जा जा रे चंदा जा जा रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip Dholkia

लता मंगेशकरांनी गायिलेल्या हिंदी चित्रपटगीतांची संख्या हजारोंच्या घरात असली तरी त्यातल्या हजारभर लोकप्रिय गीतांविषयीच हिरीरीनं बोललं व लिहिलं जातं.

जा जा रे चंदा जा जा रे

- सारंगी आंबेकर saarangee2976@yahoo.co.in

लता मंगेशकरांनी गायिलेल्या हिंदी चित्रपटगीतांची संख्या हजारोंच्या घरात असली तरी त्यातल्या हजारभर लोकप्रिय गीतांविषयीच हिरीरीनं बोललं व लिहिलं जातं. या अजरामर गाण्यांचे जनक अनिल बिस्वास, खेमचंद प्रकाश, सी. रामचंद्र, नौशाद, मदनमोहन, सचिनदेव बर्मन, राहुलदेव बर्मन, शंकर-जयकिशन, सलील चौधरी यांसारख्या मोजक्या संगीतकारांविषयीही बोललं जातं. या सगळ्या संगीतकारांची गाणी संख्यात्मकदृष्ट्या आणि गुणात्मकदृष्ट्या विपुल आहेत.

या पार्श्वभूमीवर, संख्यात्मकदृष्ट्या तुलनेनं कमी; पण गुणात्मकदृष्ट्या अवीट गाणी दिलेल्या संगीतकार रवी, श्यामसुंदर, दिलीप ढोलकिया, सुधीर फडके, रविशंकर यांच्या काही अजोड कलाकृती विस्मृतीच्या तळघरातून शोधून श्रवणानंद द्विगुणित करायचा हा प्रयत्न!

सन १९६२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘प्रायव्हेट सेक्रेटरी’ हा चंदर यांची कथा-पटकथा-दिग्दर्शन असलेला व्यावसायिक चित्रपट. त्यात अशोककुमार, जयश्री गडकर, राजा गोसावी, पौर्णिमा, निसार महंमद अन्सारी असा मोठा नटसंच होता. करमणूकप्रधान चित्रपटासाठी आवश्यक त्या प्रेमकथा, खलनायकी रंगढंग, माफक हाणामारी व विनोदनिर्मितीसाठी लागणाऱ्या सर्व घटकांची हजेरी असूनही परिणाम साधण्यात हा चित्रपट अयशस्वी होतो.

मात्र, याला अपवाद म्हणजे डी. दिलीप अर्थात् दिलीप ढोलकिया यांचं पार्श्वसंगीत व महत्त्वाच्या प्रसंगी नाट्यपरिपोष करणारी सुमधुर, श्रवणीय गाणी! या चित्रपटासाठी त्यांनी मन्ना डे, महंमद रफी व लता मंगेशकर या तीन आवाजांची योजना केली.

चित्रपटाची नायिका बताशी ही नायक अशोककुमार यांच्या पुढाकारानं व सांगीतिक गुरू राजा गोसावी यांच्या मदतीनं नृत्य-गायनकलेत यथावकाश पारंगत होते. त्यामुळे प्रसंगोपात्त प्रेमानुभूती, कलासाधना, रंगमंचीय आविष्कार इत्यादींसाठी गाण्यांची रेलचेल व गुणात्मक कामगिरीला भरपूर वाव होता. चित्रपटातील एकूण सात गाण्यांपैकी माझ्या आवडीच्या तीन गाण्यांबद्दल लिहिते...

ही तिन्ही गाणी लता मंगेशकरांची एकलगीतं आहेत. चित्रपटाच्या साधारण मध्यावर येणारं आणि ‘ॲड-लिब’ ओळींनी सुरू होणारं ‘ओ...सावरे, आ जा प्यार लिए, गाती बहार लिए, के तेरे बिना मोरे नैना हुए बावरे...’ हे शुद्ध सारंग रागातलं गीत. साडेतीन मिनिटांच्या अवधीत सुरुवातीला लता मंगेशकरांची दमदार तान येते. गाण्याची लय नृत्याला वाव देण्यासाठी बऱ्यापैकी द्रुत आहे. दोन्ही कडव्यांची चाल सारखी असली तरी प्रसन्नतेचा सुखद शिडकावा करणारी आहे. गाण्याची रचना बहुतांश मध्यसप्तकात असून त्यात एक आगळं प्रवाहित्व जाणवत राहतं.

मला आवडणारं दुसरं गीत म्हणजे ‘मिले नैन, गया चैन, पिया आन मिलो रे, ना जागूँ, ना सोऊँ मैं सारी सारी रैन...’ सुरुवातीला अंदाजे अठ्ठावीस सेकंदांच्या सुरावटीनंतर गाणं सुरू होतं. चालीचा आलेख माधुर्यानं ओतप्रोत आहे. गाण्याच्या शब्दांशी संवाद करणारा चुस्त ठेकाही लक्ष वेधून घेत राहतो.

चित्रपटाचा मुकुटमणी असणारं सर्वांगसुंदर गीत म्हणजे ‘जा जा रे चंदा जा रे, तेरी चाँदनी भी मेरा जियरा जलाए जा...’ हे चित्रपटात अगदी सुरुवातीला येतं. नायिका एका मोठ्या प्रसंगाला सामोरी जाऊन अनोळखी प्रदेशात दिशाहीनपणे भटकते आहे. तिची असहाय्य वेदना साकार करणारं हे गीत समर्पक शब्दांतून व तरल चालीतून गहिरा परिणाम साधतं.

त्यातली व्याकुळता वरकरणी संयत वाटली तरी चालीची लय व बांधणी यांची सहजसुंदर प्रमाणबद्धता केवळ स्तिमितच करत नाही, तर दूरगामी परिणामही करते. खमाजवर आधारित या गीताची दोन कडवी आहेत. गाण्यातल्या पहिल्याच ‘जा’नंतरचा किंचित् अवकाश आणि नायिकेचं अपार दुःख कवटाळणारी ओळीच्या शेवट येणारी ‘जा’ मधली तान पुनःपुन्हा ऐकून लता मंगेशकरांच्या सामर्थ्याविषयी व सांगीतिक सौंदर्यदृष्टीविषयी काय लिहावं हा प्रश्न पडतो.

वरील तिन्ही रचनांचे गीतकार प्रेम धवन यांनीही अत्यंत सोप्या व गेय शब्दांतून भावनांचा आब कमालीचा सांभाळला आहे. दिलीप ढोलकिया ऊर्फ डी. दिलीप यांचा जन्म ता. १५ ऑक्टोबर १९२१ रोजी गुजरातमध्ये जुनागढ इथं झाला.

‘संगीतकार चित्रगुप्त, एस. एन. त्रिपाठी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे सहाय्यक’ अशी ढोलकिया यांची ओळख रसिकांना असली तरी त्यांनी गायक-गीतकार-संगीतकार अशा विविध भूमिका बजावल्या होत्या. आपल्या कारकीर्दीत एकूण आठ हिंदी व अकरा गुजराती चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं.

एका संगीतप्रेमी कुटुंबात जन्मलेले ढोलकिया हे आजोबा मणिशंकर व वडील भोगीलाल यांच्याबरोबर स्वामीनारायणमंदिरात नित्य संगीतसेवा करत असत. मुंबईला येऊन दोन वर्षं कारकुनी केल्यानंतर संगीतकार खेमचंद प्रकाश यांचे बंधू रतनलाल यांनी ‘किस्मतवाला’साठी (१९४४) त्यांना गायक म्हणून प्रथम संधी दिली. भेंडीबाजार घराण्याचे अमानत अली खाँ यांचे शिष्य पांडुरंग आंबेरकर यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताची तालीम घेतली. गुजराती व हिंदी दोन्ही भाषांत गाणारे ढोलकिया यांनी १९६० मध्ये ‘भक्तिमहिमा’ या चित्रपटाचे संगीतकार म्हणून स्वतंत्रपणे धुरा सांभाळली. एचएमव्ही स्टुडिओमध्ये स्नेहल भाटकर यांच्याबरोबर, तसंच नंतर हृदयनाथ मंगेशकर यांच्याबरोबरही त्यांनी काम केलं. ता. दोन जानेवारी २०११ रोजी मुंबई इथं ढोलकिया यांचं निधन झालं. मोजकी पण दर्जेदार गाणी दिलेल्या या हरहुन्नरी संगीतकाराला विनम्र अभिवादन!

(सदराच्या लेखिका अर्थशास्त्र व संगीत या विषयांतील पदव्युत्तर स्नातक असून लेखन, गायन व अध्यापनक्षेत्रात वीस वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत.)

Web Title: Sarangi Aambekar Writes Music Songs Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top