

Jakobshavn Glacier Greenland
esakal
उमेश झिरपे - umzirpe@gmail.com
ग्रीनलँडच्या शांत किनाऱ्यावर उभे राहून जर एखाद्याने समुद्रात पडणाऱ्या हिमखंडाचा आवाज ऐकला, तर एक गोष्ट स्पष्ट जाणवते, हिमनद्या स्थिर नसतात. त्या सतत प्रवासात असतात. पर्वतांपासून समुद्रापर्यंतचा हा प्रवास हजारो वर्षे चालतो आणि त्या प्रवासात पृथ्वीच्या जलचक्राचा एक महत्त्वाचा अध्याय लिहिला जातो. म्हणूनच जेकबशावनसारख्या हिमनद्या आपल्याला केवळ बर्फाचा साठा वाटत नाहीत; त्या पृथ्वीच्या जीवनप्रवाहाचा एक जिवंत भाग आहेत.
हिमालयातील हिमनद्यांच्या सहवासात अनेक वर्षे घालवल्यानंतर मनात एक गोष्ट सतत जाणवत राहते, पृथ्वीवरील हिमाचा, बर्फाचा हा प्रवास केवळ एका पर्वतरांगेपुरता मर्यादित नाही. हिमालयातील गंगोत्री, खुम्बू किंवा मिलम यांसारख्या हिमनद्या जशा दऱ्यांमधून वाहताना दिसतात, तशाच प्रकारच्या; पण भौगोलिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळ्या हिमनद्या पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशांमध्येही आहेत. हिमालयात हिमनदी म्हणजे पर्वतांमधून उतरणारी गोठलेली नदी, तर ध्रुवीय प्रदेशात ती थेट महासागराशी संवाद साधणारी बर्फाची प्रचंड प्रवाही भिंत असते. या दूरच्या प्रदेशातील हिमनद्या आपल्या दैनंदिन आयुष्यापासून हजारो किलोमीटर दूर असल्या तरी त्यांचे अस्तित्व पृथ्वीच्या जलचक्राशी, समुद्रपातळीशी आणि हवामानाशी थेट जोडलेले आहे. म्हणूनच हिमनद्यांचा अभ्यास करताना हिमालयापलीकडे पाहणेही तितकेच आवश्यक ठरते. गेल्या दोन भागांमध्ये आपण पृथ्वीचे दक्षिण टोक असलेल्या, दक्षिण ध्रुव म्हणजेच अंटार्क्टिका खंडातील हिमनद्या, त्यांचा आपल्या जीवनावरचा परिणाम अनुभवला. यानंतर आपण वळूया उत्तर ध्रुवाकडे.