...खेळ नवा रंगेल 

सुहास किर्लोस्कर
रविवार, 31 डिसेंबर 2017

आपली आवड श्रवणीय संगीताची असावी. त्यात जुना काळ-नवा काळ, आपलं-त्यांचं असा काही भेदभाव नसावा. शिवाय, कोणतंही गाणं एकदा ऐकून मत बनवता येत नाही. कारण, नवीन प्रकार ऐकताना आपली पाटी कोरी नसते! 

"दंगल' सिनेमात वडिलांच्या भूमिकेत असलेल्या आमिर खानला त्याचं कुस्तीचं स्वप्न त्याच्या दोन्ही मुलींकडून पूर्ण करवून घ्यायचं असतं. कुस्ती करायची तर व्यायाम करायला हवा, खाण्यावर बंधन हवं, लवकर उठणं वगैरे शिस्त हवी...या सगळ्याला कंटाळून लहान मुलींनी आपली व्यथा आणि शिस्तबद्ध वडिलांबद्दलची तक्रार एका गाण्यात सांगितली आहे. त्याचे शब्द असे : 

बापू, सेहत के लिए तू तो हानिकारक है 
हम पे थोडी दया तो करो, हम नन्हे बालक है 

या गाण्यात 13 वर्षांच्या सरवर खान-सरताज खान या जैसलमेरजवळच्या छोट्या गावातल्या गायकांनी सुरवातीलाच असा काही आवाज लावलाय की मुलींनी पुकारलेलं हे मनातलं बंड प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोचतं. अमिताभ भट्टाचार्य यांनी मुलांच्या भाषेत लिहिलेल्या या गाण्याला प्रीतम यांचं संगीत सिनेमातल्या आजूबाजूच्या वातावरणाला अनुसरून आहे. खरं तर याच सिनेमातलं "ऐसी धाकड है' हे रॅप सॉंग, अर्जित सिंग यांनी गायलेलं "दर्दभरे नैना' हीही गाणी फार सुरेख आहेत. 

सिनेमा पाहिल्यानंतर अशी गाणी प्रौढ वयातले प्रेक्षक-श्रोते परत परत ऐकतात का? फार कमी...कारण, अशी गाणी ऐकण्यासाठी या पिढीला स्वतःहून प्रयत्न करावे लागतात; पण हाच प्रश्‍न तरुण पिढीला विचारा..."नवनवीन पद्धतीची आणि नवनव्या कलाकारांची गाणी ऐकून आम्ही त्यांचं एकमेकांत आदान-प्रदान करत असतो', असं उत्तर तरुणांकडून येईल. 

एखादा मित्र सूफी ऐकत असतो, एखादी मैत्रीण श्रेया घोषालची बंगाली गाणी ऐकत असते किंवा कोक स्टुडिओत नवीन काय प्रयोग झाला ते सांगत असते, दुसरा मित्र किशोरकुमार-आशा भोसले यांची गाणी ऐकत असतो. 

*** 

NH10 या थरारपटातलं "माटी का पलंग' हे अप्रतिम गाणं सिनेमातल्या क्‍लायमॅक्‍सला वाजलं, त्या वेळी माझं शब्दांकडं लक्ष गेलं नव्हतं. माझी कन्या सानिया हिनं हे गाणं मला परत ऐकायला सांगितलं तेव्हा अर्थ समजून घेत ऐकलं आणि अचंबित झालो. 

माटी के ख्वाब ही सारे, माटी के अंग 
पानी के संग बहे जीवन के रंग 
माया ही जीत सारी, माया है ये जंग 
आखरी मंझिल सभी की माटी का पलंग 

संगीत दिग्दर्शिका समीरा कोप्पीकर यांनी गायलेल्या आणि नीरज राजावत यांनी लिहिलेल्या या अनोख्या गाण्यात सतार आणि डिस्टॉर्टेड गिटारचा सुरेख संगम ऐकायला मिळतो. "कागा रे कागा पिया की खबर सुनाना' हे "मिर्झा' सिनेमातलं सुरेल गाणं कौशिकी चक्रवर्ती यांनी गायलं आहे. या श्रवणीय गाण्याचे संगीतदिग्दर्शक आहेत शंकर-एहसान-लॉय. "पिंक' सिनेमातलं तन्वीर गाझी यांनी लिहिलेलं "तू खुद की खोज में निकल' हे गाणं मुलींना-महिलांना उद्देशून आहे. "हताश होण्याचं काहीच कारण नाही, तोडून टाक त्या बेड्या आणि ती समाजानं घातलेली बंधनं. हताश न होता स्वतःच्या शोधात बाहेर पड,' असा संदेश हे गाणं देतं. शंतनू मोइत्रा यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं अमिताभ बच्चन यांच्या आवेशपूर्ण आवाजात ऐकलं की पूर्ण अर्थ समजतो! 

*** 

अशी गाणी वारंवार ऐकायला लावणारे रेडिओ सिलोन, विविध भारती, बिनाका गीतमाला यांसारखे पर्याय आता नाहीत. आता ही गाणी ऐकण्यासाठी प्रौढ मंडळींना स्वतःहून प्रयत्न करावे लागतात. युवक नवं काही शोधण्याचा प्रयत्न करतात, कोक स्टुडिओत होणारे नवनवीन प्रयोग ऐकत असतात; पण ते काय ऐकतात, याची उत्सुकता ज्येष्ठ संगीतरसिकांना असते का? कोक स्टुडिओमध्ये कौशिकी चक्रवर्ती यांच्यासारख्या अनेक कलाकारांना वेगळ्या ढंगाची गाणी गाताना एकदा तरी ऐकावं. "बेनाम सी ख्वाईशे, आवाज ना मिले' (पपोन, अन्वेशा) हे गाणं अत्यंत शांतपणे एकट्यानंच ऐकण्याचं आहे. गायिकेचा आवाज, सरोद-तबल्याचा वेगळा परिणाम ऐकत राहावा. "चौधरी' या गाण्यातून अमित त्रिवेदी, मामेखान यांनी कोक स्टुडिओत राजस्थानी लोकसंगीताचा चांगला वापर केला आहे. दिलशाद खॉं यांची सारंगी वेगळाच परिणाम साधते. राहत फतेह अली खॉं यांचं "आफरीन आफरीन' ऐकावं आणि ऐकतच राहावं. तर अशा या कोक स्टुडिओचं नाव वाचल्यावर "ढिंगच्याक' असं काही ऐकायला मिळणार, हा जसा गैरसमज आहे, तसाच पूर्वीची सगळी गाणी बोअरिंग असतात हासुद्धा! 

*** 

"रोके न रुके नैना' या अर्जित सिंग यांनी गायलेल्या "बद्रिनाथ कि दुल्हनिया' या सिनेमातल्या गाण्यातली सारंगी, तबला, बासरी, मेंडोलिन या वाद्यांचा चपखल वापर श्रवणीय आहे. "फिर ले आया दिल' हे "बर्फी' सिनेमातलं अर्जित सिंग-रेखा भारद्वाज यांनी गायलेलं गाणं "दर्दभरे गाने' ऐकणाऱ्या रसिकांना नक्कीच आवडेल. सोनू निगम यांनी गायलेलं आणि अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं "अभी मुझ में कही' हे "अग्निपथ' सिनेमातलं गाणं पाहून त्याचा अर्थ समजून घेण्यासारखा आहे. "लुटेरा' सिनेमातली अमित त्रिवेदी यांची "सवार लूँ', "मन मर्जियॉं' ही गाणी हट के आणि सुरेख आहेत. आताच्या बऱ्याच गाण्यांची शब्दरचना सुरेख असते...आणि काय म्हणायचं आहे, ते थेट सांगणारी असते. आता कुण्या प्रेयसीनं "जिथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पहाते' असं म्हटलं तर प्रियकर तिला म्हणेल, की कुठं भेटायचं आहे ते स्पष्ट शब्दांत आणि थोडक्‍यात सांग! त्या त्या काळाचं प्रतिबिंब संगीतात किंवा कोणत्याही कलेत पडत असतं. "जिंदगी न मिलेगी दोबारा' या सिनेमातलं जावेद अख्तर यांनी लिहिलेलं आणि शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं "उडे आसमान के जो परिंदे' हे गाणं एलिया मेंडसा, मोहित चौहान यांनी फार छान गायलं आहे आणि समयोचित असल्यामुळं फार वाद्यं त्यात वाजत नाहीत. 

*** 

पूर्वी अशी गाणी ऐकण्याची सुरवात ग्रामोफोनपासून झाली; पण सगळ्यांना गाणी ऐकायची सवय लावली ती रेडिओनं. रेडिओ ही वस्तू "जीवनावश्‍यक' होण्यात "विविध भारती' आणि "रेडिओ सिलोन' यांचा मोलाचा वाटा होता. "रेडिओ सिलोन'वर "आपही के गीत' या कार्यक्रमात फर्माईश कोण करतंय, याचं मला अप्रूप असे. नंतर लक्षात यायला लागलं की "झुमरीतलैय्या' या ठिकाणाहून आलेल्या फर्माइशी हा "बना-बनाया खेल' आहे. कोणती गाणी लोकप्रिय करायची, याच्या किल्ल्या अशा कार्यक्रमांच्या हातात असायच्या! अशा कार्यक्रमांमध्ये न लागणारी गाणीसुद्धा चांगली असायची. 
अगदी अलीकडं आलेल्या "बादशाहो' या सिनेमातलं "मेरे इश्‍क कमर' हे गाणं गायलं आहे राहत फतेह अली यांनी. या गाण्याला मेंडोलिन वाजवलं आहे प्रदीप्तो सेनगुप्ता यांनी. नुसरत फतेह अली यांनी हार्मोनिअमच्या साथीनं गायलेल्या मूळ गाण्याचं हे नवीन व्हर्जन. दोन्ही गाणी कव्वालीचा अलौकिक आनंद देतात. आता अशी कव्वाली कशी ऐकणार? तेव्हा गानरसिकांना बहुश्रुत करण्याचं श्रेय रेडिओला जातं. कारण, रेडिओवर पुराने फिल्मी गीत, नवीन गाणी, एखाद्या संकल्पनेवरची गाणी, शास्त्रीय संगीत, कव्वाली, गझला वगैरे लागायच्या, तेव्हा प्रत्येक कुटुंबात एकच रेडिओ असल्यामुळं हे गानप्रकार सगळेजण ऐकायचे. नंतर टेपरेकॉर्ड-सीडी-एमपी3 असा प्रवास करणारी गाणी आता तर इंटरनेटवरही उपलब्ध आहेत; पण नवनवीन काय ऐकायचं हे समजण्यासाठी वेगवेगळी आवड असणारा मित्रपरिवार हवा. त्यांच्यात संगीताची देवाण-घेवाण झाली तर बहुश्रुत होता येईल. 

*** 

आता गाणं ऐकण्याची पद्धत बदलली आहे. हेडफोन लावून स्वतःला पाहिजे ती गाणी ऐकता येतात आणि शिवाय दुसऱ्याचं काहीही ऐकू येणार नाही, याचीही तजवीज यातून करता येते! एफएम रेडिओवर आणि टीव्हीवर प्रायोजित गाण्यांचा भडिमार होत असतो. काही चांगले कार्यक्रम आहेत; पण ते हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. आता पालकांनी जर सगळे गानप्रकार जाणीवपूर्वक स्वतः ऐकण्याचा आणि मुलांना ऐकवण्याचा प्रयत्न केला तरच मुलांवर सर्व प्रकारची गाणी ऐकण्याविषयीचे सर्वांगीण संस्कार होऊ शकतात. एकतर लहान वयात पाटी कोरी असते, कान उघडे असतात. आपण जसजसे मोठे होत जातो, तसतशी झापडं लागतात आणि पूर्वी न ऐकलेलं काही ऐकण्याची वृत्ती कमी होत जाते. शास्त्रीय संगीत ऐकणारे सिनेसंगीत पसंत करत नसतील कदाचित आणि गझल ऐकणारे लोकसंगीताला नावं ठेवत असतील! "मोझार्ट, बीथोवन, जाझ हा काही आपला प्रांत नाही,' असं अनेकांना वाटत असेल; पण सिनेसंगीतामधून आपण हे सगळं पूर्वीपासून ऐकत आलो आहोत आणि ते आपल्याला आवडलेलंही आहे. आपली आवड श्रवणीय संगीताची असावी. त्यात जुना काळ-नवा काळ, आपलं-त्यांचं असा काही भेदभाव नसावा. शिवाय, कोणतंही गाणं एकदा ऐकून मत बनवता येत नाही. कारण, नवीन प्रकार ऐकताना आपली पाटी कोरी नसते! 

*** 

पुढची पिढी जे ऐकते ते ऐकलं तर बरंच काही चांगलं हाती लागतं. निरंजन पंडित या युवा संगीतरसिकाला त्याच्या आवडीची गाणी विचारली आणि "नैना ठग लेंगे' हे गाणं त्यानं अर्थासह सांगितलं. या गाण्यात गुलजार यांनी डोळ्यांची भाषा वेगळ्या पद्धतीनं मांडली आहे. या गाण्यात अंतऱ्याला सतार फार छान वाजते. "ओंकारा' सिनेमासाठी राहत फतेह अली खान यांनी अतिशय सुरेल गायलेलं हे गाणं संगीतबद्ध केलं आहे विशाल भारद्वाज यांनी. जग पूर्वीही सुंदर होतं, आताही आहे, आपण काय ऐकतो त्यावर सगळं अवलंबून असतं. गाणी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ऐकण्याविषयीच्या या सदराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्या वाचकांचे आभार. 

*** 

कवी-गीतकार गुरू ठाकूर यांनी "नटसम्राट' या सिनेमासाठी लिहिलेली नांदी नव्या काळासाठी आवश्‍यक आहे आणि हे गाणं युवक ऐकत असतात हे विशेष. अजित परब यांचं संगीत प्रसंगानुसार आहे. गायक आहेत विजय प्रकाश. या गाण्यात वर्णन केल्यानुसार, आपणही असेच आशावादी राहू. संगीत चहूबाजूंनी येत आहे. त्याचा खुल्या दिलानं स्वीकार करू या. आपल्या आवडी जपण्याबरोबरच संगीतातले नवनवीन प्रकार, प्रयोग ऐकत राहण्याचा कान तयार करू या... बहुश्रुत होऊ या... 

मिटुनि लोचने घे भिरभिरती 
सूर नांदिचे बघ दरवळती 
लालचुटुक मखमाली आता 
अलगद ही उमलेल 
भारुनिया अवकाशच अवघा 
खेळ नवा रंगेल...! 

(हे पाक्षिक सदर आता समाप्त होत आहे) 
 

Web Title: Saptrang Sunday Article Suhas Kirloskar writes on music