काही खास पाककृती...दिवाळीनिमित्त (विष्णू मनोहर)

vishnu manohar
vishnu manohar

‘कूकरी शो’च्या निमित्तानं मी अनेक ठिकाणी जातो तेव्हा ‘पारंपरिक फराळाच्या पदार्थांव्यतिरिक्‍त नवीन काहीतरी पाककृती सांगा’ अशी मागणी दिवाळीच्या आसपासच्या काळात माझ्याकडं केली जाते. त्यामुळे मी इन्स्टंट अनारसा, रव्याचा चिवडा, फ्रूट टॉफी, कॅरॅमल स्ट्रिप्स, क्रिस्पी बनाना, खाण्याचे फटाके इत्यादी वैविध्यपूर्व पदार्थांची निर्मिती केली आहे.
अशाच काही वैविध्यपूर्ण पदार्थांच्या पाककृतींविषयी...

जवळपास आपले सगळे भारतीय सण ऋतुमानाशी निगडित आहेत. दिवाळीही त्याला अपवाद नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यात येणाऱ्या या सणाच्या काळात वातावरण मोठं आल्हाददायी असतं. गोड-गुलाबी थंडी पडायला सुरवात झालेली असते. आपल्या कृषिप्रधान देशात सुगीचे दिवसही याच काळात असतात.
वेगवेगळी धान्यं, पिकं, भाजी विकून शेतकऱ्याकडे या काळात बऱ्यापैकी पैसा आलेला असतो. शेतीवर आधारित इतर छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय करणाऱ्यांच्याही हाती या काळात बऱ्यापैकी पैसा असतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या सणाला विशेष महत्त्व मिळत गेलं.

दिवाळीची चाहूल नवरात्रापासून आणि दसऱ्यापासूनच लागते. नंतर कार्तिक महिन्याच्या सुरवातीपासून देवळादेवळात
काकड-आरतीला सुरवात होते. सणांचा राजा मानल्या गेलेल्या दिवाळीला सामाजिक आणि धार्मिक या दोन्ही दृष्टींनी महत्त्व आहे. ‘तमसो मा जोतिर्गमय’ म्हणजेच ‘अंधारातून प्रकाशाकडे चला’ असा संदेश देणारा हा सण सर्वधर्मीयांना आपलासा वाटतो.

दिवाळीसंदर्भात अनेक आख्यायिका, पुराणकथा प्रचलित आहेत. प्रभू रामचंद्र १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले, त्या आनंदाप्रीत्यर्थ अयोध्यानगरवासियांनी दिवे उजळून तो आनंद व्यक्त केला आणि त्या दिवशी असलेली कार्तिक महिन्यातली अमावास्या झगमगून गेली...ती दिवाळी. कृष्णभक्‍तांच्या मते, अत्याचारी राजा नरकासुराचा वध श्रीकृष्णानं ज्या दिवशी केला तो दिवस लोक दिवे उजळून साजरा करू लागले. तो दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. आणखी एका पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णूनं नरसिंहाच्या रूपात येऊन हिरण्यकश्यपूचा वध केला. त्याच दिवशी समुद्रमंथनातून लक्ष्मी आणि धन्वंतरी या देव-देवता प्रकट झाल्या. जैनधर्मीयांनुसार, चोविसावे महावीर स्वामी यांचा निर्वाणदिन म्हणजे दिवाळी होय. शिखधर्मीयांसाठीही या दिवसाला विशेष महत्त्व आहे. कारण, याच दिवशी सन १५७७ मध्ये अमृतसर इथं सुवर्णमंदिराचा शिलान्यास झाला होता. नेपाळामध्येही दिवाळीला विशेष महत्त्व आहे. कारण, नेपाळमध्ये या दिवशीपासून नवीन वर्ष सुरू होतं. अखेरचा मुघलसम्राट बहादूरशहा जफर हेही दिवाळीचा सण साजरा करायचे...दिवाळीच्या दिवशी त्यांचा महाल दिव्यांनी सजवला जायचा व लाल किल्ल्यावरच्या समारंभात हिंदू-मुस्लिम एकत्र जमून दिवाळी साजरी करायचे असं मध्यंतरी माझ्या वाचनात आलं.
***

माझ्या लहानपणी सहामाही परीक्षा संपल्यानंतर दिवाळीची सुटी असायची. कधी एकदा परीक्षा संपतेय आणि किल्ला तयार करतोय असं आम्हा लहान मुलांना व्हायचं. आता काळानुसार परिस्थिती बदललेली आहे. चिखल-मातीत हात-पाय खराब करून घेऊन किल्ले बनवण्याचं प्रमाण आता कमी झालं आहे. कारण, तयार किल्ले बाजारात उपलब्ध असतात.
पूर्वी दिवाळीची मजा काही वेगळीच असायची. नवे कपडे, आवडीच्या वस्तू यांची खरेदी दिवाळीसारख्या मोठ्या सणावारालाच होत असे. खाण्या-पिण्याची चंगळही वर्षभरातून केवळ सणावारालाच असायची. आज असं वातावरण राहिलेलं नाही. आता माणसं वर्षभर कुठली ना कुठली खरेदी करत असतात, हॉटेलिंगही वारंवार करत असतात. मात्र, असं असलं तरी दिवाळीच्या फराळाची मजा मात्र अजूनही टिकून आहे.
***

विविध देशांमध्येही दिवाळी साजरी केली जाते. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फिजी, इंडोनेशिया, जपान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, म्यानमार, नेपाळ, न्यूझीलंड, सिंगापूर, श्रीलंका, थायलंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका या देशांत राहणारा भारतीय समाज दिवाळी मोठ्या
प्रमाणात साजरी करतो. अर्थात, ती साजरी करण्यात त्या त्या देशानुसार काही बदलही झालेले दिसून येतात.
नेपाळमध्ये दिवाळीला ‘स्वांती’ असं म्हणतात. भारतातल्याप्रमाणेच नेपाळमधली दिवाळी पाच दिवसांची असते. मात्र, भारतीयांपेक्षा निराळ्या पद्धतीनं ती साजरी केली जाते. पहिल्या दिवशी (काग तिहाड) कावळ्यांची पूजा केली जाते. या दिवशी कावळ्यांना ‘दिव्य दूत’ समजलं जातं. दुसऱ्या दिवशी (कुकुर तिहाड) कुत्र्याची पूजा त्याच्या इमानदारीच्या गुणाबद्दल केली जाते. तिसऱ्या दिवशी
लक्ष्मीची आणि गाईची व चौथ्या दिवशी लक्ष्मीची प्रतिमा असलेल्या खातेवहीची पूजा केली जाते. पाचव्या दिवसाला नेपाळमध्ये ‘भाईटीका’ असं म्हणतात. भाईटीका म्हणजे नेपाळवासियांची भाऊबीज.
दिवाळीच्या काळात नेपाळी लोक द्विसी आणि भाईलो या
नृत्यनाटिका सादर करतात. या नृत्यनाटिका गावातल्या ठराविक घरांपुढे जाऊन सादर केल्या जातात व तिथल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले जातात. नृत्यनाटिका सादर करणाऱ्यांना धान्य, फळं, मिठाई व पैसे दिले जातात. भारतातल्यापेक्षा नेपाळमध्ये फटाक्यांचा वापर कमी प्रमाणात केला जातो. काही ठिकाणी गावाच्या बाहेर ‘दिवाळीनगर’ उभारलं जातं. इथं वेगवेगळ्या प्रकारची आतषबाजी, मनोरंजनपर कार्यक्रम, पारंपरिक पूजा आदी कार्यक्रम केले जातात. एकंदरीत एखाद्या जत्रेचं स्वरूप त्या ठिकाणाला आलेलं असतं.
खाण्या-पिण्याची चंगळ असते हे वेगळं सांगायला नकोच.
त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांत भारतीय लोक एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात. हा या देशांतला एक प्रमुख सण आहे. या देशांत दिवाळीनगर या नावाचं ठिकाणही आहे. इथं देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. दिवाळीच्या काळात हिंदू धर्माशी संबंधित काही गोष्टींचं प्रदर्शनही भरवलं जातं.
मलेशियात दिवाळी ‘हरी दीपावली’ या नावानं साजरी केली जाते.
या दिवशी मलेशियात सार्वजनिक सुटी असते. इथं दिवाळीत आयोजिल्या जाणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर भारतीय परंपरेची छाप दिसून येते. मलेशियातल्या भारतीयांमध्ये तमिळ लोकांचं प्रमाण सर्वाधिक आहे. एकमेकांना घरी जेवायला बोलावून हे लोक दिवाळी साजरी करतात.
ब्रिटनमध्ये हिंदू आणि शीखधर्मीयांचं प्रमाण अधिक असल्यानं दोन्ही समुदाय इथं भारतातल्याप्रमाणेच मोठ्या उल्हासात दिवाळी साजरी करतात. एकमेकांना मिठाईच्या स्वरूपातल्या भेटवस्तू दिल्या जातात.
न्यूझीलंडमध्ये ऑकलॅंड आणि वेलिंग्टन या दोन शहरांत भारतीयाचं प्रमाणात जास्त असल्यानं तिथंही दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी होते. भारतातल्याप्रमाणेच एकमेकांना घरी बोलावून, भेटवस्तू देऊन इथं दिवाळी साजरी केली जाते. इथं फराळाच्या पदार्थांबरोबरच केक, पेस्ट्री, चॉकलेट व विशेषकरून नूडल्स/ड्रायफ्रूट्‌सपासून गोड पदार्थ तयार केले जातात.
***

दिवाळीच्या फराळासाठीची पूर्वतयारी ही साधारणतः १५ दिवस आधी सुरू होते. चकलीची भाजणी करणं, अनारशाचं पीठ तयार करणं, चिवड्याचा मसाला अशा प्रकारची ही पूर्वतयारी असते.
यापैकी चकलीची भाजणी थोडी वेळखाऊ असते. भाजणीला लागणारं साहित्य धुऊन, वाळवून त्याचं पीठ दळून आणावं लागतं. भाजणी तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्या त्या पद्धतीनं आपापल्या आवडीच्या चवीनुसार ही भाजणी केली जाते. यापैकी
भाजणीची मला आवडलेली पद्धत मी इथं देत आहे :-
चकलीच्या भाजणीसाठी :- तांदूळ : ४ वाट्या, हरभऱ्याची डाळ :२ वाट्या, उडदाची डाळ : १ वाटी, मुगाची डाळ : अर्धी वाटी, जिरे : १ चमचा, धने :२ चमचे, हिंग : पाव चमचा, हळद : पाव चमचा, तिखट : चवीनुसार, आमचूर : १ चमचा हे सर्व साहित्य एकत्र करून खमंग भाजून घ्यावं व भाजणी तयार करून ठेवावी. चकली करताना या भाजणीत चवीनुसार हळद, तिखट, आमचूर, आलं-लसूण-हिरवी मिरची-कोथिंबिरीचं वाटण घालून भिजूवन घ्यावी. चवीनुसार मीठ घालून चकल्या तयार करून तळून घ्याव्यात.
अनारशाच्या ओल्या पिठासाठी (उंडा) :- तांदूळ स्वच्छ धुऊन २ दिवस भिजत ठेवावा. नंतर त्यातलं पाणी निथळून टाकावं आणि तांदूळ मिक्‍सरवर बारीक करून घ्यावेत. नंतर ते चाळून घ्यावेत. एका वाटीपेक्षा थोडीशी कमी पिठीसाखर घालून मिश्रण एकत्र करावं व त्याचे गोळे बनवून ठेवावेत.
चिवडा मसाल्यासाठी :- धनेपूड : १ चमचा, बडीशेप : २ चमचे,
जिरे : अर्धा चमचा, आमचूर : १ चमचा, हळद : पाव चमचा, हिंग : पाव चमचा, तिखट : १ चमचा. सर्व साहित्य मिक्‍सरमध्ये बारीक करून ठेवावं आणि चिवडा करताना वापरावं. दिवाळी म्हटलं की फराळात गोडाधोडाचं महत्त्व असतंच; पण अलीकडच्या काळात गोड पदार्थांचं प्रमाण तसं कमी झालं आहे. पूर्वी लाडू, वड्या, बर्फी, अनारसे, करंज्या, गुलगुले असे दहा-बारा दिवस टिकणारे पदार्थ तर असायचेच; शिवाय दिवाळीच्या पाव दिवसांत वेगवेगळी पाच पक्वान्नंही तयार केली जायची.
‘कूकरी शो’च्या निमित्तानं मी अनेक ठिकाणी जातो तेव्हा ‘पारंपरिक फराळाच्या पदार्थांव्यतिरिक्‍त नवीन काहीतरी पाककृती सांगा’ अशी मागणी दिवाळीच्या आसपासच्या काळात माझ्याकडं केली जाते. त्यामुळे मीसुद्धा इन्स्टंट अनारसा, रव्याचा चिवडा, फ्रूट टॉफी, कॅरॅमल स्ट्रिप्स, क्रिस्पी बनाना, खाण्याचे फटाके इत्यादी वैविध्यपूर्व पदार्थांची निर्मिती केली आहे.
अशाच काही वैविध्यपूर्ण पदार्थांच्या पाककृती खास ‘शब्ददीप’च्या वाचकांसाठी...
===========
चिवडा

साहित्य :- पातळ पोहे : अर्धा किलो, चुरमुरे :२ वाट्या, शेंगदाणे : १५० ग्रॅम, दलिया : १०० ग्रॅम, खोबऱ्याचे काप : अर्धी वाटी,
धने-जिरे : एकेक चमचा, धने-जिरेपूड : एकेक चमचा, हिंग : एक चमचा, हळद : अर्धा चमचा, खसखस :१ चमचा, तिखट : चवीनुसार, हिरव्या मिरच्या :३-४, कढीलिंबाची पानं : ८-१०, आमचूर : १ चमचा, चिरलेला लसूण : २ चमचे, वाळवलेला कांदा : अर्धी वाटी.
कृती :- चिवडा जास्त कुरकुरीत राहण्यासाठी मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यात पोहे कमी आंचेवर कोरडेच भाजून घ्यावेत. भाजताना तळापासून सारखे हलवत राहावेत. पोह्यांचा रंग बदलू देऊ नये. साधारणतः ७-८ मिनिटं भाजावेत. कुरमुरे २-३ मिनिटं भाजावेत. भाजताना सारखे ढवळत राहावेत, नाहीतर कुरमुरे जळतात. पातेल्यात तेल गरम करावं. सर्वात आधी शेंगदाणे थोडे तळून घ्यावेत. शेंगदाणे तपकिरी रंगाचे झाले की एका भांड्यात काढून ठेवावेत. त्याच तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरची आणि कढीलिंबाची पानं घालून फोडणी करावी. नंतर फोडणीत तळलेले शेंगदाणे घालून लगेचच पोहे आणि कुरमुरे घालावेत. सर्व पोह्यांना तेल लागेल अशा पद्धतीनं ते मिसळावेत हे करताना गॅस मंद आंचेवर ठेवावा, नाहीतर तळाला पोहे जळू शकतात. गॅस बंद करून चवीनुसार मीठ आणि चमचाभर साखर घालावी आणि व्यवस्थित ढवळून घ्यावा.
===========
चकली

साहित्य :- तांदूळ : ४ वाट्या, हरभऱ्याची डाळ : २ वाट्या, उडदाची डाळ : १ वाटी, मुगाची डाळ : अर्धी वाटी, जिरे : १ चमचा, धने :२ चमचे, हिंग : पाव चमचा, हळद : पाव चमचा, तिखट :चवीनुसार, आमचूर : १ चमचा, मीठ : चवीनुसार, आलं-लसूण-हिरवी मिरची-कोथिंबिरीचं वाटण : २ चमचे.
कृती :- वरील सर्व साहित्य खमंग भाजून दळून आणावं. चकली करताना त्यात चवीनुसार हळद, तिखट, आमचूर, आलं-लसूण-हिरवी मिरची-कोथिंबिरीचं वाटण घालून भिजवून घ्यावं. चवीनुसार मीठ घालून चकल्या पाडून तळून घ्याव्यात.
===========
शेव

साहित्य :- हरभऱ्याच्या डाळीचं पीठ (बेसन) : १ वाटी, मीठ : चवीनुसार, तिखट : चवीनुसार, हळद : पाव चमचा, तेल तळण्यासाठी.
कृती :- डाळीच्या पिठात चवीपुरतं मीठ व तिखट घालून पीठ सैलसर भिजवावं. भिजवताना पीठाच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी. पीठ भिजलं की त्याला थोडा तेलाचा हात लावावा. नंतर कढईत तेल गरम करावं. शेव पाडायच्या साच्यामधून शेव पाडून मंद आंचेवर तळून घ्यावी.
===========
बुंदीचे लाडू

साहित्य :- बेसन : १ वाटी, बदाम-पिस्ता काप : पाव वाटी, बेदाणे : पाव वाटी, साखर :२ वाट्या, लिंबू : १, दूध :१ वाटी, कोर : पाव चमचा.
कृती :- बेसनात एक चिमूट मीठ घालून मिश्रण पातळसर भिजवावं. बुंदी पाडण्याच्या झाऱ्यातून बुंदी पाडून घ्यावी. साखरेचा दोनतारी पाक करून ठेवावा. त्यात बुंदी घालून २ मिनिटं ठेवावी. बुंदी घालताना पाक गरमच असावा. पाकातून बुंदी काढून त्यात ड्रायफ्रूट, वेलदोडापूड घालून गरम असतानाच लाडू वळून घ्यावेत.
टीप :- मोतीचूरबुंदीसाठीचा झारा बाजारात विकत मिळतो. बुंदी गाळताना कढईच्या बाजूनं एक उभा पाट लावावा.
===========
इन्स्टंट अनारसे

साहित्य :- रवा २ : वाट्या, खाण्याचा डिंक : १ वाटी, दही :२ चमचे, एकतारी साखरेचा पाक :१ वाटी, तूप तळायला, खसखस : २ चमचे.
कृती :- दह्यात रवा अर्धा तास भिजवून ठेवावा. नंतर या गोळ्यात जाडसर कुटलेला डिंक घालून नेहमीच्या अनारशासारखे अनारसे खसखशीवर थापून व्यवस्थित तळून घ्यावेत. डिंकामुळे ते छान फुलतात. नंतर ते साखरेच्या पाकातून लगेच काढावेत किंवा पाक वापरायचा नसेल तर वरून पिठी साखर घालून खायला द्यावेत.
===========
फ्रूट पेस्ट्री

साहित्य :- मैदा : २ वाट्या, स्ट्रॉबेरी : १ वाटी, साखर : पाऊण वाटी, मिल्क पावडर : १ वाटी, साजूक तूप : अर्धी वाटी, बेकिंग पावडर : १ चमचा, सोडा :१ चमचा, मीठ : चवीनुसार, टूटी फ्रूटी मिक्‍स: ४ चमचे.
कृती :- मैदा, बेकिंग पावडर, मीठ, सोडा हे सगळं एकत्र करून चाळून घ्यावं. मिल्क पावडर, साखर व तूप एकत्र फेटून नंतर दोन्ही मिश्रणं एकत्र करावीत. बेकिंग डिशमध्ये डस्टिंग करून त्यावर हे मिश्रण टाकावं. मध्ये स्ट्रॉबेरी किंवा उपलब्ध फ्रूट (चेरी, काळी द्राक्षं इत्यादी) टाकून त्यावर परत केकचं मिश्रण ओतावं. त्यावर टूटी फ्रूटी घालावी. मायक्रोव्हेवमध्ये १०० वर ५-६ मिनिटे बेक करावी नंतर खायला द्यावी
===========
ऑरेंज पेस्ट्री

साहित्य :- मैदा :२ वाट्या, मिल्क पावडर :१ वाटी, वनस्पती-तेल :पाऊण वाटी, बेकिंग पावडर :अर्धा चमचा, सोडा :अर्धा चमचा, ऑरेंज मार्मालेड :अर्धी वाटी, साखर :२ चमचे, क्रीम :अर्धी वाटी.
कृती :- मैदा, मिल्क पावडर, वनस्पती-तेल, बेकिंग पावडर, सोडा हे सगळं एकत्र करावं. त्यामध्ये अर्धी वाटी ऑरेंज मार्मालेड घालून मायक्रोव्हेव ओव्हनमध्ये ५ मिनिटं बेक करावं किंवा ओटीजीमध्ये १८० डीग्रीवर १० ते १२ मिनिटं बेक करावं. नंतर बाहेर काढून थंड करावं. ओटीजीमध्ये असल्यास आजूबाजूचा ब्राउन झालेला भाग काढून टाकावा व केकचे मधोमध २ भाग करावेत. त्यावर साखरेचं पाणी शिंपडून ओलसर करावं. पुन्हा अर्धी वाटी ऑरेंज मार्मालेड व अर्धी वाटी क्रीम एकत्र फेटून घ्यावं. हे मिश्रण एका भागावर लावून त्यावर केकचा दुसरा भाग ठेवा. आजूबाजूनं हे मिश्रण लावून सजावट करावी व थंड झाल्यावर ही पेस्ट्री खायला द्यावी.
===========
कॉफी सॅंडविच केक

साहित्य :- मैदा : २ वाट्या, दूधपावडर :१ वाटी, बेकिंग पावडर :
अर्धा चमचा, सोडा : अर्धा चमचा, लोणी : अर्धी वाटी, कॉफी : ३ चमचे, साखर : ३ चमचे, ब्रेड स्लाईस :२ नग.
कृती :- मैदा, दूध पावडर, बेकिंग पावडर, सोडा व लोणी हे सगळं एकत्र फेटून घ्यावं. गरज पडल्यास थोडं दूध घालावं. मिश्रण जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर ३ चमचे कॉफी, ३ चमचे साखर, १ चमचा पाणी एकत्र करून खूप फेटून घ्यावं. इतकं फेटावं की ते श्रीखंडासारखं घट्ट झालं पाहिजे. नंतर ब्रेडच्या २ मोठ्या स्लाईस घेऊन त्यावर दोन्ही बाजूंनी लोणी लावून घ्यावं व तयार कॉफीचं घट्ट मिश्रण लावून दुसरी स्लाईस लावावी. तयार स्लाईस केकच्या मिश्रणात बुडवून नॉनस्टिक पॅनवर ठेवावी. वर झाकण ठेवावं. मंद आंचेवर ३ मिनिटं शेकून झाकण उघडावं. नंतर दुसरी बाजू २ मिनिटे शेकून गरम असतानाच मधून कापून खायला द्यावं.
===========
मिल्क केक

साहित्य :- दूध : २ लिटर, लिक्विड ग्लुकोज :१ चमचा, साखर :१०० ग्रॅम, तूप :५० ग्रॅम, वेलदोडापूड :१ चमचा, चांदीचा वर्ख सजावटीसाठी.
कृती :- दूध आटवून घट्टसर होत आल्यावर त्यात साखर, लिक्विड ग्लुकोज व वेलदोडापूड मिसळावी. नंतर साजूक तूप घालून पुन्हा घट्टसर होऊ द्यावं. गरम असतानाच एका भांड्यात ओतून ३-४ तास ‘सेट’ करायला ठेवावं. तयार झाल्यावर खालचा रंग बदामी व वरचा रंग पांढरा होईल. वरून चांदी वर्ख लावून खायला द्यावं.
===========
कॅरॅमल नूडल्स

साहित्य :- नूडल्स : २ वाट्या, भाजलेला आक्रोडचा चुरा :अर्धी वाटी, साखर :१ वाटी.
कृती :- नूडल्स उकळून व्यवस्थित तळून घ्यावेत. नंतर कॅरॅमल तयार करण्यासाठी साखर एका भांड्यात घेऊन पाणी न टाकता वितळवावी. जास्त तपकिरी होऊ देऊ नये. फिकट पिवळ्या रंगाचा साखरेचा पाक तयार झाल्यावर तळेले नूडल्स त्यात बुडवावेत व भाजलेला आक्रोडचा चुरा वरून घालावा. नंतर आइस्क्रीमबरोबर खायला द्यावेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com