या सुरुवातीच्या पिढीतल्या सर्जनपैकी एक होतो. डॉ. वाडेकर यांनी आत्मकथनात म्हटलंय : ‘आपल्या मनासारखा अद्ययावत दवाखाना असावा...त्यात पेशंटसाठी सर्व सोई उपलब्ध असाव्यात...पेशंट असावेत, भर मध्यरात्री गाढ झोपेतून उठवणारे! भरलेल्या ताटावरून उठवून पेशंटला पाहायला नेणारे मित्र असावेत, आहेतही. पेशंट तपासणं हाच माझा एकमेव विरंगुळा आहे. पेशंट बरा होणं हेच माझं अजोड यश आहे.’
हे आत्मकथन वाचून संपवताना मला शाळेतला तो मुलगाच दिसत राहिला, आईजवळ शपथ घेणारा आणि स्वप्न पाहणारा. एक डॉक्टर निष्ठेनं आपली सेवा रुजू करतो तेव्हा तो देशसेवाच करत असतो. त्यानं सेवेसाठी आणखी इतर काही करण्याची आवश्यकता नसते.

याच जालना जिल्ह्यातल्या शेलगाव या गावातल्या अन्सार शेखची गोष्टही अशीच. अन्सारचे वडील रिक्षाचालक. घरी अत्यंत गरिबी. दारिद्र्यरेषेखालचं (बीपीएल) कुटुंब. घरात खाणारी तोंडं जास्त, कमावणारी व्यक्ती एकच. अन्सारला शाळेतून काढून लोकांकडे कामाला ठेवण्याचा विचार होतो तेव्हा त्याचे चौथीचे शिक्षक त्याच्या वडिलांना म्हणतात : ‘मुलगा हुशार आहे, त्याला शिकू द्या, भविष्यकाळात तुमचं नाव काढेल.’ अन्सार शाळेत जात राहिला आणि उन्हाळ्याच्या सुटीत छोट्या-मोठ्या हॉटेलांमध्ये वेटर म्हणून काम करत शिकत राहिला. लोकांना चहा देण्यासाठी धावपळ करत राहिला. टेबल आणि फरशी पुसत राहिला. त्याच्या वडिलांना ‘बीपीएल’अंतर्गत घर मंजूर झालं. एकूण अनुदान तीस हजार रुपयांचं. ते घेण्यासाठी वडील अन्सारला सोबत घेऊन तहसील कार्यालयात गेले. तर त्या ठिकाणी अधिकाऱ्यानं अन्सारच्या वडिलांकडे दहा टक्के लाच मागितली. घरात खायचे वांधे असणारा दारिद्र्यरेषेखालचा माणूस तीन हजार रुपयांची लाच कुठून देणार? अन्सारनं आपल्या वडिलांची हतबलता पाहिली, तडफड पाहिली. शोषण करणारी भ्रष्ट सरकारी यंत्रणा अनुभवली. पैसे देताच पळणारी फाईल पाहिली आणि निश्चय केला, ‘मी शिकणार आणि शिकून सर्वात मोठा अधिकारी होणार. मी भ्रष्टाचार संपवणार.’
अन्सार शेख जिद्दीनं शिकला आणि सन २०१५ मध्ये पहिल्याच प्रयत्नात आयएएस झाला. इतकंच नव्हे तर, वयाच्या एकविसाव्या वर्षी आयएएस होणारा तो सर्वात कमी वयाचा अधिकारी ठरला. सर्वात मोठा अधिकारी होण्याचं आठवीतल्या मुलानं पाहिलेलं स्वप्न जिद्दीनं साकार झालं.
अब्दुल कलाम हे आपल्या दौऱ्यांत विद्यार्थ्यांशी आवर्जून हितगुज साधत असत. एकदा पाचवीतल्या विद्यार्थिनीनं त्यांना सांगितलं : ‘मी मोठी झाल्यावर आयएएस होणार.’ कलाम यांनी तिला विचारलं : ‘जिल्हाधिकारी झाल्यानंतर काय करणार?’ आणि उत्तरही स्वत:च दिलं : ‘देशाला पुढं घेऊन जाणार आणि त्यासाठी सर्वात अगोदर भ्रष्टाचार संपवणार.’

डॉ. कलाम यांनी देशभक्तीचाच एक धडा पाचवीतल्या त्या विद्यार्थिनीला दिला.
देशाला स्वातंत्र्य मिळालं; पण आज देश भ्रष्टाचारानं पोखरला गेला आहे, त्याच्याविरोधात उभं राहणं आणि आपल्या वाट्याला जे काम आलं आहे ते समर्पित भावनेनं करत राहणं म्हणजेच आजच्या काळातली देशभक्ती आहे.
नंदुरबारचा शिरीषकुमार बालवीर होता...त्याचं देशावर निरतिशय प्रेम होतं. त्याचं हौतात्म्य आठवताना आपण स्वत:ला प्रश्न विचारू या : ‘आमचं देशप्रेम तेवढंच पवित्र आहे काय? शिरीषकुमार याच्यासारखंच आम्हीही उज्ज्वल भारताचं स्वप्न पाहिलं आहे काय?’
जमलंच तर आपण आपल्यात थोडा बदल करू आणि जिथं जिथं चुकलं आहे तिथं तिथं थोडी दुरुस्ती करू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com