मैत्री उलगडणारी कहाणी... (संतोष शेणई)

Santosh-Shenai
Santosh-Shenai

पंडित जवाहरलाल नेहरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या दोन व्यक्तिमत्त्वांविषयी सर्वसामान्यांना नेहमीच आदर व कुतूहल वाटत आले आहे. या दोघांमधील परस्पर नात्याचा उलगडा निखळपणे कधी केला गेला नाही. बहुतेकांनी पूर्वग्रह ठेवून गैरसमजांचा गुंताच वाढवला. या पार्श्वभूमीवर रुद्रांग्शू मुखर्जी यांचे `नेहरू व बोस : समांतर जीवनप्रवास` (अनुवाद – अवधूत डोंगरे) हे पुस्तक दोघांमधील मैत्रीचा अदमास घेण्यासाठी मदत करणारे आहे. मुखर्जी यांनी या दोघांच्या गुंतागुंतीच्या जीवनप्रवासाचे अतिशय काटेकोरपणे संशोधन करून, सहानुभूतीने लिहिलेली ही सुंदर कहाणी आहे. त्यासाठी मुखर्जी यांनी प्रामुख्याने बोस आणि नेहरू यांच्या लेखनाचा आणि भाषणांचा आधार घेतला आहे. दोघांच्या खासगी कागदपत्रांच्या आधाराने मुखर्जी यांनी या दोघांच्या बौद्धिक आणि वैयक्तिक परिवर्तनांचा शोध घेतला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नेहरू व बोस यांच्या वयामध्ये आठ वर्षांपेक्षा कमी अंतर होते. दोघेही अत्यंत दृढ विचारांचे होते. दोघेही उच्च विद्याविभूषित. दोघेही इंग्लंडमध्ये शिकून देशसेवेसाठी भारतात आलेले. स्वातंत्र्यलढ्याच्या अत्यंत निर्णायक टप्प्यात दोघेही कॉंग्रेसमध्ये गांधीजींचे सहकारी म्हणून सामील झाले. महात्मा गांधींनी या दोघांचेही स्वराज्याच्या चळवळीत स्वागत केले होते. गांधीजींना दोघेही प्रिय होते आणि तेही दोघे परस्परांचे चांगले मित्र होते. मात्र दोघांच्या स्वभावात, स्वातंत्र्यचळवळीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात भिन्नता होती. नेहरू हे नेहमी गांधीजींच्या मार्गानेच चालले, तर बोसना गांधीजींविषयी आदर असला तरी त्यांचा अहिंसेच्या, सत्याग्रहाच्या मार्गावर विश्वास नव्हता. बोसना सशस्त्र लढा देण्याचा मार्ग योग्य वाटत होता. नेहरूंनी मुसोलिनीच्या फॅसिझमचा व हिटलरच्या नाझीवादाचा स्पष्ट शब्दांत धिक्कार केला होता. तर बोसना फॅसिझमचा आधार वाटत होता. सुव्यवस्थेचे व शिस्तीचे साधन म्हणून बोस फॅसिझमकडे पाहत होते. सशस्त्र लढ्यासाठी आग्रही असलेल्या बोस यांनी अखेर गांधीजींची साथ सोडली. म्हणून तर गांधीजींनी नेहरूंचा उल्लेख `वारसदार मानसपुत्र` असा केला, तर बोस यांचा उल्लेख `मार्गभ्रष्ट मानसपुत्र` असा केला. 

नेहरू व बोस हे जणू एकमेकांचे शत्रू होते, असे चित्र अनेकांनी रंगवले आहे. नेहरूंना बदनाम करण्याचा एक भाग म्हणून बोस यांच्या नावाचा अनेकवेळा उपयोग करण्यात आला. पण त्या दोघांमधील मैत्रीच्या नात्याला फारसा उजाळा दिला गेला नाही. ते दोघे जवळचे सहकारी होते. गेल्या शतकात साधारण तीसच्या दशकात साम्राज्यवाद व भांडवलशाही याविरूद्धच्या मतांमुळे दोघेही जवळ आले होते. समाजवादावर दोघांचाही विश्वास होता. ज्यावेळी परदेशात कमला नेहरूंचा मृत्यू झाला तेव्हा नेहरूंसोबत बोस होते. तर, वसाहतीमध्ये बोस यांना अटक झाली तेव्हा त्याविरुद्ध नेहरूंनी जोरदार लिहिले होते व भाषण केले होते. 

बोस यांना १९३८मध्ये दुसऱ्यांदा कॉंग्रेसचे अध्यक्ष व्हायचे होते, पण गांधीजींनी त्यांना विरोध केला. ही गोष्ट रंगवून सांगितली जाते. पण गांधीजींनी त्यापूर्वी दोन वर्षे आधी नेहरुंनाही विरोध केला होता, याकडे दुर्लक्ष केले जाते. काँग्रेसमध्ये नेहरूंनी समाजवादी दृष्टिकोन आणला होता. त्याला कमकुवत करण्यासाठी गांधीजींनी उजव्या-भांडवलदारांना पाठिंबा दिला होता. मुखर्जी यांनी याकडे लक्ष वेधण्यासाठी जी. डी. बिर्ला यांच्या पत्राचा पुरावा दिला आहे. पण या घटनांसंदर्भात नेहरू व बोस यांनी दिलेल्या प्रतिक्रिया त्यांचा स्वभाव सांगणाऱ्या आहेत. बोस यांनी रागाने कॉंग्रेसचाच त्याग केला, तर नेहरू यांनी पक्षशिस्तीला महत्त्व दिले. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, गांधीजींशी या दोघांचा पहिल्या भेटीतील प्रतिसाद. नेहरू गांधीजींना भेटले आणि गांधीजींच्या अहिंसक सत्याग्रहाच्या मार्गाकडे ते ओढले गेले. नेहरूंच्या मनातील करुणाशक्तीला अहिंसक मार्ग जवळचा वाटला. उलट गांधीजींनी बोस यांना पहिल्याच भेटीत त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊनही समाधान झाले नव्हते. त्यांची प्रतिक्रिया होती, `केवळ निराशा`. तरीही बोस कॉंग्रेसच्या चळवळीत सामील झाले, कॉंग्रेसचे अध्यक्षही झाले. गांधीजींची मते अनेकदा दोघांनाही पटत नसत. पण बोस न पटणाऱ्या मतांविरुद्ध लगेच प्रतिक्रिया देऊन विरोध करायचे, तर नेहरू मतभेद नोंदवत असले तरी नेत्यांचा आदेश म्हणून त्याच्या अंमलबजावणीत सहकार्य करीत. 

दोघांच्याही व्यक्तिमत्त्वांचे विश्लेषण केल्यावर नेहरूंना समजून घेण्यात बोस कमी पडले या निष्कर्षाला लेखक येतो. बोस यांना वाटत होते की, नेहरू आणि ते एकत्र येऊन नवा इतिहास घडवू शकतील. पण बोस यांचे फॅसिझमविषयीचे आकर्षण आणि त्यांचा गांधीजींना असलेला विरोध यामुळे नेहरूंनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. नेहरूंची गांधीजींविषयीची वैयक्तिक भक्ती बोस यांना कधी समजलीच नाही. बोस यांनी आपल्यात आणि आपल्या देशाला मुक्त करण्याच्या आकांक्षेमध्ये कोणतीही वैयक्तिक भावना येऊ दिली नाही. मात्र संवेदनशील नेहरूंना गांधीजींविषयीची वैयक्तिक भावना दूर करता येत नव्हती. त्यामुळेच बोस हे नेहरूंवर चिडून होते. नेहरू गांधींपासून दूर होऊन आपल्याबरोबर येत नाहीत हे पाहिल्यानंतर '' तुझ्याएवढी हानी मला कोणीच पोचवलेली नाही'', असे बोस यांनी नेहरूंना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. राजकीय जीवनात दोघे एकमेकांपासून दूर जाण्याच्या अनेक कारणांपैकी हेही एक कारण होते. 

नेहरू व बोस यांचे जीवन, त्यासंबंधीचे समज-गैरसमज, गूढता, हे सगळेच असे विलक्षण आहे की, त्यांच्याविषयी लिहिणे इतके सोपे नव्हते. निष्कर्षापर्यंत पोचण्यासाठी आणि त्यांचे मार्ग स्पष्ट करण्यासाठी संबंधित व्यक्तींचे तर्क समजून घेणे खूप महत्त्वाचे होते. या पुस्तकातील सात प्रकरणांमधून या दोन महापुरुषांच्या जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यात लेखक वाचकाला घेऊन जातो. उपलब्ध झालेल्या तपशिलांची जडजंबाळ व रुक्ष मांडणी न करता, मुखर्जी यांनी त्याची मोहक कहाणी केली आहे. डोंगरे यांनी अनुवादही सरस केला आहे. हे पुस्तक भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी संदर्भग्रंथाचे मोल असलेले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com