स्वागत नव्या पुस्तकांचं

प्रतिनिधी
Sunday, 13 September 2020

मांटुगा रेल्वे स्टेशनवर एक मृतदेह सापडतो आणि मग तो खून आहे की आणखी कसला प्रकार आहे याचा तपास सुरू होतो. पोलिस निरीक्षक झेंडे आणि एकेकाळी पत्रकारितेत असलेले पीटर डिसूझा यांच्या माध्यमातून हा तपास होत असताना अनेक गोष्टी उलगडत जातात.

मर्डर इन माहीम
मांटुगा रेल्वे स्टेशनवर एक मृतदेह सापडतो आणि मग तो खून आहे की आणखी कसला प्रकार आहे याचा तपास सुरू होतो. पोलिस निरीक्षक झेंडे आणि एकेकाळी पत्रकारितेत असलेले पीटर डिसूझा यांच्या माध्यमातून हा तपास होत असताना अनेक गोष्टी उलगडत जातात. मुंबईसारख्या मायानगरीत अनेक बाबी घडत असतात, त्यातच गे व्यक्तींचं एक जगही असतं. त्या जगाचे या घटनेशी काय संबंध असतात, त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न झेंडे आणि पीटर करतात. जेरी पिंटो यांनी मूळ इंग्लिशमध्ये लिहिलेल्या या रहस्यमय कादंबरीचा मराठी अनुवाद प्रणव सखदेव यांनी केलाय. प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे (०२०- २४४८०६८६) पृष्ठं : २२०, मूल्य : २५० रुपये

गोतावळा
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ललितलेखांच्या या पुस्तकात सामान्य माणसांबद्दलचे अनुभव त्यांनी मांडलेले आहेत. दिब्रिटो यांनी प्रवासात, तसंच परदेशात गेल्यावर तिथं भेटलेल्या माणसांबद्दल लिहिलंय. परिस्थितीच्या रेट्यामुळं माणसाचे किती हाल होतात, तरीही काहीजण आपलं तत्त्व न सोडता आयुष्य कसं काढतात, याबद्दल दिब्रिटो यांनी ममत्वानं लिहिलं आहे. यातले लेख छोटे; पण आशयसंपन्न असे आहेत. प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन, नवघर, वसई (०२५०- २३३५२०३)
पृष्ठं : १७६, मूल्य : २०० रुपये

पुण्यनगरीतील वाडे व वास्तू
पुण्याला मोठा इतिहास आणि वैभवशाली परंपरा. त्याची साक्ष म्हणजे इथले वाडे आणि काही महत्त्वाचे रस्ते, तसंच काही मंदिरं. डॉ. एच. वाय. कुलकर्णी यांनी पुण्यातील या वाड्यांचा आणि काही महत्त्वाच्या जागांचा शोध घेऊन, त्याची जास्तीत जास्त माहिती दिली आहे. काळाच्या ओघात काही वाडे पडले, त्या जागी आता उभारण्यात आलेल्या इमारतींचा उल्लेख करून, कुलकर्णी यांनी या वास्तूंची चांगली माहिती दिली आहे. काही वाड्यात राहिलेल्या महत्त्वाच्या व्यक्ती, त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटनांचाही उल्लेख केल्यानं पुस्तक रंजक झालं आहे.
प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन, पुणे (०२०- २५५३७९५८, २५५३२४७९)
पृष्ठं : १७६, मूल्य : २०० रुपये.

महावस्त्र
अभिजित, गौतम हे दोन मित्र, त्यांच्या सहचारिणी रसिका, वैशाली आणि मग या सगळ्यांच्या संबंधांतले लोक. अभिजित, गौतम आणि हे शाळेतले मित्र, विनीतही त्यांच्याबरोबर असतो. पुढं प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या होतात; पण काही कारणानं हे सगळे पुन्हा एकत्र भेटतात. काही घटनांमुळं रसिकाच्या आयुष्यात वेगळं पर्व सुरू होतं. सामाजिक चळवळी आणि गावागावांतलं राजकारण याचे संदर्भही कथानकात चपखलपणानं येतात. प्रत्येकाची एक स्वतःची म्हणून स्पेस असते, ही स्पेस आणि सभोवतालचं जग याच्यात संघर्ष असतोच. हे सारं कथानक म्हणजे महावस्त्र. रेखा बैजल यांनी नातेसंबंध आणि त्यातला गुंता इथं नेमकेपणानं मांडलाय. प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, पुणे (०२०- २४४९५३१४, २४४८३९९५) पृष्ठं : १९८, मूल्य : २८० रुपये

ड्रिव्हन - कथा विराट कोहलीची
क्रीडा पत्रकार विजय लोकापल्ली यांनी प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली याच्या आयुष्यातल्या विविध घडामोडींचा वेध घेत त्याचं चरित्र लिहिलं आहे. विराट कोहलीनं अनेक अडथळे पार करत यश कसं मिळवलं, ते यातून कळतं. खेळासाठी विराट घेत असलेले कष्ट, तसंच त्याचं समाजकार्य याचीही माहिती यातून समजते. वडिलांच्या निधनानंतर लगेच मैदानावर आलेल्या विराटनं आपलं दुःख विसरून कसा खेळ केला ते कळतं आणि खेळावर त्याची किती निष्ठा आहे याची जाणीव होते. माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांची प्रस्तावना आहे. पत्रकार मुकुंद पोतदार यांनी मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद केलाय. प्रकाशक : ब्लूम्सबरी पब्लिशिंग, नवी दिल्ली
पृष्ठं : २५६, मूल्य ३५० रुपये

नर्मदायन
उदय नागनाथ यांनी नर्मदा परिक्रमा केल्यावर त्याचं अनुभव इथं मांडले आहेत. नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांची संख्या आता खूपच वाढली आहे. १५ -२० वर्षापूर्वी ही परिक्रमा करणाऱ्यांची संख्या कमी होती. मात्र आता अनेकजण या यात्रेला जातात आणि आल्यावर त्याबद्दल लेखनही करतात. उदय नागनाथ यांना लहानपणापासून या यात्रेबद्दल कुतूहल होते. तरुणपणी त्यांनी नियोजन करून ही यात्रा केली. त्यानंतर यात्रेतल्या अनुभवाबद्दल चिंतन करून हे अनुभव लिहिले आहेत. यात चमत्काराला किंवा दंतकथांना त्यांनी स्थान दिलेलं नाही. प्रवासात पाहिलेल्या ठिकाणांच्या जनजीवनाबद्दलही त्यांनी लिहिलं आहे. त्याचबरोबर काहीवेळा परिक्रमावासी चुकीचं वर्तन कसं करतात याबद्दलही परखड मत व्यक्त केलंय. प्रकाशक मायमिरर पब्लिकेशन, पुणे (०२०-२४२२६४३२, ९४२२३१६६८९) पृष्ठं :२४० मूल्य : १९५ रुपये.

दंभस्फोट
हिंदू महासभेचे विदर्भातले नेते डॉ. ना. भा. खरे यांचं हे आत्मचरित्र. स्वातंत्र्यसंग्रामातल्या अनेक मोठ्या नेत्यांशी त्यांचा संबंध आला होता. त्याबद्दल त्यांनी यात लिहिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलचे अनुभवही त्यांनी कथन केले आहेत. ‘माय पॉलिटिकल मेमॉयर्स’ या मूळ इंग्लिशमधील पुस्तकाचा डॉ. श्री. प्र. कुलकर्णी यांनी अनुवाद केलाय. १९९५ मध्ये याची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली होती, आता २५ वर्षानंतर दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. प्रकाशक : विजय प्रकाशन, नागपूर (०७१२- २५३०५३९, ६६०४०५०) पृष्ठं : २५४ मूल्य : ४०० रुपये.

दैनंदिन व्यवहारासाठी अर्थशास्त्र
अर्थशास्त्र हा विषय तसा गंभीर आणि अवघडही. मात्र देशातील प्रत्येक नागरिकाशी त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध येत असतोच. अर्थशास्त्रातील घडामोडींचे परिणाम समाजावर आणि व्यक्तिगत जीवनावर होतच असतात. मात्र कशामुळं काय होतं हे सामान्य माणसाला पटकन कळत नाही. त्यासाठी अनेक छोटी उदाहरणं देत व्ही शांताकुमार यांनी दैनंदिन जीवनात अर्थशास्त्र कसं परिणाम करतं हे समजावून दिलंय. मंजूषा मूसमाडे यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद केलाय. प्रकाशक : सेज पब्लिकेशन, नवी दिल्ली, पृष्ठं : २७० मूल्य ६९५ रुपये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang welcome new book