अभिनयाचा वस्तुपाठ (महेश बर्दापूरकर)

महेश बर्दापूरकर mahesh.bardapurkar@esakal.com
Sunday, 3 May 2020

"मी भूमिका अगदी नैसर्गिकपणे वठण्यासाठी खूप अभ्यास करतो. सिनेमातील पात्र इरफान या नावाच्या ओझ्याखाली दबू नये, यासाठी माझा विशेष प्रयत्न असतो. यश डोक्‍यात जाऊ नये यासाठी माझा संघर्ष सुरू आहे,' असं सांगणाऱ्या इरफान खानचा डाव अर्ध्यावरच संपला. पुण्यात एका भेटीदरम्यान उलगडलेल्या हरहुन्नरी कलाकारामागच्या हळव्या माणसाची ही ओळख...

"मी भूमिका अगदी नैसर्गिकपणे वठण्यासाठी खूप अभ्यास करतो. सिनेमातील पात्र इरफान या नावाच्या ओझ्याखाली दबू नये, यासाठी माझा विशेष प्रयत्न असतो. यश डोक्‍यात जाऊ नये यासाठी माझा संघर्ष सुरू आहे,' असं सांगणाऱ्या इरफान खानचा डाव अर्ध्यावरच संपला. पुण्यात एका भेटीदरम्यान उलगडलेल्या हरहुन्नरी कलाकारामागच्या हळव्या माणसाची ही ओळख...

इरफान खान...अत्यंत रफ दिसणारा, तशाच प्रकारच्या भूमिका साकारणारा कलाकार. काही व्यक्तींच्या पडद्यावरच्या अवतारावरून आपण कल्पना करतो. मात्र, प्रत्यक्षात ही माणसं खूपच वेगळी असतात. इरफान त्यांपैकीच एक. अत्यंत मृदू स्वभावाचा. पुण्यात त्याला भेटण्याचा योग आला तेव्हा नेमकी हीच गोष्ट जाणवली होती. "हिंदी मीडिअम' या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी तो आला असल्यानं त्याची दोन मुलं, शाळा आणि अभ्यास यांबद्दलची चर्चा साहजिकच रंगली. ""गरिबीमुळं माझ्या शिक्षणावर मर्यादा आल्या. मात्र, मुलांना हवं ते शिक्षण मिळावं ही माझी इच्छा आहे. मात्र, हे शिक्षण मातृभाषेतूनच असावं, हा माझा आग्रह आहे. धर्माच्या बाबतीतही मी अजिबात आग्रही नाही, माझ्या मुलांनी त्यांना हव्या त्या धर्माचं पालन करावं,'' असं तो आवर्जून सांगत होता. गप्पा त्याच्या करिअरकडं वळाल्यावर तो अधिकच हळवा झाला. ""माझ्यासारख्या फाटक्‍या माणसानं हिंदी चित्रपटसृष्टीतला नायक होण्याचं स्वप्न पाहणं म्हणजे जरा अतीच होतं; पण आईचे संस्कार आणि संघर्ष करण्याची तयारी या दोन गोष्टी मी कधीच सोडल्या नाहीत. भूमिका छोट्या असल्या तरी त्या मन लावूनच करायच्या, हा माझा शिरस्ता. त्याचं फळ मला लवकरच मिळू लागलं. टीव्हीवरील माझ्या भूमिकांच्या चर्चा होऊ लागल्या. कोणतीही भूमिका अगदी नैसर्गिकपणे वठण्यासाठी मी त्यावर खूप अभ्यास करतो. सिनेमातील पात्र इरफान या नावाच्या ओझ्याखाली दबू नये, यासाठी माझा आता विशेष प्रयत्न असतो. यश डोक्‍यात जाऊ नये यासाठी माझा संघर्ष सुरू आहे,'' हे इरफानचे विचार त्याच्या डोक्‍यात यशाची हवा थोडीही गेली नसल्याचंच अधोरेखित करत होते...

भूमिका आणि कष्ट यांबद्दल चर्चा सुरू असताना विषय "पानसिंग तोमर'मधल्या त्याच्या भूमिकेकडं गेला नसता, तरच नवल. "ही माझ्या फिल्मी करिअरमधील आजपर्यंतची सर्वांत कठीण भूमिका होती हे आधीच स्पष्ट करून त्यानं सांगितलं ः ""बहुतांश प्रेक्षकांप्रमाणे मी पानसिंग तोमर या व्यक्तिमत्त्वाबद्दल आधी ऐकलं नव्हतं. दिग्दर्शक तिग्मांशू धुलियानं मला ही कथा ऐकवल्यानंतर मी भारावून गेलो. ही भूमिका साकारण्यासाठी काय तयारी करावी लागणार आहे, हे मी त्याला विचारून घेतलं. कष्ट खूप करावे लागणार, हे स्पष्ट झालं. सर्वप्रथम खेळाडूसारखी शरीरयष्टी बनविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. पाच हजार मीटरची धावण्याची शर्यत जिंकल्याचे प्रसंग पडद्यावर साकारायचे होते आणि ते खरे वाटण्यासाठी घ्यावी लागलेली मेहनत मोठी होती. मात्र, आपण लोकांच्या स्मरणात नसलेल्या एका महान खेळाडूला जिवंत करीत असल्याचं समाधानही होतं.''

मीरा नायर यांच्या "सलाम बॉंबे'मधल्या काही सेकंदांच्या भूमिकेपासून सुरू झालेला इरफानचा प्रवास नंतर हिंदीतील एक आघाडीचा अभिनेता आणि त्याचबरोबर सातत्यानं हॉलिवूडच्या चित्रपटांत चमकणारा हिंदी अभिनेता अशी झाली. दूरचित्रवाणीवरील अनेक ऐतिहासिक मालिकांतील त्याचा अभिनयही कायम चर्चेत राहिला. "लाइफ इन अ मेट्रो' ते "लाइफ ऑफ पाय'पर्यंतचे त्याचे चित्रपट त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरले. "मेट्रो'मध्ये कोंकणा सेनला इमारतीच्या टेरेसवर नेऊन मोठ्यानं ओरडून मनातील मळमळ बाहेर टाकण्याचं प्रशिक्षण देणारा मॉंटी असो वा "लाइफ ऑफ पाय'मधील आपल्या आयुष्यांचं गमक उलगडून दाखवणार प्रौढ पाय, इरफान कायमच झोकून देत काम करायचा. हिंदी चित्रपटांमध्ये लय सापडल्यानंतर तो एकापेक्षा एक भन्नाट भूमिकांत दिसू लागला, पारंपरिक अभिनयापलीकडं त्याचा भूमिका समजून, तिची नस ओळखून केलेला अभिनय प्रेक्षकांना भावू लागला. इरफान प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला.

मात्र, नियतीला हे मंजूर नसावं. दोन वर्षांपूर्वी त्याला कर्करोगाचं निदान झालं आणि सर्वांच्या मनात पाल चुकचुकली. पुण्यात त्याला भेटलो तेव्हा, मुलाखतीनंतर चहा आला. त्याला एकदम काहीतरी आठवलं व त्यानं ड्रायव्हरला बोलावून घेतलं. गाडीतून औषधाच्या गोळ्या आणायला सांगितल्या. "नक्की काय होतंय, काही आजार आहे का,' असं विचारल्यावर तो म्हणाला, ""फार काही नाही. पोटाचा त्रास आहे. डोस वेळेवर घेतल्यावर बरं वाटतं. काम आणि वयामुळं आजार चिकटणारच...'' असं म्हणत त्यानं होमिओपॅथीच्या गोळ्या तोंडात टाकल्या. हा आजार एवढा मोठा असल्याचा अंदाज कोणालाच आला नाही. "अंग्रेजी मीडिअम' हा त्याचा शेवटचा चित्रपट. ही मोठी धावपळ असलेली भूमिका कॅन्सरवरील उपचार घेऊन आलेल्या इरफाननं मोठ्या कष्टानं साकारली. हे करताना त्याला होणारा त्रासही स्पष्ट दिसत होता, मात्र हा आजार या गुणी अभिनेत्याचा प्राणच घेऊन जाईल, असं वाटलं नव्हतं. इरफान आता आणखी खूप मोठी शिखरं गाठणार हे स्पष्ट असताना अर्ध्यावरतीच डाव मोडला. "हमारी तो गालीपें टाली पडती है,' किंवा "मोहबत इसलिए जाने दिया, जिद होती तो बाहोंमे होती,' असे भन्नाट डायलॉग फेकणारा, मात्र प्रत्यक्ष भेटीत अतिशय मृदू असलेला हा मोठा कलाकार व गुणी माणूस कायमचा चटका लावून गेला...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarng mahesh bardapurkar write actor irfan khan article