मुलांचे ‘शिस्तप्रिय मित्र’ बना (विशाखा सुभेदार)

विशाखा सुभेदार
Sunday, 9 August 2020

पालकांनी मुलांचे ‘शिस्तप्रिय मित्र’ बनलं पाहिजे. नुसते मित्र न बनता, त्यांना थोडी शिस्तही लावली पाहिजे. मूल जिथं चुकेल, तिथं त्याला रागवता आलं पाहिजे आणि प्रसंगी त्याची चूक पोटातही घालता आली पाहिजे. या दोन्ही गोष्टींचा योग्य मेळ पालकांना घालता आला पाहिजे.

पालकांनी मुलांचे ‘शिस्तप्रिय मित्र’ बनलं पाहिजे. नुसते मित्र न बनता, त्यांना थोडी शिस्तही लावली पाहिजे. मूल जिथं चुकेल, तिथं त्याला रागवता आलं पाहिजे आणि प्रसंगी त्याची चूक पोटातही घालता आली पाहिजे. या दोन्ही गोष्टींचा योग्य मेळ पालकांना घालता आला पाहिजे.

शिस्त, मेहनत आणि काम करण्यातला प्रामाणिकपणा या गोष्टी मी प्रामुख्यानं माझ्या आई-वडिलांकडून शिकले. माझ्यातल्या कलेला आकार देण्याचं काम माझ्या वडिलांनी केलं. मी त्यांना नाना म्हणायचे. नानांना जाऊन आता जवळपास दहा वर्षं होतील; पण त्यांची शिकवण आजही माझ्याजवळ आहे. त्यांना अभिनय अथवा नृत्याची कला अवगत होती किंवा ते या क्षेत्रात होते, असं अजिबात नव्हतं; पण ते उत्तम परीक्षक होते, सजग प्रेक्षक होते. त्यांनी मला वाचनाची आवड लावली. वेगवेगळं ऐकायला, बघायला शिकवलं. त्यांनी माझ्यात अभिनयाचं, नृत्याचं बीज रोवलं. माझे सगळे एकपात्री प्रयोग नाना बसवून घ्यायचे. मी भरतनाट्यमही शिकले आहे. नानांना नृत्याचं अंग नव्हतं; पण तरीही ते नृत्य बसवायचे. या ठिकाणी ही स्टेप चांगली दिसेल, हे चांगलं दिसणार नाही असं सांगायचे. माझ्यासाठी ते जणू माझा आरसाच होते. त्यामुळे त्यांनी शिकवलेल्या खूपशा गोष्टी मी आजही लक्षात ठेवलेल्या आहेत. मला आठवतं- आमच्या दारापुढे काढलेली रांगोळी कायम कोणीतरी पुसून टाकायचं. मला याचा खूप राग यायचा. आपण मेहनतीनं काढलेली रांगोळी कोणी क्षणभरात पुसतं हे मला खूप त्रासदायक व्हायचं. मग मीदेखील रागात शेजारच्यांच्या रांगोळ्या एक-दोन वेळा पुसल्या. मला वाटायचं, तेच माझी रांगोळी पुसतात. ते बघून नाना मला म्हणाले : ‘बाळा, दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा आपण आपली रेष गडद काढावी. तुझी रांगोळी पुसली तर पुसू दे, आपण पुन्हा काढावी. ते असं किती दिवस पुसतील? शेवटी त्यांच्या कृतीची त्यांना लाज वाटेलच ना! अथवा ते कंटाळतील आणि पुसायचं सोडून देतील.’ ही खूप मोठी गोष्ट माझ्या वडिलांनी मला शिकवली.

नानांनी मला खूप गोष्टी शिकवल्या हे खरं असलं, तरी आमच्या पिढीत मुलांचा वडिलांशी फारसा मोकळा संवाद नसायचा. आता मी माझ्या मुलाशी जेवढी बोलते, त्या तुलनेत ते फारच अल्प होतं. वडिलांपासून एका अंतरावरच राहण्याची तेव्हा पध्दत होती. त्यांचा एक प्रकारचा धाक, भीती वाटायची. ते शब्दातून बरंच काही सांगायचे; पण स्पर्शातून मिळणारी बापाची माया मला मिळाली नाही. ते मला ‘चिमणी’ म्हणायचे, कारण मला सतत बडबड लागायची. माझं लग्न झाल्यावरही मी माहेरी आल्यावर ‘माझी चिमणी आली’ असं ते आनंदानं म्हणायचे. माझं आणि नानांचं खूप छान नातं होतं. मी आज या क्षेत्रात आहे ते त्यांच्यामुळेच.

आता काळ खूपच बदलला आहे. आता आई-वडील हे जवळपास मुलांचे मित्रच बनले आहेत. माझ्यात आणि मुलगा अभिनय आमच्या दोघांत खूपच मनमोकळा संवाद होतो. आमची दोन घरं आहेत. मी कामानिमित्त मुलुंडला असते, तर तो अंबरनाथ इथल्या आमच्या घरी असतो. आम्ही रोज भेटत नाही; पण संवाद मात्र नियमित असतो. दिवसभरात काय घडलं हे आम्ही रोज रात्री एकमेकांना सांगतो. मी माझ्या आईशी इतकं नाही बोलू शकत- जितकं मी अभिनयशी बोलते. तसंच अभिनयचं आहे. तो जितकं माझ्याशी बोलतो, तितकं कोणाशीच नाही बोलत. पालकांशी असलेल्या मनमोकळ्या संवादाची कमतरता माझ्या लहानपणी मला जाणवली होती, त्यामुळे मी ठरवलंच होतं, की जे थोडंफार अंतर माझ्या आणि माझ्या पालकांमध्ये होतं, ते मी माझ्यात आणि माझ्या पाल्यांमध्ये ठेवणार नाही. कारण आम्ही आई-वडिलांना घाबरायचो. शाळेत किंवा बाहेर काही घडलं, तर ते त्यांना सांगायला खूप भीती वाटायची. आपण घरी ही गोष्ट सांगितली, तर आपलं बाहेर पडणं बंद होईल असं वाटायचं. हे भय मला माझ्यात आणि माझ्या अपत्यांत नव्हतं ठेवायचं. मूल आणि पालकांतली ही भीती मला पुसायची होती आणि त्यात मी यशस्वी झाले असं म्हणता येईल. अभिनय मला इत्थंभूत सर्व गोष्टी सांगतो. घरातली, बाहेरची, आवडलेली आणि न आवडलेली गोष्टही तो सहज सांगतो. माझी आवडलेली अथवा न आवडलेली गोष्ट, एखादं स्कीट नाही आवडलं, तर तेही मोकळेपणानं सांगतो. अभिनय आता मास कम्युनिकेशनच्या शेवटच्या वर्षाला आहे; पण अगदी लहान असल्यापासून आमच्यात मोकळा संवाद ठेवण्यासाठी मी सतत प्रयत्न करत आले आहे. मुलं वयात येऊ लागतात, तेव्हा त्यांना बरेचदा ही गोष्ट आपण आईला सांगायला नको असं वाटू लागतं. त्यांना स्वतःची स्पेस हवी असते. अभिनयच्या बाबतीतही असं घडलं होतं. त्या काळात तो काही गोष्टी मला नाही सांगायचा; पण मी माझ्या बाजूनं संवाद सतत सुरूच ठेवला होता. काही काळानं तो स्वतःच मला म्हणाला की, ‘आई, त्यावेळी मी तुला अमुक गोष्ट नव्हती सांगितली.’ वाढत्या वयात मुलांमध्ये अनेक बदल होत असतात. तेव्हा ते फारसे बोलत नसले, तरी पालकांनी त्यांच्याशी संवाद सुरू ठेवावा. काही काळानं गाडी पुन्हा रुळावर येते. मी सतत संवाद ठेवत असले, तरी त्याच्या प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ केली नाही- त्यामुळे त्याची निर्णयक्षमता उत्तम बनली.

काही बाबतीत आई म्हणून मी खूप गोष्टी नाही करू शकले, याची रुखरुख मला वाटते. कारण माझ्या आईनं प्रत्यक्षपणे माझी जेवढी काळजी घेतली, तेवढी मी माझ्या कामामुळे अभिनयची नाही घेऊ शकले. आई मला शाळेत सोडायला, घ्यायला यायची, रोज गरमगरम जेवायला द्यायची, वेगवेगळे पदार्थ करायची, भरवायची. हे सगळं माझ्या करिअरमुळे मला अभिनयसाठी नाही करता आलं; पण तरीही मला जितकं करता आलं तितका क्वालिटी टाइम मी त्याला दिला. अभिनय मोठा झाल्यानंतर मी ठरवलं होतं, की आता सतत स्वयंपाकघरात वावरणं बंद करायचं. कारण संसाराच्या रहाटगाडग्यात आपण स्वतःची स्पेसच विसरलेलो असतो. त्यामुळे आपण आता स्वतःला वेळ द्यायचा. मात्र, असं ठरवलेलं असलं तरी अनेकदा अभिनयला काहीतरी खायला हवं असतं किंवा आणखी काही हवं असतं, त्यावेळी माझ्या मनाची खूप घालमेल होते. आपण आता किचनमध्ये फारसं रमायचं नाही, हा माझा ‘पण’ काहीसा मोडतो आणि मी त्याच्यासाठी काहीतरी बनवते; पण फार त्यात अडकत नाही. कारण इतकी वर्षं सकाळी घरचं काम करून कामासाठी बाहेर पडायचं, दिवसभर काम करायचं, रात्री थकून घरी यायचं, हाच दिनक्रम होता. आता त्यात बदल हवा असणं फारसं गैर नाही असं मला वाटतं. अभिनय आता चोवीस वर्षाचा आहे. आणखी दोन वर्षं फार तर तो माझ्यावर काही प्रमाणात अवलंबून राहील. या सर्व काळात मी आईपण जगले, आता बाईपण जगावं असं मला वाटतं. म्हणजे एक स्त्री म्हणून आपण आयुष्य जगावं असं वाटतं. अभिनय लहान होता तेव्हा पहिली साडेतीन वर्षं मी सतत त्याच्यासोबत होते. त्यानंतर काही दिवस मी त्याला थोडा वेळ पाळणाघर, थोडा वेळ शाळा आणि नंतर घर असं ठेवत होते. सासूबाई होत्या म्हणून मला या गोष्टी त्यामानानं सोप्या गेल्या. पुढे तो गुरूकुल शाळेत गेला. त्यावेळी तो सकाळी सातला निघायचा, ते संध्याकाळी सात-साडेसातलाच घरी यायचा. त्याला मी सांगून ठेवलं आहे, की तू धडपडशील, तेव्हा मी तुझ्याजवळ नक्कीच आहे; पण प्रत्येक पावलावर मात्र सोबत नसीन. कारण आता तो लवकरच आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, स्वतंत्र होईल. इतर बाबतीतही त्याला सक्षम, स्वतंत्र करणं तितकच गरजेचं आहे.

शाळेत असतानापासून खरं तर अभिनयनं त्याची त्यानंच बऱ्यापैकी काळजी घेतली. तो दहावीत असताना त्याला कुठला क्लास लावला नव्हता. मी स्वतः वेळ मिळेल तेव्हा त्याचा अभ्यास घ्यायचे, गरज असेल तिथं नोट्स काढून द्यायचे. परीक्षेच्या काळात तर मी त्याच्याबरोबरच राहायचे. ज्या ज्या वेळी त्याला गरज होती तेव्हा मी त्याच्याजवळ होते. त्याचा अभ्यास, इतर गरजा, स्पर्धा, गॕदरींग, आजारपण अशा प्रत्येक वेळी मी त्याच्याबरोबर असायचे. फक्त गरमगरम खायला घालणं हे मला माझ्या लेकाच्या बाबतीत करता आलं नाही. कारण मी सकाळीच स्वयंपाक करून बाहेर पडायचे. रात्री घरी यायचे, तेव्हा अभिनय झोपलेला असायचा. त्यामुळे ही खंत मला काही वेळा नक्कीच वाटते.

अलीकडच्या काळातली मुलं फार प्रॕक्टिकल झाली आहेत, त्यांच्यामधलं इमोशनल बाँडिंग हलतंय असं मला वाटतंय. कॕज्युअल रिलेशनशीप, वरवरची मैत्री, तात्पुरतेपणा या गोष्टी वाढल्या आहेत. मी खूप विचार करते यावर, इतका इमोशनल कट ऑफ या पिढीमध्ये का झाला आहे? माझं आणि अभिनवचं कधी भांडण झालं किंवा वाद झाला, तर तो डायरेक्ट कट ऑफ करतो आणि पुढे चलतो. काही दिवस बोलणं बंद करतो. माझी मात्र इकडे घालमेल होत असते, की बाबा तू अबोला सोड आणि बोल काहीतरी; पण त्यानं तो विषय तिथंच सोडून दिलेला असतो, मला हे आवडलं नाही, बस! मग पुढे काहीच नाही. ही समस्या केवळ माझ्याच मुलाची नाहीये, तर त्याच्या वयाच्या इतर मुलांची पण आहे. माझा एक मानसपुत्र आहे. तो सध्या अमेरिकेत असतो. अभिनवपेक्षा तो मोठा आहे. त्यामुळे त्याच्यात आणि अभिनवमध्ये भावनिक पातळीवरचा फरक कसा वाढत गेला हे मी बघितलं आहे. प्रत्येक पिढीगणिक हा भावनिक ओलावा कमी होत चालला आहे, असं मला वाटतं. हा भावनिक ओलावा मुलांनी जपावा किंवा त्यांच्यात तो राहावा असं मला वाटतं. अर्थात एक कलाकार म्हणून अभिनव बऱ्यापैकी इमोशनल आहे. तो कट ऑफ करतो; पण अंबरनाथ गावात राहत असल्यामुळे गावाचा एक टच त्याच्यामध्ये आहे. तो भावनिक ओलावा त्याच्यात आहे. त्याचा मोठा मित्रपरिवार तिथं आहे. त्यांना सोडून यायचं नाही, म्हणून तो मुलुंडला येत नाही. मात्र, तरी ही पिढी भावनेच्या बाबतीत कोरडी होत चालली आहे, असं मी आजूबाजूला बघते. त्याचं कारण म्हणजे परस्परांतला संवाद संपला आहे. अभिनयच्या बाबतीत मी तो सतत सुरू ठेवला.

अभिनय सहावी-सातवीत असताना मी मुलुंडला घर घेऊन राहू लागले. कारण मला अंबरनाथला राहून कामासाठी एवढा प्रवास करणं झेपेनासं झालं होतं. घरी पोचायला खूपच उशीर व्हायचा. मी मुलुंडला राहायचं ठरवल्यावर अभिनयला जवळ बसवून तसं सांगितलं. मी आता रोज तुझ्यासोबत नसीन. सुटी असेल, परीक्षा असेल तेव्हा येईन. मी जे सांगितलं, ते त्या वयात त्याला फारसं कळतही नव्हतं; पण मी तरीही सगळी परिस्थिती खरी सांगितली. तुझं नववी-दहावी येत नाही तोपर्यंतचा वेळ मला दे. मी तेव्हा पुन्हा तुझ्याजवळ येऊन राहीन. त्यावेळी त्याला हे सगळं कळलं असेल असं नाही; पण आई आपल्याला काहीतरी महत्त्वाचं सांगत आहे एवढं नक्की समजलं. अर्थात हा निर्णय तितका सोपा नव्हता. नंतर कामाच्या व्यग्रतेमुळे अंबरनाथला नियमित जाणं जमत नव्हतं. इकडे काही काळानंतर अभिनय खूप आजारी पडू लागला. छातीत दुखतंय, पोटात दुखतंय असा त्रास होऊ लागला. तो आजारी पडला, की मला रात्री-अपरात्री धावत अंबरनाथला जावं लागायचं. त्यावेळी डॉक्टर मला म्हणाले, ‘त्याला तू हवी असतेस ना, म्हणून त्याला हे आजारपण येत आहे, ही इज मिसिंग यू. तू दर आठवड्याला त्याला भेटायला येत जा, म्हणजे, तू येणार आहेस या विचारानं त्याला बरं वाटेल.’ त्यानंतर मी ठरवलं, की आठवड्यातून एकदा अंबरनाथला जायचच. नंतर अभिनयचं छातीत दुखणं, पोटात दुखणं सगळं बंद झालं.

अभिनय खूप हुशार आणि प्रामाणिक मुलगा आहे. तसं तो मला बरंच काही शिकवत असतो. माझं इंग्रजी खूप वाईट आहे. अभिनय मला त्याबद्दल नेहमीच मार्गदर्शन करत असतो. त्याचं उर्दूही चांगलं आहे. त्याच्यामुळे मी उर्दू वाचायला आणि ऐकायला शिकले. तो माझा परीक्षक आहे. माझं कुठलं काम नाही आवडलं, तर ‘हे बरोबर केलं नाहीस तू’ असं तो सांगतो. एखादं काम आवडलं, तर ते आवडल्याचंही मोकळेपणाने सांगतो. जसं माझे बाबा माझा आरसा होते, तसंच माझा मुलगाही माझा आरसा आहे, असं मी म्हणीन.

दहावीपर्यंत अभिनयजवळ स्वतःचा फोन नव्हता. नंतर तो एकटा बाहेर पडू लागला म्हणून फोन घेऊन दिला. नववीच्या वाढदिवसाला मी त्याला एक व्हिडिओ गेम आणून दिला होता. त्याव्यतिरीक्त कुठलं गॕजेट त्याच्याकडे नव्हतं. आता मात्र स्मार्टफोन किंवा गॕजेटचा वापर तो नियमित करतो. शिवाय आता तो मोठाही झाला आहे, त्यामुळे आता मी काही बोलणं योग्य ठरणार नाही. त्याला या गोष्टींचा योग्य वापर कसा करायचा हे समजलं आहे. आता लॉकडाऊनमध्ये ‘आठशे खिडक्या, नऊशे दारं’ या मालिकेचं चित्रीकरण घरातच करायचं होतं. ते सगळं, कॕमेरा,अँगल, लाईट वगैरे बघून अभिनयनंच केलं. मात्र, लहान मुलांना गॕजेटपासून दूर ठेवावं असं मला वाटतं. थोडी समज आल्यावर ते द्यावं; पण आताच्या परिस्थितीत ऑनलाइन शाळा, क्लासेसमुळे मोबाइल फोन मुलांना देणं ही गरज बनली आहे. त्यामुळे मुलांना मोबाइल आपला मित्र वाटू लागला आहे. त्यासाठी पालकांनी मुलांच्या मोबाइल वापरावर लक्ष ठेऊन तो वापर मर्यादित केला पाहिजे. पालकांनी मुलांचे ‘शिस्तप्रिय मित्र’ बनलं पाहिजे. नुसते मित्र न बनता त्यांना थोडी शिस्तही लावली पाहिजे. मूल जिथं चुकेल, तिथं त्याला रागवता आलं पाहिजे आणि प्रसंगी त्याची चूक पोटातही घालता आली पाहिजे. या दोन्ही गोष्टींचा योग्य मेळ पालकांना घालता आला पाहिजे.
(शब्दांकन : मोना भावसार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang vishakha subhedar write parents article