मराठी बालसाहित्यातलं सीमोल्लंघन... (विद्या सुर्वे-बोरसे)

vidya surve borse
vidya surve borse

उत्तम मराठी बालसाहित्यही भाषांतरित होऊन इतर भाषिकांपर्यंत जायला हवे. एक प्रकारे हे बालसाहित्याचं सीमोल्लंघन आहे. सीमोल्लंघन केल्याशिवाय आपल्याला आपली बलस्थाने लक्षात येणार नाहीत. चाकोरीतून बाहेर पडून नवा विचार करणं व तो अंमलात आणणं हे सीमोल्लंघन असतं. साहित्यातील प्रयोगशीलता ही या पातळीवर कार्य करत असते. लेखकाला ती स्वत:चा परिघ ओलांडायला भाग पाडते. वाचकालाही सीमोल्लंघन नवं भान देते, त्याला बाह्य अवकाशाशी जोडते, विस्तीर्ण आकाश माहिती असलेला वाचक त्यानंतर मर्यादित कुंपणात रमू शकत नाही.

‘साहित्य अकादमी’नं चार वर्षांपूर्वी मुंबईतल्या विभागीय सभागृहात ‘मराठी बालसाहित्य’ या विषयावर एका परिसंवादाचं आयोजन केलं होतं. अनंत भावे, महावीर जोंधळे, राजीव तांबे... असे मान्यवर या चर्चेत निमंत्रित केले होते. नव्या पिढीतीलही काही अभ्यासक लेखक होते. ‘गेल्या पंचवीस वर्षांतील मराठीतील प्रयोगशील बालसाहित्य’ या विषयावर मीही एक मांडणी या चर्चेत केली होती. ‘मराठी लेखकांना यापुढील काळात जगातील लेखकांशी स्पर्धा करावी लागेल. जगभरचं बालसाहित्य जेव्हा सहजपणे गावागावांत, संगणकाच्या माउसच्या एका क्लीकवर उपलब्ध होऊ लागेल, त्या वेळी वाचकांपुढं अनेक पर्याय उपलब्ध असतील. उपलब्ध असंख्य पर्यायांतून वाचकांनी आपलं पुस्तक निवडावं असं वाटत असेल, तर नावीन्य आणि प्रयोगशीलता अपरिहार्य असेल,’ असा चर्चेचा एकूण सूर होता.

शाळा व ग्रंथालयं यांच्यासाठी शिफारस करावयाची पुस्तकं मराठी व इंग्रजी असावीत, अशी भूमिका सरकारनं याच सुमारास घेतली आणि त्यामुळं मराठी बालसाहित्यात द्वैभाषिक पुस्तकांची लाट आली. अर्थात, ही लाट शासकीय होती, त्यामुळं त्या-त्या वर्षासोबत ती विरूनही गेली. कोट्यवधी रुपये खर्चून शाळांसाठी शासन प्रत्येक वर्षी जे ग्रंथ खरेदी करत असतं, त्यांची तपासणी कुणीतरी एकदा केली पाहिजे. निदान मागच्या दहा वर्षांत या योजनेतून किती पुस्तकं सरकारनं खरेदी केली, किती शाळांपर्यंत पोहोचली, किती विद्यार्थ्यांनी वाचली, या पुस्तक योजनेचा लाभ नेमका कुणाला झाला, विद्यार्थ्यांना? लेखकांना? की विशिष्ट प्रकाशकांना? निवड झालेल्या व शिफारस केल्या गेलेल्या पुस्तकांची गुणवत्ता काय आहे, याची उलट तपासणी आवश्यक आहे. या पुस्तकांची भाषिक आणि वाङ्मयीन गुणवत्ता तटस्थपणे तपासायला हवी आहे.

सरकारी योजनेनं दिलेली संधी आम्ही गमावली. यानिमित्तानं मराठीतलं उत्कृष्ट बालसाहित्य अनुवादित करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता आलं असतं. मात्र, विद्यार्थ्यांच्या हाती जी हजारो पुस्तकं गेली, त्यांतील दर्जेदार पुस्तकांची संख्या अगदी अल्प होती. द्वैभाषिक, त्रैभाषिक पुस्तकं शासकीय योजनेमुळं मराठीत पहिल्यांदा आली असं नाही, तर भारत ज्ञानविज्ञान समुदायसारख्या स्वयंसेवी संस्था हे काम मागील अडीच- तीन दशकांपासून करत होत्या. जगभरातील उत्तमोत्तम पुस्तकं इंग्रजी, हिंदी आणि मराठी अशा तीन भाषांत एकाचवेळी उपलब्ध करून देत होत्या. अरविंद गुप्ता हे मुलांसाठी वैज्ञानिक खेळणी निर्माण करणारे केवळ शास्त्रज्ञच नाहीत, तर उत्तम लेखक आणि भाषांतरकारदेखील आहेत. त्यांनी जगभरातील शेकडो कथांचा हिंदीत अनुवाद केला आणि त्यांच्या अनुवादांमुळं या कथा अन्य भारतीय भाषांतही पोहोचल्या.
जगभरातील उत्तमोत्तम बालसाहित्य जसं मराठीत येणं गरजेचं आहे, तसंच उत्तम मराठी बालसाहित्यही भाषांतरित होऊन इतर भाषकांपर्यंत जायला हवं. एक प्रकारे हे बालसाहित्याचं सीमोल्लंघन आहे. सीमोल्लंघन केल्याशिवाय आपल्याला आपली बलस्थानं लक्षात येणार नाहीत. चाकोरीतून बाहेर पडून नवा विचार करणं व तो अमलात आणणं हे सीमोल्लंघन असतं. साहित्यातील प्रयोगशीलता ही या पातळीवर कार्य करत असते. लेखकाला ती स्वत:च्या परिघाला ओलांडायला भाग पाडते. वाचकालाही सीमोल्लंघन नवं भान देतं, त्याला बाह्य अवकाशाशी जोडतं. विस्तीर्ण आकाश माहिती असलेला वाचक त्यानंतर मर्यादित कुंपणात रमू शकत नाही.
मराठी बालसाहित्यात सीमोल्लंघन करण्याचा प्रयत्न दोन शतकांपासून होत आला आहे. मुलांसाठी विचार करणारे लोक नेहमीच मर्यादित कुंपणांना नकार देत आले. या मंडळींनी शालेय अभ्यासक्रम आणि बालसाहित्य यांची सांगड घातली, विज्ञानाचा तर्कशुद्ध विचार रुजवायला मदत केली. त्यांनी मुलांसाठी म्हणून स्वतंत्र नियतकालिकं काढली, मुलांना लिहितं केलं, मुलांचीच संमेलनं आयोजित करायला सुरुवात केली; मुलांमध्ये मूल होऊन रमताना त्यांनी सहजपणे संस्कारांची साखरपेरणी केली. मुलांचं मनोरंजन करणं, म्हणजे साक्षात प्रभूशी नातं जोडणं आहे, हा विचार त्यातूनच जन्माला घातला. बालसाहित्य हे एक व्रत आहे, अशी श्रद्धा मनाशी बाळगून, प्रसंगी स्वत:च्या खिशाला खार लावून, दोन शतकांपासून काही मंडळी निष्ठेनं धडपड करत राहिली आहेत, असं आपल्याला मराठी बालसाहित्याचा इतिहास वाचताना जाणवेल.

मराठी मातीशी इमान राखणारे प्रयोग हे बालसाहित्याला नावीन्य देऊ शकतात आणि त्यासाठी सतत प्रयत्न करत रहाणं; विषयाचा, मुलांचा, वयोगटाचा, समाजस्थितीचा, भाषेचा अभ्यास करत रहाणं आवश्यक आहे, हे मात्र खूप कमी जणांना समजलेलं असतं. आजच्या काळात याची अत्यंत स्पष्ट जाणीव असणारे लेखक म्हणून राजीव तांबे यांचा उल्लेख करावा लागेल. विपुल लेखन करणारे ते लेखक आहेत. दररोज कुठं न कुठं त्यांचं लेखन प्रकाशित होत असतंच. दररोज लिहीत असले, तरी त्यांच्याजवळ सांगण्यासारखं पुष्कळ आहे, हेही जाणवत रहातं. बहुप्रसव लेखकांच्या बाबतीत बहुधा नेहमीच असणारा सपाटपणा, पाट्या टाकूपणा, उथळपणा तांबेंच्या लेखणीच्या आजूबाजूलासुद्धा फिरकत नाही. टाळेबंदी सुरू होण्यापूर्वी राजीव तांबे यांच्या एकत्रित दहा पुस्तकांचा संच प्रकाशित झाला. वारा, जादू, प्रकाश, पाणी, मित्र अशा छोट्या; पण महत्त्वाच्या विषयांची एकदम नव्या नजरेनं या संचात मांडणी करण्यात आली आहे. या संचाची दोन वैशिष्ट्यं आहेत - एकतर ज्ञान आणि मनोरंजन यांचा संगम मांडणीत आहे. विशेषत: सहा वर्षांखालील मुलांसाठी हा संच उपयुक्त आहे; आणि दोन - चित्रकार हा शिशुसाहित्याचा कणा असतो, याची स्पष्ट जाणीव पहिल्यांदा मराठीत या पुस्तकांनी व्यक्त केली आहे. श्रीनिवास बाळकृष्णन या चित्रकाराचे यासाठी मानावे तेवढे आभार कमी असतील. लेखकानं रिकाम्या सोडलेल्या जागा चित्रकारानं भरून काढायच्या असतात. लेखकाची गोष्ट चित्रकार पुढं पुढं घेऊन जात असतो. किंबहुना बालवाचकाच्या मनात निर्माण होणारं गोष्टीचं भावविश्व नीटपणे साकार होण्यासाठी चित्रकाराच्या रंग- रेषा धावून येत असतात, ही जाणीव तांबे यांच्या पुस्तकसंचानं दिली आहे. अन्य भाषांतील काही लेखकांच्या भाषांतरित साहित्याचे असे संच आपल्याकडं यापूर्वी प्रकाशित झाले होते. तथापि, भाषांतरकारांच्या मर्यादा या पुस्तकांनी ठळकपणे अधोरेखित केल्या. शिवाय, या पुस्तकांना आपल्या मातीचाही गंध नव्हताच, त्यामुळं एका विशिष्ट वर्तुळाबाहेर ही पुस्तकं छोट्या मुलांना आपली वाटली नाहीत.

गणेश आघाव या नव्या कवीचा उल्लेख करणं सीमोल्लंघनाच्या संदर्भात महत्त्वाचं आहे. ‘पोरी शाळेत निघाल्या/ डोंगर वाटांच्या/ पऱ्यांना पुसती / तुम्ही गं कुणाच्या?’ अशी सुरुवात असलेली त्यांची कविता भाषिक प्रदेश ओलांडून अन्य बारा-तेरा भाषांत पोहोचली. या कवितेला शाळकरी मुलींच्या उड्या मारत चालण्याची, खळखळून हसण्याची स्वाभाविक लय आहे. ती लयही अनुवादात उतरली आहे, हे विशेष. आबा महाजन यांच्या बालकविता संग्रहाचं गोर बंजारा बोलीमध्ये मागील वर्षी भाषांतर प्रकाशित झालं. ‘आनंदेरो झाड’ (संपादक - युवराज माने) हासुद्धा असाच विलक्षण प्रयोग होता. निंबा कृष्ण ठाकरे हे गणितज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून सुपरिचित आहेत. जळगाव येथील युवराज माळी यांनी ठाकरे यांच्या इंग्रजी बडबडगीतांचं रंगीत पुस्तक बाजारात आणलं. एन. के. ठाकरे यांच्या या ‘ऱ्हाइम’चं वैशिष्ट्य असं, की खानदेशी संस्कार पेरणारी ही इंग्रजी बालकविता आहे. साहजिकच मराठी मुलांना ती समजून घेणं आवडेल, किंवा बहुतेक मुलांना ती आपलीच वाटेल. स्वाती काटे यांच्यासोबत पृथ्वीराज तौर यांनी शालेय पाठ्यपुस्तकांतील कवितांची चोवीस बोलीभाषांत भाषांतरं करवून घेतली आहेत. ज्या शाळकरी विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी नाही, त्यांच्या आकलनासाठी ‘शाळेतील कविता’ हा प्रकल्प काटे - तौर यांनी हाती घेतला होता. विशेष म्हणजे, या प्रकल्पातील भाषांतरं स्वत: विद्यार्थ्यांनीच केलेली होती. मराठी कवितेचं हे सीमोल्लंघन दिशादर्शक आहे. बालाजी मदन इंगळे, तृप्ती अंधारे, मंजिरी निंबकर, नामदेव माळी, दयासागर बन्ने, मथू सुरेश सावंत, नरेंद्र लांजेवार यांनी शाळकरी मुलांना लिहितं करण्यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत.

मुलांनी लिहिलेल्या लेखनाकडं गांभीर्यानं पाहिलं जाऊ लागलं आहे, त्यांची पुस्तकं प्रकाशित होऊ लागली आहेत, त्यांना पुरस्कार मिळू लागले आहेत, ही विशेष आनंदाची बाब आहे. ‘सर्जक पालवी शोध एका बाललेखिकेचा’ या दिनेश पाटील यांच्या पुस्तकासारखी पुस्तकं आगामी काळात जर मोठ्या प्रमाणात येऊ लागली, तर बालसाहित्याला निराळं वैभव प्राप्त होईल. नचिकेत मेकाले, दिव्यांशू सिंह, मैत्री लांजेवार, अस्मिता चव्हाण, गौतम पाटील, साक्षी लाड, लक्ष्मी बनसोडे असे अनेक विद्यार्थी-लेखक मागील चार-दोन वर्षांत समोर आले आहेत. या बालसाहित्यिकांच्या लेखनाची नेमकी नोंद होणं गरजेचं आहे. सदानंद पुंडपाळ, विजया वाड, गणेश घुले, डी. के. शेख या ज्येष्ठ लेखकांकडून होणाऱ्या प्रयोगांमुळं मराठी बालकुमार साहित्याचं क्षितिज विस्तारत जात आहे.

मराठी बालकुमार साहित्याच्या क्षितिजाचा विस्तार एक प्रकारचं सीमोल्लंघन आहे. येत्या काळात अशा घटना वरचेवर होत राहोत, कारण यातूनच मराठी बालसाहित्याला एकविसाव्या शतकातील कालसंवादी स्वर लाभणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com