माणसांमध्ये रमणारे दादा ! (हेमंत टकले)

Hemant-Takale
Hemant-Takale

दादांनी कधीही काहीही गुपचूप केलं नाही, सगळा कारभार खुला होता. म्हणूनच त्यांच्या काँग्रेसच्या पक्षनिष्ठेविषयी कुणीही शंका घेतली नाही. इतरांशी दादांनी मैत्री जोडली म्हणूनसुद्धा कुणाला राग आला नाही. विधिमंडळातील मैत्रीमुळं राम कापसे नाशिकमध्ये आले, की दादांकडं जायचे. राम कापसे यांच्या नातेवाइकांचं नाशिकमध्ये दुकान होतं. पक्ष वेगवेगळे असले, तरीही त्यावेळी नेते टोकाची भूमिका घेत नव्हते, हे दिसून येतं. दादांनी गावच्या राजकारणात करायच्या त्या गोष्टी आवडीनं केल्या.

सांस्कृतिक, सामाजिक, कला अशा विविध क्षेत्रांतील कार्यक्रमांसाठी हक्काचे अध्यक्ष म्हणून नाशिककरांची स्वीकारार्हता मिळालेले वनाधिपती विनायकदादा पाटील म्हणजे माणसांचं जंगल! ज्यांचा-ज्यांचा त्यांच्याशी संबंध आला, अशा प्रत्येकाला दादा पारदर्शी माणूस वाटले. आत एक आणि बाहेर एक असे कुणालाही वाटले नाहीत. म्हणूनच दादांची ‘एक्झिट'' ही त्यांच्या मित्रांप्रमाणेच साऱ्यांना चटका लावून गेली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राजकीय क्षेत्रातील आमची आणि नंतरची पिढी अशा प्रत्येकाशी विनायकदादा ‘कनेक्ट'' होते. मोठ्यांप्रमाणे ‘ज्युनिअर''मध्येदेखील दादा रमायचे. मैफल जमवण्याचा त्यांचा शौक होता. १९७४ मध्ये डॉ. वसंतराव गुप्ते हे थेट नगराध्यक्ष झाले होते. त्या वेळी त्यांचा काँग्रेस पक्ष नव्हता. काँग्रेस, जनसंघ, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होते. मात्र, दादांना डॉ. गुप्ते जवळचे वाटायचे. समाजात मान्यता मिळालेलं व्यक्तिमत्त्व डॉ. गुप्ते होते. काँग्रेसचा उमेदवार असतानाही राजकारणापलीकडं डॉ. गुप्ते यांना त्यांनी मदत केली. दादांनी कधीही काहीही गुपचूप केलं नाही, सगळा कारभार खुला होता. म्हणूनच त्यांच्या काँग्रेसच्या पक्षनिष्ठेविषयी कुणीही शंका घेतली नाही. इतरांशी दादांनी मैत्री जोडली म्हणूनसुद्धा कुणाला राग आला नाही. विधिमंडळातील मैत्रीमुळं राम कापसे नाशिकमध्ये आले, की दादांकडं जायचे. राम कापसे यांच्या नातेवाइकांचं नाशिकमध्ये दुकान होतं. पक्ष वेगवेगळे असले, तरीही त्या वेळी नेते टोकाची भूमिका घेत नव्हते, हे दिसून येतं. दादांनी गावच्या राजकारणात करायच्या त्या गोष्टी आवडीनं केल्या. कुंदेवाडीच्या सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून विरोधकांचे अर्ज पोचणार नाहीत, याची तजवीज केली. त्यातूनही काहीजण अर्ज भरायला येताहेत म्हटल्यावर अर्जांची अंतिम मुदत दुपारी तीन ही सरकारी कार्यालयातील घड्याळात दुपारी अडीचला संपवण्यात आली होती.

निफाडच्या साखर कारखानदारीतील काकासाहेब वाघ यांच्या शिष्यासारखे दादा राहिलेत. नाशिकच्या राजकारणात भाऊसाहेब हिरे, काकासाहेब वाघ, सुरगाण्याचे धैर्यशील महाराज पवार, मूळचंद गोठी अशा घराणी होती. हे सगळे जण दादांना वरिष्ठ होते. मात्र, सगळ्यांना एकत्र ठेवणारे होते विनायकदादा. राजकारणातील जुळवाजुळवीमुळं दादा पुलोद सरकारमध्ये राज्यमंत्रिपदापर्यंत पोचले. उद्योग, सांस्कृतिक कार्य खातं त्यांच्याकडं होतं. राजकारण समाजाशी जोडता येतं, हे दादांनी दाखवून दिलं. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचं संचालकपद सनदी अधिकारी यांच्याऐवजी रंगभूमीकार दामू केंकरे आणि पुढं कमलाकर सोनटक्के यांच्याकडं त्यांनी सोपवलं. माणसाला ओळखून त्याच्या क्षमतेनुसार जबाबदारी सोपवण्याचं कसब त्यांनी सिद्ध केलं. मंत्रिपद गेल्यावर त्यांना खेद वाटला नाही. निफाडच्या राजकारणात मालोजीराव मोगल यांना उमेदवारी मिळाल्यावर दादांनी तक्रार न करता स्वीकारली.

प्रत्येक गोष्टीकडं खेळ म्हणून पाहायचं. एक डाव संपला की दुसरा डाव सुरू करायचा, अशी दादांची खासीयत होती. मराठीइतकाच हिंदी आणि ऊर्दू भाषेशी त्यांचा जिव्हाळा राहिला. राजकारणामध्ये हरहुन्नरी असं हे व्यक्तिमत्त्व, कुठंही ‘फीट'' बसावं अशी तयारी दादांनी स्वतः करून घेतली होती. समाजवादी काँग्रेसतर्फे नाशिक लोकसभा मतदारसंघातून दादांना उमेदवारी मिळाली. त्या वेळी आळेफाटापासून ते नाशिक, निफाड, येवला अशा भलामोठा मतदारसंघ होता. या निवडणुकीच्या निमित्तानं दादा माझ्या घरी राहिले होते. त्यांच्या प्रचाराचं कार्यालय नाशिकमधील महात्मा गांधी रस्त्यावरील मुंदडा हॉलमध्ये होतं. पण, सबंध प्रचारात दादा एकदाही कुणावरही चिडलेले मी पाहिलेलं नाही. प्रचार कार्यालयातून दुपारी मी घरी पोचलो असताना दादांना झोपलेलं पाहिलं. निवडणुकीची धामधूम असताना दादा निवांत आहेत हे पाहिलं असतानाच, दादांनी मला विश्रांती घ्या असं सुचवले. मात्र, दादा भाषणाला उभे राहिले, की रंगत वाढत जायची. ओव्या, संत वचनं, शेरोशायरी असायची. ते ऐकून लोक मंत्रमुग्ध व्हायचे. लोकांची ओळखलेली नाडी याचं हे उदाहरण होय. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर दादांनी काँग्रेसमध्ये राहणं पसंत केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे माझे जवळचे मित्र आहेत, वडिलकीच्या नात्यानं ते मला सल्ला देतील; परंतु काँग्रेस सोडणं माझ्या रक्तात नाही, असं दादांनी त्या वेळी म्हटलं होतं. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांच्याकडं दादांचं जाणं-येणं होतं. त्यामुळं साहित्यिक, संपादकांशी त्यांचा परिचय व्हायचा, त्यातून नातं जोडलं जायचे. युनायटेड स्टेट इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ब्युरोमध्ये मंगेश पाडगांवकर नोकरी करत होते. ते नाशिकमध्ये आले असताना कुसुमाग्रजांच्या समवेत झालेल्या मैफलीला विनायकदादा उपस्थित होते. त्या वेळी पाडगांवकरांनी काँग्रेस म्हणजे काय, असा प्रश्‍न विचारला होता. दादांनी त्याकाळच्या प्रसिद्ध असलेल्या बजाज स्कूटर एजन्सीचा दाखला दिला. उद्योगात बजाज आणि राजकारणात काँग्रेसची एजन्सी घेतली जाते, असं दादांनी म्हणताच, उपस्थितांमध्ये हंशा पिकला होता.

काँग्रेसच्या शिबिर, संमेलन, बैठकींमध्ये शिस्तीनं राहत असताना दादांच्या विचारांची बैठक पक्की झाली होती. नाशिकमधील वकीलवाडीत दादा राहिले, पुण्यात शिकले. या प्रवासात त्यांच्या अवतीभोवती मध्यमवर्ग होता. तरीही त्यांनी कृषिक्षेत्राची नाळ तुटू दिली नाही. आदिवासी पट्ट्यात काजू लागवड केली. कुंदेवाडीमध्ये पाझर तलाव झाला, त्यातून पाण्याची सोय झाली म्हणून नाशिक जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अजोय मेहता यांचं नाव ‘अजय सागर'' असं पाझर तलावाला दादांनी दिलं. अधिकाऱ्यानं चांगलं काम केल्यावर त्यास खुल्या वृत्तीनं मान्यता देण्याची भूमिका त्यामागं होती. चांगलं काम करणाऱ्यांशी दादांची बांधिलकी जमली होती. क्षेत्र लादलं नसलं, तर आवडीनं काम करत कुठली गोष्ट कुठं ठेवायची याचं तारतम्य येतं. त्यामुळं कम्युनिस्ट चळवळीतील नाना मालुसरे, माजी आमदार जे. पी. गावित यांच्याशीही त्यांचा स्नेहभाव जुळलेला होता. श्री. ग. माजगांवकर यांनी पदयात्रा काढली होती, त्यातून दादांचं त्यांच्याशी मैत्र जुळलं. त्यात बाबासाहेब पुरंदरे जोडले गेले. पंडित जसराज, चित्रकार सुभाष अवचट यांच्याशीही त्यांचा ऋणानुबंध राहिला. दादांनी कधीही काँग्रेस अथवा समाजवादाची टोकाची भूमिका घेतली नाही, की भाजपच्या वाटेवर गेले नाहीत. त्यामुळं विजया दशमीच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलन कार्यक्रमासाठी दादांना बोलावलं गेलं असतं, तर आश्‍चर्य वाटण्याचं कारण नव्हतं. मात्र, म्हणून कुणाचा तरी हात धरून सत्ता मिळवण्याची दादांची इच्छा नव्हती.

‘हेमंतराव दुसरं काही तरी करून बघावं,‘ असं म्हणत दादा चांगलं आहे त्या गोष्टी इतरांकडून घ्यायचे. दादांनी नीलगिरीचा अभ्यास केला, संशोधन केलं, इंधन निर्मितीसाठीच्या जेट्रोफाची लागवड केली. त्यांचे हे प्रयोग भविष्याचे वेध घेणारे होते. कृषिक्षेत्रातील प्रयोगाच्या अनुषंगानं कुसुमाग्रज यांच्यासमवेत बैठक सुरू असताना दादांना कुठली पदवी द्यायची, अशी चर्चा सुरू झाली. त्या वेळी कुसुमाग्रजांनी पहिल्यांदा जंगली महाराज म्हणूयात असं सुचवल्यावर सगळेजण मनमुराद हसले आणि नंतर कुसुमाग्रजांनी दादांना वनाधिपती म्हणूयात, असं सुचवलं. त्यावेळीपासून दादांचा उल्लेख वनाधिपती असा सुरू झाला. कुसुमाग्रज प्रतिष्ठान स्थापन झाल्यावर पहिल्या विश्‍वस्त मंडळात दादा होते. कुसुमाग्रज स्मारकामध्ये प्रवेश केल्यावर चार कदंबाची झाडं दादांनी लावलेली आहेत. कृषिक्षेत्राच्या माध्यमातून दादा तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव, राजीव गांधी यांच्यापर्यंत पोचले होते. त्यांनी कधीही कुणाकडं काहीही मागितलं नाही. एकादृष्टीनं त्यांची प्रकृती फकिराची होती, ते कुठल्याही पाशात अडकले नाहीत.

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि दादा यांच्यात अनेक गोष्टींचं साम्य पाहायला मिळालं. त्यातील एक प्रकर्षानं जाणवणारी गोष्ट म्हणजे, कलावंत, साहित्यिक, नाटककार, चित्रपट निर्माते, सामाजिक कार्यकर्ते अशा सगळ्यांमध्ये दादांचा श्री. शरद पवार यांच्याप्रमाणे वावर होता. सगळ्या क्षेत्रांचा आस्वाद घ्यायचा आणि स्वतःची भर घालायची, हेही दादांच्याकडून घडलं. मात्र, स्वतःच्या संस्था असाव्यात असं दादांना कधीही वाटलं नाही. इतकी आध्यात्मिक पातळी दादांनी गाठलेली होती. राज्यकर्ते चुकले, तर दादा सांगायचे. पण त्याचवेळी कुठल्याही पक्षाच्या सरकारचा चांगुलपणा असल्यास त्याचं दादा मोकळेपणानं कौतुक करायचे. दादांनी नैमित्तिक लेखन केलं. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्याविषयीचं ‘यशोधन'' पुस्तक हे त्यांचंच. कौटुंबिक अडचणी आल्या, मात्र त्यातूनही त्यांनी मार्ग काढला. वहिनींचं निधन झाल्यावर मात्र दादा खंतावले. प्रकृती साथ देत नव्हती, तरीही आजाराला गोंजारत बसण्याऐवजी ते सार्वजनिक जीवनात रमले. आजारासोबत जगण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवला. त्यांच्या उत्तर आयुष्यात हट्टीपणा दिसला नाही. ते सगळ्यांना आपले वाटायचे. सगळ्यांशी ते प्रेमानं बोलायचे. राजकीय जीवनात आणखी मोठं होता आलं असतं; पण त्यांनी सामाजिक काम टिकवून ठेवलं. म्हणूनच समाजानं त्यांचं व्यक्तिमत्त्व स्वीकारलं.

विनायकदादांचा व माझा परिचय पन्नास वर्षांहून अधिक काळचा. माझी आणि दादांची पहिली भेट होण्यास ‘सकाळ'' कारणीभूत ठरला. पुण्याहून नाशिकला रोज ‘सकाळ'' टॅक्सीनं यायचा. त्यात तिघांना बसायची सोय असायची. रात्री एकला ‘सकाळ''च्या पुण्यातील कार्यालयाजवळ पोचावं लागायचं. तरुण, उमदे, भरघोस मिशीवाले गावचे पुढारी टॅक्सीत बसलेले होते. मी टॅक्सीत बसल्यावर हे इकडं कसे? असा प्रश्‍न मला पडलेला होता. पण पंधरा ते वीस मिनिटांमध्ये दादांनी मला आपलंसं केलं. वयाचं अंतर दादांनी कधीही मानलं नाही. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत ते सहजगत्या मिसळायचे. स्त्री-पुरुष असा भेदभाव त्यांनी कधीही मानला नाही. व्यासपीठ हा त्यांचा आवडता छंद होता, तो पुढं बहरत गेला. नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीच्या बैठकीसाठी स्वागताध्यक्ष डॉ. वसंतराव पवार आणि दादा इतरांसमवेत मुंबईला निघाले होते. तत्पूर्वी डॉ. पवार यांनी शस्त्रक्रिया केली होती. मात्र कारमध्ये बसल्यावर डॉ. पवार यांचा मोबाईल सतत वाजत राहिला. दादांना गप्पांशिवाय चालत नव्हतं. बराच वेळ झाला, तरीही डॉ. पवार हे मोबाईलवर बोलताहेत म्हटल्यावर दादांनी आपल्या घरी मोबाईलवरून संपर्क केला आणि प्रवासात मला कुणीच फोन करत नाही असं सांगून दर पंधरा ते वीस मिनिटांनी फोन करा असं सांगितलं. दादांच्या या मिश्‍कीलीनं खिल्ली उडालेली होती आणि माहोल तयार झाला होता.

मग मात्र डॉ. पवार यांचा फोन बंद झाला. पवार यांच्या मुंबईतील मित्रांच्या ‘ग्रुप''मधील गोविंद तळवलकर हे निवृत्त झाल्यावर मुंबईच्या गरवारे क्लबमधील जागेत मित्रांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम ठरला. उद्योजक माधवराव आपटे, विनायकदादा, पुण्याचे विठ्ठल मणियार, मुंबईचे शानबाग, खासदार श्रीनिवास पाटील हे ग्रुपमध्ये होते. आपल्या मित्राची नेमकी कोण माहिती सांगू शकेल हे माहिती असल्यानं श्री. शरद पवार यांनी हक्काचे मित्र विनायकदादा यांच्यावर जबाबदारी सोपवली. त्या वेळी दादा तळवलकर समजून घेत त्यांच्याबद्दल छान बोलले. गोविंद तळवलकर यांनी नाशिकमध्ये घर केलं. दादांनी त्यांच्या घराची देखभाल केली. अशा मैत्रातील तारा निखळला आहे. त्यांना विनम्र आदरांजली

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com