गुणवत्ता आणि संधीचा संगम (सुनंदन लेले)

गुणवत्ता आणि संधीचा संगम (सुनंदन लेले)

आयपीएल स्पर्धा म्हणजे गुणवत्तेला संधी देणारं व्यासपीठ. यंदाची आयपीएल स्पर्धा मुंबई इंडियन्स संघानं दिमाखात जिंकली. ज्या प्रकारे रोहित शर्मानं मुंबई इंडियन्स संघाला सातत्यानं यशाचा मार्ग दाखवला, त्याचा विचार करता रोहित शर्माला ‘ट्वेन्टी -२०’ स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली जावी, या मागणीला आता चांगलाच जोर येऊ लागला आहे.

‘आयपीएल’ स्पर्धा होणार की नाही, या शंकेनं स्पर्धेची झालेली सुरुवात आणि सर्व अडथळे पार करून साखळी आणि प्लेऑफचे मिळून ६० सामने यशस्वीरीत्या खेळले जाऊन ‘बीसीसीआय’नं (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) अशक्य ते शक्य करून दाखवलं. आठ संघांतील खेळाडूंनी, प्रशिक्षकांनी, सपोर्ट स्टाफनं इतकंच काय, सर्व समालोचकांनीसुद्धा विलगीकरण आणि बायो सिक्युरिटी बबलचा नियम तंतोतंत पाळला. या नियम पालनामुळंच स्पर्धेत कोणतंच विघ्न आलं नाही. ‘आयपीएल ट्वेन्टी-२०’ स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाचं याकरिता मनमोकळेपणानं कौतुक व्हायला पाहिजे. फारसा गाजावाजा न करता आयपीएलचे प्रमुख अधिकारी म्हणून ब्रिजेश पटेल यांनी जे जोखमीचं काम चोखपणे पार पाडलं, त्याबद्दल त्यांना शाबासकी दिली पाहिजे.

सुरुवात आगळी, शेवट वेगळा..
यंदाच्या ‘ड्रीम-११’ आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जमध्ये रंगला होता. स्पर्धा सुरू होण्याअगोदर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून महेंद्रसिंग धोनीनं निवृत्ती जाहीर केल्यानं सर्वांच्या नजरा धोनी काय करतो याकडं लागल्या होत्या. पहिल्या सामन्यात धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघानं मुंबईला पराभूत करून कमाल केली. सगळ्यांना वाटलं होतं, नेहमीप्रमाणं मुंबई इंडियन्स संघाचा सुरुवातीचा प्रवास ठेचकाळत होणार आणि चेन्नई संघ भरारी मारणार. विचार केला होता त्याच्या बरोबर उलट झालं. चेन्नई संघाच्या कामगिरीला जणू नजर लागली आणि मुंबई संघानं भरारी मारली.

आश्वासक पहिल्या सामन्यानंतर चेन्नई संघाला जणू ग्रहण लागलं. अंबाती रायडूला दुखापतीनं ग्रासलं आणि वॉटसन - धोनी या बिनीच्या खेळाडूंना फलंदाजीमध्ये सूर गवसेनासा झाला. परिणामी चेन्नई संघाचा खेळ अपेक्षेप्रमाणं रंगलाच नाही. तसं बघायला गेलं, तर धोनी संघात जास्त बदल करताना दिसत नाही. जसजसा कामगिरीचा आलेख वर चढेनासा झाला, तसा धोनी संघात बदल करताना आढळला. फाफ डु प्लेसिसनं बर्‍यापैकी सातत्य दाखवत फलंदाजी केली, त्याला अपेक्षित साथ बाकीच्या फलंदाजांकडून लाभली नाही. तसंच, संघातील फिरकी गोलंदाजांनी विशेष चांगली गोलंदाजी केली नाही. एकमेव सकारात्मक गोष्ट चेन्नई संघाकरिता घडली ती म्हणजे, विश्वास दाखवून संधी दिलेल्या ऋतुराज गायकवाडनं सलग तीन सामन्यांत अर्धशतकी मजल गाठताना केलेली फलंदाजी. ऋतुराजला भारतातून निघताना कोरोनाचा त्रास नव्हता, जो तिकडं पोहोचल्यावर निदर्शनास आला. बिचाऱ्याला १४ दिवस विलगीकरणात घालवावे लागले, जेव्हा संघ सराव करून सामने खेळायला मैदानात उतरला होता. मनानं खंबीर ऋतुराजनं तो कठीण काळ पचवताना आपली सकारात्मकता सोडली नाही. पहिल्या काही सामन्यांत खेळायची संधी मिळाल्यावर त्याच्या हातून फलंदाजी करताना चुका झाल्या. कर्णधार धोनी आणि मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगनं ऋतुराजवरचा विश्वास कायम ठेवला आणि त्याला परत संधी दिली, ज्याचं ऋतुराजनं खरोखरच सोनं केलं. त्याच्या उलट परिस्थिती केदार जाधवची झाली. त्याला निर्भेळ संधी मिळालीच नाही. चेन्नई सुपर किंग्जला बरंच सिंहावलोकन करून आगामी स्पर्धेची तयारी करावी लागणार आहे, ज्यात नव्यानं संघ बांधणीचं मोठं आव्हान असणार आहे. धोनीनं चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणं सुरू ठेवणार असल्याचं स्पष्ट केल्यानं संघ मालकांना हायसं वाटलं असणार, कारण धोनी चेन्नई संघाचा आत्मा आहे.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चांगल्या संघाचा अडखळता प्रवास
यंदाच्या आयपीएल स्पर्धेला प्रारंभ होत असताना किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांकडून क्रिकेट जाणकारांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या. कागदावर दोनही संघ चांगलेच मजबूत वाटत होते. पंजाब संघाकडं तारुण्याचा जोष होता, तर दिल्ली संघाकडं अनुभवी खेळाडूंचा आधार. पंजाब संघाचा कर्णधार के. एल. राहुलनं केलेली लाजवाब फलंदाजी यंदाच्या ड्रीम ११ आयपीएल स्पर्धेचा कौतुकाचा विषय ठरली. राहुलला मयांक आगरवालनं तोलामोलाची साथ दिली, तरीही पंजाब संघाला एकत्रित चांगली कामगिरी करता आली नाही, तसंच मोक्याच्या क्षणी निर्णायक खेळी करता आली नाही. त्याचा परिणाम असा झाला, की हातातोंडाशी आलेले विजय पंजाब संघापासून दूर गेले.

दिल्ली कॅपिटल्स संघाची बांधणी रिकी पाँटिंगनं स्वत: लक्ष देऊन केली होती. कमजोर दुवे बरोबर विचार करून भरून काढले होते. तरीही दिल्ली संघाचा प्रवास सुखकर झाला नाही, ज्याला कारण होतं, बेभरवशाची फलंदाजी. शिखर धवननं सलग दोन शतकं ठोकून कमाल केली; पण पृथ्वी शॉला अनेक संधी मिळूनही अपेक्षित खेळ करता आला नाही. रिषभ पंतची कामगिरी सपशेल निराशाजनक झाली. या सगळ्याचं प्रतिबिंब संघाच्या यशावर उमटलं. दिल्ली संघानं अंतिम फेरी गाठली तरीही शेवटच्या टप्प्यावर बसायचा तो फटका बसलाच.

कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सच्या खेळात सातत्याचा अभाव राहिल्यानं प्लेऑफ फेरीसुद्धा गाठणं त्यांना जमलं नाही. काहीसा दुर्दैवी संघ सनरायझर्स हैदराबादचा ठरला. बाद फेरीत जाण्याची किमया साधूनही ढिसाळ कामगिरी करताच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर लक्षात राहिला. गेली काही वर्षं विराट कोहलीच्या हाती कर्णधारपदाची धुरा असूनही बेंगलोर संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षित पातळी गाठता आलेली नाही.

हेही वाचा : बिहारची दंगल 

मुंबई इंडियन्सचं गारुड
आयपीएल स्पर्धेवर पहिल्यापासून नजर टाकली तर दिसून येतं, की मुंबई इंडियन्स संघाभोवती प्रसिद्धीचं वलय पहिल्यापासून होतं. त्याच्या तुलनेत भन्नाट कामगिरीचं गणित मुंबई इंडियन्सना सोडवायला जरा वेळ लागला. त्यांच्या कामगिरीत सर्वांत लक्षणीय बदल तेव्हाच झाला, जेव्हा २०११ मध्ये संघचालकांनी रोहित शर्माला हैदराबाद संघ चालकांना मोठी रक्कम देऊन मुंबई इंडियन्स संघात दाखल करून घेतलं. २०१३ मध्ये रोहितला मुंबई इंडियन्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली, गेली त्यानंतर मुंबई संघानं काय करून दाखवलं ते अभ्यास करण्यासारखं आहे. मुंबई इंडियन्स संघानं आठ वर्षांत पाच वेळा विजेतेपदावर हक्कं सांगितला. एकदाही अंतिम सामना त्यांनी गमावलेला नाही. कधी निकराच्या लढतीत हातून निसटलेला विजय मुंबई इंडियन्स संघानं खेचून आणला, तर कधी संपूर्ण वर्चस्व गाजवत यशावर निशाणा साधला.

हे यश असंच सहजी मिळालेलं नाही. मुंबई इंडियन्स
संघचालकांनी संघ बांधणी करताना डोकं लढवल्याचं दिसून येतं. सर्वांत मोठी गोष्ट दिसते ती संघातील वातावरणाची. इंग्रजीत एक म्हण आहे की, ‘इफ यू फेल टू प्रिपेअर देन बेटर यू बी प्रिपेअर टू फेल’. म्हणजेच, तयारी करताना चुकलात तर तोंडावर आपटण्याची तयारी ठेवा. मुंबई इंडियन्स संघ चालकांनी गुणवान खेळाडू शोधून काढायला जॉन राइट आणि किरण मोरेला नेमलं. जसप्रीत बुमरा आणि हार्दिक- कृणाल पंड्या बंधूंना जॉन राइट आणि किरण मोरे यांनी अगदी शोधून काढलं. ईशान किशनचं उदाहरण घ्या, किंवा ट्रेंट बोल्टचं. हे दोनही खेळाडू इतर संघांतून खेळताना कसे होते आणि मुंबई इंडियन्स संघात दाखल झाल्यावर कसे बहरले हे बघण्यासारखं आहे. ट्रेंट बोल्टनं यंदाच्या ड्रीम ११ आयपीएल स्पर्धेत कामगिरी अशी केली आहे, की पहिल्या षटकात फलंदाज बाद करण्याची कमाल ८ वेळा करून दाखवली. ईशान किशननं यंदाच्या स्पर्धेत जबरदस्त सातत्यानं फलंदाजी करताना ५१६ धावा काढल्या.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आयपीएल स्पर्धा या वर्षी होईल की नाही अशी शंका होती. बीसीसीआयनं स्पर्धा भरवण्याचा विचार पक्का केल्यावर इतर संघचालक वाट बघत बसले होते, नक्की काय होतं याकडं. दुसर्‍या बाजूला मुंबई इंडियन्स संघ चालकांनी स्वत:च्या कारखान्याच्या आवारात असलेलं मैदान अद्ययावत करून खेळाडूंकरिता सराव सुविधा सज्ज ठेवली. सोबतीला किरण मोरे आणि सचिन तेंडुलकरला विनंती करून सरावावर लक्ष द्यायला नेमलं. बायो सिक्युरिटी बबल तयार करून खूप लवकर सराव चालू केल्यानं मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंच्या मनातील मरगळ झटकली गेली. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली दर्जेदार सराव चालू झाल्यानं कौशल्याला धार आली, तसंच संघात एकमेकांमधलं ट्युनिंग आपोआप व्हायला लागलं. संघ स्पर्धेकरिता आखातात दाखल झाल्यावर अबुधाबीला सगळी सुंदर व्यवस्था करून खेळाडूंना खूश केलं गेलं आणि मगच खर्‍या सरावाला प्रारंभ केला गेला. या सगळ्याचा सकारात्मक परिणाम मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर झालेला दिसतो.

‘खेळाडूंमधली गुणवत्ता हेरून त्यांना खेळाला पोषक वातावरणात फुलायला वाव देणं आणि मग मेहनत करून तयार झालेल्या खेळाडूंना आयपीएलसारख्या जबरदस्त मंचावर आपलं कसब दाखवायची संधी देणं हेच आमचं काम आहे, जे आम्ही २००८ मध्ये संघ घेतल्यापासून करत आलो आहोत. मुंबई इंडियन्स संघाला मिळालेलं यश हे याच विचारपूर्वक राबवलेल्या योजनेचं फलित आहे,’ नीता अंबानी यांनी २०२० आयपीएलचं विजेतेपद पटकावल्यावर अगदी सरळ साध्या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंबई इंडियन्स संघ सातत्यानं चांगली कामगिरी का करतो आहे, याचा अभ्यास इतर संघ चालकांनी करायची वेळ आली आहे.

रोहित शर्माला संधी मिळायला हवी
मुंबई इंडियन्स संघाची धुरा हाती घेतल्यापासून रोहित शर्मानं करून दाखवलेली कामगिरी विलक्षण आहे. त्याच्या बॅटमधून योग्यवेळी धावा बरसल्या आहेत आणि त्यानं संघातील प्रत्येक खेळाडूला सर्वोत्तम कामगिरी करायला प्रोत्साहित केलं आहे. ‘मी हुकूमशाही पद्धतीनं संघाचं नेतृत्व करत नाही. प्रत्येक खेळाडूला पाठिंबा द्यायचा, विश्वास द्यायचा, की तो संघाकरिता किती मोलाचा आहे. काही वेळा अपेक्षित कामगिरी झाली नाही तरी त्याच्या आत्मविश्वासाला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची. संघातील वातावरण खेळीमेळीचं ठेवायचं आणि प्रत्येकाला फुलायची आणि नैसर्गिक खेळ करायची संधी द्यायची याकडं आम्ही लक्ष देत आलो आहोत. म्हणून यशाचा मार्ग आम्हाला शोधता आला आहे,’ असं रोहित शर्मा म्हणतो.

जी प्रगल्भता रोहित शर्मानं मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करताना दाखवली आहे, त्याचा विचार करता ‘ट्वेन्टी-२०’ स्पर्धेत भारतीय संघाचं कर्णधारपद रोहित शर्माला का दिलं जाऊ नये, अशी चर्चा जोर धरत आहे. एकीकडं विराट कोहलीला भरपूर संधी मिळूनही बेंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघानं अपेक्षित कामगिरी केलेली दिसत नाही, तर दुसरीकडं रोहित शर्मानं संघाला वारंवार यशाच्या मार्गावर नेलं आहे. २०२१ मध्ये भारतात आणि पाठोपाठ २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात ‘ट्वेन्टी-२०’ जागतिक करंडक स्पर्धा होणार आहे. विराट कोहलीनं भरपूर संधी मिळून आयसीसी स्पर्धांमध्ये कर्णधार म्हणून वाखाणण्याजोगी मजल गाठून दाखवली नसल्यानं तशीच संधी किमान ‘ट्वेन्टी-२०’ स्पर्धेत भारतीय संघाच्या बाबतीत रोहित शर्माला का मिळू नये, ही मागणी रास्त वाटत आहे.बीसीसीआय निवड समितीत नव्यानं सदस्य दाखल करून घेण्याच्या तयारीत असताना रोहित शर्माला वेगळी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वाढू लागली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com