रूप पाहता ‘ॲपु’ले! (विश्राम ढोले)

विश्राम ढोले vishramdhole@gmail.com
Sunday, 5 July 2020

टिकटॉकसह इतर चिनी ॲप्सवर नुकतीच बंदी घालण्यात आली. टिकटॉक बंद झाल्यावर ‘चिंगारी’ या तशाच प्रकारच्या ॲपला मागणी वाढू लागली. मुळात एक ॲप बंद होईल, दुसरं लोकप्रिय होईल; पण स्वतःचं रूप छोट्या व्हिडिओंद्वारे जगापर्यंत पोचवण्याची, असलेल्या-नसलेल्या कलागुणांची अभिव्यक्ती करण्याची गरज इतक्या लोकांना का वाटतेय हे बघणं जास्त उत्सुकतेचं आहे.

टिकटॉकसह इतर चिनी ॲप्सवर नुकतीच बंदी घालण्यात आली. टिकटॉक बंद झाल्यावर ‘चिंगारी’ या तशाच प्रकारच्या ॲपला मागणी वाढू लागली. मुळात एक ॲप बंद होईल, दुसरं लोकप्रिय होईल; पण स्वतःचं रूप छोट्या व्हिडिओंद्वारे जगापर्यंत पोचवण्याची, असलेल्या-नसलेल्या कलागुणांची अभिव्यक्ती करण्याची गरज इतक्या लोकांना का वाटतेय हे बघणं जास्त उत्सुकतेचं आहे. टिकटॉक किंवा तस्तम ॲप्स कोणत्या वैयक्तिक-सामाजिक ऊर्मीना आवाहन करतात, कोणत्या मानसिकतेला उत्तेजन देतात, अभिव्यक्तीच्या कोणत्या रूपाला प्राधान्य देतात याचा घेतलेला शोध.

 

केंद्र सरकारनं ‘टिकटॉक’वर सोमवारी बंदी घातल्यावर तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी एक वेगळीच प्रतिक्रिया दिली. ‘टिकटॉकवरील बंदीमुळे बेरोजगार होणाऱ्या लोकांचं काय? नोटाबंदीसारखा याही बंदीचा लोकांना खूप त्रास होणार आहे,’ अशा आशयाची ती प्रतिक्रिया होती. त्यांची प्रतिक्रिया राजकीय आहे, हे उघड आहे. शिवाय टिकटॉकवरच्या बंदीमुळे होणाऱ्या बेरोजगारीचा अर्थ नेमका कसा लावला, हेही त्यांनी स्पष्ट केलेलं नाही; पण त्यांच्या प्रतिक्रियेतली राजकीयता आणि संदिग्धता बाजूला ठेवली तरी टिकटॉकची तुलना त्या कळत नकळत चलनाशी करतात, हे महत्त्वाचं आहे. थोडाफार अतिशयोक्तीचा आरोप स्वीकारून असं खरंच म्हणता येतं, की स्वस्तात प्रसिद्धी मिळविण्याच्या एका मार्केटमध्ये टिकटॉक भारतात खरोखरच हजाराची नोट बनलं होतं. ज्यांनी ही ‘टिकटॉक करन्सी’ भरपूर प्रमाणात जमवली होती, त्यांचे या बंदीमुळे आता खरेच वांधे झाले आहेत.

 

याला जोडूनच आणखी एक बातमी आली. टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर ‘चिंगारी’ या त्याच्यासारख्याच; पण भारतीय बनावटीच्या ॲपच्या डाऊनलोडिंगचं प्रमाण अचानक प्रचंड प्रमाणात वाढलं. कालपर्यंत फार परिचित नसलेलं हे ॲप तासाला लाखापेक्षा जास्त इतक्या प्रमाणात डाऊनलोड होऊ लागलं. पाहतापाहता ‘चिंगारी’नं ७५ लाखांचा टप्पाही ओलांडला. हा वेग आणि हे प्रमाण इतकं होतं, की ‘चिंगारी’च्या सर्व्हरला ते पेलवेना. ‘चिंगारी’चा सध्या ‘वणवा’ झाला आहे. ॲप चालवणाऱ्यांसाठी ही स्थिती आनंदाची असली, तरी हा वणवा मॅनेज करताना त्यांची तारांबळ उडालीय. नोटाबंदीनंतर नोटा बदलून घेण्यासाठी बँकापुढे उडालेल्या गर्दीसारखंच हे. यादरम्यान अनेकांनी आपले टिकटॉकीय ‘धन’ इन्स्टा, फेसबुकसारख्या इतर ‘चालू खात्यां’वर वळवून ते वाचवण्याचा प्रयत्न केला. हेही काहीसे नोटाबंदीला लोकांनी दिलेल्या प्रतिसादासारखंच.

यातला वरवरच्या तुलनेचा भाग बाजूला ठेवला, या निर्णयामागची राजकीयता मागं ठेवली, तरी जे उरतं ते महत्त्वाचं आहे. उथळ टाईमपासची किंवा थिल्लरपणाची टीका सतत झेलणारं एक मनोरंजनात्मक ॲप प्रत्यक्षात लाखो लोकांच्या दैनदिन जगण्याचा इतका मोठा भाग झालं होतं, हे ते मागं उरणारं वास्तव आहे. हे लाखो लोक म्हणजे नेमके किती तर जवळजवळ वीस कोटीं वापरकर्ते. त्यातले १२ कोटी बऱ्यापैकी सक्रिय वापरकर्ते. त्यांच्यात जवळजवळ निम्म्यापर्यंत भरणा १६ ते २४ या अगदी तरुण वयोगटातला. टिकटॉकची भारतात होणारी आर्थिक उलाढाल किती- तर मागच्या वर्षी आलेल्या बंदीच्या वेळी कंपनीनंच कोर्टात दिलेल्या माहितीनुसार- दिवसाला पाच लाख डॉलर्स! भारतात टिकटॉतवर सर्वांत मोठा स्टार किंवा सेलिब्रिटी असलेल्या रियाझ अलीच्या टिकटॉक अनुयायांची संख्या तब्बल ३.८ कोटी. या टॉप टेनमध्ये शेवटच्या स्थानावर असलेल्या रॉबिन जिनलचे अनुयायीही १.८ कोटी. लाखोंनी अनुयायी असलेल्या टिकटॉक स्टार्सची संख्या तर हजारांमध्ये. मोठमोठ्या टिकटॉक स्टार्सची एकेका पोस्टची कमाई लाखोंमध्ये. टिकटॉक स्टारडमचा प्रभाव म्हणून की काय, मागच्या वर्षी आलेल्या ‘बाला’ या लोकप्रिय चित्रपटातलं एक प्रमुख पात्र या टिकटॉक स्टारच्या व्यक्तिरेखेवर बेतलेले होते. बाकी असे व्हिडिओ फारसे पोस्ट न करताही टिकटॉकवर तासनतास पडीक राहणाऱ्यांची संख्याही लाखोंमध्ये. टिकटॉकच्या अफाट लोकप्रियतेची आणि यशाची अशी बरीच उदाहरणं आणि आकडेवारी देता येईल.

अर्थात टिकटॉवर टीकाही बरीच होत असते. या ॲपची चायनीज मालकी, त्यांची तिथल्या सत्ताधाऱ्यांशी असलेली जवळीक, डेटावापराबाबतचं संदिग्ध धोरण आणि संशय ही तर कारणं आहेतच; पण मुळात अनेक वापरकर्त्यांकडून थिल्लर मनोरंजनासाठी होणारा वापर हा टिकटॉकवरचा मोठाच आक्षेप आहे. त्याला काहीप्रमाणात टिकटॉतची रचनाही कारणीभूत आहे. तिथं करता येणारे व्हिडिओ जास्तीत जास्त मिनिटभराचे असू शकतात. अजून मोठे व्हिडिओ करायचे असतील, तर ॲपबाहेरच्या साधनांचा वापर करावा लागतो. मुळात प्रसिद्ध गाणं किंवा डायलॉगवर लिपसिंक करण्याची गंमत देणारं ‘म्युझकली’ हे ॲप हे टिकटॉकचे खरे पूर्वज. ते ॲप विकत घेऊन टिकटॉकनं तोच प्रकार सुरू ठेवला. आजही टिकटॉकवर लिपसिंक करणारे व्हिडिओ सर्वांत जास्त.... पण अर्थात तेवढंच नाही. नाच आणि गाण्यांचं छोटं सादरीकरण, छोटे विनोदी प्रसंग, अंगविक्षेपी व्हिडिओ, फॅशन टिप्स, छोटेखानी सल्ले अशा प्रकारचे व्हिडिओही टिकॉकवर भरपूर असतात. अशा प्रकारच्या व्हिडिओच्या नावाखाली सॉफ्ट पॉर्न प्रकाराकडे झुकणारे व्हिडिओही तिथं येतात म्हणून मध्यंतरी टिकटॉवर बरीच टिका झाली. भारतात तर हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं; पण आठवडा-दीड आठवड्याच्या बंदीनंतर टिकटॉक पुन्हा सुरू झालं होतं. असाच प्रकार इंडोनेशियातही घडला होता. टिकटॉक व्हिडिओ करताना झालेले वाद, अपघात, मृत्यू यांच्याशी सबंधित प्रकरणंही बरीच आणि त्यावरून होणारी टीकाही भरपूर. तेव्हा लोकप्रियता आणि टीका अशा दोन्ही बाबतीत टिकटॉकची कामगिरी विलक्षण म्हणावी अशीच. टिकटॉकच्या या दोन्ही बाजूंना एक सामाजिक आयामही आहे. एक म्हणजे ते मुख्यत्वे ट्वीन आणि टिन म्हणजे १० ते १९ वयोगटातील मुलांचं म्हणून ‘बालिश’ किंवा ‘बचकाना’ ॲप मानलं जातं. शिवाय त्यांचा वापरकर्ता वर्ग हा त्यामानं कमी आर्थिक गटातला, बराचसा निमशहरी वा ग्रामीण; तसंच सामाजिक उतरंडीवर तुलनेनं खालच्या स्तरांवरांवरचा असतो, असंही समजलं जातं. या सगळ्या कारणांमुळे लोकप्रिय असूनही सोशल मीडियाच्या प्रतिमाक्रमात टिकटॉक डाऊनमार्केट मानला जातो.

...पण या साऱ्या वर्णनातला टिकटॉक या ॲपचा संदर्भ वगळला, तरी जे उरतं ते विचार करण्यासाखं आहे. कारण तेच खरं या ॲपचं मूल्य होतं. त्यानंच टिकटॉकला प्रसिद्धीच्या बाजारात हजाराच्या नोटेचे मूल्य दिलं. उद्या ही नोट जरी रद्द झाली, तरी तिचं मूल्य कुठं दुसऱ्या नोटेमध्ये रूपांतरीत करता येईलच. ते मूल्य कालपर्यंत टिकटॉकला होतं. उद्या ‘चिंगारी’ला मिळेल तर परवा अजून कशाला तरी. त्यामुळे मुळात अशा ॲप्सना इतकं मूल्य कशामुळे येतं हे पाहणं गरजेचं आहे. टिकटॉकसारखी ॲप्स कोणत्या वैयक्तिक-सामाजिक ऊर्मीना आवाहन करतात, कोणत्या मानसिकतेला उत्तेजन देतात, अभिव्यक्तीच्या कोणत्या रूपाला प्राधान्य देतात याचा शोध घेणं गरजेचं आहे.

एकतर गोष्ट तर स्पष्ट आहे, की टिकटॉकसह सर्व समाजमाध्यमांनी अभिव्यक्तीच्या क्षेत्राचं प्रचंड सार्वत्रिकीकरण केलं आहे. स्वस्त स्मार्टफोन आणि स्वस्तातल्या डेटामुळे त्याला मोठा हातभार लागला हे खरंच आहे; पण मुळात कोणालाही आपल्या स्थळ-काळाच्या मर्यादांपलीकडे जात काहीतरी (किंवा काहीही) सांगता येऊ शकतं, परिचित अपरिचित अशा हजारो लोकांपर्यंत ते एका क्लिकसरशी पोचवता येऊ शकतं ही शक्यताच मुळात क्रांतिकारी आणि ऐतिहासिकही. अशा स्थळकाळापार जाणाऱ्या अभिव्यक्तीचं इतकं मोठं दालन इतक्या सगळ्यांसाठी आजवरच्या इतिहासात कधीच खुलं नव्हतं. तिथं मक्तेदारी होती ती काहीएक सांस्कृतिक-आर्थिक भांडवल असणाऱ्या मर्यादित लोकांची. तिथं अचानक धरण फुटावे असे या समाजमाध्यमांचे दरवाजे उघडले गेले आणि या आतापर्यंत सामाजिक अभिव्यक्तीच्या परिघावर राहिलेल्या लोकांच्या अभिव्यक्तीचे लोंढे बाहेर पडू लागले. त्यात जसा समाजाच्या मधल्या-खालच्या आणि अगदी तळागाळातल्या लोकांचा सहभाग आहे, तसा एरवी बऱ्यापैकी सुस्थित; पण अभिव्यक्तीबाबत स्वातंत्र्य वा प्रतिष्ठा नसलेल्या महिला, तरुण आणि कुमारवयीनांचाही तितकाच सहभाग आहे. ही सगळी मंडळी टिकटॉक, हॅलो, स्नॅपचॅटपासून ते फेसबुक, इन्स्टापर्यंतपर्यंत विविध माध्यमांवर व्यक्त होऊ लागली. खरंतर टिकटॉकसारख्या माध्यमांवर अशांचीच गर्दी जास्त. स्वतःच्या स्वतंत्र अभिव्यक्तीचा आतापर्यंत सराव नसलेल्या अशा हजारोंना या ॲप्सनी लिपसिंकद्वारे दुसऱ्यांची का असेना; पण प्रतिष्ठित अभिव्यक्ती मिळवून दिली.

या अभिव्यक्तीला असलेलं दृकश्राव्यतेचं परिमाण तर अधिकच महत्त्वाचं. लेखी अभिव्यक्तीसाठी लागणारं भाषिक- सांस्कृतिक भांडवल फारसे नसणाऱ्या लाखोंना करण्यासाठी अतिशय सोप्या अशा दृकश्राव्य सुविधा या ॲप्सनी पुरवल्या. इतकंच नव्हे तर आपल्या अभिव्यक्तीवर इतरांचा प्रतिसाद कसा येतो याचा उघड, तात्काळ आणि मोजता येण्यासारखा लेखाजोखाही त्यांच्यापुढे मांडला. आपलंच रूप, आपलीच वाटावी अशी अभिव्यक्ती, सोपी साधनं, लाखोंपर्यंत पोचण्याची क्षमता आणि प्रतिसाद-परिणाम मोजता येण्याची सुविधा असं सारं एकाच वेळी मिळत गेलं, तर आजपर्यंत या सर्वांना मुकलेले लाखो लोक त्याचा भला-बुरा वापर करणारच. आपल्या अभिव्यक्तीतून, त्याला मिळणाऱ्या प्रतिसादातून स्वतःला निरखत आणि जोखत जाणारच. स्वतःबद्दल थोडं चांगलं वाटून घेणार. व्यापक अर्थानं हे सारं किती खरं, चांगलं, हितकारक वगैरे प्रश्न त्यांना बहुतेकवेळा पडत नाहीत आणि पडले तरी त्यांची उत्तरं शोधण्याइतकं पुरेसं सांस्कृतिक संदर्भ वा भांडवल बहुतेकांकडे नाही. निदान सध्यातरी. त्यामुळे जे वाटतं, आवडतं, सुचतं, जमतं आणि मुख्य म्हणजे जे चालतं ते सांगणार याकडे बहुतेकांचा कल. या माध्यमांवरील अभिव्यक्तीतून होणारा आर्थिक फायदा मोजक्या मंडळींसाठी. बहुतेकांसाठी ती शक्यता अतिशय मर्यादितच; पण या अभिव्यक्तीतून होणारी स्व-प्रतिमा आणि सामाजिक ओळखच अनेकांना इथं आकर्षून घेते. विशेषतः ज्यांना प्रत्यक्ष आयुष्यात अशी ओळख नाही वा प्रतिमा नाही अशांसाठी तर ही ॲप्स फारच मोठा पर्याय आहे. युवा नाटककार सौरभ शामराज यानं लिहिलेली आणि रुचिता भुजबळ या गुणी अभिनेत्रीनं साकारलेली ‘हॅलो फ्रेंड्स’ ही एकपात्री एकांकिका अतिशय संवेदनशीलतेनं हा मुद्दा मांडते. ‘हॅलो फ्रेंडस् चाय पियोगे’ एवढंच म्हणणारे किंवा अगदीच घरगुती काही सांगू पाहणारे व्हिडिओ टाकणाऱ्या आणि तरीही समाजमाध्यमी भाषेत लोकप्रिय झालेल्या एका साध्या निम्नमध्यमवर्गीय विवाहितेचं जगणं आणि त्यातले आशा-निराशेचे खेळ ही एकांकिका अतिशय प्रभावीपणे मांडते. एका अर्थाने टिकटॉकीय अभिव्यक्तीमागील सामाजिकता समजून घेण्याचा हा मुद्दा आहे.

या सामाजिकतेचप्रमाणेच टिकटॉक आणि त्यासारख्या समाजमाध्यमांमागची मानसिकताही महत्त्वाची आहे. आपल्या अभिव्यक्तीतून लक्ष वेधून घेणं ही एका पातळीपर्यंत सामाजिक गरज असली, तरी त्याचं रूपांतर मानसिक व्यसनात होण्याची भीती नाकारता येत नाही. काहीतरी करून सतत सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याच्या या मानसिकतेला समाजमाध्यमं फार वेगानं व्यसनात रूपांतरीत करून शकतात. एकतर त्यांचा अल्गोरिदमच लोकांनी तिथं जास्तीत जास्त वेळ राहावं यासाठी लिहिलेला असतो. लाईकची संख्या, कितींना आपला व्हिडिओ पाहिला याची संख्या, आपल्या अनुयायांची संख्या अशा उत्तेजना देणाऱ्या अनेक गोष्टी या समाजमाध्यमांच्या अनुभवाचा एक अविभाज्य भाग असतो. या संख्यांमध्ये जसजशी वाढ होते, तसतशी त्यातली उत्तेजना वाढायला लागते; पण वाढत्या आनंदासाठी हळूहळू अधिक उत्तेजना लागते. त्यासाठी मग अधिक वेळ घालवणं, अधिक पोस्ट करणं हे चक्र सुरू होतं. अगदी दारूच्या व्यसनासारखं. समाजमाध्यमांच्या वापराचं असं व्यसन लागलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कुमारवयीन मुलं आणि तरुणांप्रमाणंच आता इतर वयोगटांमध्येही ते दिसू लागलं आहे. इतरांचं लक्ष वेधून घेण्याच्या व्यसनात आपलं कशातच लक्ष लागेनासं होणं, कशातच मन न रमणं हे प्रकारही वाढू लागले आहेत.

म्हणूनच टिकटॉकवरची बंदी ही फक्त एका ॲपवरील बंदी आहे. त्यामागची आर्थिक, सामाजिक, मानसिक आणि तांत्रिक मूल्यं आणि शक्ती जोपर्यंत आहेत तोपर्यंत अशा सोप्या, मनोरंजक, लक्षवेधी दृकश्राव्य अभिव्यक्तीची ‘चिंगारी’ अशीच भडकत राहणार... किंवा भडकवत राहणार!!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang vishram dhole write chinees tiktok app and chingari app article