वर्ष नवे, साज नवे

प्रा. शैलजा सांगळे
रविवार, 1 जानेवारी 2017

जगभरात नववर्षाचं स्वागत करण्याच्या अनेक पद्धती विकसित झाल्या असल्या, तरी त्या सर्वांच्या मुळाशी एकच समान विचार असतो, तो म्हणजे ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी.’ गेल्या वर्षातलं सगळं वाईट विसरायचं आणि नव्या वर्षाचं स्वागत करायचं. वेगवेगळ्या देशांमध्ये नववर्ष साजरं करण्याच्या पद्धती नक्की काय असतात, त्यांच्यामागे विचार, प्रथा काय असतात, याविषयीची रंजक माहिती.

जगभरात नववर्षाचं स्वागत करण्याच्या अनेक पद्धती विकसित झाल्या असल्या, तरी त्या सर्वांच्या मुळाशी एकच समान विचार असतो, तो म्हणजे ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी.’ गेल्या वर्षातलं सगळं वाईट विसरायचं आणि नव्या वर्षाचं स्वागत करायचं. वेगवेगळ्या देशांमध्ये नववर्ष साजरं करण्याच्या पद्धती नक्की काय असतात, त्यांच्यामागे विचार, प्रथा काय असतात, याविषयीची रंजक माहिती.

नववर्ष म्हणजे एक जानेवारी. हा जगातल्या प्रत्येकाला आवडणारा आणि प्रत्येकजण ज्याची आतुरतेनं वाट पाहत असतो तो दिवस. नातेवाईक, कॉलेज तरुण-तरुणी, मित्रमंडळींचे कंपू, कार्यालयीन कर्मचारी एवढंच काय बालगोपाळांमध्येसुद्धा नववर्षाच्या स्वागताच्या योजना आखल्या जातात. धर्म, जात-पात, पंथ असं कशाचंही बंधन नसलेला आणि सर्व जगात अत्यंत उत्साहानं, आनंदानं साजरा होणारा दिवस म्हणजे नववर्षाचा दिवस. जगाच्या कानाकोपऱ्यातला कितीही व्यग्र असलेला माणूस या दिवसाच्या ‘सेलिब्रेशन’मध्ये सहभागी होतोच. सर्वच देशांत प्रेक्षणीय रोषणाई आणि लोकांचा सळसळता उत्साह आणि आनंददायी चेहरे बघायला मिळतात.
आज जगातल्या जवळपास सर्वच देशांत ३१ डिसेंबरच्या रात्री बारा वाजताच नववर्षाचं स्वागत केलं जातं; पण फार प्राचीन काळी नववर्षाची सुरवात एक जानेवारीला होत नसे. नववर्ष साजरं करण्याची सुरवातच मुळी ख्रिस्तपूर्व इसवीसन ४०० पूर्वी बॉबिलॉनमध्ये झाली. त्या वेळेस नववर्षाचं स्वागत २१ मार्चला करत असत. कालांतरानं अनेक देशांनी स्वतःच्या सोयीनुसार, बुद्धीनुसार २१ मार्चला सुरू होणाऱ्या कॅलेंडरमध्ये बदल केले. वेगवेगळ्या कॅलेंडरमुळे लोकांची गैरसोय होऊ लागली, म्हणून रोमन सिनेटनं सर्वांना सोईस्कर असं कॅलेंडर ख्रिस्तपूर्व इसवीसन १५० मध्ये तयार केलं आणि १ जानेवारी हाच नववर्षाच्या प्रारंभाचा दिवस म्हणून जगन्मान्य झाला.

नववर्षाच्या पहिल्या क्षणाचं स्वागत
रोमन पुराणात ज्याचा उल्लेख आढळतो, त्या जानस या देवाच्या नावावरून जानेवारी हे वर्षाच्या पहिल्या महिन्याचं नाव पडलं असावं. जानस हा देव डोक्‍याच्या पुढच्या बाजूस आणि मागच्या बाजूसही एकाच वेळी पाहत असे, असा उल्लेख आढळतो. ३१ डिसेंबरच्या रात्री म्हणजे वर्षाच्या शेवटच्या रात्री बारा वाजता जानस देव गेल्या वर्षाकडे पाहतो आणि पुढच्या वर्षाच्या नव्या योजना आखतो, असं मानून ३१ डिसेंबरला रात्री बारापर्यंत जगण्याची आणि बारा वाजल्यानंतर नववर्षाच्या पहिल्या क्षणाचं स्वागत करण्याची प्रथा पडली असावी. खरं म्हणजे ३१ डिसेंबरला रात्री बारापर्यंत जागण्याचा मुख्य उद्देश म्हणजे येणाऱ्या वर्षाचं स्वागत करायचं. रात्री जागायचं, तर ग्रुप हवा. त्यातूनच मग मित्रमंडळी किंवा नातेवाईक यांचं एकत्र जमणं सुरू झालं. मग वेळ घालवण्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम, पार्टी, मेजवानी, एकमेकांना भेटवस्तू देणं, आनंद व्यक्त करण्यासाठी फटाके उडवणं इत्यादी सुरू झालं.

एक जानेवारी हा संपूर्ण जगात नववर्षाचा दिवस मानला जात असला, तरी अनेक देशांत पारंपरिक नववर्षाचा दिवसही मानला जातो आणि बऱ्याचदा त्याला धर्माचं अधिष्ठान असतं. हिंदू नववर्ष हिंदू चांद्रवर्षीय कॅलेंडरप्रमाणं साजरं होत असलं, तरी भारतात विविध राज्यांत वेगवेगळ्या दिवशी नववर्ष साजरं करतात. महाराष्ट्रात गुढीपाडवा हा नववर्षाचा दिवस असतो. पंजाबमध्ये १४ एप्रिलला, आसाम, तमिळनाडू आणि बंगालमध्ये १४ आणि १५ एप्रिलला नववर्ष साजरं करतात. 

ज्यू लोकांमध्ये ग्रेगेरिअन कॅलेंडरप्रमाणे नववर्षाचे साजरीकरण सप्टेंबर किंवा ऑक्‍टोबर महिन्यात असते. ते दहा दिवस चालते. पहिल्या दिवसाला ‘रोश हशाना’ (Rosh Hashanah)  म्हणतात, तर शेवटच्या दिवसाला योम किपूर (yomm kippur) म्हणतात. पहिल्या दिवशी लोक मेणबत्त्या लावून नातेवाइकांबरोबर नववर्ष साजरं करतात. मधात बुडवून ठेवलेलं सफरचंद खातात, ज्यातून आयुष्यात सर्व काही गोड होणार हे सूचित होतं. ज्यू लोकांच्या समजुतीनुसार, देव दर वर्षी दहा दिवस आयुष्याचं पुस्तक उघडतो. त्यात प्रत्येकाचं भविष्य लिहितो, कोण जगणार, कोण मरणार, कोणाची प्रगती होणार, कोणाची अधोगती होणार इत्यादी. शेवटचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी लोक उपवास करतात आणि सगळ्या पापांपासून परिमार्जन करण्याची देवाकडं प्रार्थना करतात.

धार्मिक महत्त्व 
शीख नववर्ष त्यांच्या नानकशाही कॅलेंडरनुसार येणाऱ्या वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १३ किंवा १४ एप्रिलला साजरं करतात. दहावे गुरू गुरूगोविंदसिंग यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करतात, त्याला ते ‘बैसाखी’ म्हणतात. पंजाब आणि हरियाना राज्यात या दिवसांत पिकांची कापणी झाल्यानं शेतकऱ्यांच्या हातात पैसा आलेला असतो, लोक शेतात ‘जत्ता आयी वैसाखी’ गाणं म्हणत फिरतात, सर्व जण गुरुद्वारात जातात, भक्तिगीतं म्हणतात, कीर्तन ऐकतात, ‘कराह’ प्रसाद वाटतात आणि सर्वांसाठी जेवण म्हणजे लंगर असतो. बौद्ध धर्माचे लोक नवीन वर्ष एप्रिल महिन्यातल्या पहिल्या पौर्णिमेपासून तीन दिवस साजरं करतात. पारशी नववर्षाला ‘जमशेट नवरोज’ म्हणतात. २१ मार्चला ते साजरं करतात. पर्शियाचा राजा जमशेट यानं पारशी कॅलेंडर सुरू केले. नवरोज म्हणजे वसंत ऋतू, म्हणून ‘जमशेट नवरोज’ नाव पडलं. पारशी लोक या दिवशी घर स्वच्छ करून उदबत्त्या लावतात. घरात सगळीकडे चंदनाची पावडर टाकतात, त्यामुळे घरात हवा शुद्ध होते व ताजेतवाने वाटते. नववर्षाच्या दिवशी घरातल्या टेबलावर ते धार्मिक ग्रंथ, झोराष्ट्रचं चित्र, आरसा, मेणबत्त्या, उदबत्त्या, फळं, फुलं, साखर, ब्रेड आणि नाणी इत्यादी वस्तू ठेवतात. त्यांच्या मते या सर्व वस्तू कुटुंबाच्या समृद्धीचं आणि दीर्घायुष्याचं प्रतीक आहेत. सर्व पारशी लोक या दिवशी अग्यारीमध्ये जातात आणि प्रार्थना करतात, त्याला ते ‘जशान’ म्हणतात. ते चंदनाची पावडर तिथल्या अग्नीवर टाकतात. ख्रिस्ती धर्मात मात्र एक जानेवारीलाच खूप धूमधडाक्‍यात नववर्षाचं स्वागत केलं जातं. अशा प्रकारे अनेक धर्मांच्या प्रथा, परंपरा, संस्कृतीनुसार एक जानेवारीव्यतिरिक्त इतरही दिवशी पुन्हा नववर्ष साजरं करतात.

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जगभरात नववर्षाचं स्वागत करण्याच्या अनेक पद्धती विकसित झाल्या असल्या, तरी त्या सर्वांच्या मुळाशी एकच समान विचार असतो, तो म्हणजे ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी.’ गेल्या वर्षातलं सगळं वाईट विसरायचं आणि नव्या वर्षाचं स्वागत करायचं. दक्षिण अमेरिकेतल्या अनेक देशांत कागदाची रद्दी भरून तयार केलेली माणसाची प्रतिकृती प्रत्येकाच्या घरासमोर उभारली जाते. मध्यरात्री घरातला प्रत्येक जण त्याला अग्नी देऊन जाळतात. त्या प्रतिकृतीच्या प्रतीकात्मक रूपात गतवर्षीच्या दुष्ट रूढी, दुष्ट प्रवृत्ती, वाईट घटना, संकटं, वाईट सवयी इ. जाळून संपवतात. नवीन वर्षी हे सर्व विसरण्याचा प्रयत्न करतात. आजही अनेक देशांतील महत्त्वाच्या शहरांमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री बारा वाजता चर्चमध्ये घंटानाद होतो. लोक ड्रम्स वाजवतात, सायरन वाजवतात, गाड्यांचे हॉर्न जोराजोरात वाजवतात, फटाके वाजवतात. जपानमध्ये रात्री बारा वाजता १०८ वेळा घंटा वाजवतात. पूर्वी थायलंडमध्ये रात्री बारा वाजता बंदुकीतून गोळीबार करत. अमेरिकन लोक पिस्तुलानं हवेत गोळीबार करत. रात्री बारा वाजता एवढा आवाज करण्याचा हेतू एकच तो म्हणजे दुष्ट प्रवृत्तींना पळवून लावायचं. दर वर्षी लंडन शहरातल्या ट्रॅफलगार चौकात आणि अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातल्या ट्रॅफलगार चौकातल्या भव्य टाइम्स स्क्वेअरमध्ये ३१ डिसेंबरला रात्री लाखो लोक एकत्र येतात, खूप ओरडतात, किंचाळतात, हल्लागुल्ला करतात. दुष्ट प्रवृत्ती आवाजानं घाबरतात, हा त्यामागचा समज आहे.

थायलंडमध्ये १३ ते १५ एप्रिल असे तीन दिवस नववर्ष साजरं करतात. तीन दिवसांत त्यांचा ‘वॉटर फेस्टिव्हल’ असतो. त्याला ते साँगक्रान (song kran) म्हणतात. आपण जसं रंगपंचमीला एकमेकांच्या अंगावर पाणी फेकतो, तसेच ते पाणी फेकतात. लोकांना पवित्र करणं हा त्यांचा उद्देश असतो. या दिवशी गौतम बुद्धांचा पुतळा सुवासिक पाण्यानं स्वच्छ करतात. बौद्ध विहारात जाऊन प्रार्थना करतात. फळं, मिठाई भिक्षुकांना देतात. या दिवशी ते पिंजऱ्यातल्या पक्ष्यांना सोडून देतात. घरांतल्या मत्स्यगृहांतले मासे नदीत सोडतात, त्यामुळं कुटुंबाला चांगलं नशीब लाभतं, हा त्यांचा समज असतो. बरेच लोक नदीकिनारी वाळूचा डोंगर करतात. त्याला ‘छेडी’ म्हणतात आणि त्यावर रंगीत झेंडा लावतात.

चीनमध्ये आकाशदिवे
चिनी लोकांचं नववर्ष ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार पहिल्या चांद्र महिन्यातल्या पहिल्या दिवशी साजरं करतात. या वर्षी ते २८ जानेवारीला साजरं करणार आहेत. चिनी लोक रंगीबेरंगी कपडे घालून घरासमोर खूप आकाशदिवे लावतात. त्या दिवशी मोठी मिरवणूक काढतात. रेशमी कपडे परिधान केलेला ड्रॅगन मिरवणुकीत पुढं चालतो. नववर्षाच्या दिवशी घराचं दर्शनी दार लाल रंगानं रंगवतात, घराच्या खिडक्‍यांना लाल कागदाच्या पताका लावतात, त्यावर happiness, longivity, wealth इत्यादी लिहिलेलं असतं. काही लोक लाल कपडे परिधान करतात. लाल रंग सौख्य आणि चांगलं नशीब याचं प्रतीक मानतात. लाल रंगाचा एवढा वापर का करतात, याबाबत एक दंतकथा आहे. चीनमधला हिंस्र पशू ‘नियन’ हा खेड्यांतल्या लोकांना त्रास देत असे, मुलांना पळवून नेत असे. त्याच्या त्रासाला कंटाळून त्या खेड्यातले लोक रात्री दुसऱ्या खेड्यात जात असत. एका माणसानं त्याला मारायचं ठरवलं. त्यानं रात्री घराबाहेर खूप लाल कागद ठेवले आणि फटाके लावले. तेव्हापासून नियन दिसलाच नाही. त्यामुळं दुष्ट प्रवृत्ती लाल रंग आणि आवाजाला घाबरतात, अशी चिनी लोकांची समजूत झाली. त्यामुळं दुष्ट प्रवृत्तींना नष्ट करण्यासाठी ते लाल रंग वापरतात. या दिवशी घरातली मोठी माणसं लहान मुलांना लाल पाकिटात पैसे देतात. ही पाकिटं मुलं सात दिवस उशीखाली ठेवतात आणि शेवटच्या दिवशी पाकीट उघडतात. असं केल्यानं सुख लाभतं, समृद्धी येते, असा त्यांचा समज आहे. या दिवशी घरातले चाकू, सुऱ्या, ब्लेड आणि इतर धारदार वस्तू लपवून ठेवतात. या दिवशी बोट कापलं तर कुटुंबाच्या सुखालाही कात्री लागते, अशी त्यांची धारणा असते. या दिवशी कुटुंबातले सगळे सदस्य म्हणजे काका, मामा, आजी, आजोबा इत्यादी एकत्र येऊन जेवण करतात; त्याला ‘रियुनीयन’ (Reunion) जेवण म्हणतात.

वाईट इच्छा नष्ट करण्यासाठी घंटानाद
जपानमध्ये नववर्ष एक जानेवारीलाच साजरं करतात. त्याला ते ‘ओसेचिरीओरी’ (Osechiryori) म्हणतात. या दिवशी काही लोक झोजोजी मंदिरात जमा होतात आणि नववर्षाच्या आनंदाप्रीत्यर्थ हेलियमचे फुगे आकाशात सोडतात. बौद्ध मंदिरांत १०८ वेळा घंटानाद करतात. १०८ पापांचं परिमार्जन करण्यासाठी; तसंच १०८ वाईट इच्छा नष्ट करण्यासाठी घंटानाद केला जातो. आजच्या कॉम्प्युटरच्या युगातही मित्रांना आणि नातेवाइकांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारी पोस्टकार्डं पाठवणारा जपान हा एकमेव देश असावा. ही पोस्टकार्डं घरोघरी पोचवण्यात जपानच्या पोस्ट विभागाचे कर्मचारी १५ डिसेंबरपासून व्यग्र असतात, कारण प्रत्येक पोस्टकार्ड एक जानेवारीपूर्वी घरोघरी पोचवण्याचा त्यांचा नियम आहे आणि तो ते कसोशीने पाळतात, हे विशेष. कोरिया देशात नववर्षाची तीन दिवस सार्वजनिक सुटी असते. त्याला ते ‘सेऊलाल’ म्हणतात. इथं लोक आपल्या मूळ गावी जातात, पितरांसाठी धार्मिक विधी करतात आणि त्यासाठी ‘हॅनबॉक’ हा विशिष्ट पेहराव परिधान करतात.

फिलिपिन्समध्ये ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री लोक जेवण करतात, त्या वेळी गोल आकारातली फळं टेबलावर ठेवतात, दारावर द्राक्षाचे घड बांधतात, गोल डिझाईन असलेले कपडे परिधान करतात, त्यामुळं धनवृद्धी होते, असं मानतात. सर्व दरवाजे आणि खिडक्‍या रात्री उघड्या ठेवतात, त्यामुळं चांगलं नशीब घरात येतं, असा समज आहे. रात्री बारा वाजता कार्डबोर्डचे किंवा प्लॅस्टिकचे हॉर्न वाजवतात, त्याला ते टोरोटॉट (torotot)  म्हणतात. हॉर्न नसले, तर भांडी, थाळ्यांवर घंटानाद करतात. बांबूच्या तोफा बनवून त्यात दारूगोळा भरून उडवतात. जोरात म्युझिक लावतात. वाईट गोष्टी आणि वाईट प्रवृत्ती हद्दपार करण्याचा हा त्यांचा मार्ग असतो. भूतानमध्ये नववर्षाच्या सणाला ‘लोसर’ म्हणतात. फेब्रुवारी आणि मार्चच्या दरम्यान १५ दिवस नववर्षाचा सोहळा चालतो. या दिवसांत तिरंदाजीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेतल्या जातात. संपूर्ण जगातून नावाजलेले तिरंदाज इथं स्पर्धेत उतरतात. त्यांच्या प्रथेनुसार कणकेच्या गोळ्यात तांदूळ, मीठ, साखर इत्यादी पांढरे पदार्थ किंवा कोळसा लपवतात. ज्याच्या कणकेच्या गोळ्यात पांढरी वस्तू निघते, त्याच्यासाठी शुभशकुन असतो; पण ज्याच्या गोळ्यात कोळसा निघतो, त्याचा भविष्यकाळ कोळशाप्रमाणे काळाकुट्ट असतो, असं मानतात.

बारा टोलबरोबर बारा द्राक्षं
मेक्‍सिकोत नववर्षाच्या रात्री घड्याळाच्या बारा टोलबरोबर बारा द्राक्षं खाण्याची प्रथा आहे. मेक्‍सिकोत नववर्षाच्या दिवशी घराची सजावट लाल, पिवळा, हिरवा आणि पांढरा या चारच रंगांचा वापर करून करतात. लाल रंग प्रेमाचे आणि जीवनपद्धती सुधारण्याचं प्रतीक, पिवळा रंग अर्थव्यवस्था सुधारण्याचं, हिरवा रंग निसर्गाचं जतन करण्याचं आणि पांढरा रंग उत्तम आरोग्याचं प्रतीक मानतात. या दिवशी गोड ब्रेड बनवतात आणि तो बनवताना काही ब्रेडमध्ये एक नाणं ठेवतात. ज्याला ते नाणं मिळतं, त्याचं भविष्य उज्ज्वल आहे, असं मानतात. एका कागदावर गतवर्षातल्या सर्व नकारात्मक घटनांची किंवा वाईट घटनांची यादी करतात आणि तो कागद जाळून टाकतात. सर्व नकारात्मक गोष्टी नष्ट करणं, हा उद्देश असतो. बेल्जियममध्ये लहान मुलं कुटुंबातल्या मोठ्या व्यक्तींसाठी स्वतः लिहिलेली पत्रं वाचतात. स्वतः डिझाईन केलेली, रंगवलेली, गुलाबाची फुलं आणि रिबननं सजवलेली शुभेच्छापत्रं पालकांना आणि आजी-आजोबांना देतात. फिनलंडमध्ये तर एक वेगळीच परंपरा आहे, त्या परंपरेचं नाव मोलीब्डोमॅन्सी (molybdomancy). या परंपरेनुसार शिशाचा (lead) तुकडा एका पातेल्यात ठेवून गरम करून वितळवतात आणि लगेच गार पाण्याच्या बादलीत ते शिसे ओततात. गार पाण्यामुळं ते पुन्हा घट्ट होतं, ते जो आकार धारण करतं, त्यावरून भविष्य सांगतात.
फ्रान्समध्ये ‘एपिफॅनी’ (Epiphany) नावाची एक पेस्ट्री बनवतात. काही पेस्ट्रींमध्ये छोटी बाहुली ठेवतात. ज्या व्यक्तीला ती बाहुली मिळते ती व्यक्ती त्या दिवशीची राणी किंवा राजा असतो. त्यांना मुकुट घालून सन्मान करतात. ग्रीसमध्ये नववर्षाच्या दिवशी स्पेशल पाय (फळं किंवा मांस यांवर पेस्ट्री टाकून बनवलेलं पक्वान्न) लावतात. त्याला ‘व्हसिलोपिटा’ (vassilopita) म्हणतात. रात्री बारा वाजता ‘पाय’ कापतात. रात्री बारा वाजता जेवताना घरातली महिला तिचे दागिने एका प्लेटमध्ये ठेवून ती प्लेट टेबलवर ठेवते. घरातल्या आर्थिक सुबत्ततेचं ते प्रतीक असतं. जेवण झाल्यावर डिश धुवून ठेवत नाहीत; दुसऱ्या दिवशीपर्यंत तशीच ठेवतात, रात्री-अपरात्री येणाऱ्या अदृश्‍य पाहुण्यासाठी. आइसलॅंडमध्ये वेगळीच प्रथा आहे. त्या दिवशी घरातले सगळे जण दूरचित्रवाणीवर विनोदी कार्यक्रम बघण्यात दंग असतात. राजकारणी, कलाकार, प्रतिष्ठित उद्योगपती, महत्त्वाच्या व्यक्ती इत्यादींवर प्रहसनात्मक कार्यक्रम चालू असतो, त्याचा आनंद लुटतात.

मनुके खाताना नियोजन
पोर्तुगालमध्ये शॅंपेनची बाटली उघडून आनंद व्यक्त करतात. घरातले प्रत्येक जण बारा महिन्यांचं प्रतीक म्हणून बारा मनुके खातात आणि प्रत्येक मनुका खाताना त्या महिन्यातल्या नियोजनाचा विचार करतात. या दिवशी एक विशेष केक बनवतात, त्याला ‘बोलो री’ (Bolo Rei)  म्हणजेच ‘किंग केक’ म्हणतात. गोल आकाराच्या केकच्या मध्यभागी भोक पाडलेलं असतं आणि केकच्या सर्व बाजूंनी गोलाकार सुका मेवा, मनुके, फळांचे तुकडे इत्यादीची सजावट करतात. त्या केकमध्ये ज्याला एखादं कडधान्याचं बी सापडतं, त्यानं पुढच्या वर्षी केक स्पॉन्सर करायचा असतो. ब्राझीलमध्ये नववर्षाच्या दिवशी लोक पांढरा वेष परिधान करून समुद्रकिनारी जातात आणि फटाके उडवतात. पांढरे कपडे शुभ मानले जातात. ब्रिटनमध्ये नववर्षानिमित्त मोठी मिरवणूक काढतात, त्यात लाखो लोक सहभागी होतात. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात टाइम्स स्क्वेअर या प्रसिद्ध चौकात सत्तर फूट उंच टॉवरवर बारा फूट व्यासाचा बॉल ठेवलेला असतो. ३१ डिसेंबरला रात्री बारा वाजता हा बॉल खाली आणण्यात येतो आणि नववर्षाच्या स्वागताची सुरवात हल्लागुल्ला, किंचाळणं, फटाके उडवणं इत्यादींनी होते. नेदरलॅंडमधले डच लोक या दिवशी गोल आकाराचा गोड ब्रेड म्हणजे डोनट खातात. काही लोक गोल आकाराचे वाटाण्याचे दाणे खातात. गोल आकाराच्या वस्तूचा खाद्यपदार्थांत वापर अनेक देशांत केला जातो. गोल वस्तू संपूर्ण वर्षाच्या गोलाकार चक्राप्रमाणं मानतात.

सेलिब्रेशन’ला बाजारी स्वरूप
अनेक युरोपीय, आशियाई, अमेरिकन देशांत नववर्षाचं स्वागत शक्‍यतो सर्व कुटुंबीयांच्या समवेत जुन्या परंपरा सांभाळून केले जाते. भारतात मात्र नववर्षाच्या स्वागतासाठी जंगी पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. त्या पार्ट्या केवळ तरुणांच्याच असतात असं नाही, तर प्रौढांच्यासुद्धा असतात. अशा पार्ट्यांचं आयोजन कोणाच्या घरी करण्यापेक्षा हॉटेलात करण्याचं फॅड वाढलं आहे. हॉटेलवालेसुद्धा भरपूर दिव्यांची रोषणाई करून महिनाभर आधीच डिस्काउंटच्या जाहिराती देऊन, संगीत, नृत्य, जेवण आणि मद्य इत्यादींचं पॅकेज देऊन लोकांना आकृष्ट करतात आणि भरीस पाडतात. या पार्ट्यांमध्ये नातेवाइकांचं निवांत भेटणं, जिवाभावाच्या गप्पा मारणं, सुख-दुःख वाटणं, एखादी छानशी सुचलेली कविता ऐकवणं हे नसतंच. मद्यप्राशन करून नाच, गाणी करून धिंगाणा घालणं हेच प्रामुख्यानं आढळते. मद्याचा कॅफ चढल्यावर बेफाम नाचणं, मुलींशी लगट करणं इत्यादी नववर्षाच्या स्वागताची पद्धत झाली आहे. त्याचे वाईट परिणाम एखाद्या कुटुंबाला आणि पर्यायानं समाजालाही भोगावे लागतात. नववर्षाच्या रात्री मद्यपान करून बेभान होऊन वेगाचं भान न ठेवता गाड्या चालवल्यानं अपघातात दगावल्यामुळे अनेक आई-वडील तरुण मुलांना गमावून बसतात. मद्यपानामुळं शुद्ध हरपल्यावर मुलींची छेडछाड केल्यामुळे किती तरी मुलांना पोलिस स्टेशनवरून सोडवून आणण्याची वेळ आई-वडिलांवर येते. काही तरुण तरुणी याच पार्ट्यांमध्ये मद्यपान व धुम्रपान करायला शिकतात व पुढच्या वर्षापर्यंत व्यसनाच्या आहारी जातात. थोडक्‍यात नववर्ष ‘सेलिब्रेशन’ला बाजारी स्वरूप आलं आहे.

भावना चांगलीच
नववर्षाच्या स्वागतामागचा हेतू व भावना चांगलीच असते. नववर्षाच्या निमित्तानं मित्रमंडळी, नातेवाईक, मुलं, सुना, जावई इत्यादी निवांत भेटतात. विचारांची देवाणघेवाण होते, एकमेकांची आस्थेनं विचारपूस करतात, गप्पा होतात, आजच्या धकाधकीच्या आणि घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या रटाळवाण्या जीवनपद्धतीत सणवार साजरीकरणाची गुलाबपाण्याची शिंपण ही प्रत्येकाला हवीशीच वाटते. गळेकापू स्पर्धेमुळे निर्माण झालेली अतिरेकी इर्ष्या, पैसा कमवण्यासाठी चाललेली धडपड व धावपळ, कुटुंबात संवादाअभावी येणारी कटुता, यामुळं मनावर आलेली ताणतणावाची जलभेट झटकून टाकून पुन्हा ताजंतवानं होऊन कामाला लागण्यासाठी सणवार साजरे करणं हवंच. ती आजच्या काळाची गरज आहे. परंतु त्यासाठी नियमांची, नीतिमूल्यांची सीमारेषा ओलांडली जाणार नाही, याची काळजी घ्यायलाच हवी.

Web Title: Shailaja Sangle writes about traditions to celebrate New Year