

- दुर्गा आजगांवकर
दक्षिणपथांवरून मौर्यांचं आधिपत्य नाहीसं होताच आंध्रसत्तेची पूर्वेकडून पश्चिमकडं नांदी सुरू झाली. अशातच महाराष्ट्राला भारतीय राजकारणाच्या मानचित्रावर स्थान मिळवून देणारा इतिहास घडत होता. महाराष्ट्रातल्या प्रतिष्ठान (सध्याचं पैठण) इथं आपली राजधानी स्थापन करणारा सातवाहन राजवंश हा महाराष्ट्रातला ‘पहिला ज्ञात ऐतिहासिक राजवंश’ म्हणून जन्माला आला.
या वंशाला कोरीव लेखांत ‘सातवाहनकुल’, तर पुराणांत आंध्र किंवा आंध्रभृत्य म्हटलं आहे, म्हणून त्यांच्या उदयकाळाबद्दल विसंगती आहे. मात्र, त्यांचा इतिहास प्राचीन भारतातल्या अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण समजला जातो.
इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकापासून ते इसवीसनाच्या तिसऱ्या शतकाच्या मध्यापर्यंत भारत खंडाच्या दक्षिण भागावर (दख्खन प्रांत) सातवाहनांनी राज्य प्रस्थापित केलं. या वंशाचा प्रणेता म्हणून ‘सिमुक (श्रीमुख)’ सातवाहन याचं नाव पुराणांत येतं.
त्यासमवेत त्याचा उल्लेख जुन्नरजवळच्या नाणेघाटातल्या लेण्यांमध्ये कोरलेल्या पुतळ्याखालच्या पीठांवर आढळतो. वंशावळरूपी हे आठ पुतळे आता नष्ट झाले आहेत; पण त्यांची नावं अवशिष्ट आहेत. सध्याचं पुणं, नाशिक, नगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांत त्यानं सत्ता स्थापन करून प्रतिष्ठान हे राजधानीचं ठिकाण निश्चित केलं.
सातवाहन राजवंशाला साधारणतः तीसेक राज्यकर्ते जवळजवळ ४६० वर्षं सर्वात प्रबळ शासक म्हणून लाभले. सातवाहनांच्या कलेची व्याप्ती स्थापत्य, नाणी, शिलालेख, चित्रकला आणि विविध पुराणांमधून आढळते.
सातवाहनांनी रोमनांबरोबरच्या व्यापारउदीमाला उत्तेजन दिल्यानं शेती, उद्योग यांचं प्रतिबिंब राजकीय कारकीर्दीबरोबरच प्रतिभासंपन्न कलेतही दिसून येतं. तत्कालीन काळाशी संबंधित जे कलेचे प्रकार निर्मिले गेले, त्या कलाविष्कारांना प्रातिनिधिक स्वरूपात ‘सातवाहनकला’ असं संबोधलं गेलं.
या संबोधनाला राजकीय संदर्भासह भौगोलिक पार्श्वभूमीही आहे. याच्या देखण्या खुणा म्हणजे पश्चिम भारतात या शासकांच्या कालावधीत निर्मिलेल्या वैभवशाली ‘बौद्धगुंफा’ होत. सातवाहन राजे कृष्ण, गौतमीपुत्र सातकर्णी, पुलुमावी आणि यज्ञश्री सातकर्णी यांनी बौद्ध भिक्षूंकरिता लेणी कोरून घेऊन ग्रामदाने दिल्याचे उल्लेख कोरीव लेखांत मिळतात.
मौर्यांनी सुरू केलेली ही लेणीपरंपरा सातवाहनांनी पुढं विकसित केली. यामध्ये चैत्य आणि विहार हे नवीनात नवीन. सह्याद्री पर्वतरांगेतल्या कोंडिवते, भाजे, तुळजा, पितळखोरा, कोंडाणे, अजिंठा, नाशिक, बेडसा, जुन्नर, कार्ले, कुडा, महाड, कराड आणि कान्हेरी अशी ठिकाणं सातवाहनांच्या स्थापत्याची साक्ष देतात.
सातवाहनकालीन समजल्या गेलेल्या चैत्यगृहांच्या रचनेत दोन्ही बाजूंना स्तंभांची रांग व मागच्या बाजूला अर्धवर्तुळाकार जागा आहे. तिथं गोलाकार स्तूप आणि त्याभोवती प्रदक्षिणापथ, स्तूपावर हर्मिका व एकावर एक तीन छत्रं, स्तूपाच्या समोर मध्यभागी दरवाजा इत्यादी व त्यावर आत प्रकाश पडावा म्हणून अर्धवर्तुळाकृती मोठं वातायन असे.
त्याच्या आकारावरून त्याला घोड्याच्या नालाची खिडकी (Horseshoe Window) म्हणण्याचा प्रघात पडला. याचं उत्तम उदाहरण म्हणून भाजे इथल्या लेणी सर्वांत प्राचीन आणि प्रतिभासंपन्न समजल्या जातात. भाजे-पितळखोरा-कार्ले ही लेणी शिल्पशैलीच्या दृष्टीनं लक्षणीय आहेत. त्यांत स्त्रीपुरुष नर्तकांची दम्पती व मिथुनशिल्पांचा समावेश आहे.
त्यांतल्या काही चित्रांत गौतम बुद्धांच्या चरित्रातले प्रसंग आणि इतर काहींत जातककथा दाखवल्या आहेत. राजांपासून सामान्य ग्रामिकांपर्यंत विविध श्रेणींच्या आणि औद्योगिक लोकांनी दान देऊन ही लेणी शिल्प-चित्रांनी भूषवली होती, असं काही लेखांवरून समजतं.
भारतातली सर्वांत प्राचीन ऐतिहासिक चित्रं सातवाहनकाळातली आहेत. यांमध्ये अजिंठा गुंफा क्रमांक ९ आणि क्रमांक १० यांचा समावेश होतो. जातककथा हे चित्रांचे मुख्य स्रोत असून गौतम बुद्धांचं जीवन आणि त्यांचं पूर्वजीवन अशा विषयांवरच्या प्रसंगांतून संपूर्ण स्तंभ आणि छत आच्छादलेलं होतं.
त्याचबरोबर फुलांच्या आणि प्राण्यांच्या प्रतिमा अतिशय कौशल्यानं साकारलेल्या पाहायला मिळतात. ही चित्रं भाजे, अमरावती, सांची आणि जगय्यापेट इथल्या शिल्पांशी, मुद्रा आणि वैशिष्ट्यं यांच्याबाबतीत साधर्म्य बाळगतात.
सातवाहनकालीन लेणी हीनयान पंथांची असल्यामुळं बुद्धमूर्ती अथवा त्यांची शिल्पं आढळत नाहीत; परंतु बौद्धपद, भद्रासन, स्तूप, बोधिवृक्ष आदींमधून त्यांचं अस्तित्व सूचित होतं. त्या काळी यक्षसंप्रदाय प्रचलित असल्यानं यक्ष-यक्षिणींच्या मूर्ती स्तूपांच्या कठड्यांवर कोरलेल्या, भारहूत इथल्या शुंगकालीन स्तूपाशी संलग्न असलेल्या सापडल्या आहेत.
जणू लाकडांमध्ये कोरीव काम करावं इतक्या सहजतेनं दगडावर कोरलेल्या कलाकृती अमरावती, नागार्जुनकोंडा इथं दिसून येतात. कुमारस्वामींनी अमरावती (आंध्र प्रदेश) इथल्या शिल्पकलेचं वर्णन करताना, ‘भारतीय कलेचं अत्यंत विलासी आणि सुकुमार पुष्प’ असं म्हटलेलं आहे. अमरावतीशैली अधिक प्रवाही, जोमदारपणे विकसित झालेली दिसते. सातवाहनांची परंपरा निश्चितच महान आहे. भारतीय कलेतल्या एकात्मतेतून हे सूक्ष्मातिसूक्ष्म साम्य निर्माण झालं असावं यात शंका नाही.
सातवाहनांचा प्राकृत वाङ्मयालाही उदार आश्रय होता. या काळातल्या हाल नृपतीनं (सतरावा) सातशे गाथांचा निवडक संग्रह ‘गाहा सत्तसई (गाथा सप्तशती)’ या नावानं प्रसिद्ध केला होता. कोट्यवधी गाथांमधून या सातशे गाथा निवडण्यात आल्या असून, त्या विविध दर्जाच्या कवी-कवयित्रींनी रचलेल्या आहेत.
या काळातला दुसरा सुप्रसिद्ध प्राकृत ग्रंथ ‘बृहत्कथा’ हा होय. त्याची इसवीसनाच्या अकराव्या शतकात सोमदेव आणि क्षेमेंद्र यांनी अनुक्रमे केलेली ‘कथासरित्सागर’ आणि ‘बृहत्कथामंजरी’ ही संस्कृत रूपांतरंच सध्या प्रसिद्ध आहेत.
सातवाहनकालीन कला-इतिहास त्यांच्या नाण्यांवरून अधिक विश्वसनीय स्वरूपात अभ्यासता येतो. सातवाहनांनी तांबं, शिसं, पोटीन आणि चांदी या माध्यमांत नाणी पाडली. त्यातली सर्वांत प्राचीन नाणी नेवासे-पैठण भागाशी संबंधित असून ती ‘हत्ती’ प्रकारची आहेत.
त्यांना ‘कार्षापण’ ही संज्ञा असून नाण्यांवरचे लेख प्राकृत भाषेत आहेत व त्यांत ब्राह्मी व खरोष्ठी या लिपींचा उपयोग दिसतो. सातकर्णीच्या नावानं पाडल्या गेलेल्या अनेक प्रकारच्या नाण्यांवर हत्ती, सिंह, प्राणी, झाड, नंदीपद, स्वस्तिक वगैरेंसारखी चिन्हं आणि सातवाहन घराण्याचं राजचिन्ह म्हणता येईल असं ‘चंद्रकोर-अंकित उज्जैन चिन्ह’ आदी प्रकारविशेष आढळतात.
‘गजलक्ष्मी’ दैवताचं चित्रण आणि जहाज, नौका या छापांची नाणी विशेष उल्लेखनीय आहेत. सातवाहनांच्या नाविकसंबंधांचं आणि सामर्थ्याचं सुस्पष्ट चित्रण यावरून समजतं. चांदीच्या छबीयुक्त नाण्यांवर माहाराष्ट्री आणि दक्षिणी अशा दोन प्राकृत भाषांमधले लेख आहेत. प्रदेशपरत्वे तिथल्या परिचित लिपीत लेख कोरण्याची कला यांतून दिसून येते. सातवाहनकालीन नाणी ही मुख्यत्वे ठशांचा वापर करून तयार केली गेलेली असली तरी प्रारंभीच्या काळातली ‘आहत’ नाणीही ज्ञात आहेत.
सातवाहन वंशातला एक अत्यंत बलाढ्य आणि थोर राजा ‘गौतमीपुत्र सातकर्णी’ याला दिली गेलेली कोरीव लेखांमधली ‘तिसमुदतोयपीतवाहन’ (ज्याचे घोडे अरबी समुद्र, दक्षिण महासागर आणि बंगालचा उपसागर या तीन समुद्रांचं पाणी प्यायलेले आहेत) ही उपमा सार्थ आहे. त्यावरून त्याच्या राज्यविस्ताराची कल्पना येते.
तत्कालीन रोमन साम्राज्याशी असणाऱ्या व्यापारामुळं कलेला वाव मिळून त्यांतून व्यापारीमार्गांवर कलाकेंद्रे उदयाला आल्याचं दिसतं. या कलांचं राजधानी प्रतिष्ठान हे मुख्य केंद्र होतं. कल्याण, चौल, सोपारा आदी महत्त्वाची सागरी बंदरं आणि जुन्नर, नाशिक, पैठण, तेर (तगर), भोकरदन, कोल्हापूर (ब्रह्मपुरी) ही महत्त्वाची व्यापारीकेंद्रे व राजकीय केंद्रे होती.
या ठिकाणी झालेल्या उत्खननांत काही हस्तिदंती मूर्ती, रोमन मद्यकुंभ (ॲम्फोरा), मणी, दागदागिने, मातीच्या आणि धातूच्या वस्तू, खेळणी, ठसे अशा बऱ्याच कलाकृती मिळाल्या. विशेष म्हणजे, कोल्हापूरमध्ये रोमन धाटणीची (?) समुद्रदेवता, रोमन कांस्य धातूच्या वस्तूंचा साठा, तर भोकरदन व तेर इथल्या उत्खननांत काही हस्तिदंती स्त्रीमूर्ती मिळाल्या.
त्या इटलीतल्या पोम्पेई इथल्या स्त्रीमूर्तींशी साधर्म्य दर्शवतात. याशिवाय, इतरत्र काही रोमन नाणी आणि देवतांचे ब्राँझचे पुतळे सापडले. त्यांवरून, व्यापाराबरोबरच सातवाहन आणि रोमन यांच्यातली कलेमधली देवाणघेवाण स्पष्ट होते. जवळजवळ अडीच-तीन हजार वर्षांपूर्वी भारतीय कलाकारांनी घडवलेला हा कलात्मक खजिना पाहिल्यावर मन आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही!
(लेखिका ह्या चित्रकार व पुरातत्त्व-सहाय्यक संशोधक असून हैदराबाद इथल्या ‘प्लीच इंडिया फाउंडेशन’मध्ये कार्यरत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.