‘पाणी भरपूर प्या’ (युवराज मल्होत्रा)

युवराज मल्होत्रा
रविवार, 8 डिसेंबर 2019

मी संतुलित आहार घेतो, त्यात शाकाहार आणि मांसाहार दोन्हीचा समावेश करतो. तरतरी वाटण्यासाठी मी रेड शुगर घालून ब्लॅक कॉफी किंवा ताज्या लिंबाचा रस पितो. दररोज न चुकता तीन ते चार लिटर पाणी पितो. उन्हाळ्यात तर यापेक्षाही जास्त पाणी पितो. पाण्यामुळे शरीराला चांगल्या प्रकारचा बॅलन्सही मिळतो. तसंच, व्यायामातून घामाद्वारे आपल्या शरीरातले नको असलेले घटक बाहेर पडतात. त्यामुळे शरीराला पाण्याची जास्तीत जास्त गरज असते.

मी संतुलित आहार घेतो, त्यात शाकाहार आणि मांसाहार दोन्हीचा समावेश करतो. तरतरी वाटण्यासाठी मी रेड शुगर घालून ब्लॅक कॉफी किंवा ताज्या लिंबाचा रस पितो. दररोज न चुकता तीन ते चार लिटर पाणी पितो. उन्हाळ्यात तर यापेक्षाही जास्त पाणी पितो. पाण्यामुळे शरीराला चांगल्या प्रकारचा बॅलन्सही मिळतो. तसंच, व्यायामातून घामाद्वारे आपल्या शरीरातले नको असलेले घटक बाहेर पडतात. त्यामुळे शरीराला पाण्याची जास्तीत जास्त गरज असते.

मी वेट ट्रेनिंगची दिनचर्या पाळतो आणि आठवड्यातून सहा वेळा व्यायाम करतो. तीन दिवस मी वेट्‌स करतो आणि तीन डिझाईन फ्री वेट्‌स करतो. मी जेव्हा आउटडोअर शूटिंगसाठी जातो, तेव्हा वेट ट्रेनिंगसाठी सोबत केबल्स नेतो. आणि जर आउटडोअर शूटिंग अधिक काळ चालणार असेल, तर मी टीआरएक्‍स बेल्टही बरोबर नेतो, जो सैल आहे आणि त्याच्या मदतीनं सर्व व्यायाम करता येऊ शकतात. प्रत्येक वेळी तुम्ही लांब जाता तेव्हा तुमच्याकडे लीडर्स आणि वेट्‌स नसतात, त्यामुळे या गोष्टी सोबत नेणं फायद्याचंच आहे.

माझा योगावर विश्‍वास आहे. ते खूप चांगलं आहे; पण प्रत्येक जण वेगळा असतो. प्रत्येकाच्या शरीरासाठी कधीकधी ते उपयुक्त होत नाही. उदाहरणार्थ, माझं शरीर तितकं लवचिक नसल्यानं मी जास्त योगासनं करू शकत नाही. ते अवघड वाटतं. त्यामुळे योगासनं करण्यात मला तूर्त आनंद वाटत नाही. मात्र, आठवड्यातून एक किंवा दोन वेळा योगासनं करण्याचं आता माझं उद्दिष्ट आहे- कारण मनाच्या शांतीसाठी आणि शरीरासाठी योगासनं हा उत्तम व्यायाम आहे. जिमिंग केल्यानं तुमचं शरीर अधिकाधिक कडक होतं. योगासनं तुमच्या शरीराची लवचिकता टिकवून ठेवतात आणि तुम्हाला आतून कणखर बनवतात.

मी आठवड्यातले सातही दिवस व्यायाम करत नाही. मी सहा दिवस व्यायाम करतो आणि एक दिवस शरीराला विश्रांती देतो. खूप दमणूक चांगली नसते, तुमच्या शरीराला विश्रांतीची गरज असते. त्यामुळे सर्वांनीच आठवड्यात न चुकता व्यायाम करावा; पण एक दिवस शरीराला विश्रांतीही द्यावी.

व्यायामासाठी वेळापत्रक मी पाळतो. मला सकाळी व्यायाम करायला आवडतं. व्यायामानं मी दिवसाची सुरुवात केली, तर मला दिवसभर ताजंतवानं वाटतं. मी दररोज सकाळी दोन तास व्यायाम करतो. माझं काम सुरू असलं, तरी मी व्यायाम कधीच चुकवत नाही. मला एखादा दिवस व्यायाम करायला जमलं नसेल, तर दिवसभर मला उदास वाटतं. सध्या मी सोनी हिंदी वाहिनीवरील ‘तारा फ्रॉम सातारा’ या मालिकेसाठी चित्रीकरण करत आहे. त्यामुळे मी सकाळी साडेचार वाजताच उठतो आणि चित्रीकरणाला निघण्यापूर्वी मी माझा नित्याचा व्यायाम करतो.

डाएटचं काटेकोर पालन
मी डाएट काटेकोरपणे पाळतो. त्यासाठी मनाचं संतुलन लागतं; पण मी पंजाबी असल्यानं खवय्या आहे. त्यामुळे ‘चीट डेज’ होतात. मी त्यासाठी ठराविक दिवस ठरवलेला नाही; पण काही-काही पदार्थांच्या बाबतीत मी मनावर ताबा ठेवू शकत नाही. बटर चिकन हे त्यापैकीच एक आहे. मला ते फारच प्रिय आहे.
मी संतुलित आहार घेतो, त्यात शाकाहार आणि मांसाहार दोन्हीचा समावेश करतो. मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी मी शाकाहारी जेवण घेतो. त्यामध्ये ओट्‌स, सॅलड, सॅंडविच आणि इतर आरोग्यदायी आहाराचा समावेश असतो. इतर दिवशी मी अंडी, तंदुरी चिकन आणि जास्तीत जास्त प्रोटिन्स आहारात घेण्याचा प्रयत्न करतो. तरतरी वाटण्यासाठी मी रेड शुगर घालून ब्लॅक कॉफी किंवा ताज्या लिंबाचा रस पितो. तसंच, दररोज न चुकता तीन ते चार लिटर पाणी पितो. उन्हाळ्यात तर यापेक्षाही जास्त पाणी पितो. पाण्यामुळे शरीराला चांगल्या प्रकारचा बॅलन्सही मिळतो. तसंच, व्यायामातून घामाद्वारे आपल्या शरीरातले नको असलेले घटक बाहेर पडतात. त्यामुळे शरीराला जास्तीत जास्त पाण्याची गरज असते.

व्यायामासाठी आवर्जून वेळ काढतो
तणावपूर्ण दिनचर्येतून मी व्यायामासाठी आवर्जून वेळ काढतो. व्यायामामुळे तुमच्या शरीराचं सौष्ठव वाढतं; तसंच मनालाही विसावा मिळतो. त्यामुळे व्यायाम टाळण्याचा प्रश्‍नच येत नाही. कोणी कितीही व्यस्त असलं, तरी याच्यासाठी तो वेळ काढू शकतो. जर माझं चित्रीकरणाचं वेळापत्रक व्यग्र असलं, तर मी विश्रांतीच्या वेळेत व्यायाम करतो. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात आपण ज्या गुणवत्तेचं अन्न खात होतो, तसं आता मिळत नाही. अनेक उत्पादनांच्या बाबतीत आपल्याला तडजोड करावी लागते आहे. त्यामुळे त्याची भरपाई व्यायाम करूनच होऊ शकते. व्यायामामुळे तुम्हाला हलकंफुलकं वाटतं. त्याच्यामुळे एक निरोगी जीवन जगण्यास तुम्हाला मदत मिळू शकते आणि आरोग्यविषयक तक्रारी टाळता येऊ शकतात. माझे बरेचसे मित्र स्थूल होते; पण निर्धारानं त्यांनी त्यावर मात केली आहे आणि त्यांचा आत्मविश्‍वासही वाढला आहे.

सलमान हा ‘फिटनेस आयकॉन’
सलमान खानशिवाय फिटनेस आयकॉन दुसरा कोण असणार? बॉलिवूडचा कोणताही चाहता हा सलमान खानच्या शरीरयष्टीचा चाहता असतोच. तो या वयातदेखील किती फिट दिसतो. पन्नाशीतही तो आपला फिटनेस आणि आरोग्य याबाबतीत खूप काटेकोर आहे. मला त्याच्याकडून खूप प्रेरणा मिळते. मला कधीकधी या रोजच्या जिम शेड्युलचा कंटाळा येतो; पण सलमान कधीही त्याचे वर्कआऊट चुकवत नाही. आणि तो ज्या प्रकारे कसरत करतो, ते कौतुकास्पद आहे.
खरं तर मी फिटनेस फ्रिक आहे. त्यामुळे मी माझं शरीर नेहमीच मेंटेन ठेवतो. त्याचप्रमाणे व्यायामही न चुकता करतो. त्यामुळे मला कधीच थकवा जाणवत नाही. खरं तर कलाकारांना अनेकदा आपल्या भूमिकेप्रमाणं आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल करावा लागतो. अनेकांना वजन कमी करावे लागते तर अनेकांना जास्तही करावे लागते. मात्र, हे एक आव्हानच असते. असाच प्रकार ‘तारा फ्रॉम सातारा’ या मालिकेतल्या आरटीचं पात्र साकारताना करावा लागला. यामध्ये माझा लूक खूपच बदलण्यात आला आहे. त्यासाठी मला वजनही कमी करावं लागलं; पण ते आव्हान मी यशस्वीरित्या पेललं आणि माझ्या व्यक्तिमत्त्वाचं नवीन रूप प्रेक्षकांना दिसलं.

कुटुंब, मित्र-मैत्रिणींवर व्यायामाचा प्रभाव
खरं तर आपल्या आजूबाजूचं वातावरण जसं असतं, त्याचप्रमाणं आपल्यातही बदल होत असतात. हा निसर्गाचा नियमच आहे. त्याचप्रमाणं मी जसा व्यायाम करतो, लवकर उठतो, रात्री लवकर झोपतो या गोष्टी माझे कुटुंबीयही अंगीकारतात. त्याचा फायदा त्यांनाही होतो. त्याचप्रमाणं मला घरी वेळ न मिळाल्यास मी सेटवर व्यायाम करतो. तसंच अनेकदा धावतोही. या सर्व गोष्टी माझे सहकलाकार आणि इतर टीम अंगीकारतात. त्याचा मला मनापासून आनंद होतो.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saptarang yuvraj malhotra write health fitness article