अनटोल्ड स्टोरी ऑफ नवनाथ पानसरे (ऐश्वर्य पाटेकर)

ऐश्वर्य पाटेकर (oviaishpate@gmail.com)
Sunday, 8 November 2020

डोक्यावरची छत्री सांभाळत जो तो त्याच्याजवळून निघून जात होता, पावसाला चुकवत होता, तसं नवनाथलाही. कुणालाच त्याची दया येत नव्हती, तरी त्यानं आशा सोडली नव्हती.

नवनाथ रस्त्यावर येऊन उभा राहतो. वरून पाऊस कोसळतोय अन् आत काळीज सगुणासाठी टाहो फोडतंय! तिचं शेवटचं क्रियाकर्म तरी व्हावं म्हणून वेडापिसा झालेला नवनाथ शहराच्या रस्त्यावर धुंडीत सुटलाय माणुसकी, ती त्याच्या हाती कुठली लागतेय! पण आस फार वेडी असते. लोक त्याच्याजवळ थांबत नव्हते. डोक्यावरची छत्री सांभाळत जो तो त्याच्याजवळून निघून जात होता, पावसाला चुकवत होता, तसं नवनाथलाही. कुणालाच त्याची दया येत नव्हती, तरी त्यानं आशा सोडली नव्हती.

नवनाथ दवाखान्याच्या पायरीवर बसला होता. त्याची सहा वर्षांची लेक कृष्णा त्याच्या पुढ्यात बसली होती. नवनाथच्या डोक्यावर प्रश्नांचं गाठोडं. त्या गाठोड्याची गाठ त्याच्या लेकीनं सोडली.

‘‘दादा, आई मेली त आता भाकरी कोण करीन? ’’

नवनाथजवळ लेकीच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं असं नाही; पण त्याची चिंता वेगळी होती. ती काही तो त्याच्या लेकीला सांगू शकत नव्हता. लेकीच्या भाकरीचा प्रश्न सोडवणं त्याच्यादृष्टीनं अवघड नाहीच. तोच तिच्या भाकरीसाठी माखून घेणार होता काटूटीत हात. लेकीचा प्रश्न तो सहजी सोडवणार होता; पण त्याचा प्रश्न कोण सोडवणार होतं? त्याच्या सगुणाची डेडबॉडी गावात कशी न्यायची? मगाशी दवाखान्यातल्या कर्मचाऱ्यानं सांगितलं, की अँब्युलन्सचे हजार रुपये पडतील! त्याच्या खिशात दिडकी नव्हती. कुठून आणायचे पैसे? या भल्यामोठ्या शहरात आपल्या जिवाचं कोण आहे? मग कशाला कोण देईल पैसे? दवाखान्यानं आपले खिसे रिकामेच करून टाकले..

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

“ये लवकर आटप. अजूनही इडंच का? अँब्युलन्सचं काय? आणली न्हायीस का? ती बॉडी कुडवर सांभाळायची आम्ही?” वार्डबॉयनं फटकारलं

“दादा आसं नका करू. पाया पडतो तुम्च्या. बघतो म्या काय जमतं का?”

“एकांद तासाचा यळ हाये तुझ्याकडं. न्हायीतर भायर फेकून देवू!”

नवनाथ रस्त्यावर येऊन उभा राहतो. वरून पाऊस कोसळतोय अन् आत काळीज सगुणासाठी टाहो फोडतंय! तिचं शेवटचं क्रियाकर्म तरी व्हावं म्हणून वेडापिसा झालेला नवनाथ शहराच्या रस्त्यावर धुंडीत सुटलाय माणुसकी, ती त्याच्या हाती कुठली लागतेय! पण आस फार वेडी असते. लोक त्याच्याजवळ थांबत नव्हते. डोक्यावरची छत्री सांभाळत जो तो त्याच्याजवळून निघून जात होता, पावसाला चुकवत होता, तसं नवनाथलाही. कुणालाच त्याची दया येत नव्हती, तरी त्यानं आशा सोडली नव्हती. कुणीतरी दिडकी ठेवीलच आपल्या हातावर. माणुसकी पार संपून गेली नाही या जगातून. कुणी नं कुणी गावंलच दयावंत. तो कृष्णाला म्हणाला,

“किस्ना, बाळा माझ्या आडूशाला उभी ऱ्हा. म्हण्जे पाऊस न्हायी लागायचा तुला!”

“दादा, कधी जायचं आपल्या गावाला!”

“पैसे मिळाले का मंग जायचं!”

“कधी मिळतील दादा पैसे?”

नवनाथ हे कसं सांगू शकणार होता? पैशाच्या तिजोऱ्या लोकांच्या आहेत, चाव्याही त्यांच्याच! त्यानं कृष्णाला कसंबसं समजावलं अन् पुन्हा तो आपल्या कामाला लागला. समोरून एक फेरारी येताना दिसली. तो जिवाची पर्वा न करता अगदी रस्त्याच्या मधोमध जाऊन उभा राहिला, गाडीला आडवा झाला. पावसाची तमा न करता गाडीवाला शेठ बाहेर आला. नवनाथच्या डोळ्यांत चमक, अंगात तरतरी, की भेटला दयावंत.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

“काय रे भडव्या! आम्हाला मारतो का?” असं म्हणत त्यानं मारायला सुरुवात केली. शेठ एकटा कसा असेल? आणखी चार-दोन उतरून आले, तेही हात चालवायला लागले. सोडवायला कुणीच येईना! कृष्णा रडायला लागली.

“माझ्या दादाला मारू नका! माझ्या दादाला पैसे हवेत!”

“काय रे भडव्या मौत आली का तुझी!” शेठचा मऊ तुकतुकीत चेहरा आणखीनच लाल झाला. त्या लहान पोरीचं आर्जव त्याच्या कानापर्यंत पोहचलं नाही. नवनाथ एवढा मार पडूनही त्यास हात जोडीत म्हणाला,

“सायब माझी बायको मेलीय. तिचं मढं गावाकडं न्यायचंय मला. त्यासाठी अँब्युलन्सची यवस्था करायची, तेवढ्यापुरतं पैसे हावेय हायेत..!”

“साल्या भिकारड्या तू पैसे आमच्याकडं ठेवायला दिले का? एकतर अपघाताला निमित्त झाला असता, वर तोंड करून पैसे मागतो!” असं म्हणत परत एक कानफटात देत, आपल्या गाडीत बसून निघून जातो. तेवढ्यात दवाखान्यातल्या स्ट्रेचरवर त्याच्या सगुणाची बॉडी बाहेर आणली जाते. वार्डबॉय आवाज देतो.

“ये नवनाथ संपला तुझा एक घंटा. उचल ही बॉडी!”

जवळच घोंगडी पांघरून उभ्या असलेल्या भिकाऱ्यानं नवनाथचं दु:खं ओळखलं.

“ये बघ दादा माझ्याकडं हे पोतंय. यक कर. ह्या पोत्यात घाल ती बॉडी. अन् ही पाचपंचवीस रुपयांची चिल्लर असू दे वाटचालीला!”

नवनाथला खूप आनंद झाला. त्याचा प्रश्न सुटला. सगुणाचं प्रेत पोत्यात टाकलं. त्याचं गाठोडं व्यवस्थित बांधलं अन् घेतलं खांद्यावर. बापलेक थोडासा रस्ता चालून गेल्यावर त्यांच्याजवळ एक गाडी येऊन थांबली. गाडीतून युवक उतरला. त्याच्या हातात कॅमेरा होता. प्रेसवाला असावा. तो त्याच्याबरोबरच्या मुलीस म्हणाला,

“रश्मी काय गं कुठंय ब्रेकिंग निव्ज?”

“अस्मित, कॅमेरा ऑन कर. समोरच्या गाठोड्यावाल्याला फ्रेममध्ये घे!”

“त्याच्या गाठोड्याचं काय?”

“वेड्या. आहेस कुठं! ही तर ब्रेकिंग निव्ज आहे. ते नुसतं गाठोडं नाहीये. मगाशी सरांनी सांगितलं या माणसाविषयी. ट्रॅफिक जॅममध्ये अडकले तेव्हा सरांच्या हाती लागलाय हा मोलाचा ऐवज. आपल्या चॅनेलचा टीआरपी बघ कसा सरकन वर जाईन!" रश्मीनं जास्त वेळ न दवडता नवनाथला गाठलं.

“दादा, थांबा जाऊ नका!”
“बाई, मला पंचवीस किलोमीटर जायचंय, तेही पायी!”
“दादा तुम्ही टीव्हीवर याल!”
“त्यानं काय व्हईल?”
“तुमची व्यथा साऱ्या जगासमोर येईन!”
“जगासमोरूनच चाललोय म्या!”

तिनं अस्मितला खुणवलं. त्यानं कॅमेऱ्याचा डोळा फिरवला. तिनं जवळच्या पर्समधून कंगवा काढून केस व्यवस्थित केले. बारका आरसा तोंडासमोर धरत. ओठांवर हलकीशी लिपस्टिक फिरवली. कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये अस्मितनं तिला घेतलं,

मी रश्मी झिंगाळकर. मी तुमच्यासमोर ठेवणार आहे माणसातली माणुसकी संपल्याची जितीजागती गोष्ट! माझ्याबरोबर आहेत... अडखळत थांबते अन् नवनाथला म्हणते,

“दादा नाव काय तुमचं?”

“ये पोरी काय नको माणुसकीची कथा मांडू. यक कर! तूच का देत न्हायीस मला हजार रुपये. म्हण्जे माझ्या सगुणाचे धिंडवडे जरा तरी कमी व्हतील. माणुसकी परि माणुसकीबी ऱ्हावून जाईन!”

“मी कसे द्यायचे?”
“मग माझा टाइम का घेवून ऱ्हायली!”

तो कॅमेऱ्याला पाठ दाखवत तडातडा पावलं उचलत निघाला. त्याच्या गावची स्मशानभूमी येईपर्यंत त्याला चालत राहायचं होतं. त्याच्या अतीव दु:खाच्या वेळप्रसंगी पाऊस कोसळत होता अन् आता आकाश निरभ्र होऊन सूर्य उन्हाची आग ओकत होता. पेटलेल्या उन्हानं पायाखालची वाट चांगलीच तापली होती. अनवाणी पायांना डांबरी सडक चटाचटा चटकं द्यायला सरसावली होती. त्याला त्याच्या लेकीच्या पायांची जाणीव झाली.

“बाळा, तुझ्या पायाला चटकं बसत असतील नं!”
“दादा, तुझ्या पायात बी कुडं चपला हायेत!”

नवनाथ वडाची सावली पाहून थांबला. सगुणाला चांगली जागा पाहून जमिनीवर टेकवलं. लेकीच्या एका तळपायाला पिशवी बांधली अन दुसऱ्याला त्याच्या गळ्यातलं उपरणं.

“किसना, झाल्या तुझ्या चपला तयार. आता काय बिशाद की डांबर तुझ्या पायाला चटकं देईन!”

“दादा, तुला खूप लागलं का रे?” नवनाथच्या कपाळावरची जखम कुरवाळत कृष्णा म्हणाली.

कपाळाला झालेली जखम काय आज न् उद्या भरणारंच आहे; पण नवनाथच्या काळजाला झालेली जखम कशी भरून येणार? कसं जग आहे? म्हणे जग श्रीमंत झालं! कसं श्रीमंत म्हणावं ह्या जगाला? हे तर भिकाऱ्यापेक्षा निपतरी. भिकाऱ्याला आपली दया आली. तोच खरा श्रीमंत. त्यानं वेळ सांभाळली, नाही तर आपण दु:खानं वेडं झालं होतो. आपल्याला हे सुचलं नसतं.

“काही न्हायी बाळा, उलीसंच. त्यानं काय व्हतंय?”

पुन्हा एकदा सगुणाचं गाठोडं त्यानं खांद्यावर घेतलं. सुरू झाली त्याची पदयात्रा. पदयात्रेचं प्रक्षेपण पहात होतं उघडं जग. म्हणजे आजूबाजूची झाडं, आभाळ, डोंगर, नदी-नाले. एवढं बरं, की या झाडा-झुडपांकडं कॅमेरा नव्हता; नाही तर त्यांनी नवनाथची शोकयात्रा कॅमेऱ्यात शूट करून उघड्या आभाळाच्या स्क्रीनवर फुकटचं प्रक्षेपण साऱ्या जगाला दाखवलं असतं..

नवनाथ नुसता चालतोच आहे. बरं तरी चालायला पैसे पडत नाहीत. नाही तर नवनाथसाठी किती मुश्कील झालं असतं. सगुणाचं ओझं त्याला जड वाटत नसलं, तरी त्यानं त्याच्या काळजावर भार दिला होता. तो भार फार जड होता. चालून चालून लहानगी कृष्णा थकली.

“दादा, आजूक किती चालायचं?”

“किस्ना, आपलं गाव खूप लांबय आजून. तुला भूक लागली असल नं बाळा!”

“तुला दादा?”
“नाही बाळा!”
“मंग मलाबी न्हायी लागली!”

त्याला वाटलं एवढ्याशा लेकराच्या अंगी केवढं हे शहाणपण! भूक मारून काय उपेग. आपल्या लेकीसाठी त्यानं भूक लागल्याचं नाटक केलं. पाववड्याचा गाडा पाहून तो थांबला.

“चल किसना यक यक पाववडा खाऊ!”

पोरीची भूक कातून बिलगली वड्याला. तिला खाताना पाहून त्याचं मन निवलं. खरं तर तिला सकाळीच भूक लागली होती; पण सगुणानं जीव सोडला अन् हे त्रांगडं उभं राहिलं.

“दादा, तू का न्हायी खात?” शेवटचा घास खाता खाता कृष्णा म्हणाली.

“तुला देऊ का थोडा!”

“नको माझं पोट भरलं!” तरी त्यानं अर्धा तिला खायलाच लावला अन् अर्धा जवळ येऊन बसलेल्या कुत्र्याला टाकला.

“दादा, तू खायचा नं!”
“त्याला बी भूक लागली आसंल नं किसना!”

पुन्हा एकदा सगुणाचं गाठोडं त्याच्या खांद्यावर. मर्त्ययात्रा क्षितिजाला भेदत त्याची वाटचाल सुरू झाली. ढग गडगडू लागले.

“किसना, बाळा पाय उचल!”

असं जोरात निघाले बापलेक की त्यांनी त्यांचं गाव गाठलंच! थेट स्मशानभूमीतच त्यानं सगुणाचं गाठोडं उतरवून ठेवलं. त्याच्या जातीपातीचे चार भाऊबंद लोक धावत आले. नवनाथच्या खांद्यावरचं ओझं उरतलं होतं, तरीही त्याचे खांदे जडच होते. गाठोडं झालेली सगुणा भुरूभुरू जळून गेली, तरीही त्याच्या खांद्यावर ओझं होतंच. ज्या ओझ्याला सतीगती लावता येत नाही, ते भार वाढवणारंच!

आपल्याला वाटलं की आपण ही कथा वाचून संपवली; पण नाही! तुमचेही खांदे चाचपून पहा, खूप भार आहेत. ते तुम्ही कुठं उतरवून ठेवाल...?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptrang aishwary patekar write about Untold Story of Navnath Pansare

Tags
टॉपिकस