esakal | मराठी मालिकांचा ‘कन्टेंट’मेंट झोन! (आदित्य दवणे)
sakal

बोलून बातमी शोधा

aaditya davane

आज टेलिव्हिजनवरच्या मराठी मालिका बघताना एक तीव्र मानसिक, सांस्कृतिक तडाखा मेंदूला बसतो. ‘आपण हे काय पाहतोय!’ असं क्षणभर वाटून जातं.मराठी चित्रपट एकीकडे कोशातून बाहेर येत असताना, मालिका मात्र नेमका उलटा प्रवास करत आहेत का अशी शंका मनात आज निर्माण होते.

मराठी मालिकांचा ‘कन्टेंट’मेंट झोन! (आदित्य दवणे)

sakal_logo
By
आदित्य दवणे davane.aditya@gmail.com

आज टेलिव्हिजनवरच्या मराठी मालिका बघताना एक तीव्र मानसिक, सांस्कृतिक तडाखा मेंदूला बसतो. ‘आपण हे काय पाहतोय!’ असं क्षणभर वाटून जातं.मराठी चित्रपट एकीकडे कोशातून बाहेर येत असताना, मालिका मात्र नेमका उलटा प्रवास करत आहेत का अशी शंका मनात आज निर्माण होते. ‘कौटुंबिक, कौटुंबिक’ म्हणत मनोरंजनाच्या करंजीच्या आत भरलं जाणारं सारण खरंच तेवढं पौष्टिक, चविष्ट आहे का? की भुकेलेला माणूस मिळेल ते खातो त्यानुसार मराठी टेलिव्हिजनचा आजचा प्रेक्षक ‘दिसेल ते बघतो’ असं झालं आहे?

‘कलाकृतीला नक्की सांगायचं काय आहे?’ या प्रश्नाला पूर्वीपेक्षा आज अधिक महत्त्‍व प्राप्त होताना दिसत आहे. आज सजग रसिक कुठल्याही भाषेतून सादर होणाऱ्या दृक्-श्राव्य कलाकृतींमधील मजकूर - कन्टेंट - चोखंदळ वृत्तीनं तोलून-मापून स्वीकारतो. स्ट्रीमिंग माध्यमाला (नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम) सामोरा गेलेला हा रसिक फक्त वरवरचं पॅकेजिंग बघून त्याला भुलत नाही, तर विषय काय, कलाकृतीचा आशय काय याचा अभ्यास करून त्या मनोरंजनाकडे वळतो आणि म्हणूनच, दर्जेदार असं काही या रसिकवर्गाला तितक्याच निगुतीनं सादर करण्याचं सर्जनशील बंधन निर्मात्यांवर आणि कलाकारांवर येतं आणि ते ते आनंदानं निभावतात. अशा प्रकारे व्यावसायिक आणि प्रायोगिक कलेच्या अविस्मरणीय मिलापाची अनुभूती अशा कलाकृतींच्या आस्वादनातून आपण घेऊ शकतो हेच लॉकडाउनच्या सक्तीच्या काळात समग्रतेनं अनुभवता आलं. जागतिक चित्रपट, मालिका खरोखर मनाला समृद्ध करून गेल्या, करत आहेत. पाचेक महिन्यांच्या कालावधीत मनोरंजनाच्या दृष्टीनं इतका सलग ‘वसूल’ काळ गेल्यानंतर आज टेलिव्हिजनवरच्या मालिका बघताना एक तीव्र मानसिक, सांस्कृतिक तडाखा मेंदूला बसतो. ‘आपण हे काय पाहतोय!’ असं क्षणभर वाटून जातं. सतत या स्ट्रीमिंग माध्यमातून मनोरंजन अनुभवल्यानंतर लगेच वाहिन्यांवरील मालिका बघताना समोरचा विरोधाभास जागतिक आणि भारतीय मालिकांच्या ‘कन्टेंट’मधला गुणात्मक फरक अधोरेखित करतो. मातृभाषा मराठी असल्यामुळे असेल कदाचित; आपल्या भाषेतल्या मालिकांमधला, हाच ‘कन्टेंट’ अनुभवताना मन आज चिंतित होतं. विचारमग्न होतं.
मराठी चित्रपट एकीकडे कोशातून बाहेर येत असताना, मालिका मात्र नेमका उलटा प्रवास करत आहेत का अशी शंका मनात आज निर्माण होते. ‘कौटुंबिक, कौटुंबिक’ म्हणत मनोरंजनाच्या करंजीच्या आत भरलं जाणारं सारण खरंच तेवढं पौष्टिक, चविष्ट आहे का? की भुकेलेला माणूस मिळेल ते खातो त्यानुसार मराठी टेलिव्हिजनचा आजचा प्रेक्षक ‘दिसेल ते बघतो’ असं झालं आहे?

बघायला गेलं तर, हल्ली मालिका त्यांचं शीर्षक आणि शीर्षकगीत इथंच संपतात! त्यांना कथा-पटकथा असली तरी रोज रोज केल्या जाणाऱ्या त्याच त्या भाजीचा नकोसा वास या मालिकांना असतो. रोज तशीच फोडणी देत, चकचकीत नट आपली कला लेखक-दिग्दर्शकाच्या आदेशावरून सादर करतात. घरातलं मूल मालिकेतल्या मुलासोबत मोठं होत असतं...काही वर्षांनी मालिकेत ‘हॅप्पी एंडिंग’ होतं...वाहिन्यांबरोबरचा करार संपतो आणि अनेक कलाकार त्यानंतर विस्मरणात जातात. रसिकांच्या लक्षात राहील आणि स्वतःच्या परिश्रमांचं चीज झाल्यासारखं वाटेल अशी निदान एक तरी भूमिका प्रत्येक अभिनेत्याला आयुष्यात साकारावीशी वाटत असते...आपल्या हातून असामान्य असं काही लिहिलं जावं किंवा दिग्दर्शित व्हावं असं प्रत्येक लेखक-दिग्दर्शकाला वाटत असतं. ते तसं वाटणं आज संपुष्टात आलं आहे का? की त्यांच्या वाहिन्यांचे सर्वेसर्वा त्यांना तसं करू देत नाहीत? आजच्या मराठी मालिका बघताना असे काही प्रश्न पडत राहतात...मराठी एकांकिकांमधून सर्वोत्तम कलाकार बाहेर पडतात; परंतु नंतरच्या काळात मालिकांमध्ये काम करताना किंवा मालिकांसाठी कलेची फक्त सपक ‘नोकरी’ करताना टीआरपीचा बिझनेस यांना सांभाळावा लागणार असेल तर यावर गंभीरपणे विचार केला जाण्याची गरज आहे.

पंचवीस-तीस मिनिटांतल्यांपैकी पंधरा मिनिटं भरगच्च जाहिराती पाहून एक कळतं की अशाही कन्टेंटला मागणी आहे! तेव्हा ‘अभिरुची’ या शब्दाचा मन विचार करू लागतं. घरातल्या चार जणांत आपल्या एकट्याला आवडतं तेच उत्तम आणि आपण सोडून तिघांना आवडतं ते तकलादू, असं कसं? बहुमत खरं त्यांच्या बाजूनं आहे. ज्येष्ठ पिढीला स्ट्रीमिंग माध्यमातली ‘सुंदर ती दुसरी दुनिया’ कदाचित हाताळता न आल्यानं अनेकदा ते तिला दुरावतात, म्हणून आज बहुधा या अशा अनेक मालिकांचं फावतं. मग कुठं तरी शोध लागतो की ही अभिरुची घडवण्यासाठी अनेकदा माध्यमंच प्रभावी ठरतात आणि टेलिव्हिजन हे त्यापैकी महत्त्वाचं माध्यम आहे. सातत्यानं उत्तम, बौद्धिक तरीही मनोरंजक कन्टेंट दाखवून अशा अभिजात मनोरंजनाचीसुद्धा प्रेक्षकांना सवय लागू शकते. कलाकार सोप्या वाटेनं सतत जात राहिला, नवनिर्मितीत त्यानं ‘सर्जनशील जोखीम’ घेतलीच नाही तर मालिकांच्या या क्षेत्रात प्रयोग होणार नाहीत. मालिकांवर प्रेम करणारा प्रेक्षक घरात बसून मालिका बघतो म्हणून त्याला सतत स्वयंपाकगृह आणि दिवाणखाने दाखवायचे व भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवण्यासाठी सोशीक व्यक्तिरेखेवर अत्याचार करायचे हे सूत्र मराठी मालिका अजून किती दिवस अवलंबणार? आणि आणखी एक, मालिकांच्या भागांचे विक्रम करायला ते काही नाटकाचे प्रयोग आहेत का? की जे प्रत्येक प्रयोगाच्या वेळी अडीच तास रक्ताचं पाणी करत, पायाला भिंगरी लावत, वेगवेगळ्या शहरी-गावी फिरत करावे लागतात! रोज आठवणीनं औषध घेतल्यासारखी, ब्रेकच्या मध्ये मध्ये पेरलेली पंधरा मिनिटांची कथा, त्यातही अनेक वेळा फ्लॅशबॅक, दीर्घ पार्श्वसंगीत आणि असंख्य अनावश्यक प्रसंग या सगळ्यात प्रेक्षकाला खरंच रसिक म्हणून काय आणि किती मिळतं? ‘क्वांटिटी’च्या नादात ‘क्वालिटी’त जर तडजोड केली जाणार असेल तर आपल्यावर विश्वास टाकणाऱ्या प्रेक्षकाला गृहीत धरल्यासारखं ते होत नाही का?

मराठी मालिकांच्या वाटचालीत अलीकडच्या काळात ‘अग्निहोत्र’, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ आणि अगदी आत्ताच्या ‘रुद्रम’, ‘१०० डेज्’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ यांसारखे यशस्वी प्रयोग झाले आहेत. त्यामुळे, मराठीतही सकस कन्टेंटची निर्मिती होऊ शकते आणि त्याला मराठी रसिक भरभरून प्रतिसाद देतो हे सिद्ध झालेलं आहे. या आणि अशा अनेक मालिका संपताना हुरहूर वाटत राहते. तेच खरं कलाकारांचं आणि वाहिन्यांचं यश! मात्र, ही काही मोजकीच उदाहरणं. अनेकदा इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रवाहाला सर्वस्व मानणं हे अभिनव कलाकृतीच्या आड येतं आणि मग सारा गोंधळ होतो. आपल्याला फक्त ‘प्रेक्षक’ हवेत की ‘रसिक’ याचा निर्णय मराठी मालिकांच्या निर्माणकर्त्यांनी आता घेतला तर बरं होईल.

हिंदीत किंवा इतर भारतीय भाषांत हे असंच काहीसं सुरू नाही का? तर नक्कीच आहे! परंतु इथं आज अधिक जवळच्या माणसांशी संवाद साधण्याचा सूर आहे. ‘डेली सोप’साठी हलकेफुलके विषय लागत असले तरी त्यात चांगला दर्जेदार कन्टेंट निर्माण करण्याची जबाबदारी आणि प्रेक्षकांमधल्या रसिकांची अभिरुची घडवायचं तसं एक प्रकारचं अवघड काम, ही आजच्या कलाकारांपुढची प्रमुख आव्हानं आहेत. तेव्हा तशा कलाकृती मराठी मालिकांच्या माध्यमातून आपल्याला भविष्यात अनुभवायला मिळतील अशी आशा रसिक म्हणून बाळगायला हरकत नाही.

loading image
go to top