कुडलसंगमच्या भेटीला नवं वर्ष सरकत होतं... 

उत्तम कांबळे
रविवार, 31 डिसेंबर 2017

कृष्णा आणि मलप्रभा या दोन मोठ्या नद्यांची गळाभेट जिथं होते, त्या जागेला कुडलसंगम म्हणतात. लिंगायत धर्माचे संस्थापक भगवान बसवेश्‍वर यांचं सुंदर स्मारक याच संगमावर आहे. बसवण्णा जसे संगमावर उभे आहेत, तसं आपल्या सगळ्यांचं आयुष्यही विधायक गोष्टींच्या संगमावर उभं राहावं, अशी प्रार्थना करताना मला संकोच वाटत नाही. जुनं वर्ष मावळायच्या आणि नवं वर्ष सुरू व्हायच्या संधिकालात मी या संगमाच्या ठिकाणीच होतो. आता भिंतीवर उद्या नवं कॅलेंडर उगवेल. नव्यातून नवी स्वप्नंही उगवतील. आपण मात्र "जुनं मावळलं' म्हणू या नको, तर "नवं उगवलं' म्हणू या... कागदावरची, रस्त्यावरची फिरस्ती कधीतरी संपते; पण काळजावरची फिरस्ती कायम राहते...ती कायम राहील, या भावनेनं निरोप घेऊ या... 

विजापूरमध्ये आदिलशाहीच्या अनेक ऐतिहासिक खुणा वास्तुरूपात आजही दिमाखात उभ्या आहेत. त्यात एक बारा कमानींची इमारत ही गुरू हजरत अब्दुल रजाक कादरी यांच्या समाधीची वास्तू म्हणजे जोड घुमट. दुसऱ्या इब्राहिम आदिलशहानं आपली पत्नी ताज सुलतानच्या स्मरणार्थ बांधलेली ताजबावडी म्हणजे ताज तालाब, उपरी बुरूज, इब्राहिम रोजा वगैरे अन्यही काही वास्तू; पण सगळ्या जगाला खेचून घेतोय तो गोल घुमट. सातवा आदिलशहा महंमद यानं बांधलेला गोल घुमट जवळपास चारशे वर्षं गर्दी खेचून घेतोय. या घुमटात आपल्याच आवाजाचे सात वेळा प्रतिध्वनी निघतात. इराणचा मलिक संदल याचं हे स्थापत्य आहे. अनेक वेळा या घुमटात गेलो होतो. आवाजावर मर्यादा येण्याच्या काळात पुन्हा एकदा या घुमटात जाऊन मोठा आवाज काढावा, शिट्ट्या वाजवाव्यात म्हणून पुन्हा घुमटात गेलो. तसे अनेक जण म्हणजे रोज आठ-दहा हजार लोक इथं येतात. आपलाच आवाज सात वेळा ऐकून आनंदी होतात. पूर्वी म्हणे घुमटाच्या एका भिंतीला मनगटावरचं घड्याळ टेकवलं, की त्याची टिकटिक दुसऱ्या भिंतीत ऐकू यायची...त्याच्यापूर्वी म्हणे हृदयाची धडधडही ऐकू यायची. अशा अनेक दंतकथा या वास्तूमुळं तयार झाल्या आहेत. 

खरंतर मला जायचं होतं कुडलसंगमाला. कृष्णा आणि मलप्रभा या दोन मोठ्या नद्यांची गळाभेट जिथं होते, त्या जागेला कुडलसंगम म्हणतात. भगवान महावीर आणि भगवान बुद्ध यांच्यानंतरचे मोठे समाजक्रांतिकारक व लिंगायत धर्माचे संस्थापक बसवेश्‍वर यांच्या जन्माचं हे ठिकाण. एका क्रांतिकारकाचं विलोभनीय, कल्पक आणि सुंदर असं स्मारक नदीत बांधण्यात आलेलं आहे. कृष्णा आणि मलप्रभा या भगिनी जणू काही या स्मारकाला गोंजारतात, आपल्या कुशीत घेऊन वात्सल्य देतात, असा भास व्हावा इतकं सुंदर हे स्मारक आहे. बसवेश्‍वरांनी जातीवर, अंधश्रद्धांवर प्रहार केला. बसव मंडपांची स्थापना झाली. अनेक जातिधर्मांतल्या, तसंच शूद्र-अतिशूद्र लोकांना आपल्या धर्मात त्यांनी प्रवेश दिला. शेकडो शरणांनी म्हणजे शिष्यांनी वचनरचना केली. माणुसकीचा अर्थ आणि तिचाच धर्म सांगण्याची वचनं जगप्रसिद्ध आहेत. वचनांचं एक युगच भारतात होऊन गेलं. या युगाच्या सर्व पाऊलमुद्रा जतन करण्याचा प्रयत्नही होतोय, ही आणखी चांगली गोष्ट आहे. डॉ. वीरण्णा राजूर, डॉ. एम. एम. कलबुर्गी आदी अनेक विद्वानांनी वचनांचा अभ्यास केला. मराठीत व अन्य अनेक भाषांत ती अनुवादित झाली आहेत. मूलतत्त्ववादानं भरून वाहणाऱ्या सध्याच्या वातावरणात लोकप्रबोधनासाठी आणि लोक घडवण्यासाठी या वचनांची खूप आवश्‍यकता आहे. बसवेश्‍वरांचा धर्म म्हणजे सनातन विषमता फेकून तयार केलेला एक नवा समाज होता. या समाजात जातीजातीचं नव्हे, तर माणसामाणसाचं नातं होतं. 

बसवेश्‍वरांचं कर्तृत्व आठवत आठवत स्मारक पाहताना खूप आनंद होतो. खरं तर इथं ठिकठिकाणी बसवेश्‍वरांची क्रांतिकारी वचनं कोरायला हवी होती. असो. या तीर्थस्थळाला भेट दिली तेव्हा लिंगायत समाजाचं खूप मोठं आंदोलन कर्नाटकात नुकतंच होऊन गेलं होतं. आपल्या समाजातल्या लोकांच्या नावासमोर "लिंगायत धर्म' लिहिण्याची मान्यता मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. ही मागणी झाल्यानंतर काही दिवसांतूनच नागपूरमधून एक आवाज आला. अर्थात, तो काही नवा नव्हता. जुन्याचा प्रतिध्वनीच होता ः "या देशातला प्रत्येक जण हिंदूच आहे...' आता काय होणार, हा प्रश्‍नच आहे; पण बसवेश्‍वरांची वचनं काळाला चिरून पुरून उरणारी आहेत. कुडलसंगम देवाला साक्षी ठेवून त्यांनी प्रचंड रचना केली आहे. "कुत्रं पालखीत बसलं तरी त्याचा हाडं चघळण्याचा स्वभाव जात नाही' किंवा "आपलं मन विनाकारण भटकू नये म्हणून त्याला पांगळं का ठेवा?' "लाखेचा वितळणारा देव कसा म्हणू?' किंवा "दांभिक भक्ताचा शेजार नको' किंवा "कुळ कोणतंही असलं तरी काय... माणसा, उगीच आशा करू नकोस; इथं काहीच स्थिर नाहीय,' अशी अनेक वचनं नवा माणूस, नवा समाज घडवण्याचा प्रयत्न करतात. जातिव्यवस्थेवर बसवण्णा शेवटचा प्रहार कसा करतात आणि स्वतःची ओळख कशी करून देतात हे पाहा... 

वडील आमचे मादार चेन्नया 
आजोबा आमचे डोहार कक्कया 
चुलते आमचे चिक्कया पहा 
दादा आमचे किन्नरी बोम्मया 
मज का बरे जाणत नाही, कुडलसंगम देवा 

बसवयुगाचं कितीही वर्णन केलं तरी थोडंच आहे. भारतात जन्माला आलेल्या प्रत्येकानं एक तरी बसववचन आपल्या आयुष्यात कधीतरी वाचावं एवढंच म्हणता येईल. 

स्मारकातून पाय निघता निघत नव्हता; पण बदामी, ऐवळी करत बेळगाव गाठायचं होतं. सकाळी येळ्ळूर या सतत गाजणाऱ्या मराठी गावात परशुराम मोटराचे व त्याची बहीण सरिता मोटराचे यांच्यासोबत मधुकर या मराठी माणसानं मराठी मुलांसाठी सुरू केलेल्या "चांगळेश्‍वरी' या हायस्कूलमध्ये गेलो. बेळगाव जिल्ह्यात अजूनही सुमारे दोन हजार मराठी शाळा आहेत. त्यांची संख्या जास्त असली, तरी विद्यार्थिसंख्या आणि शासकीय मदत याअभावी त्या रोडावत आहेत. मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकवणारी सुमारे शंभर ग्रंथालयंही आहेत. बेळगाव जिल्ह्यात दर वर्षी दहा तरी मराठी साहित्य संमेलनं होतात. या सगळ्यांना महाराष्ट्र शासनानं आर्थिक अनुदान द्यायचं ठरवलं होतं. एक-दोन वर्षं ते दिलं आणि नंतर कायमचंच बंद झालं. ग्रंथालयं आयसीयूमध्ये गेल्यासारखी आहेत. त्यातूनही जिद्दीनं चालणारी ग्रंथालयं काही प्रमाणात आहेत. कुद्रेमनी या गावातल्या "बलभीम' या छोट्याशा मराठी ग्रंथालयाला भेट दिली. राज्य शासन म्हणजे आपलं महाराष्ट्र शासन थोडं उदार झालं, की सीमाभागातल्या मराठी संस्कृतीला संजीवनी मिळू शकते. ग्रंथालयं, संमेलनं, शाळा ऊर्जितावस्थेत येऊ शकतात; पण हे सरकारला सांगायचं कुणी? नुसतंच "झालाच पाहिजे' म्हणून काय उपयोग? "आपला विचार आणि वर्तनव्यवहार बदला', असं महाराष्ट्र सरकारला कोण सांगणार? सरकार कॉंग्रेसचं की भाजपचं, हा प्रश्‍न नाहीच! 
कर्नाटकातून पाय काढताना नेहमीप्रमाणेच मन उदास होतं. त्यातही सीमाभागातून पाय काढताना मनात एक काहूर माजतं. खरंच वर्षानुवर्षं त्यांनी जपलेल्या स्वप्नांचं, त्यांच्या लढायाचं काय होणार...? कर्नाटक सोडताना जुनं वर्ष 360 घरं पार करून नव्याच्या स्वागतासाठी पुढं सरकत होतं आणि नवं वर्ष उगवण्यासाठी आतुर होताना दिसत होतं. आपल्या शरीरावर साचलेले चित्र-विचित्र अनुभवांचे, घटना-घडामोडींचे प्रसंग बाजूला सारून मोड बाहेर पडतोय, असं वाटत होतं. 

नव्या वर्षापासून "फिरस्ती' हे सदर बंद करायचं होतं. खूप वर्षं ते लाखो वाचकांच्या हातात हात घालून चाललं. सगळे वाचक हजारो प्रसंगांचे, घटना-घडामोडींचे साक्षीदार झाले. या सदरानं हजारो कुटुंबं, माणसं उभी केली. दुःख वाटून घेतलं. सुख वाटून घेतलं. माणुसकीचा उजेड अजून शिल्लक आहे, हेच जणू काही वाचक सांगत होते. मराठीत वाचक कमी होतोय, हे कधी "फिरस्ती'च्या कॉलमला पटलं नाही. "सकाळ'च्या अंगा-खांद्यावर "फिरस्ती'चा एक मोठा परिवार तयार झाला. या परिवारानं अनेक प्रश्‍न सोडवण्यात पुढाकार घेतला. ऊर्जेचे, विधायकतेचे सुंदर झरे तयार केले. "फिरस्ती'तून दहा-बारा पुस्तकं तयार झाली. त्यांनाही उदंड प्रतिसाद दिला. या सदरानं नवी लेणी खोदली, जुन्यांचा जीर्णोद्धार केला. हजारो माणसांना आणि त्यांच्यातल्या माणसांनाही पाहता आलं. अलीकडच्या काळात एकाच माणसानं "सकाळ'सारख्या मोठ्या दैनिकात आठ-दहा वर्षं अखंडितपणे चालवलेलं सदर दुर्मिळच असावं. या सदराचं सांस्कृतिक, सामाजिक आणि धर्मनिरपेक्ष चळवळीत रूपांतर झालं. जगात शब्दच सामर्थ्यशाली असतात, याचं प्रत्यंतर मला अनेक वेळा आलं. माणसाच्या काळजात आणि डोळ्यांत दुष्काळ कायमस्वरूपी मुक्कामाला येत नाही, हेही मला पुनःपुन्हा कळून चुकलं. "माणुसकीचा जागर' असंही स्वरूप या सदराला प्राप्त झालं. सदरातल्या अनेक घटनांवर कविता, नाटकं, बोधपट झाले. काही घटनांवर चित्रपटनिर्मितीच्या हालचाली सुरू आहेत. एका लेखानं सुमारे पन्नास लाख रुपये एका कुटुंबाला मिळाले. चिखलवाडीतल्या आदिवासींना कोंबड्या देण्यापासून ते उंदीर आणि घूस खाणाऱ्या पाड्यावर अन्नाचा वर्षाव करेपर्यंत, सोलापुरातल्या एका चर्मकाराला संगणक देण्यापासून ते गावागावांना राज्यघटना देईपर्यंत, पन्नालाल गाढवाचं सजवलेलं; पण खोटं जीवन पाहण्यापासून ते अनेक अवलिया माणसांपर्यंत अनेक व्यक्ती, प्रसंग आणि अनुभव यांना सदरानं कवेत घेतलं. अनेक विधायक कामं "फिरस्ती'च्या वाचकांनी केली. आता हे सदर बंद करताना मलाही हुरहूर आहे; पण ज्याला प्रारंभ असतो, त्याला शेवटही असतो, हेही तितकंच सत्य आहे. कुडलसंगममधून आणि एका मराठी शाळेतून "फिरस्ती'मधला हा शेवटचा लेख लिहिताना मला खूप आनंद होतो आहे. दोन पवित्र नद्यांच्या संगमावर बसवण्णा जसे उभे आहेत, तसं आपल्या सगळ्यांचं आयुष्यही अशाच विधायक गोष्टींच्या संगमावर उभं राहावं, अशी प्रार्थना करताना मला संकोच वाटत नाही. प्रार्थना प्रश्‍न सोडवत नाही; पण तिकडं घेऊन जातेय, हेही मला ठाऊक आहे. भिंतीवर उद्या नवं कॅलेंडर उगवेल. नव्यातून नवी स्वप्नंही उगवतील. सगळं काही अनित्य आहे. तेच कायम आहे. जुनं मावळलं म्हणू या नको, तर नवं उगवलं म्हणू या. कागदावरची, रस्त्यावरची फिरस्ती संपणारच होती; पण काळजावरची फिरस्ती कायम ठेवून निरोप घेऊ या... 

(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे) 

Web Title: Saptrang Sunday Article Uttam Kamble column in Sakal