यशस्वी व्हा! (यशवंत थोरात)

yashwant thorat
yashwant thorat

स्वप्नं मोठीच असली पाहिजेत असं नाही. ती ‘तुमची’ असणं महत्त्वाचं आहे! तुम्ही बाळगलेलं स्वप्न हे जर खरोखरच तुमचं स्वतःचं स्वप्न असेल तर ते कधी ना कधी साकारण्यात तुम्ही यशस्वी व्हालच. एखादा दगड जसा पाण्यात टाकल्याबरोबर तळाशी जातो तसे तुम्ही तुमच्या उद्दिष्टापर्यंत अगदी सहजपणे पोचाल...

प्रत्येक वेळी शहाणपण हे मिळवल्यानंच प्राप्त होतं असं नाही, तर
कधी कधी ते तुमच्यावर ‘लादलं’ही जातं! तुमच्या केसांमध्ये जेव्हा रुपेरी छटा आढळायला लागतात किंवा तुम्हाला टक्कल पडायला लागतं तेव्हा हे शहाणपण तुमच्याकडे आपसूक येतं. म्हणजे ‘ते तुमच्याकडे आहेच’ असं मानलं जातं. जर तुम्हाला भलीमोठी पांढरी दाढी असेल आणि तुमचा पोषाख एखाद्या विभूतीसारखा असेल तर तुम्ही आपोआपच अशा वर्गात जाऊन बसता. एकदा असं स्थान मिळालं की काहीही होऊ शकतं. तुम्ही जर सरकारच्या सार्वजनिक स्वच्छता खात्यातून निवृत्त झाला असलात तरी ‘भारतापुढची भूराजकीय आव्हानं’ अशा विषयावरचं तुमचं व्याख्यानही लोक मोठ्या आदरानं ऐकतील किंवा तुम्ही ‘नाबार्ड’सारख्या एखाद्या संस्थेचे अध्यक्ष असलात तरी ‘आयुष्यात यश कसं मिळवायचं?’ अशा एखाद्या विषयावर तुमचं भाषण ठेवलं जातं, तसं भाषण देण्यास तुम्ही पात्र असलात किंवा नसलात तरी. त्या वेळीही हे असंच घडलं. पोलिस खात्यातले एक अधिकारी आणि त्यांची पत्नी मला भेटायला आली होती. त्या अधिकाऱ्यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. त्यांना आता पत्नीच्या मदतीनं स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करून घेणारा एक क्लास सुरू करायचा होता. त्यांच्या डोळ्यांमधली स्वप्नं एवढंच त्यांचं भांडवल होतं. त्या स्वप्नांमुळेच त्यांनी शहरातल्या एका तालमीच्या जागेत आपला क्लास सुरू केला होता. त्यांच्या मते मी शहरातला एक यशस्वी माणूस होतो, त्यामुळे मी त्यांच्या क्लासचं उद्घाटन करावं असं त्यांना वाटत होतं. आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते करत असलेल्या धडपडीचं मला कौतुक वाटलं; पण तारखा जमत नसल्यानं मी त्यांचं निमंत्रण स्वीकारू शकलो नाही. त्यांची क्षमा मागत मी त्यांना शुभेच्छा दिल्या. हा विषय तिथंच संपला.

काही दिवसांपूर्वी ते पुन्हा माझ्याकडे आले. ‘आता आमच्या क्लासला एक वर्षं पूर्ण होतंय, त्यामुळे पहिल्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून या’ अशी विनंती करायला ते आले होते. मी थोडीशी तयारी दर्शवली; पण पुन्हा तारखा जुळत नसल्यानं माझा नाइलाज झाला. माझ्या नकारानं ते निराश झाले. त्यांचं हिरमुसण्यानं मलाही वाईट वाटलं. मी त्यांना म्हणालो : ‘‘मी कार्यक्रमाला येऊ शकणार नाही; पण मी उद्या तुमच्याकडे येतो. त्या वेळी विद्यार्थ्यांशी मी अनौपचारिक गप्पा मारीन.’’ मला वाटलं होतं की मी तिथं जाईन, चहा घेईन आणि दहा–पंधरा मिनिटांत तिथून निघू शकेन. माझा अंदाज चुकला. कारण, माझी ओळख करून देताना त्यांनी विद्यार्थ्यांना सांगूनच टाकलं की ‘आपण जीवनात यशस्वी कसं झालो याचं रहस्य डॉ. थोरात तुम्हाला सांगणार आहेत.’ त्यांच्या या वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मला पर्यायच उरला नाही. आयुष्यात मी यशस्वी झालोय असं त्यांना का वाटलं असावं असा विचार करतच मी बोलण्यासाठी उभा राहिलो. माझा प्रवास एखाद्या सर्वसाधारण सरकारी कर्मचाऱ्यासारखा होता. मी योग्य अशा संस्थेत योग्य वोळी आणि योग्य अधिकाऱ्याच्या हाताखाली काम सुरू केलं आणि म्हणूनच चेअरमनपदापर्यंत पोचलो. माझ्या मते, बुद्धिमत्ता किंवा अन्य एखाद्या विशेष गुणाचा त्याच्याशी फारसा संबंध नव्हता.

तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेले समोरचे ते विद्यार्थी हातात वही-पेन घेऊन माझ्याकडे उत्सुकतेनं बघत होते. जणू काही बुद्धिमत्तेचे माणिक-मोती त्यांच्यावर उधळले जाणार होते! मी तिथं जाण्याऐवजी घरीच थांबलो असतो तर बरं झालं असतं असं मला वाटून गेलं. काहीतरी बोलायचं म्हणून मी सुरुवात केली. मी मुलांना विचारलं : ‘‘भविष्यात तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात हवीशी वाटते?’’
एकाच वेळी अनेक हात वर झाले. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळी क्षेत्रं सांगितली; पण सगळ्यांच्या सांगण्यात एकच सूर होता आणि तो म्हणजे त्यांना आयुष्यात यशस्वी व्हायचं होतं. स्वतःच्या यशस्वितेबद्दल साशंक असणारा माझ्यासारखा माणूस आपल्याला यशाची गुरुकिल्ली देईल असा त्यांचा भाबडा विश्वास होता. खरी गोष्ट म्हणजे, आयुष्यात प्रत्येक वेळी वेगवेगळ्या चुकांमधून मी कसा शिकत गेलो याव्यतिरिक्त सांगण्यासारखं माझ्याकडे दुसरं काही नव्हतं.
‘‘म्हणजे तुम्हा सर्वांना आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे तर...’’ मी बोलायला सुरुवात केली आणि ‘‘पण यश म्हणजे नेमकं काय हे कुणी मला सांगेल काय?’’ मी विचारलं.
माझ्या प्रश्र्नावर क्षणभर शांतता पसरली. गंभीर चेहऱ्याची एक मुलगी म्हणाली : ‘‘यश म्हणजे नाव, कीर्ती आणि पैसा कमावणं.’’
मला त्यातून बोलण्याचा धागा सापडला.
‘‘यशाची सर्वसाधारण कल्पना ही अशीच आहे,’’ मी म्हणालो.
दहा बाय दहाच्या खोलीत राहून एखादा माणूस कोट्यधीश झाला वगैरे स्वरूपाच्या गोष्टी ऐकायला सर्वांनाच आवडतात. यावर सर्वांनीच संमतीदर्शक मान डोलावली. शब्दांची काळजीपूर्वक निवड करत मी म्हणालो : ‘‘पण १३० कोटी लोकसंख्येच्या देशात हे असं प्रत्येकाच्या बाबतीत अशक्य आहे.’’
मुलांचे चेहरे पडले.
माझा आवेशही थोडा कमी झाला. खालच्या आवाजात मी म्हणालो : ‘‘मात्र, कीर्ती आणि नशीब ही फक्त काही थोड्या लोकांची मक्तेदारी असावी आणि तुमच्या-माझ्यासारख्या लोकांनी फक्त त्यांच्या यशोगाथा ऐकाव्यात; पण स्वतः कधीच यशस्वी बनू नये
असा याचा अर्थ नाही.’’
मुलांच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह तसंच होतं.
‘‘आपण यशस्वी होणार नाही असं नाही,’’ मी म्हणालो : ‘‘आपल्यापैकी प्रत्येकाकडे यशस्वी होण्याची शक्ती आणि क्षमता आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं यशस्वी होऊ शकतो याबाबत मला शंका नाही.’’
‘‘तुम्ही केवळ आमचं समाधान व्हावं यासाठी हे सांगत आहात का?’’ समोर बसलेल्यांपैकी कुणीतरी विचारलं.
‘‘नाही, तसं नाही,’’ मी म्हणालो : ‘‘तुम्ही सगळेजण तुमच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकता. मात्र, तुम्ही यश कशाला मानता, कोणता व्यवसाय निवडता आणि यशापयशाला कसं सामोरं जाता यावर ते अवलंबून आहे.’’
‘‘तुम्ही बाहेरच्या नोटीस बोर्डावर लावलेला माझा परिचय वाचलाय का?’’ मी विचारलं.
मुलांनी होकारार्थी मान हलवली.
‘‘मी आयुष्यात यशस्वी झालोय असं तुम्हाला वाटतंय का?’’ मी पुन्हा विचारलं.
सगळ्यांनी पुन्हा होकारार्थी मान हलवली.

‘‘मग मला तुम्हाला सांगायला पाहिजे की माझ्या आयुष्याची सुरुवात अपयशातून झालीय. माझ्या आईला वाटत होतं की मी डॉक्टर व्हावं; पण मला तत्त्वज्ञानात रस होता. सुरुवातीला माझ्या आईचा विजय झाला. कारण, मला माझ्या इच्छेविरुद्ध विज्ञान शाखेत घालण्यात आलं; पण नंतर मी विजयी झालो. कारण, वर्षाच्या शेवटी मी यशस्वीपणे नापास झालो! नंतर मला माझ्या आवडीप्रमाणे राज्यशास्त्र, इतिहास आणि तत्त्वज्ञान हे विषय घेऊन कला शाखेत जाण्याची परवानगी देण्यात आली, तेव्हा मी विद्यापीठात पहिला आलो. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येकाला नेहमीच हवं ते मिळत नाही. तुम्हाला हवा तो अभ्यासक्रम घेता आला किंवा हवी ती नोकरी मिळाली तर तुम्ही नक्कीच भाग्यवान आहात; पण नेहमीच तुम्हाला तुमच्या पसंतीच्या गोष्टी मिळतील असं नाही. आयुष्य हा एक पत्त्यांचा डाव आहे. तुमच्या हातात कोणते पत्ते येतील ते नशिबावर ठरतं. ते तुम्ही ठरवू शकत नाही. येतील ते पत्ते घेऊन डाव खेळणं एवढंच तुमच्या हातात असतं.’’
‘तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जे जन्माला येतात त्यांनी असा उपदेश करणं सोपं आहे,’ एक मुलगी पुटपुटली.
‘‘माझ्याबद्दल तू हे म्हणत असशील तर बेटा, तुझं म्हणणं चुकीचं आहे,’’ मी समजावणीच्या स्वरात म्हणालो : ‘‘मी स्पर्धात्मक परीक्षा देऊन रिझर्व्ह बँकेत नोकरीला लागलो हे खरं आहे; पण नोकरी सुरू झाल्यावर लवकरच माझ्या लक्षात आलं, की जमाखर्च हा काही माझा प्रांत नव्हे. मी लोकांमध्ये रमणारा माणूस आहे. माझा स्वभाव आणि प्रकृती वेगळी आहे आणि नीरस फायलींमधल्या नीरस गोष्टींवर नीरस शेरे मारण्यात मला रस नव्हता. मला काहीतरी वेगळं करायचं होतं, तरीपण मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित केलं आणि माझ्याकडून सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. मी तसं केलं नसतं तर आज तुमच्यासमोर भाषण द्यायला उभा राहिलो नसतो.’’
तिच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं.
‘‘पण योग्य निवड करण्यावरच यश अवलंबून असतं का?’’ मागं बसलेल्यांपैकी कुणीतरी विचारलं.

‘‘काही बाबतीत ते खरं आहे,’’ मी म्हणालो: ‘‘पण तुम्ही यशाची व्याख्या काय करता यावरही ते अवलंबून आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्याबरोबर दोन वर्षं काम करण्याची संधी मला मिळाली होती. त्या वेळी मी रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक मंडळाचा संचालकही होतो. ते रिझर्व्ह बँकेच्या स्थानिक संचालक मंडळाचे अध्यक्ष होते. एकदा त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर सहज गप्पा मारताना मी त्यांना ‘तुमचं सर्वात मोठं यश कोणतं?’ असं विचारलं. ते क्षेपणास्त्र वगैरे काही सांगतील असं मला वाटलं होतं; पण माझा अंदाज साफ चुकला. ते म्हणाले, ‘हृदयावरील शस्त्रक्रियेच्या वेळी वापरले जाणारे स्टेन्ट्स आपण परदेशातून मागवत असल्यानं फारच महाग असतात हे काही वर्षांपूर्वी माझ्या लक्षात आलं. ते माझ्या मनाला फारच लागलं. शेवटी मी दीर्घ रजा घेतली. बराच अभ्यास केला आणि देशात तयार होऊ शकतील असे स्वस्त किमतीचे स्टेन्ट्स बनवले. ते परीक्षणासाठी आणि वितरणासाठी मी पाठवून दिले आणि पुन्हा कामावर रुजू झालो. नंतर एकदा एका विमानतळावर वाट पाहत असताना एक महिला मला भेटली. साध्या वेशातली ती महिला मला म्हणाली, ‘कलामजी, आप मेरे दिल में हमेशा रहेंगे.’ मी उडालोच! पण, ‘तुम्ही बनवलेले कमी किमतीचे स्टेन्ट्स माझ्या हृदयात बसवले आहेत’ असं जेव्हा ती महिला पुढं म्हणाली तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला.’ कलाम मला म्हणाले, ‘थोरात, मी आयुष्यात केलेल्या सगळ्या कामांमधलं हेच काम मला सर्वात मोठं वाटतं. कारण, ते लोकांचे प्राण वाचवणारं काम आहे, लोकांना मारणारं नव्हे.’ ’’

चमकदार डोळ्यांच्या त्या मुलीनं पुन्हा विचारलं :
‘‘मला देशाचं पंतप्रधान बनायचं आहे; पण मला ते शक्य होईल का?’’
‘‘कदाचित होईल किंवा कदाचित होणारही नाही; पण तुम्ही किती मोठं स्वप्न बघता हे महत्त्वाचं नाही. यशस्वी ठरण्यासाठी आपल्याला देशाचा आदर्श वगैरे बनलं पाहिजे असंही काही नाही. आपण आपल्या कुटुंबाचे, सहकाऱ्यांचे किंवा आपल्या गल्लीचे किंवा आपण राहतो त्या वस्तीचे आदर्श बनलो तरी त्या यशाचं समाधान, एखादा दरिद्री माणूस लक्षाधीश बनण्याच्या तोडीचं असतं...स्वप्नं मोठी असलीच पाहिजेत असं नाही. ती ‘तुमची’ असणं आवश्यक आहे! जर खरोखरच ते तुमचं स्वप्न असेल तर एखादा दगड पाण्यात टाकल्याबरोबर तो जसा तळाशी जातो तसं तुम्ही सहजपणे तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचाल; पण जर ते तुमचं स्वप्न नसेल आणि अन्य कुणाचं तरी स्वप्न असेल तर मात्र तुम्ही लाकडाच्या तुकड्याप्रमाणे आयुष्यभर वर वर तरंगत राहाल.’’
‘‘हे इतकं सोपं आहे? तुम्ही आम्हाला ते अधिकच सोपं करून सांगत नाही आहात ना?’’कुणीतरी विचारलं.
‘‘तसं नाही. मुद्दा हा आहे की आपल्याला काय पाहिजे हेच आपल्यापैकी अनेकांना कळत नाही. अनेक वेळा वेगवेगळ्या अनेक गोष्टी आपल्याला आकर्षित करत असतात. तुम्हाला बऱ्यापैकी यश हवं असतं, सामाजिक प्रतिष्ठा हवी असते. चांगलं घर हवं असतं. देखणा नवरा किंवा सुंदर पत्नी हवी असते. एक चांगलं घर हवं असतं. बहुतांश लोकांच्या अपेक्षा याच असतात. अनेकांच्या त्या अपेक्षा पूर्ण होतात आणि ते सर्वसाधारणपणे सुखाचं जीवन जगतात. कारण, तीच त्यांची सुखाची व्याख्या असते; पण तुम्हाला मोठं यश हवं असेल तर तुम्हाला कुठलं तरी एकच मोठं ध्येय ठरवावं लागेल आणि अन्य गोष्टी त्यापुढे गौण मानाव्या लागतील.’’
‘‘जर आम्ही तुमचा सल्ला ऐकला आणि योग्य दिशा व योग्य उद्दिष्ट ठरवलं तर यशाची खात्री देता येईल?’’ एका फॅशनेबल मुलीनं विचारलं.
‘‘आयुष्यानं मला शिकवलं की प्रयत्न आणि नशीब यांच्यात एक नातं आहे. तुम्ही जेवढे जास्त प्रयत्न कराल तेवढी यशाची संधी तुम्हाला अधिक मिळते. त्याला तुम्ही नशीब म्हणणार असाल तर खुशाल म्हणा,’’ मी म्हणालो.
‘‘मला एक शंका आहे,’’ एक मुलगी म्हणाली : ‘‘प्रयत्न आणि तुम्हाला मिळणारी संधी यांत एक नातं आहे हे जरी मान्य केलं तरी यशाची शक्यता वाढावी यासाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न करणं आवश्यक आहे?’’

हा थोडा कठीण प्रश्न होता.
‘‘तुला एक उदाहरण देऊनच मी हे स्पष्ट करतो,’’ मी म्हणालो : ‘‘आमच्याकडे मंगेश नावाचा बागकाम करणारा एक मुलगा होता. तो आमच्या बागेप्रमाणे इतर काहीजणांच्या बागेचंही काम करत असे; पण त्याच्या कामाची एक विशिष्ट पद्धत होती. आपली प्रत्येक बाग सर्वात सुंदरच दिसली पाहिजे असा त्याचा कटाक्ष असे. इतरांच्या दृष्टीनं त्याचं काम क्षुल्लक असलं तरी त्याच्या दृष्टीनं ते अमूल्य होतं. मला असं म्हणायचंय, की जर एखाद्या छोट्या गोष्टीसाठीसुद्धा तुम्ही जर सर्वस्व पणाला लावत असाल तर मग ते यश तुमच्यासाठी फार मोठं असतं; मग ती गोष्ट कितीही सामान्य असो. चांगली आई बनणं, चांगला पती, चांगला कर्मचारी, चांगला आयएएस अधिकारी, चांगला प्राध्यापक किंवा चांगला मदतनीस असं काहीही बनण्यासाठी केलेले प्रयत्न तितकेच समाधान देतात. ते समाधान तुम्ही तुमचे सहकारी, विद्यार्थी, तुमचे वरिष्ठ अधिकारी किंवा तुमच्या संपर्कात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या डोळ्यांत पाहू शकता.’’

बराच वेळ शांत बसलेला एक मुलगा एकदम म्हणाला : ‘‘माझे वडील आता नाहीत. ते अतिशय प्रामाणिक होते. त्यांनी आयुष्यात प्रामाणिकपणे खूप कष्ट केले; पण तरीही त्यांना शेवटी अपयशच पत्करावं लागलं. म्हणजे बहुतेक वेळा प्रामाणिक प्रयत्नांचं वा कष्टाचं फळ अपयशच असतं हे तुम्हाला मान्य आहे का?’’
‘‘मला मान्य आहे; पण काही बाबींपुरतंच. सन २००० मध्ये मला कार्यकारी संचालकपदी बढती देण्याबाबत विचार सुरू होता. त्या वेळी मी रिझर्व्ह बॅंकेच्या दिल्लीच्या कार्यालयात प्रादेशिक संचालक होतो. आमच्या डेप्युटी गव्हर्नरांनी एकदा माझ्या कार्यालयाला भेट दिली, तपासणी केली. स्टाफसमोर बोलताना माझ्या कामाचं कौतुकही केलं. मला प्रमोशन मिळणार असं सगळ्यांना खात्रीनं वाटत होतं; पण नेमकं उलटं घडलं. काही महिन्यांनी त्याच डेप्युटी गव्हर्नरांनी मला कॅश विभागाच्या एका कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यास सांगितलं. माझ्या मते ती कारवाई नैसर्गिक न्यायाला धरून नव्हती. मी माझं तसं स्पष्ट मत मांडलं; पण तो माझ्या मनाचा कमकुवतपणाच नव्हे तर आदेशाचा भंगही मानला गेला. धाडसी निर्णय घेण्यास मी अपात्र ठरवला गेलो आणि माझी बदली मुंबईला मुख्यालयात केली गेली आणि माझ्याकडे थेट भरती होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाची नियमावली बनवण्याचं काम देण्यात आलं. हा माझ्या कारकीर्दीला फार मोठा धक्का होता. जो माणूस कार्यकारी संचालक बनणार असं सर्वांना वाटत होतं त्याच्यावर अशी कारवाई होणं फारच धक्कादायक होतं. दोन दिवस मी अस्वस्थ होतो. थोडा निराशही झालो होतो; पण मी स्वतःला सावरून म्हटलं, ‘एवढं वाईट घडूनही मी अद्याप तिथं कायम आहे. आता जे घडेल त्याला मी तोंड देईन; पण मी माझी लढाई सोडणार नाही. नियमावली लिहायचं काम का असेना; पण मी ते इतकं चांगलं करीन की सगळे माझं नाव घेतील.’ मी निष्ठेनं आणि खूप कष्ट घेऊन ते काम केलं. त्याचं मला खूप समाधान मिळालं. या गोष्टीला इतरही काही वळणं असली तरी तिचा शेवट गोड झाला. सहा महिन्यांनी कार्यकारी संचालकपदी मला बढती देण्यात आली. काही दिवसांनी त्याच डेप्युटी गव्हर्नरांनी मला बोलावून घेतलं. त्यांच्या विरोधात जाणाऱ्या माणसाला ते क्वचितच क्षमा करत. त्यांनी मला काही वेळ तसंच उभं ठेवलं. थोड्या वेळानं वर पाहिलं. खाकरून घसा साफ केला आणि खर्जातल्या आवाजात ते म्हणाले : ‘थोरात तुमच्याबाबत माझी चूक झाली होती. ‘नाबार्ड’च्या अध्यक्षपदासाठी एखादा वरिष्ठ अधिकारी सरकारनं मागितला आहे. मी तुमच्या नावाची शिफारस करत आहे.’ तात्पर्य हे की, आयुष्यातल्या निर्णायक गोष्टी केवळ चांगल्या काळातच घडतात असं नाही. नैराश्याच्या वाईट काळातही त्या अचानकपणे समोर येतात. त्यांना यश मानायचं की अपयश हे तुमच्या मनःस्थितीवर अवलंबून असतं. संकटाच्या काळातही अशी संधी समोर येतच असते.’’

बराच उशीर झाला होता. मी घड्याळ बघितलं.
एवढ्यात कुणीतरी विचारलं : ‘‘शेवटी, तुमच्या बोलण्याचं सार काय आहे?’’
क्षणभर काय उत्तर द्यावं ते मला कळलंच नाही. मी मनातल्या मनात योग्य ते शब्द शोधण्याचा प्रयत्न केला आणि मला ते शब्द सापडले. मी म्हणालो : ‘‘बहुतेकवेळा आपण मिळवलेलं तथाकथित यश हे एखाद्या चकाकत्या भांड्यासारखं असतं. ते तात्पुरतं असतं. चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक ही फक्त पदं असतात. प्रत्येक पद हे ठराविक मुदतीचं असतं. मुदत संपली की ते पद जातं, त्यामुळे ज्यातून नाव किंवा प्रसिद्धी मिळेल अशा गोष्टींचा फारसा गाजावाजा करण्यात काही विशेष अर्थ नाही. दुसऱ्या बाजूला माझ्यातला दुबळेपणा, माझे पूर्वग्रह, वेळोवेळी मला होणारा मोह यांच्याविरुद्धचा माझा संघर्ष हा त्यापेक्षा स्थायी स्वरूपाचा आहे; पण माझ्यासाठी सर्वोच्च समाधानाची बाब मी जेव्हा इतरांसाठी काही करू शकलो ती आहे. अशा कामगिरीचं बक्षीस पैशांच्या रूपात मिळत नाही, ते मिळतं समाधानाच्या रूपात, स्वतःविषयीच्या खूप खोल समाधानाच्या रूपात.’’

बराच उशीर झाला होता. मी माझ्या नोट्स गोळा करत होतो.
तेवढ्यात एक मुलगा डोकावला. तो म्हणाला : ‘‘सर, मी जर्नालिझम केलंय. काही वृत्तपत्रांतून लिहीतही असतो. आयुष्यात यशस्वी कसं व्हायचं यावर मला एक बाईट द्या ना.’’
मी हसलो. त्याच्या पाठीवर हात थोपटत मी म्हणालो : ‘‘मित्रा, आयुष्याकडून मी एक गोष्ट शिकलो. यशातून सुख मिळत नाही. नेमकं उलट घडतं. सुख माणसाला यशाकडे घेऊन जातं. तुम्ही जे करत आहात त्यावर तुमचं प्रेम असेल तर तुम्ही यशस्वी व्हाल. अन्यथा माझ्यासारखी तुम्हाला यशाची कधी गरजच भासणार नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com