दाताची गोष्ट (विद्या सुर्वे-बोरसे)

vidya surve borse
vidya surve borse

मी तेव्हा एका वेगळ्याच परीक्षेला बसले होते...या वर्गात वाक्प्रचारांचे अर्थ घोकून घोकून तोंडपाठ करावे लागले. त्यात अनेक वेळा दाताचा उल्लेख येई. माझे बहुतेक दात पडून नवे आले होते आणि पडलेले बहुतेक सगळे दात माळवदावर जमा झाले होते. मात्र, दात-ओठ खाणं, दात काढणं, दातखीळ बसणं, दात ठेवणं, दात विचकणं, दाती तृण धरणं, दात दाखवणं या वाक्प्रचारांच्या रूपानं अनेक ‘दात’ माझ्या संग्रहात नव्यानं जमा झाले होते.

प्रत्येकाजवळच एक गोष्ट असते. ती कधी कुणी ऐकलेली नाही, कुणाला ऐकवली गेलेली नाही. एक अशी गोष्ट, जी फक्त ज्याची त्यालाच माहीत आहे, जी शंभर टक्के आपली स्वत:चीच आहे. तिच्यावर इतर कुणाचा ठसा नाही, इतर कुणाची स्वाक्षरी नाही...अगदी आपलीदेखील सही नाही. कारण, ही अशी गोष्ट आहे, जी आपण स्वत:लासुद्धा सांगितलेली नाही. ती आपल्याला ठाऊक असते आणि या कानाची गोष्ट त्या कानाला कळणार नाही याची आपण दक्षताही घेतलेली असते.
माझ्याकडे एक गोष्ट आहे. माझ्या दाताची गोष्ट. ती मी कधीच कुणाला सांगणार नाही. मला माहितीय की तुमच्याकडेसुद्धा दाताची अशी गोष्ट असणार आणि तुम्हीदेखील ती कुणालाच सांगितलेली नसणार.

पहिला दात पडला तेव्हा त्याचं मी काय केलं हे आजही मला लख्ख आठवतं. तेव्हा मी नुकतीच शाळेत जाऊ लागले असेन. माझा मित्रपरिवार हळूहळू वाढत चालला होता. रेखा, अनिता, सीमा यांच्याशिवायही माझ्या काही मैत्रिणी झाल्या होत्या, त्या माझ्या गल्लीतल्या होत्या. गल्ली जिथं संपते आणि जिथं मोठा रस्ता सुरू होतो, तर त्याच्या पलीकडे असणाऱ्या घरांच्या दाट गर्दीत राहणाऱ्या या काही मैत्रिणी होत्या. खरं तर त्या माझ्याच शाळेत शिकत होत्या. त्यातल्या काही माझ्याच वर्गात होत्या. आम्ही एकाच सडकेवरून शाळेत जात-येत असू आणि गप्पा मारत मारत, उड्या मारत मारत घरी परतत असू. वेण्यांना दोन दोन, लाल लाल रिबिनी असलेल्या कुणीतरी एके दिवशी मला सांगितलं असणार की तिचा दात पडलाय आणि गुपित सांगावं तशी ती मला म्हणाली असणार, ‘कुण्णाला म्हणजे कुण्णालाच सांगायचं नाही बरं. दात पडला की तो कुणाला सापडू नये म्हणून वर आकाशात फेकून द्यायचा असतो.’
‘पण तो खालीच येणार...कारण, वर फेकलेली वस्तू पुन्हा जमिनीकडे परत येते, असं मला आमच्या अनितामाईनं सांगितलं आहे. ती वरच्या वर्गात आहे,’ मी त्या मुलीला उत्तर दिलेलं असणार.

‘अगं, वरती म्हणजे एकदम आकाशात नाही गं, कुणाच्याही घराच्या छतावर फेकायचा,’ तिनं माझी समजूत काढत तिचं म्हणणं पुढं रेटलं असणार...माझं समाधान झालं की नाही ते आठवत नाही; पण पुढं जेव्हा माझा दात पडला तेव्हा घराजवळ असलेल्या एका धाब्याच्या घराच्या माळवदावर मी तो फेकला होता आणि दात फेकताना मला कुणी बघत तर नाहीय नं याची काळजी घेतली होती. माझ्या दाताचं मी काय केलं ते कधीच कुणाला सांगितलं नाही. अगदी स्वत:लासुद्धा सांगितलं नाही.

तरी काही वर्षांनी मी कुणाला तरी विचारलं होतंच, ‘तू तुझ्या पडलेल्या दाताचं काय केलंस?’ तर ती म्हणाली, ‘त्यात काय करायचं? कुणाला सापडू नये म्हणून मी तो जमिनीत पुरून टाकला’ मी हसले. का हसले हे तिला सांगितलं नाही आणि माझ्या पडलेल्या दाताचं काय केलं हा विषय येण्याअगोदर विषय बदलला. तिला ‘थोरांची ओळख’ या पुस्तकातल्या एका चित्राबद्दल विचारू लागले. चित्रामधली व्यक्ती निर्मळ स्मितहास्य करत होती आणि तिचे शुभ्र दात चमकत होते. आपल्या बाईंचेही दात हसताना असेच शुभ्र चमकतात हे माझ्या तेव्हा लक्षात आलं. त्या खूप छान आणि मन लावून शिकवत, त्या आईची मैत्रीण होत्या आणि माझ्यावर तशीच माया पांघरत.
त्यानंतरच्या वर्षी अभ्यासाला अचानक खूप म्हणी आणि वाक्प्रचार आले. ते येण्याचं तसं काहीच कारण नव्हतं; पण मी तेव्हा एका वेगळ्याच परीक्षेला बसले होते आणि त्या पुस्तकात या म्हणी होत्या. म्हणी मला माहीतच होत्या, कारण आजूबाजूच्या सगळ्या मावश्या, आत्या, आज्या यांच्या बोलण्यात त्या सतत येत असत; पण या वर्गात वाक्प्रचारांचे अर्थ घोकून घोकून तोंडपाठ करावे लागले. त्यात अनेक वेळा दाताचा उल्लेख येई. माझे बहुतेक दात पडून नवे आले होते आणि पडलेले बहुतेक सगळे दात माळवदावर जमा झाले होते. मात्र, दात-ओठ खाणं, दात काढणं, दातखीळ बसणं, दात ठेवणं, दात विचकणं, दाती तृण धरणं, दात दाखवणं असे अनेक ‘दात’ माझ्या संग्रहात नव्यानं जमा झाले होते. हे एक मजेशीर प्रकरण होतं. पुढं दात पडला की मला या वाक्प्रचारांची आठवण येत असे. दातांमुळे त्या काळी शब्दसंग्रहात अशी भर पडली. गंमत अशी की सकाळपासून संध्याकाळपर्यंत निरनिराळ्या कारणांनी निरनिराळ्या म्हणी आणि वाक्प्रचार मला आठवत असत. ‘डोळ्यात अंजन घालणं’पासून ते ‘डोळा लागणं’पर्यंत. हा एक गमतीचा खेळ झाला होता.
***

दातांविषयीची गोष्ट मी पार विसरून गेले होते आणि अचानक साईचं पत्र सापडलं. साई माझा मुलगा, तो दुसरीत होता तेव्हा त्यानं लिहिलेला एक संदेश. दाताची एक गोष्टच. वहीच्या पानावर त्यानं त्याचा दात चिकटवला आहे, त्याच्या शेजारी वर्णन लिहिलं आहे : ‘हा दात माझा. दुसरा दात. आज १९ डिसेंबर. हा दात शाळा सुटल्यावर व्हॅनमध्ये पडला.’ साईला दाताविषयी विचारलं तर त्यानं त्याच्या मित्राचं नाव सांगितलं, म्हणाला : ‘दात असा चिकटवून ठेवला तर दुसरा दात मजबूत येतो, लवकर पडत नाही...’
अवतीभवती मित्र असतातच. कोणत्याही काळात ते असतात आणि त्यांनी दिलेल्या अशा समजुतीही असतात, न विसरता येणाऱ्या गोष्टी त्या समजुतींमुळे आपल्या मनात तयार होतात. दाताची गोष्ट माझी वेगळी होती, मैत्रिणीची वेगळी आणि साईची वेगळी आहे. आपला काळ वेगळा, मित्र-मैत्रिणी निराळ्या होत्या. बोचऱ्या दातांचे ते दिवस छानच होते.

वाटलं की केवळ आपल्याच जीवनात अशा समजुती असतील. दात पडण्याची गोष्ट ज्याची त्याची ‘गुपित गोष्ट’ असेल; पण फ्रँकलिनशी गाठ-भेट झाली तेव्हा पुन्हा माझी गणितं चुकली. आता तुम्ही म्हणाल, कोण हा फ्रँकलिन? आणि तो कुठून आला असा मध्येच? तर फ्रँकलिन हे एक कासव आहे. शाळेत जाणारं. खेळणारं. भांडणारं. दंगा करणारं. त्यालाही अंधाराची भीती वाटते. त्यालाही दादागिरी करता येते. ते मित्रांपुढं भाव खातं, तरी मित्रांवर प्रेमही करतं. ते घरभर पसारा करतं आणि मनसोक्त अभ्यासही करतं. फ्रँकलिन चक्क आपल्यासारखं आहे. पुलेत् बूर्ज्वझी या लेखिकेनं फ्रँकलिनच्या मस्त मस्त धमाल गोष्टी लिहिल्या. ब्रेंडा क्लार्क यांनी त्या गोष्टींना साजेशी भन्नाट चित्रं काढली आणि मंजूषा आमडेकर यांनी त्या मराठीत अनुवादित केल्या आहेत. फ्रँकलिनच्या कथा वाचत होते तेव्हा पुन्हा अवचित ‘दात’ भेटला. केवळ दातच नव्हे, तर चक्क दंतपरीसुद्धा भेटली.

फ्रँकलिनची गोष्ट आपल्या गोष्टीसारखीच आहे. एके दिवशी तो मित्रांसोबत शाळेच्या बसची वाट बघत असताना अचानक सोबतच्या अस्वलाचा दात डुगडुगला आणि हिसक्यासरशी बाहेर आला. ‘माझा पहिला दात पडला’ अस्वल म्हणालं. तेव्हा फ्रँकलिनला ते सगळं फार भयंकर वाटलं. त्याला वाटलं, ‘आता आईला काय सांगणार हा?’ अस्वलानं आपला दात एका कागदात अलगद गुंडाळला आणि बॅगमध्ये ठेवून दिला. ‘आपला पडलेला छोटा दात रात्री झोपी जाण्याआधी उशीखाली ठेवून द्यायचा असतो...मग दंतपरी येते आणि तो दात घेऊन जाते. जाता जाता ती खूप भेटवस्तू उश्याशी ठेवून जाते. कारण, दात पडणं म्हणजे मोठं होणं. आपण मोठे झालो आहोत म्हणून या भेटवस्तू आपल्याला मिळतात.’ फ्रँकलिनला नवीच माहिती मिळते. त्याला वाटतं, आपल्यालाही भेटवस्तू मिळाव्यात; पण फ्रँकलिनच्या तोंडात दातच नसतात. आपलं दु:ख तो आई-बाबांना सांगतो तेव्हा ते म्हणतात की ‘कासवांना दात नसतात.’ आता काय? मग फ्रँकलिन दंतपरीकडून भेटवस्तू मिळवण्यासाठी युक्ती लढवतो. त्याला भेटवस्तू मिळतात आणि एक नवी शिकवणही मिळते.

फ्रँकलिनची युक्ती यशस्वी होते का? त्याला भेटवस्तू कशा मिळतात?
या प्रश्नांची उत्तरं मी सांगाणार नाही. आपला मुद्दा दातांचा आहे. दाताच्या गोष्टीचा आहे. फ्रँकलिनची गोष्ट मला आवडली. कारण, तिनं मला भूतकाळात नेलं. साईलाही आवडली. कारण, त्याला ती त्याचीच गोष्ट वाटली.

इथं एक बाब मला प्रकर्षानं लक्षात आली. जगातली सगळी मुलं सारखीच असतात. काळ बदलला, प्रदेश बदलला, भोवताल बदलला तरी समजुती तशाच राहतात. समजुतींचा देह बदलतो; पण आत्मा तोच असतो. श्रद्धा आणि विश्वास बदलत नाहीत. हेच एक कारण आहे की साधासुधा वाटणारा दात जगभरातल्या मुलांना जोडत जातो, त्यांना दंतपरीच्या साम्राज्याशी जोडून घेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com