esakal | ‘ॲनिमल फार्म’च्या निमित्तानं... (विद्या सुर्वे-बोरसे)
sakal

बोलून बातमी शोधा

saptarang vidya surve borse write balguj article

मला खूपदा वाटतं, की कुमार आणि किशोरगटातल्या वाचकांनी ‘ॲनिमल फार्म’ अवश्य वाचली पाहिजे. समकालाचा अन्वयार्थ लावण्याची शक्ती विकसित होत असण्याचं हेच वय असतं. ही कादंबरी  राजकीय समज घडवण्यासाठी उपयोगी ठरू शकते. पुस्तकातलं जग आणि वास्तवातलं जग यांची तुलना करण्याचा एक छंद या वयात अनेकांना असतो. अशा कुमारांना ही कादंबरी नवी दृष्टी देऊ शकते.

‘ॲनिमल फार्म’च्या निमित्तानं... (विद्या सुर्वे-बोरसे)

sakal_logo
By
विद्या सुर्वे-बोरसे

मला खूपदा वाटतं, की कुमार आणि किशोरगटातल्या वाचकांनी ‘ॲनिमल फार्म’ अवश्य वाचली पाहिजे. समकालाचा अन्वयार्थ लावण्याची शक्ती विकसित होत असण्याचं हेच वय असतं. ही कादंबरी  राजकीय समज घडवण्यासाठी उपयोगी ठरू शकते. पुस्तकातलं जग आणि वास्तवातलं जग यांची तुलना करण्याचा एक छंद या वयात अनेकांना असतो. अशा कुमारांना ही कादंबरी नवी दृष्टी देऊ शकते.

चांगली कलाकृती; मग ती लहानांसाठी असो की मोठ्यांसाठी, ती वाचकाला जीवनदृष्टी देत असते. जीवन कसं आहे हे ती सांगतेच, त्याशिवाय, जीवन कसं असावं याविषयीही ती मार्गदर्शन करते. हे मार्गदर्शन माहितीपर पुस्तकातल्या मार्गदर्शनासारखं एकसुरी, शब्दबंबाळ अथवा केवळ माहितीचा पुरवठा करणारं नसतं. अगदी सहजपणे श्रेष्ठ कलाकृती मानवी जीवनाचं फलित आणि ध्येय सुचवत जाते. सगळ्या वादांकडून ती वाचकाला मानवतावादाकडे घेऊन जाते. मानव; मग तो कोणत्याही जाती-धर्माचा, वंश-प्रांताचा असेल, मानव; मग तो काळा वा गोरा किंवा पिवळा वा लाल असेल, तो केवळ मानव आहे आणि त्याच्याशी बंधुभाव जपला पाहिजे याची शिकवण श्रेष्ठ कलाकृती देतात. विश्वकुटुंबाची व्यापक व्याख्या अशा कलाकृती आपल्याला अजाणतेपणे सांगत असतात. तिथं प्रचाराचा थाट नसतो, पांडित्याचा आविर्भाव नसतो किंवा ‘मी काही सांगत आहे’ अशी भूमिकाही नसते. मातीत बीज पेरावं आणि त्यातून रोप उगवून यावं इतक्या सहजपणे कलाकृती वाचकाच्या मनात विचारांचं बीज पेरतात आणि वाचकाच्या कृतीतून तो विचार उगवून येतो. पुस्तकाचा संस्कार तो हाच. ‘पुस्तकं मस्तकं घडवतात,’ असं जे म्हटलं जातं ती प्रक्रिया अशीच घडते.
            
जगातलं कोणतंही श्रेष्ठ साहित्य हे अपरिहार्यपणे बाल-कुमारसाहित्याचा भाग असतं. ‘हे बालकांसाठी नाही’ असं आपल्याला म्हणताच येत नाही. श्रेष्ठ कलाकृतींचं आवाहन सार्वकालिक आणि सर्ववयीन असतं, म्हणूनच रामायण-महाभारताच्या कथा आपल्याकडे ज्या आवडीनं लहान मुलं ऐकतात त्याच आवडीनं ज्येष्ठ नागरिकही त्यांचा आनंद घेतात. या कथा प्रत्यक्ष जीवनात दिशादर्शक उदाहरणं म्हणून येतात. संदर्भासाठी आपण त्यांचा अनेकदा वापर करतो. त्या सर्वपरिचित असतात, तरीही गुळगुळीत होत नाहीत हे विशेष.
            
केवळ महाकाव्येच नव्हेत, तर पंचतंत्र, कथासरित्सागर, जातककथा, चातुर्यकथा, लोककथा यांनाही अशीच सार्वत्रिकता लाभलेली आहे. संतांच्या गोष्टी, इतिहासातल्या वीरयोद्ध्यांच्या गोष्टी, आधुनिक काळातल्या अभिजात कथा-कादंबऱ्या हेही जीवन समृद्ध करणारे साहित्यप्रकार होत.

रवींद्रनाथ टागोर, प्रेमचंद यांचं लेखन वाचताना, शेक्सपीअरची, मोलियरची नाटकं पाहताना, टॉल्सटॉय, दस्तोव्हस्की किंवा मोंपासा, ओ. हेन्री, खलील जिब्रान यांच्या शब्दांच्या अरण्यात फिरताना आपल्याला समृद्ध झाल्याचा, नवं झाल्याचा अनुभव येतो.
श्रेष्ठ लेखक हा तत्त्वज्ञही असतो असं म्हणता येईल. जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान तो कळत-नकळत आपल्याला सांगत असतो. सानेगुरुजी, वि. स. खांडेकर, जी. ए. कुलकर्णी, पु. ल. देशपांडे, जयंत नारळीकर, भा. रा. भागवत, शिवाजी सावंत, रणजित देसाई, आनंद यादव, रा. रं. बोराडे आणि इतर कितीतरी लेखकांचं साहित्य वाचताना हा अनुभव पुष्कळदा येत असतो. कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर या दिव्यत्वाची प्रतीती आपल्याला घडवून आणत असतात. या सगळ्यांच्या ग्रंथसंस्कारांतून आपण आंतर्बाह्य बदलून जातो.

अशा सगळ्या विचारांत मी बुडालेली असताना मध्येच माझ्या हाती ब्रिटिश लेखक जॉर्ज ऑर्वेल (मूळ नाव : एरिक आर्थर ब्लेअर ) यांची ‘ॲनिमल फार्म’ही कलाकृती आली. त्यांच्या साहित्यकृतीवर आधारित चित्रपटाशी परिचय होताच; पण पुस्तकाचं वाचन हा अनुभव विलक्षण वेगळा होता. मला वाटलं की कुणीतरी जाणीवपूर्वक मला ही कादंबरी वाचायला भाग पाडत आहे. ही कादंबरी वाचावी अशी केवळ माझी नव्हे, तर समकालाची मागणी आहे.
वर्तमानाचा अन्वयार्थ लावण्याची नजर देणारी ही कलाकृती बाल-कुमारांसाठी आहे का, ती त्यांना कितपत समजेल असे प्रश्न विचारले जातील. या प्रश्नांची व्यर्थ चर्चा मोठ्यांनी करत बसण्यापेक्षा एकदा कुमारांच्या हाती ‘ॲनिमल फार्म’ देऊन आपल्या समजुतीचा पडताळा घेतला पाहिजे.
‘ॲनिमल फार्म’ वाचताना आपण ती केवळ वाचत नाही तर ती अनुभवतही जातो...
* * * 
   
प्राण्यांनी ‘ॲनिमल फार्म’ची सप्तसूत्री निश्चित केली आहे...दोन पायांवर चालणारा प्राण्यांचा शत्रू आहे, चतुष्पाद किंवा पंख असणारे मित्र आहेत, प्राणी कपडे घालणार नाहीत, प्राणी गादीवर झोपणार नाहीत, प्राणी दारू पिणार नाहीत, एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची हत्या करणार नाही, सर्व प्राणी समान आहेत...
मात्र, क्रांतिनंतरच्या पहिल्याच दिवसापासून भ्रष्ट आचाराला सुरुवात झाली. आपण इतरांपेक्षा जास्त बुद्धिमान आहोत, डोक्यानं काम करणारा शारीरिक कष्ट उपसणाऱ्यांपेक्षा अधिक श्रेष्ठ असतो हे पटवून देण्यात फार्मवरची डुकरं यशस्वी झाली. गाईंच्या दुधावर डुकरांचा हक्क प्रस्थापित झाला. हळूहळू इतरही अनेक गोष्टींवर डुकरांनी अधिकार सांगितला. पुढच्या काळात सत्तालालसा एका अशा टोकाला गेली की हिंस्र कुत्र्यांच्या साह्यानं नेपोलिअन नावाच्या डुकरानं स्नोबॉल नावाच्या डुकराला ‘ॲनिमल फार्म’मधून पिटाळून लावलं आणि प्राणिजगताच्या नेतृत्वावर ताबा मिळवला.
 
‘स्नोबॉल हा शत्रूचा हेर होता, त्याला पळवून लावणं प्राण्यांच्याच हिताचं होतं,’असं हुकूमशहा झालेल्या नेपोलिअननं प्राण्यांच्या गळी उतरवलं.
लवकरच त्यानं खुल्या चर्चा बंद केल्या. आपले निर्णय लादायला सुरुवात केली. प्राण्यांच्या डोळ्यात धूळफेक केली. त्यानं वास्तवाची, इतिहासाची, घटनांची मोडतोड केली. अंध अनुयायी निर्माण केले. विरोधात गेलेल्यांना ठार मारलं. कोंबड्यांची अंडी विकली. दारू-उत्पादनासाठी शेती आरक्षित केली. काल्पनिक शत्रूचा बागुलबुवा निर्माण केला आणि त्याची भीती घातली. आपण ‘ॲनिमल फार्म’चे तारणहार आहोत हे स्तुतिपाठकांकरवी सर्वांवर बिंबवलं. ‘शिस्त! पोलादी शिस्त!’असं म्हणत जरब निर्माण केली. नेपोलिअन कपडे घालू लागला, गादीवर झोपू लागला, दारू पिऊ लागला, न खेळलेल्या लढाईसाठी स्वतःला विविध वीरपदकांनी भूषवू लागला. ‘देशासाठी बलिदान’, ‘देशप्रेम’ या नावाखाली त्यानं अत्यल्प अन्नाच्या मोबदल्यात प्राण्यांकडून दुप्पट काम करवून घेतलं. शंका घेणाऱ्यांना क्रूर कुत्र्यांची भीती दाखवली. त्यानं स्वतःभोवती संरक्षकभिंत उभी केली. नेपोलिअन डुकरानं भीती, संशय, अंध अनुयायी, अफवा यांच्या साह्यानं प्राण्यांच्या लोकशाहीची सप्तसूत्री बदलून टाकली. ‘सर्व प्राणी समान आहेत; पण काही प्राणी इतरांपेक्षा अधिक समान आहेत,’ हे नवं सूत्र त्यानं प्रस्थापित केलं. उदात्त हेतूनं स्थापन केल्या गेलेल्या, प्राण्यांनी प्राण्यांसाठी निर्माण केलेल्या ‘ॲनिमल फार्म’ची सत्ताधीशांनी स्वार्थापोटी पूर्वीपेक्षा अधिक दुर्दशा केली. मानवाला विरोध करणाऱ्या नेपोलिअन डुकराचा चेहरा मानवासारखा झाला हे सत्य प्राण्यांना समजून येईपर्यंत खूप उशीर झालेला होता.
***

ऑर्वेल यांनी १९४५ मध्ये लिहीलेली ही कथा. व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही, समाजवाद, भांडवली अर्थव्यवस्था, सर्वग्रासी हुकूमशाही असे शब्द कानावर पडतात तेव्हा
ऑर्वेल यांच्या या ‘ॲनिमल फार्म’ची आठवण येते. ही कादंबरी कधीही जुनी न होणारी आणि प्रत्येक काळात स्वतःला सिद्ध करणारी कथा आपल्यासमोर ठेवते. एखादी दंतकथा असावी तशी या कादंबरीची धाटणी आहे. ही कल्पित गोष्ट वाचता वाचता वाचकाला नवं राजकीय भान येत जातं. यशस्वी रूपकात्मक कादंबरी म्हणून ‘ॲनिमल फार्म’चा निर्देश करता येईल. अन्योक्ती या अलंकाराचं उदाहरण म्हणूनही तिच्याकडे पाहता येईल. ही कादंबरी जगातल्या बहुतेक भाषांमध्ये अनुवादित झालेली आहे. विसाव्या शतकातल्या शंभर श्रेष्ठ कादंबऱ्यांमध्ये ‘टाइम’या नियतकालिकानं ‘ॲनिमल फार्म’चा समावेश केला आहे. आपल्यासाठी आनंदाची बाब अशी की ऑर्वेल यांचा जन्म भारतात (मोतीहारी, बिहार) झालेला होता.
 
मला खूपदा वाटतं, की कुमार आणि किशोरगटातल्या वाचकांनी ‘ॲनिमल फार्म’ अवश्य वाचली पाहिजे. समकालाचा अन्वयार्थ लावण्याची शक्ती विकसित होत असण्याचं हेच वय असतं. ही कादंबरी  राजकीय समज घडवण्यासाठी उपयोगी ठरू शकते. पुस्तकातलं जग आणि वास्तवातलं जग यांची तुलना करण्याचा एक छंद या वयात अनेकांना असतो. अशा कुमारांना ही कादंबरी नवी दृष्टी देऊ शकते. ‘नाइन्टीन एटीफोर’ या ऑर्वेल यांच्या दुसऱ्या कादंबरीविषयीही असंच म्हणता येईल.
 
चांगली साहित्यकृती ही ज्ञान-मनोरंजनाच्या पुढं जात असते. ती वाचकाला अपूर्व दृष्टी देत असते. वाचकाचा दृष्टिकोन घडवत असते. ‘ॲनिमल फार्म’ ही त्या जातकुळीची कादंबरी आहे, म्हणूनच योग्य काळात योग्य वाचकांपर्यंत ती पोहोचणं आवश्यक आहे.