निसर्गरम्य कॅनडाची नजरबंदी

कॅनडा, एक नितांत सुंदर, निसर्गाने नटलेला आणि विस्तीर्ण पसरलेला देश... सध्या भारताचे आणि कॅनडाचे संबंध ताणले गेलेले असले तरीही तिथल्या निसर्गाचा आविष्कार नाकारून चालणार नाही.
Canada Country
Canada Countrysakal

- विशाखा बाग

निसर्गाची मुक्त उधळण असलेला कॅनडातील बांफचा परिसर म्हणजे न चुकवता येण्यासारखं एक महत्त्वाचं स्थळ. कॅनडा म्हणजे एक नितांत सुंदर निसर्गसौंदर्याने नटलेला सुंदर देश.

कॅनडा, एक नितांत सुंदर, निसर्गाने नटलेला आणि विस्तीर्ण पसरलेला देश... सध्या भारताचे आणि कॅनडाचे संबंध ताणले गेलेले असले तरीही तिथल्या निसर्गाचा आविष्कार नाकारून चालणार नाही. अटलांटिक, आर्क्टिक आणि प्रशांत महासागराचा तिन्ही बाजूंनी वेढा असलेला आणि भूभागानुसार जगातील क्रमांक दोनचा असलेला हा देश.

पूर्व आणि पश्चिम असे दोन्ही कॅनडाचे भाग बघण्यासारखे आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरलेल्या या देशात पूर्व आणि पश्चिम कॅनडामध्ये पूर्णपणे वेगवेगळे निसर्गाचे आविष्कार आणि शहरं बघायला मिळतात. मोठे स्वच्छ व गोड्या पाण्याचे तलाव, बारमाही वाहणाऱ्या नद्या, जगविख्यात असलेली रॉकी पर्वतराजी आणि इतरही बर्फाच्छादित मोठमोठे पर्वत अन् डोंगर हे सर्व काही आपल्याला कॅनडामध्ये बघायला मिळतं.

टोरंटो, व्हँकुव्हर, ओटावा, व्हिक्टोरिया, क्युबेक आणि मॉन्ट्रियलसारखी इथली अनेक अद्ययावत शहरंही बघण्यासारखी आहेत. त्यांची वैशिष्ट्ये अशी आहेत, की इथे शहरांमध्येच, शहराबरोबरच पावलोपावली निसर्गसुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळतो.

कामानिमित्ताने मी पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांना भेट दिली होती. आज हा लेख लिहिताना पुन्हा एकदा कॅनडा डोळ्यांसमोर उभा राहिला. तसं म्हटलं तर मी या देशाच्या नक्कीच प्रेमात आहे. भरपूर निसर्गसौंदर्याने भरलेल्या या शहरांमध्ये कामाच्या संधीसुद्धा तेवढ्याच उपलब्ध आहेत. आज मी तुम्हाला अशाच अद्‍भुत निसर्गसौंदर्याने नटलेल्या बांफ या गावाला घेऊन जाणार आहे.

कॅलगरी या मोठ्या शहरापासून साधारण दीड तासात आपण बांफला पोहोचतो. भारतातून कॅलगरीसाठी विमान सेवा उपलब्ध आहे. कॅलगरी ते बांफ यामधील रस्ता आपण एन्जॉय करत करत आणि गाडीतून बाहेर निसर्ग बघता बघता बांफ केव्हा येतं ते कळतही नाही.

गावात शिरतानाच रस्त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूला टोकाशी बर्फाच्छादित डोंगर आपलं स्वागत करतो. दोन्ही बाजूंना नेटकी लाकडी घरं, रेस्टॉरंट आणि हॉटेल्समधून जाणारा मोठा आणि स्वच्छ रस्ता आहे. त्याच्या दुसऱ्या टोकाला बर्फाच्छादित डोंगर, हे गावात शिरताक्षणीच दिसणारं चित्र मी कधीही विसरू शकत नाही.

बांफ हे गाव अनेक कारणांनी जगभरात प्रसिद्ध आहे. बांफ नॅशनल पार्क हा कॅनडातील पहिला आणि जगातील तिसरा नॅशनल पार्क आहे. हे गाव रॉकी पर्वतांच्या सान्निध्यात आणि या नॅशनल पार्कमध्येच वसलेलं आहे. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून नामनिर्देशित असलेलं हे गाव एक नावाजलेलं पर्यटन स्थळ आणि बांफ माऊंटेन फिल्म फेस्टिवलसाठीसुद्धा जगप्रसिद्ध आहे.

बो नदीच्या काठावर वसलेले हे गाव, इथे असलेल्या सल्फरयुक्त गरम पाण्याच्या झऱ्यासाठी आणि तलावांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. येथील महत्त्वाचं आकर्षण म्हणजे बांफ गंडोला. गावापासून फक्त दहा-बारा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सल्फर नावाच्या डोंगरावर या केबल कारमधून आपल्याला जाता येतं. २२९२ फूट उंच असलेल्या या डोंगराच्या टोकावर जाण्यासाठी केबल कारने फक्त आठ मिनिटं लागतात.

जवळपास बाराही महिने ही केबल कार सुरू असते. वर गेल्यानंतर दिसणारं अप्रतिम दृश्य कधीही न विसरण्यासारखंच... संपूर्ण नॅशनल पार्कचा परिसर, बो नदी, बांफ गाव आणि आजूबाजूच्या रॉकीजच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा. निसर्गाने अमाप सौंदर्याची उधळणच इथे केलेली दिसते. अर्धा दिवस तरी तुम्ही नक्की इथे घालवू शकता.

आम्ही इथे पोहोचल्यानंतर इथल्या लाकडी ‘स्काय वे’वर चालण्याचा आनंद घेतला. मनसोक्त फोटो काढले आणि स्काय रेस्टॉरंटमध्ये कॉफीसुद्धा घेतली. इथे एक मिनी थिएटरसुद्धा आहे, त्यामध्ये तुम्हाला इथली एक माहितीवजा फिल्म दाखवली जाते.

संपूर्ण बांफच्या परिसरात छोटे-मोठे जवळपास एक डझनपेक्षाही जास्त तलाव आहेत. एकापेक्षा एक सरस आणि रम्य परिसर या तलावांच्या आजूबाजूला आपल्याला अनुभवायला मिळतात. त्यातीलच महत्त्वाच्या दोन तलावांना आम्ही भेट दिली. मोरेन लेक आणि लेक लुई अशा दोन्ही ठिकाणी तुम्ही कयाकिंग, बोटिंग आणि हायकिंगसारखे साहसी खेळ खेळू शकता. स्वच्छ आरसपानी असं तलावातील निळसर हिरवं पाणी, तलावाच्या मागे एका बाजूला घनदाट झाडी आणि त्यामागे बर्फाच्छादित डोंगर. या दृश्याची तुलना जगातील कोणत्याही मानवनिर्मित गोष्टीशी होऊ शकत नाही.

असंच अजून एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे बो वॉटर फॉल. गावापासून फक्त एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेला हा वॉटर फॉल. इथे तुम्ही चालतसुद्धा जाऊ शकता. फक्त काळजी घेण्यासाठी काही गोष्टी बरोबर ठेवणं आवश्यक असतं. जसं की, खाण्यापिण्याच्या गोष्टी तर आहेच; पण त्याचबरोबर ‘बेअर स्प्रे’ म्हणजेच अस्वलांसाठीचा फवारा कायम बरोबर असावा लागतो. कॅनडामध्ये वन्यजीवही मोठ्या प्रमाणावर आहेत. मोठी हरणं किंवा सांबर (मूस), रानटी उंदीर, मुंगूस, माऊंटन गोट आणि अस्वलांसारखे प्राणी इथे कायम तुम्हाला कधीही अगदी गावातसुद्धा दिसू शकतात, पण आम्हाला मात्र खूपच थ्रिलिंग अनुभव आला... जाताना आणि येतानासुद्धा.

एकंदरीतच संपूर्ण कॅनडा आणि निसर्गाची मुक्त उधळण असलेला बांफचा परिसर म्हणजे आयुष्यातील न चुकवता येण्यासारखं एक महत्त्वाचं स्थळ नक्कीच आहे. त्याशिवाय बांफच्या आजूबाजूला भेट देण्यासारखी अजूनही बरीच ठिकाणं आहेत. त्या आणि त्यासारख्या कॅनडातील अजून अनेक महत्त्वाच्या निसर्गरम्य स्थळांना आपण येणाऱ्या पुढच्या काही भागांत भेट देणारच आहोत.

gauribag7@gmail.com

(लेखिका वित्त सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com