कथेच्या आदिम मशाली (विद्या सुर्वे-बोरसे)

विद्या सुर्वे-बोरसे vidyasurve99@rediffmail.com
Sunday, 1 November 2020

चतुराईच्या गोष्टी पंचतंत्र आणि इसापनीतीतही भेटतात. कोल्हा हा खरंतर चतुर आहे. पण आपण त्याला चतुर म्हणत नाही, आपण त्याला धूर्त म्हणतो, लबाड म्हणतो. लबाडी कोणती? धूर्तपणा कोणता? आणि चातुर्य कोणतं? हे बालकुमारांना अगदी त्या वयात उमगून येतं, त्याचं कारण त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या या छोट्या-मोठ्या गोष्टी. आपली विद्वत्ता, आपली हुशारी ही समाजहितासाठी असते, इतरांचं भलं करण्यासाठी असते, संकटातून मार्ग काढण्यासाठी असते, याबाबतचे संस्कार उपदेशाचा कोणताही डोस न पाजता चातुर्यकथांनी केले आहेत.

चतुराईच्या गोष्टी पंचतंत्र आणि इसापनीतीतही भेटतात. कोल्हा हा खरंतर चतुर आहे. पण आपण त्याला चतुर म्हणत नाही, आपण त्याला धूर्त म्हणतो, लबाड म्हणतो. लबाडी कोणती? धूर्तपणा कोणता? आणि चातुर्य कोणतं? हे बालकुमारांना अगदी त्या वयात उमगून येतं, त्याचं कारण त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या या छोट्या-मोठ्या गोष्टी. आपली विद्वत्ता, आपली हुशारी ही समाजहितासाठी असते, इतरांचं भलं करण्यासाठी असते, संकटातून मार्ग काढण्यासाठी असते, याबाबतचे संस्कार उपदेशाचा कोणताही डोस न पाजता चातुर्यकथांनी केले आहेत.

भारतात अनेक अजरामर राजे-महाराजे होऊन गेले, सम्राट अकबर हा त्यांपैकी एक. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात त्याचं स्वत:चं स्थान आहे. न्यायप्रिय, सहिष्णू आणि जनहितदक्ष राजा म्हणून सम्राट अकबराचा उल्लेख केला जातो. अकबरानं लोकहिताचे घेतलेले निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी हा भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांचा मांडणीचा आणि चर्चा-चिकित्सेचा विषय असतो. तथापि, सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालेली अकबराची प्रतिमा मात्र लोककथा आणि दंतकथांमधून निर्माण झालेली आहे. अकबर-बिरबलाच्या कथांनी अकबराला राजा म्हणून अमर केलं आहे. अकबराएवढी प्रसिद्धी कुठल्याही दुसऱ्या मुगल सम्राटाला मिळाली नाही. लोकांमधील सम्राट अकबराची कथा ही केवळ एकटी त्याची कथा नाही, ती जेवढी अकबराची आहे, तितकीच ती बिरबलाचीदेखील आहे. किंबहुना बिरबलाच्या शहाणपणाच्या गोष्टींमुळं अकबराची प्रतिमा सामान्यांना आपली वाटते. राजा जेव्हा जेव्हा विचारात पडतो, अडचणीत सापडतो, जेव्हा त्याच्यावर अरिष्ट कोसळतं, त्या त्या वेळी आपल्या बुद्धीचा, चातुर्याचा वापर करून बिरबल संकटाचं निवारण करतो. बिरबल हा जनतेचा प्रतिनिधी आहे, सदैव जनतेच्या बाजूचा आहे, त्यामुळं इतर मंत्री-संत्री आणि सरदार-उमराव जेव्हा लोकांच्या परिघाच्या बाहेर आहेत, राजदरबारात जेव्हा सामान्यांना प्रवेश नाही, त्या काळात बिरबलाची दारं रात्री-अपरात्रीही सर्वांसाठी खुली आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सामान्यातील सामान्य वाटणारा फाटका माणूसही त्याला सहज भेटू शकतो आणि आपलं गाऱ्हाणं त्याच्या कानी घालू शकतो. त्याच्याकडं न्यायासाठी मदतीची याचना करू शकतो. बिरबलही असा, की तो सदैव मदतीला तयार आहे. तो अकबराचा सेवक आहे. व्यवस्था ‘राजा बोले दल हाले’ अशी आहे, तथापि बिरबल प्रसंगी सम्राट अकबराच्या डोळ्यांतही अंजन घालतो. वास्तवाची दुसरीही एक बाजू आहे, हे राजाला एकही शब्द न बोलता, अगदी युक्तीनं पटवून देतो. तिथं चातुर्य आहे. म्हणूनच बिरबलाची खिचडी शतकं ओलांडून गेली, तरी जनमानसात अजूनही लोकप्रिय आहे. घडाभर चुना घेऊन जाणाऱ्या पानवाल्याला ‘चुन्यात लोणी मिसळवून जा,’ असा त्यानं दिलेला सल्ला उपयुक्त वाटतो किंवा ‘बुंद से गयी वो हौद से नहीं आती,’ हे त्याचं विधान शतकं ओलांडून गेलं तरी आजही चपखल बसतं.

राजा विक्रमादित्य सोडला, तर अशी प्रसिद्धी इतर सम्राटांना अथवा राजेरजवाड्यांना फारच कमी मिळाली. राजा विक्रमादित्य हा जात्याच हुशार होता, जे इतर राजांनी अभावानेच केलं, ते जनतेची दु:खं जनतेत जाऊन समजून घेण्याचं मोठं काम त्याने केलं. वेश बदलवून राजा विक्रमादित्याचं लोकांत मिसळणं हे विलक्षण आहे. तो आपल्या सिंहासनाला जागला, राजधर्माला जागला, हे अगदी सहज कळून येतं.

राजपुत्र ठकसेन, तेनालीरमण ही सगळी भारतीय जनतेला प्रिय असणारी चतुर माणसं आहेत. त्यांच्या चातुर्यकथांमुळं त्या काळातील राजेसुद्धा लक्षात राहिले.

चातुर्यकथा हे बालकुमार साहित्याचं महत्त्वाचं अंग आहे. इसापनीती, पंचतंत्र, सिंहासनबत्तीशी, वेताळपंचविशी, शुकबहात्तरी, एक हजार एक अरबी रात्री, गलिव्हर्स ट्रॅव्हल्स अशा सगळ्या कथाकहाण्यांत शहाणपणाच्या पुष्कळच गोष्टी आहेत. हे शहाणपण केवळ गोष्टींपुरतंच मर्यादित राहिलेलं नाही, तर ते झिरपत झिरपत समाजातील प्रत्यक्ष व्यवहारात रुजलं आहे. लोकव्यवहारातील म्हणी, वाक्प्रचार यांना या गोष्टींचं अधिष्ठान लाभलं आहे. लोकव्यवहारात एखादा दृष्टांत पटवून देण्यासाठी आजही या कथा सांगितल्या जातात.

शिशू, बाल आणि कुमार अशा तिन्ही गटांना चतुरपणा आवडतो, साहस आवडतं आणि न्यायाची बाजू आवडते. ‘अंधेरा कायम रहे’ म्हणणारा खलनायक कुठल्याही काळातील बालकांना आपला वाटलेला नाही. मुलं नेहमीच सुष्ट शक्तींच्या, चांगुलपणाच्या बाजूला उभी राहतात आणि त्यामुळं त्यांचा होणारा अंतिम विजय बालकांना स्वत:चा विजय वाटत असतो. ‘चंपक’ वनातील प्राण्यांच्या गोष्टी वाचताना मुलं रममाण होतात, ते केवळ चित्रांमुळं नाही, प्राण्यांच्या वर्तन-व्यवहारामुळं नाही, तर कुठंतरी त्यांनी या कथानकाला स्वत:शी जोडून घेतलेलं असतं.

कुमार गटातील वाचकांना साहसकथा आकर्षित करत असतात. या साहस कथांमध्येही चातुर्याला मोठा वाव मिळाला आहे. ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ या म्हणीच्या मुळाशी हा शहाणपणाच रुजलेला आहे. शेरलॉक होम्सच्या हेरकथा असोत, की आपल्याकडील फास्टर फेणे, बोक्या सातबंडे, समशेर कुलुपघरे यांच्या हकीकती... तिथं साहस आहेच. त्यासोबत बुद्धीचं गतिमान धावणंही आहे.

चाचा चौधरी कॉमिक्स हे किशोरांना खूप आवडत असे. चाचा चौधरी आणि साबू यांची जोडीगोळी कुमारांच्या गळ्यातील ताईत झाली होती. कार्टूनिस्ट प्राण यांनी या दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये अफाट जादू भरलेली होती. ‘चाचा चौधरींचा मेंदू संगणकापेक्षा जलदगतीनं विचार करतो’ अशी एक ओळ या कॉमिक्समध्ये हमखास वाचायला मिळत असे आणि त्यामुळंच मंगळ ग्रहावरून आलेल्या साबूपेक्षा आपल्या मातीतले चाचा चौधरी धमाल उडवून देत. डोगा, नागराज, सुपरकमांडो ध्रुव, फॅन्टम, ही मॅन अशा इतर कॉमिक्सच्या तुलनेत चाचा चौधरी बालवाचकांत लोकप्रिय झाले, त्याचं कारण त्यांची चतुराई. चाचा चौधरी हे डोगासारखे बलवान नाहीत, सुपरकमांडो ध्रुवसारख्या अचाट शक्ती त्यांच्याकडं नाहीत, नागराजसारखे ते अमानवी नाहीत. चारचौघांसारखे, आजूबाजूच्या कोणत्याही सामान्य व्यक्तीसारखे ते आहेत. पण त्यांच्याजवळ असणारी तर्क आणि विचार करण्याची शक्ती अफाट आहे. कार्यकारणभाव आणि दोन भिन्न गोष्टींतील संगती लावण्याची चाचा चौधरींची बुद्धिमत्ता बालकुमार वाचकांनाही वेगळा विचार करायला भाग पाडत असते. मोगली, टारझन यांच्या कहाण्यांत भेटणारं साहस आणि चातुर्य पुन्हा निराळं आहे, त्याला बालबुद्धीचा स्पर्श आहे.

चतुराईच्या गोष्टी पंचतंत्र आणि इसापनीतीतही भेटतात. कोल्हा हा खरंतर चतुर आहे. पण आपण त्याला चतुर म्हणत नाही, आपण त्याला धूर्त म्हणतो, लबाड म्हणतो. लबाडी कोणती? धूर्तपणा कोणता? आणि चातुर्य कोणतं? हे बालकुमारांना अगदी त्या वयात उमगून येतं, त्याचं कारण त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या या छोट्या-मोठ्या गोष्टी. आपली विद्वत्ता, आपली हुशारी ही समाजहितासाठी असते, इतरांचं भलं करण्यासाठी असते, संकटातून मार्ग काढण्यासाठी असते, याबाबतचे संस्कार उपदेशाच्या तात्पर्याचा कोणताही डोस न पाजता चातुर्यकथांनी केले आहेत.

आपण थोरामोठ्यांची चरित्रं वाचतो, त्यांत रममाण होतो. संकटं सर्वांच्याच आयुष्यात असतात, लढाई प्रत्येकालाच लढावी लागते, आणीबाणीच्या काळात न डगमगता, स्वतःचा विश्वास न हरवता जिद्दीनं जे पुढे चालत राहिले, ते यशस्वी झाले. त्यांचा जीवनप्रवास वाचताना तिथंही चातुर्याच्या कथा आपल्याला सापडतात. छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराजा सयाजीराव गायकवाड, अब्राहम लिंकन, जॉर्ज वॉशिंग्टन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी या महान विभूतींची चरित्रं वाचत असताना कितीतरी चातुर्यकथा भेटतात, आपल्यालाही त्यातून बोध मिळतो. आपल्यावर एक संस्कार होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रात तर अशा कथा पानोपानी आहेत. गनिमी काव्याचं तंत्र, दिल्ली-आग्र्याहून सुटका, विशालगड आणि प्रतापगडावरील पराक्रम, सिंहगड, रायगड यांच्या कथा यांत तेज आहे, पराक्रम आहे आणि चातुर्यही आहे.

आपल्याकडं दरवर्षी बालकांना देशपातळीवर शौर्य पुरस्कार दिला जातो. अतुलनीय कर्तबगारी करणाऱ्या बालकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान केला जातो. या मुलांच्या कथा वाचल्या, ऐकल्या, तर त्यातही चातुर्याचा धागा आहेच. या साहसीवीरांची कथा पुन्हा पुन्हा लिहिणं गरजेचं आहे.

चतुरपणाच्या गोष्टी मानवाला समंजस, विचारी, विवेकी आणि सजग बनवतात. या गोष्टी मानवाला प्रत्येक कडू-गोड प्रसंगी मार्गदर्शन करत असतात. आपल्याला लक्षात येईल, की बाल - कुमारांचं वय संपून गेलं, तरी चातुर्य कथा आपल्या हाताचं बोट सोडत नाहीत, त्या सदैव आपली सोबत करत राहतात. या कथा अशा आदिम मशालीसारख्या असतात, ज्या आपली काळोखाची वाट प्रकाशानं उजळून टाकत असतात.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saptrang Vidya Surve Borse Write Article