आगळावेगळा नृत्यानुभव (सतीश पोरे)

सतीश पोरे
रविवार, 23 जून 2019

पश्‍चिम दिशेला क्षितिजावर लाली पसरली. सूर्यास्ताची चाहूल लागली. बाली हे बेट असल्यानं क्षितिजावर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणं अवर्णनीय असतं. सूर्याची स्वारी निरोप घेत होती आणि दुसऱ्या बाजूनं पायऱ्या चढून नृत्यकलाकार रंगमंचावर अवतरत होते. कलाकार रंगमंचावर चक्‌चक्‌ आवाज करू लागले. कसलंही वाद्य नव्हतं, गाणं नव्हतं, संगीत नव्हतं; फक्त तोंडातून निघालेला चकचक आवाज! सर्वांनी एकसुरात आणि हाताची हालचाल करत केलेला चक्‌चक्‌ आवाज एखाद्या तालवाद्यासारखा भासत होता...

पश्‍चिम दिशेला क्षितिजावर लाली पसरली. सूर्यास्ताची चाहूल लागली. बाली हे बेट असल्यानं क्षितिजावर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणं अवर्णनीय असतं. सूर्याची स्वारी निरोप घेत होती आणि दुसऱ्या बाजूनं पायऱ्या चढून नृत्यकलाकार रंगमंचावर अवतरत होते. कलाकार रंगमंचावर चक्‌चक्‌ आवाज करू लागले. कसलंही वाद्य नव्हतं, गाणं नव्हतं, संगीत नव्हतं; फक्त तोंडातून निघालेला चकचक आवाज! सर्वांनी एकसुरात आणि हाताची हालचाल करत केलेला चक्‌चक्‌ आवाज एखाद्या तालवाद्यासारखा भासत होता...

इंडोनेशिया हा देश हिंदी महासागरात आशिया खंडाच्या आग्नेय दिशेस आहे. मात्र, या देशाच्या उत्तरेस दक्षिण चिनी समुद्र आणि पॅसिफिक; तसंच पूर्वेसही पॅसिफिक महासागर आहे. या देशाची सुमारे तीन हजार बेटं पूर्व- पश्‍चिम पसरलेली (अंतर सुमारे पाच हजार किलोमीटर) आहेत. दक्षिणोत्तर अंतर त्या मानानं कमी (सुमारे दोन हजार किलोमीटर) आहे. या देशाच्या दक्षिणेला बाली नावाचं लहानसं बेट आहे. पूर्व-पश्‍चिम विस्तार 145 किलोमीटर, तर दक्षिणोत्तर विस्तार अवघा 88 किलोमीटर आहे. यावरून याच्या छोटेपणाची कल्पना येईल. इंडोनेशियातली बहुतेक सर्व बेटं निसर्गसौंदर्यानं नटलेली असली, तरी गेल्या तीस-चाळीस वर्षांत बालीनं बहुसंख्य पर्यटकांचं लक्ष वेधलं आहे.

काही दिवसांपूर्वी आम्ही बालीला भेट दिली. बालीमध्ये प्रेक्षणीय स्थळं अनेक असली, तरी बालीतलं मुख्य शहर डेनपसारपासून 45 किलोमीटरवरच्या उलवाटू गावातल्या उलुवाटू मंदिराच्या प्रांगणात संध्याकाळी साडेसहा वाजता होणारं केकॅक नृत्य अप्रतिम होतं. बाली लोकांच्या दैनंदिन जीवनात नृत्यनाट्याला (तिथल्या स्थानिक भाषेत नृत्यनाट्याला वायांग- वोंग म्हणतात.) खूप महत्त्व आहे. बाली नृत्यावर हिंदू संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे. नृत्यावरच नव्हे, तर इंडोनोशियन कलेवर भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे. (इसवीसनाच्या पहिल्या शतकात भारतातून हिंदू आणि बौद्ध लोक इथं आले. त्यावेळी मलायोपॉलिनेशियन वंशाचे लोक इथं राहत होते. काही भागांवर भारतीयांचं राज्यही होतं. तथापि, हिंदू आणि बौद्धांचा इथल्या सर्वसामान्य जनतेवर फारसा परिणाम होऊ शकला नाही. तिथल्या पुढारलेल्या वर्गावर मात्र संस्कृत भाषा, हिंदू संस्कृती, साहित्य- त्यात रामायण, महाभारत आलं- यांचा फार परिणाम झाला. तो आजतागायत जाणवतो.)
बालीतल्या नर्तकांना, नृत्यदिग्दर्शकांना रामायणातली कथानकं अधिक भावत असावीत. तथापि, महाभारत; तसंच इतर महाकाव्यांमधल्या देवदेवतांच्या, वीरपुरुषांच्या, वीरांगनाच्या कथाही नृत्याद्वारे सादर केल्या जातात. या नृत्यनाट्यातून अप्सरांऐवजी देदोरी (बालीनीज देवता) या नायक अर्जुनासमवेत नृत्य करतात.

बालीनृत्याचे चार प्रकार आहेत. लेगॉंग या नृत्यप्रकारात दोन मुली सोनेरी चमक असलेली वस्त्रं परिधान करून फुलांनी सजवलेला मुकुट घालून हातात पंखे घेऊन नृत्य करतात. एकाभिनय आणि गतिमान हालचाली यांद्वारे सूत्रधार प्रत्येक नृत्याविष्कारासंबंधी माहिती सांगत असतो.
जानगर या प्रकारात मुलांच्या दोन रांगा समोरासमोर बसतात. मुली चौरसाच्या राहिलेल्या रांगा पूर्ण करतात. गाण्याच्या एकामागोमाग समूह स्वरात गुणगुणत आणि बसलेल्या जागेवरून हालचाल करतात. प्रत्यक्ष नृत्य चौरसाच्या आतल्या भागात होतं. सांघयान या नृत्यात मुली उन्मनावस्थेत नृत्य करतात. त्याचवेळी त्यांच्यामध्ये अतिमानवी शक्तीचा संचार झालेला असतो असं मानलं जातं. केकॅक (केतजाक) नृत्य हे प्रामुख्यानं वानरनृत्य असतं. यात पुरुष नर्तकांची संख्या 40-50 असते. यात रामायण महाभारतातील प्रसंग सादर केले जातात.
आम्ही हे केकॅक नृत्य उलुवाटू मंदिरात पाहिलं. या नृत्यासाठी 20-25 पायऱ्यांचं गोलाकार स्टेडियम होतं. मधल्या भागात नृत्य सादर होणार होतं. वेळ संध्याकाळी साडेसहाची; पण प्रेक्षक पाच वाजल्यापासूनच स्थानापन्न होत होते. भारतीय रुपयांत तिकिटांची किंमत पाचशे रुपये होती.

उन्हाची सौम्य तिरीप येत होती. थोड्या वेळातच सूर्यास्त होणार होता. साडेपाच वाजता एक पुजारी हातात फुलं आणि शिजवलेला तांदूळ (भात) घेऊन आला. फुलं आणि भात रंगमंचाच्या मध्यभागी असलेल्या दीपमाळेच्या पायथ्याशी असलेल्या चौरसाकृती दगडावर त्यानं ठेवला. मोठा दिवा प्रज्ज्वलीत केला.
पश्‍चिम दिशेला क्षितिजावर लाली पसरली. सूर्यास्ताची चाहूल लागली. बाली हे बेट असल्यानं क्षितिजावर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणं अवर्णनीय असतं. सूर्याची स्वारी निरोप घेत होती आणि दुसऱ्या बाजूनं पायऱ्या चढून नृत्यकलाकार रंगमंचावर (स्टेडियमरूपी गोलाकार फरशीचा रंगामंच) अवतरत होते. फक्त कमरेला लुंगी! रंगमंचावर चक्‌चक्‌ आवाज करू लागले.
कसलंही वाद्य नव्हतं, गाणं नव्हतं, संगीत नव्हतं; फक्त तोंडातून निघालेला चकचक आवाज! सर्वांनी एकसुरात आणि हाताची हालचाल करत केलेला चक्‌चक्‌ आवाज एखाद्या तालवाद्यासारखा भासत होता.
रामायणातल्या सीतेची वनातून सुटका आणि रावणाचा वध हा प्रसंग सादर केला जाणार होता. पाच- दहा मिनिटं तोंडातून चकचक आवाज काढून झाल्यावर राम- सीता- लक्ष्मण आले. त्यांच्या वेशभूषा आकर्षक होत्या. ते चक्‌चक्‌ असा आवाज काढत नव्हते; पण मुद्राभिनयानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत होते. संवाद नव्हते, सूत्रधारक नव्हता, संगीत नव्हतं. रावण सीतेला पळवून नेतो, त्याच्या मार्गात जटायू (गरुड) येतो. रावण त्याचे पंख छाटतो, असे प्रसंग सादर होत होते. गरुडाची भूमिका करणारा कलाकार जमिनीवर पडतो, तेव्हा प्रेक्षक स्तब्ध होतात. परदेशी प्रेक्षक- ज्यांना रामायण माहीत नव्हतं तेही- अचंबित होत होते. सर्व प्रेक्षकांना कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी तिकिटाबरोबरच नृत्यनाट्याच्या कथानकाचं माहितीपत्रक इंग्रजीतून पुरवलं होतं. त्यामुळं परदेशी प्रेक्षकही समरस होत होते.

सीतेची सुटका आणि रावणाचा वध हा तर कळसाध्याय होता. जमिनीवर बसलेले वानररूपी कलाकार उभे राहतात, हात वर करतात, सर्व जण रावणाला उचलून हातांवर घेतात हे दृश्‍य तर अत्यंत हृदयस्पर्शी होते. सर्व प्रेक्षक यावेळी उठून उभे राहून कलाकारांना अभिवादन करतात.
हनुमानानं लंका जाळली, या दृश्‍याच्या वेळी सात-आठ वानर हातात मशाली घेऊन नाचतात. प्रेक्षकांना मशालीच्या ज्वालांची उष्णता थोडीफार जाणवते. एक वानर प्रेक्षकांत येऊन बसतो. त्यामुळं हशा पिकतो.
काही उत्साही प्रेक्षक स्वतःच्या जागेवरून उठून कलाकारांचं अभिनंदन करण्यासाठी खाली येतात. त्याचा स्वीकार करून सर्व कलाकार- विशेषतः तासभर तोंडातून चक्‌चक्‌ आवाज करत, एका लयीत शरीर हलवणाऱ्या वानरांच्या भूमिका करणारे कलाकार- घामेघूम झालेले असतानाही संथ गतीनं रंगमंचाच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवरून दृष्टीआड होतात. कलाकारांची वेशभूषा/ रंगभूषा कुठं होते ते कळत नाही. कलाकारांची भाषा, प्रेक्षकांची भाषा भिन्न असल्यानं कार्यक्रमाची पसंतीही मूकाभिनयानंच व्यक्त करावी लागत होती.

आम्ही अनुभवलेल्या केकॅक नृत्यात संगीत, संवाद गाणी नसली, तरी अन्य बालीनृत्यांत आघातप्रधान वाद्यांनीयुक्त अशा गेमलन संगीताची साथ असते. या वाद्यांमध्ये थाळ्यांचा आणि धातूंपासून बनवलेल्या अन्य वाद्यांचा समावेश असतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satish pore write bali dance article in saptarang