व्यायाम हा 'स्ट्रेस बस्टर' (सौरभ गोखले)

सौरभ गोखले
रविवार, 13 जानेवारी 2019

"शरीर जपा, आयुष्य आनंदी राहील. मन फिट ठेवा, डोकं शांत राहतं,' हे सुखी जीवनाचे साधे सरळ फंडे आहेत. फक्त व्यायाम आणि वर्कआऊटच नव्हे, तर वेळ मिळेल तसा मी सायकलिंग, रनिंगही करतो. कामाचा ताण किंवा एखाद्या गोष्टीच्या तणावाखाली असलो, तर मी वर्कआऊट करतो. सायकलिंग करतो, बाहेर फिरायला जातो. या गोष्टी माझ्यासाठी "स्ट्रेस बस्टर' आहेत.

"शरीर जपा, आयुष्य आनंदी राहील. मन फिट ठेवा, डोकं शांत राहतं,' हे सुखी जीवनाचे साधे सरळ फंडे आहेत. फक्त व्यायाम आणि वर्कआऊटच नव्हे, तर वेळ मिळेल तसा मी सायकलिंग, रनिंगही करतो. कामाचा ताण किंवा एखाद्या गोष्टीच्या तणावाखाली असलो, तर मी वर्कआऊट करतो. सायकलिंग करतो, बाहेर फिरायला जातो. या गोष्टी माझ्यासाठी "स्ट्रेस बस्टर' आहेत.

फिटनेस हा विषय माझ्या अगदी आवडीचा आणि जवळचा. मी फिटनेसकडे दुर्लक्ष केलं आहे, असा आजपर्यंत एकही दिवस नाही. फिटनेसबाबत कुणी तरी सांगितल्यावर मी त्याकडे लक्ष द्यायला लागलो, असं मुळात नाहीच. मला पहिल्यापासूनच त्याची आवड आहे. सुदृढ आरोग्य आणि मन स्थिर असेल, तर आपण कोणतंही काम सुरळीतपणे करू शकतो, असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे फिटनेस हा महत्त्वाचाच. मी एक कलाकार आहे. त्यामुळे भूमिकेच्या गरजेनुसार लूक बदलावा लागतो. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या "सिम्बा' चित्रपटासाठी मी माझा लूक बदलला होता. या चित्रपटात अभिनेता सोनू सूदच्या भावाची माझी भूमिका होती. त्यामुळे जास्त वजन न वाढवता मस्क्‍युलर लूक मला बनवायचा होता. त्यासाठी मला आधी फिट राहणं गरजेचं होतं. अगदी तीन ते चार किलोच वजन मी वाढवलं असेल; पण माझा जास्त भर होता तो मस्क्‍युलर लूकवर. त्यानुसार मी माझ्या डाएट प्लॅनमध्ये बदल केला. जिममध्ये अधिकाधिक घाम गाळला. वजन जास्त न वाढवता मस्क्‍युलर वजन कसं वाढेल, याकडे माझा कटाक्ष होता. मात्र, त्यासाठी कष्टही तेवढेच होते. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो- मी नेहमीच डाएटवरच असतो. साखर तर मी पूर्णपणे बंद केली होती. प्रोटिन्स आणि फॅट्‌सचं माझं डाएट होतं. लूक बदलायचा आहे, म्हणून कुणी तरी सांगून मी एकही गोष्ट केली नाही. आवड होती, मनापासून इच्छा होती आणि शेवटी आपण पडद्यावर किंवा नेहमीच्या जीवनात कसं दिसावं हा सर्वस्वी निर्णय आपला असतो. त्यानुसार मी सगळं करत गेलो. या सगळ्याचा रिझल्ट म्हणजे आरोग्य. स्वतःमध्ये किती बदल होतो हे मला आपसूकच समजत गेलं.

प्रत्येक व्यक्ती फक्त शरीरानं नव्हे, तर मनानंही फिट असेल, तर जीवनातला कोणताही क्षण आनंदानं जगू शकते. मी सुदृढ आरोग्यासाठी प्रत्येक वेळी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेतोच असे नाही. माझी एक खासियत आहे. मी स्वतःवरच प्रयोग करतो. माझ्या शरीराला कोणती गोष्ट सूट होते, हे मला आता ठाऊक झालंय. गेली वीस वर्षं मी वर्कआऊट करतोय. वर्कआऊट म्हणजे माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग झाला आहे. मी कोणत्या प्रकारचा व्यायाम करतोय आणि त्याचा माझ्या शरीरावर काय परिणाम होतोय किंवा बदल होतोय हे मला माहीत झालं आहे. एक मात्र आहे. माझं फिटनेसबाबत बरंच वाचन आहे. कोणतं ठराविक असं पुस्तक वाचतो हे सांगता येणार नाही; पण जे पुस्तक मला आरोग्यविषयक गोष्टींच्या दृष्टीनं योग्य वाटतं ते मी वाचतो. काही आरोग्यविषयक टीव्ही शो असतील, तर तेही मी बघतो. त्यातल्याही काही टिप्स महत्त्वाच्या असतात. एखादा सीन असेल, त्यासाठी मला सिक्‍स पॅक ऍब्ज दाखवायचे असतील, किंवा एखाद्या भूमिकेसाठी वजन कमी किंवा जास्त करायचं असेल, तर मी आहारतज्ज्ञ आणि जीम ट्रेनरची मदत घेतो. मला माझ्या वर्कआऊट, डाएटमध्ये काही बदल करायचे असतील, तर माझा फिटनेस ट्रेनर मानस कुलकर्णी याच्याकडून मी सल्ला घेतो. शिवाय डॉक्‍टर सुधांशू ताकवले- जे उच्चस्तरातल्या खेळाडूंना आरोग्याविषयक गाइड करतात, तेही- मला गाइड करतात. याव्यतिरिक्त माझं नेहमीचं वर्कआऊट, डाएट सुरूच असतो. ते कधीही सोडत नाही. एक नक्की सांगतो ः मी सोनू सूदला फिटनेसच्या बाबतीत फॉलो करतो.
कलाकार म्हटलं, की कामात व्यस्त. कधीही चित्रीकरणासाठी जावं लागतं वगैरे वगैरे... फक्त कलाकारच नव्हे, तर इतर मंडळीही सध्या बिझी लाइफ जगताहेत; पण या सगळ्यातही आरोग्याकडं लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. आणि मी नेमकं तेच करतो. मी जगाच्या पाठीवर कुठंही असलो तरी- अगदी घरी यायला उशीर झाला तरी- दिवसातून एकदा किमान एक तास व्यायाम, वर्कआऊट करतोच. यासाठी माझी काही ठरलेली वेळ नाही आणि यासाठी वेळ ठरवणं शक्‍यही नाही. फिटनेसबाबतीत मी जेव्हा विचार केला तेव्हा पहिली गोष्ट मी बंद केली ती जंक फूड. कोल्ड ड्रिंक्‍स पिणं मी टाळतो. शिवाय साखर जितकी कमी खाल किंवा साखरेचे पदार्थ जितके कमी खाणार तितकं शरीरासाठी चागलं आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे, की जेव्हापासून मी साखर बंद केली तेव्हापासून माझ्या चेहऱ्यावर आणि शरीरावर खूप चांगला परिणाम झाला. वेळा ठरवून मी कधीच खात नाही. उदाहरणार्थ, प्रत्येक दोन तासांनी खा असं माझं कधीच नसतं; पण मी दिवसातून तीन वेळा तरी खातो. सकाळचा नाष्टा, दुपारी आणि रात्रीचं जेवण हे माझं ठरलेलं. जेवणातही डाळ, भाजी, पोळी, आमटी असे अगदी साधे पदार्थ. विशेष असं काही नाही. प्री वर्कआऊट आणि पोस्ट वर्कआऊटसाठी जे काही थोडंसं खायला लागतं ते मी खातो. किंवा मध्येच भूक लागली तर ड्रायफ्रुट्‌स, शेंगदाणे मी खातो. पनीर, चीज, वेफर्स खाणं तर पूर्णपणे मी बंदच केलं आहे.

माझ्या आजोबांनी सांगितलेलं एक वाक्‍य मला आठवतंय. तुम्ही जन्माला येता, तेव्हा तुमचं शरीर तुमच्याबरोबर असतं आणि जातानाही तुम्ही फक्त शरीरच बरोबर घेऊन जाता. यामधल्या प्रवासात जर तुम्ही तुमचं शरीर चांगलं ठेवलं, तर तुमच्या जीवनाचा प्रवास सुखकर होतो. ही छोटी पण महत्त्वाची गोष्ट मी लक्षात ठेवली. शरीर जपा, आयुष्य आनंदी राहील. मन फिट ठेवा डोकं शांत राहतं. हे सुखी जीवनाचे साधे सरळ फंडे आहेत. फक्त व्यायाम आणि वर्कआऊटच नव्हे, तर मला वेळ मिळेल तसा मी सायकलिंग, रनिंगही करतो. कामाचा ताण किंवा एखाद्या गोष्टीच्या तणावाखाली असलो, तर मी वर्कआऊट करतो. सायकलिंग करतो, बाहेर फिरायला जातो. या गोष्टी माझ्यासाठी "स्ट्रेस बस्टर' आहेत. शांतपणे विचार करायची मला संधीही मिळते.
(शब्दांकन ः काजल डांगे)

Web Title: saurabh gokhale write gym stress buster article in saptarang