नीरज ते श्रीकांत २०२१ ची रत्ने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

neeraj chopra and kidambi srikanth
नीरज ते श्रीकांत २०२१ ची रत्ने

नीरज ते श्रीकांत २०२१ ची रत्ने

आपल्याकडे गेल्या काही वर्षांपासून सरत्या वर्षाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पारच बदलून गेलाय. ते साहजिकही आहे. ‘‘फारच वाईट गेलं हे वर्ष...पुढचं वर्ष तरी चांगलं जाईल!’ असं अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळू लागलं आहे... अर्थात्, हा दृष्टिकोन बदलला, त्याला कारण आहे तो अदृश्य असा कोरोना विषाणू! या महामारीत सर्वसामान्य माणूस तर भरडला गेलाच; पण उद्योग-व्यवसाय-मनोरंजन-क्रीडा अशी सर्वच क्षेत्रं अनेक पावलं मागं गेली होती. हा विषाणू काही थांबायचा नाव घेईना. रूप बदलून वेगवेगळ्या नावांनी तो येतच आहे...पण जगरहाटीसुद्धा आता थांबणार नाही हेही तेवढंच खरं आहे. २०१९ मागं गेलं, २०२० सरलं...आता २०२१ निरोप घेण्याच्या तयारीत असताना आणि प्रत्येक जण आपापला ताळेबंद मांडत असताना आपल्या भारताचं क्रीडाक्षेत्रही २०२१ या वर्षाला सलाम करत आहे. २०२० मधील लांबणीवर पडलेलं ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक हे २०२१ मध्ये झालं आणि चमत्कार केला तो क्रिकेटेतर खेळाडूंनी. त्यांंनी अगदी कमालच केली! ऑलिंपिकमध्ये सात, तर पॅरालिंपिकमध्ये १९ एवढी पदकं कधी नव्हे ती मिळवली.

नीरज चोप्रा याचं ऑलिंपिक सुवर्णपदकातील तेज आणि वर्ष संपता संपता श्रीकांतची जागतिक स्पर्धेतील रुपेरी झळाळी डोळे दिपवणारी ठरली.

मुळात टोकिओ ऑलिंपिक होईल की नाही याची खात्री नव्हती. त्यात २०२० मधील लॉकडाउन. अशा वातावरणात शारीरिक तंदुरुस्तीपेक्षा मनाची अस्वस्थता अधिक चिंता निर्माण करणारी होती. ऑलिंपिक म्हणजे सर्वोत्तमातील सर्वोत्तम. तिथं ‘उन्नीस-बीस’ चा फरकही आयुष्यभराची मेहनत पाण्यात घालवणारा ठरतो. सराव करायचा कसा याचीच शाश्वती कोरोनाकाळात नव्हती. असं असतानाही मिळवलेलं यश भारताच्या ऑलिंपिकच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदलं जाणार आहे. जेव्हा आव्हानांचा डोंगर उभा असतो तेव्हा लढण्यासाठी अधिक बळ मिळतं, इच्छाशक्ती अधिक प्रबळ होते. असंच जणू काही भारताच्या या वीरांचं झालं.

मीराबाई चानूनं अनपेक्षितपणे सुरू केलेल्या टोकिओ ऑलिंपिक मोहिमेवर नीरजनं सुवर्णकळस चढवला. सर्व काही स्वप्नवत् असं घडत होतं; पण त्यासाठी या सर्व खेळाडूंनी सरावासह मानसिकता कणखर ठेवण्यासाठी घेतलेली मेहनत अद्वितीय होती. घरापासून, कुटुंबापासून दूर, त्यात जैवसुरक्षा-वातावरणाचा बंदिस्तपणा, संपर्कात येणाऱ्या कुणाकडून कोरोनाचा ‘खो’ आपल्याला तर मिळणार नाही ना याची सततची धास्ती असं चक्रव्यूह या ऑलिंपिकवीरांनी भेदलं म्हणून त्यांच्या पदकांची झळाळी अधिक तेजोमय आहे.

ऑलिंपिकमध्ये भारताचं पहिलंवहिलं वैयक्तिक सुवर्णपदक नेमबाजीत अभिनव बिंद्रानं मिळवलं; परंतु टोकिओत पदकांची संख्या वाढत असताना भरवशाच्या नेमबाजांकडून फारच निराशा झाली. भारतात सरावावर निर्बंध असल्यामुळे परदेशात सरावाची सुविधा असताना आणि इतर स्पर्धा खेळण्याची संधी असताना ऑलिंपिकमधील अपयश चिंता निर्माण करणारं होतं. जे नेमबाजीचं तेच तीरंदाजीचं. या दोन खेळांच्या वर्षभरात विश्वकरंडक स्पर्धा होत असतात, त्यांमध्ये आपले खेळाडू विक्रमांचा आणि पदकांचा लक्ष्यभेद करत असतात; पण ऑलिंपिकपदकाची कशाशीही तुलना होऊ शकत नाही.

हॉकीचं युग पुन्हा सुरू; पण...

खरं तर हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ; पण लोकप्रियतेच्या सीमा क्रिकेटनं पार केल्या आणि हॉकी हा खेळ दुर्लक्षित होऊ लागला. त्यात ऑलिंपिकसारख्या स्पर्धांत काहीच हाती लागत नसल्यामुळे हॉकी मर्यादित होऊ लागली होती; परंतु ४१ वर्षांनंतर भारतीय पुरुष हॉकी संघानं ऑलिंपिकपदक मिळवलं. महिलांच्या हातचं पदक थोडक्यात निसटलं; पण त्यांनी केलेली प्रगती आणि दाखवलेली जिगर पुन्हा एकदा ‘चक दे’ची आठवण करून देणारी होती. मात्र, वर्ष संपता संपता आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत जपानकडून उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आलं. साखळीत ज्या जपानचा ६-० असा धुव्वा उडवला होता त्याच संघाकडून ३-५ अशी झालेली हार ही हॉकी संघात सातत्याचा अभाव असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध करणारी आहे. टोकिओ ऑलिंपिकपदकानंतर भारतीय संघ प्रथमच स्पर्धेत खेळत होता. टोकिओतील इच्छाशक्ती आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेत मात्र कमी पडली. या जुन्या दुखण्यावर कधी रामबाण उपाय सापडणार या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही.

...यांच्या यशोगाथा वाचा

कोरोनाकाळात मुळात धडधाकट असलेल्यांना जगणं कठीण झालं होतं, त्यात आपल्या दिव्यांग खेळाडूंनी पॅरालिंपिक स्पर्धेत मिळवलेलं यश केवळ पदकांपुरतं मर्यादित नाही. जगण्याची उमेद हरपलेल्या सर्वांनाच त्यांचा पदकापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे.

गेल्या काही महिन्यांत चार तरुण नेमबाजांनी आत्महत्या केल्या. अपेक्षित यश न मिळाल्यामुळे जीवन संपवण्याचं हे पाऊल उचललं गेलं. नेमबाजच असलेली अवनी लेखरा ही वयाच्या आठव्या वर्षी अपंग झाली. खुर्चीशिवाय तिचं दुसरं जग नव्हतं, तरीही तिनं पॅरालिंपिकमध्ये कमालच केली. अपघातात पाय गमावलेला कुस्तीपटू सुमित अंतिल त्या अवस्थेतही मोठी झेप घेतो. जन्मानंतर काही महिन्यांतच पोलिओ झालेली भाविना पटेल वयाच्या चौतिसाव्या वर्षी जगज्जेती होते. अशक्य ते शक्य करण्याची धमक असलेल्या अशा खेळाडूंची यशोगाथा केवळ पॅरालिंपिक स्पर्धांपुरती मर्यादित न राहता शालेय अभ्यासक्रमातूनही ती प्रसिद्ध व्हायला हवी.

श्रीकांतने करून दिला पुन्हा श्रीगणेशा

भारताच्या पुरुष बॅडमिंटनचे आद्य प्रणेते नंदू नाटेकर यांनी २०२१ या वर्षात जगाचा निरोप घेतला. नाटेकर यांच्यानंतर प्रकाश पदुकोण, विमलकुमार आणि ऑल इंग्लंड विजेता पुल्लेला गोपीचंद हे मोजकेच पुरुष बॅडमिंटन खेळाडू गाजले. महिलांमध्ये साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी तिरंगा फडकवत ठेवला; पण पुरुषांमध्ये हवी तेवढी प्रगती झाली नाही. मात्र, २०२१ हे वर्ष संपता संपता झालेल्या जागतिक बॅटमिंटन स्पर्धेत किदम्बी श्रीकांत हा भारताचा पहिला रौप्यपदक विजेता ठरला. वीसवर्षीय लक्ष्य सेन सर्वात लहान रौप्यपदक विजेता ठरला. नाटेकर यांची परंपरा पुढं सुरू राहू शकेल असा विश्वास या दोघांकडून निश्चितच मिळाला आहे. सिंधू ऑलिंपिकमध्ये दोन पदकं मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली; पण ऑलिंपिक असो वा जागतिक स्पर्धा, तिला तई झू यिंग हिचा अडथळा काही केल्या पार करता येत नाही, त्यामुळे सुवर्णपदकाला हुकलावणी मिळत आहे. हे चक्रव्यूह आता भेदायलाच हवं.

Web Title: Shailesh Nagavekar Writes Neeraj Chopra And Kidambi Srikanth

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Neeraj Chopra