जाणून घ्या तुमचा पुढचा आठवडा कसा असेल : साप्ताहिक राशिभविष्य

श्रीराम भट
Sunday, 11 October 2020


मित्रहो, सध्या मंगळ वक्री स्थितीत पृथ्वीजवळ आहे. त्यामुळंच रवी-मंगळाचा प्रतियोग सप्ताहात होत आहे, तोसुद्धा अधिकातील अमावास्येच्या सप्ताहात. माणसाची जगण्यासाठीची तडफड हा मनाचा भोग आहे. माणसाचं जगणं हे एका भावरूपाला यायला पाहिजे. असं हे भावयुक्त चित्त भक्तीचं रूप होत, जीवनाचा साक्षात्कार अनुभव असतं आणि हीच आपल्या जीवनाची घटस्थापना होय!

पुणे: आदि, मध्य आणि अंत या अवस्था किंवा ही अवस्थांतरं तात्त्विक विवेचनातून अध्यात्मशास्त्रात सतत उल्लेखलेली आपणास पाहायला किंवा ऐकायला मिळत असतात. एक मात्र खरं, की आपण जग म्हणणारी एक जाणीव जगामध्ये जागवली जात असते. अर्थातच, हे जाणिवेचं चैतन्य वरील तीन अवस्थांना जाणवून घेत जगत असतं. म्हणूनच म्हणतात ना, मरणातसुद्धा जग जगतं!

किती गंमत आहे बघा ना, वरील कोणत्याही अवस्थेला न चिकटता ही अवस्थांतरं पाहणारं हे चैतन्य स्वतःला आत्मचैतन्य म्हणवत एक साक्षित्वाचा अखंड नंदादीप तेवत ठेवत असतं. थोडक्यात काय, या आदि, मध्य आणि अंत या अवस्थांतरांतील मध्यंतर अनुभवणारं आत्मचैतन्य आपल्या साक्षात्कार नावाच्या मित्रांबरोबर या त्रयींना विसरून अमृतासमान अर्थातच अमृततुल्य असं रसपान करत असतं.

मंगळ ही पृथ्वीतत्त्वाची जाणीव आहे आणि त्यामुळंच तो पृथ्वीचा सहोदर आहे. भूमीला घट्ट पकडून ठेवणारा तो भौम होय. चंद्राच्या (आईच्या) गर्भात मनाच्या जाणिवेचा जन्म होतो आणि ही मनाची जाणीव पृथ्वीचा आधार घेत जगात जगण्यासाठी व आपल्याला जगवण्यासाठी सध्याच्या संगणकीय जगात अलार्म लावत असते.

ज्योतिष हे जगतं जरूर, त्यामुळंच जगात जगणारं ज्योतिष हे मनाचं मानसशास्त्र जाणतं. म्हणूनच जग जगणाऱ्या जाणिवेचा अभ्यास म्हणजे ज्योतिष! जाणणं हा मनाचा गुणधर्म आहे, त्यामुळंच ज्योतिष हा जाणून घेण्याचा विषय आहे. मन - चित्त - चैतन्य असा जाणिवेचा प्रवास आहे. मनाचं चैतन्यस्वरूपच चित्त होय! मन जग जगतं किंवा जगाचा भोग घेतं, तर चित्त जीवनाचा साक्षात्कार अनुभवत समर्पित होत असतं.

मित्रहो, सध्या मंगळ वक्री स्थितीत पृथ्वीजवळ आहे. त्यामुळंच रवी-मंगळाचा प्रतियोग सप्ताहात होत आहे, तोसुद्धा अधिकातील अमावास्येच्या सप्ताहात. माणसाची जगण्यासाठीची तडफड हा मनाचा भोग आहे. माणसाचं जगणं हे एका भावरूपाला यायला पाहिजे. असं हे भावयुक्त चित्त भक्तीचं रूप होत, जीवनाचा साक्षात्कार अनुभव असतं आणि हीच आपल्या जीवनाची घटस्थापना होय!

स्पर्धेत यश मिळणार

मेष : कृत्तिका नक्षत्रास रवी-मंगळ योगाची धग पोचू शकते. भरणी नक्षत्रास सप्ताहात शुभ ग्रहांची उत्तम कनेक्‍टिव्हिटी. ता. १३ व ता. १४ हे दिवस अतिशय सुसंगत आणि प्रवाही. अश्‍विनी नक्षत्रास स्पर्धात्मक यश. मात्र अमावास्येजवळ नोकरीत संशयास्पद वातावरणातून त्रास.

अपवादात्मक लाभ

वृषभ : सप्ताहाची सुरुवात वैयक्तिक सुवार्ता देणारी. कलाकारांना प्रसिद्धी. ता. १४ चा दिवस मोठा शुभलक्षणी. विशिष्ट करारमदार. व्यावसायिक अपवादात्मक लाभ. रोहिणी नक्षत्रास जुन्या येण्यातून लाभ. अमावास्या मृग नक्षत्रास घरात अशांततेची.

ओळखी फलद्रूप होतील

मिथुन : आर्द्रा नक्षत्रास सप्ताहात अपवादात्मक परिस्थितीतून लाभ. ओळखी - मध्यस्थी फलद्रूप होतील. बाकी पुनर्वसू नक्षत्रास अमावास्येचं फिल्ड मानवी उपद्रवातून हैराण करणारं. विचित्र माणसांचा सहवास. नोकरीत बदलीची वावटळ. मृग नक्षत्रास भ्रातृचिंता.

धारदार वस्तूंपासून जपा

कर्क : ता. १३ व ता. १४ हे दिवस एकूणच आपल्या राशीस प्रसन्न ठेवतील. पुष्य नक्षत्राच्या व्यावसायिक उठाठेवी यशस्वी होतील. आश्‍लेषा नक्षत्रास अमावास्येचा एक व्हायरस राहील. गर्दीची ठिकाणं टाळा. तरुणांनो, थट्टा-मस्करी टाळा. स्त्रीवर्गाचा अपमान करू नका. धारदार वस्तूंपासून जपा.

नोकरीत भाग्योदय

सिंह : सप्ताहातील राश्‍याधिपतीशी होणारे योग पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात विचित्र अंमल करू शकतात. चोरी-नुकसानी सांभाळा. उत्तरा व्यक्तींनी आपली सुरक्षा व्यवस्था बळकट ठेवावी. बाकी ता. १४ व ता. १५ हे दिवस पूर्वा नक्षत्रास सर्व प्रकारांतून मोकळी वाट देतील. नोकरीत भाग्योदय.

मोठ्या सुवार्तांची शक्यता

कन्या : अमावास्येकडं वाटचाल करणारा सप्ताह ग्रहांच्या प्रतियोगातून ताणतणावांचा. वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर काळजी घ्या. चित्रा नक्षत्रव्यक्ती अमावास्येजवळ लक्ष्य होऊ शकतात. हस्त नक्षत्रास ता. १४ चा बुधवार सूर्योदयी मोठ्या सुवार्तेचा. उत्तरा नक्षत्रास धनलाभ.

आर्थिक व्यवहार जपून

तूळ : सप्ताहात व्यावसायिक आर्थिक व्यवहार जपून करा. विशाखा नक्षत्रास अमावास्या कायदेशीर प्रश्‍नातून त्रासदायक. बाकी स्वाती नक्षत्रास ता. १३ व ता. १४ हे दिवस आत्यंतिक शुभलक्षणी. सहवासातील व्यक्तींचेही भाग्योदय. चित्रा नक्षत्रास अमावास्या स्त्रीचिंतेची.

वैभवसंपन्नतेकडं वाटचाल

वृश्‍चिक : सप्ताह अतिशय मजेदार फळं देईल. कुयोगांच्या पार्श्‍वभूमीवर शुभ ग्रहांची लॉबी ऍक्‍टिव्ह राहीलच. अनुराधा नक्षत्रव्यक्ती लाभ उठवतीलच, शिवाय ज्येष्ठा नक्षत्रव्यक्ती वैभवसंपन्नतेकडं वाटचाल करतील. मात्र, अमावास्येजवळ मातृपितृ चिंता शक्‍य. भागीदारीचे प्रश्‍न सतावतील.

गुरू-शुक्राची साथ

धनू : सप्ताहात रवी-मंगळ प्रतियोगातून वक्री मंगळाची धग राहीलच. नोकरी-व्यवसायात मानवी उपद्रव होऊ शकतो. पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा व्यक्तींनी अमावास्येचं व्हायरस सांभाळावं. बाकी गुरू-शुक्राची मंत्रालयं ता. १३ व ता. १४ ऑक्‍टोबर २०२० या दिवसांत आपणास चांगलीच सहकार्य करतील.

कायद्याचं पालन गरजेचं

मकर : रवी-मंगळाचा प्रतियोग फिल्ड ताब्यात घेईल. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट ग्रहांच्या सीमांवर गडबडीचा. सरकारी कायदेकानू पाळाच. श्रवण नक्षत्रास ता. १५ चा गुरुवार शुभलक्षणी. धनिष्ठाच्या तरुणांचा परदेशी भाग्योदय.

पती-पत्नीचा भाग्योदय

कुंभ : रवी-मंगळ प्रतियोगाचं फिल्ड अमावास्येजवळ पूर्वाभाद्रपदा नक्षत्रास काही झळा पोचवू शकतं. सप्ताहातील तिन्हीसांजा जपाच. शततारका नक्षत्रास ता. १३ व ता. १४ हे दिवस भरभरून देणारे. पती-पत्नीचा मोठा भाग्योदय होईल. धनिष्ठास अमावास्या चोरीची.

मुलांची प्रगती होईल

मीन : ता. १६ च्या अमावास्येच्या क्षेत्रात रेवती नक्षत्रव्यक्ती टार्गेट होऊ शकते. घरात वादाची पार्श्‍वभूमी राहील. बाकी गुरुभ्रमणाची स्थिती ता. १४ व ता. १५ या दिवसांत नोकरदारांचं भाग्य उदयास आणेल. उत्तराभाद्रपदास सप्ताहात पुत्रोत्कर्ष. काहींना पुत्रयोग.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang weekly horoscope and panchang