प्रेरक ‘पृथ्वी’सेना (शैलेश नागवेकर)

शैलेश नागवेकर nshailu@gmail.com
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

मुख्य संघात स्थान मिळवण्याच्या रांगेत हे युवा खेळाडू उभे असल्याचं मी पाहतो, तेव्हा ‘कॅच देम इफ यू कॅन’ असा सल्ला मला द्यावासा वाटतो. त्यांच्याबरोबरही स्पर्धा करण्याची वेळ आली आहे. त्यांना सोबत घेऊन देशाची प्रगती करत राहा.
- सचिन तेंडुलकर

पृथ्वी शॉनं नेतृत्व केलेल्या क्रिकेट संघानं १९ वर्षांखालच्या गटातला विश्‍वकरंडक जिंकून नवा अध्याय सुरू केला. पृथ्वीची कहाणी प्रेरक आहेच; पण संघातल्या प्रत्येकाचीच कहाणी एखाद्या चित्रपटात शोभावी अशी. प्रशिक्षक राहुल द्रविडनं या हिऱ्यांना पैलू पाडले आणि या संघानं लखलखतं यश मिळवलं. या संघातले हे चमचमणारे तारे नक्की आहेत तरी कोण, क्रिकेटची फारशी कौटुंबिक पार्श्‍वभूमी नसणारी ही मुलं इथपर्यंत पोचली कशी, राहुलनं त्यांना दिशा कशी दिली, या संघापुढची वाट कशी असेल अशा गोष्टींचा वेध.

नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी में क्‍या है....
मुठ्ठी में है तकदीर हमारी...
हमने किस्मत को बस मे किया है...
***
छोटू...तेरे टीम के मुठ्ठी में क्‍या है....
मुठ्ठी में है ‘इंडियन क्रिकेट’की तकदीर हमारी...
हमने ‘वर्ल्डकप’को बस में किया है.....
***

सहा दशकांपूर्वीच्या ‘बूट पॉलिश’ या चित्रपटातलं, मुलांच्या भवितव्याबद्दल गाजलेलं हे गीत. या गीतामध्ये भारतीय युवा संघाचा कर्णधार पृथ्वी शॉच्या युवा संघाच्या (मुंबई क्रिकेटमध्ये त्याला ‘छोटू’ या नावानंही ओळखलं जातं) कामगिरीचा आधार घेऊन केलेला बदल या ‘पृथ्वी’सेनेचं सार्थ वर्णन करतो. हा युवा कर्णधार आणि त्याच्या टीमनं क्रिकेट विश्वात आपल्या आगमनाची थाटात वर्दी दिली. वरिष्ठ स्तरावरच्या क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा भारतीय संघ जोरदार कामगिरी करत असताना पृथ्वी शॉच्या संघानं राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली १९ वर्षांखालच्या गटातला विश्वकरंडक जिंकण्याचा पराक्रम केला. महिलांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिमाखदार प्रगती केलेली आहे, तर गेल्याच महिन्यात अंधांची विश्वकरंडक स्पर्धाही भारतानं पाकिस्तानचा पराभव करून जिंकली आहे. इंग्रजांनी भारतात आणलेल्या क्रिकेट या खेळात भारताची सर्व स्तरांवर पकड तयार झाली आहे, याचं हे द्योतक आहे.

वरिष्ठ स्तरावर मिळवलेलं यश घोटवून, सराव करून मिळवलं जातं; पण युवा संघाची कामगिरी फार महत्त्वाची. यामागं मेहनत आणि योजनाबद्ध तयारी तेवढीच महत्त्वाची असली, तरी नैसर्गिक आणि उपजत गुणवत्तेचं बाळकडू जन्मतःच मिळणं आवश्‍यक असतं. आपल्याकडं मूल रांगायला लागल्यावर हातात प्लॅस्टिकची बॅट दिली जाते; पण पृथ्वी शॉचे विजेते साथीदार आणि ज्यांना संधी मिळाली नाही अशा मिसरुड फुटलेल्या किती तरी खेळाडूंना लहान वयातच क्रिकेटची मोठी स्वप्नं दिसली आणि क्रिकेटची बाराखडी गिरवावी, असं त्यांना वाटल्यास वाटल्यास नवल नाही. फुटबॉल असो, की क्रिकेट सांघिक खेळात आता युवा (१७ आणि १९ या वयोगटातल्या) स्पर्धांना तेवढंच महत्त्व प्राप्त झालं आहे. काही महिन्यांपूर्वी आपल्याकडं १७ वर्षांखालील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा झाली. या स्पर्धेतले सामने पाहाण्यासाठी प्रीमियर लीग, स्पॅनिश लीगमधल्या प्रसिद्ध क्‍लबचे प्रतिनिधी नवे खेळाडू शोधण्यासाठी आले होते. क्रिकेटमध्येही लहान वयोगटात जागतिक स्तरावर चमकणारे खेळाडूच पुढं जाऊन मैदान गाजवत असतात. विराट कोहली हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर पृथ्वीच्या संघानं मिळवलेल्या यशाकडं पाहायला हवं.

पैलू पाडलेला हिरा
उपजत गुणवत्तेला न्याय देणं म्हणजेच खाणीत सापडलेल्या हिऱ्याला पैलू पाडून तेजोयम करण्यासारखं; पण त्यापेक्षा महत्त्वाची असते ती स्वयंस्फूर्ती आणि जिद्द. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सर्व अडथळ्यांवर मात करून चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यशोगाथा प्रेरक असतात. युवा संघाच्या यशात प्रत्येक खेळाडूचं योगदान मोलाचं होतं; पण कर्णधार पृथ्वी शॉ सर्वांचा केंद्रबिंदू होता. त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर पाहिला जातो आहे; पण त्याहूनही लहान वयातच त्यानं केलेले परिश्रम हेलावणारे आहेत. कोवळ्या वयातच आई गेल्यानं आईविना वाढलेलं हे लेकरू. पहाटेपहाटे तो मुंबईत आणि तेही पश्‍चिम रेल्वेतून वडिलांबरोबर दोन-दोन तासांचा प्रवास करायचा. भल्या पहाटे चार वाजल्यापासून दिनक्रम सुरू व्हायचा. सकाळी वांद्रे इथल्या एमआयजी क्‍लबमध्ये आणि सायंकाळी कलिना इथं सराव अशी मेहनत तो घेत असताना आस्थेनं विचारणा करणारी, मायेची फुंकर घालणारी आई नव्हती; पण सर्व भावना मागं टाकून पृथ्वीला त्याचे वडील- पंकज शॉ घडवत होते. एमआयजी क्‍लबमध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनही सराव करायचा. एकदा तर पृथ्वीची फलंदाजी पाहण्यासाठी सचिनचीही पावलं थांबली. या कोवळ्या खेळाडूसाठी ती मोठीच शाबासकी होती. मुंबईतल्या ज्या हॅरिस ढाल शालेय क्रिकेटमध्ये सचिन-विनोद जोडीनं भागीदारीचा विश्वविक्रम केला होताच, त्याच हॅरिस क्रिकेट स्पर्धेत पृथ्वीनं ५४६ धावांची खेळी केली. तिथंच त्याचा खऱ्या अर्थानं उदय झाला. आजच्या घडीला दादा फलंदाज असलेले विराट कोहली, एबी डिव्हिलिअर्स यांच्या बॅटवर जो एका कंपनीचा लोगो आहे, तोच ब्रॅंड पृथ्वीला अठराव्या वर्षात मिळाला आहे. हं त्यानं कोवळ्या वयात घेतलेल्या मेहनतीचं फळ आहे. अर्थात त्याच्या बॅटवर मोठ्या कंपनीचा लोगो आला; पण मुंबईत तो अजून स्वतःच्या घराच्या शोधात आहे.

मेहनत हाच यशाचा मार्ग
विश्वविजेतेपद मिळवणाऱ्या या संघात काही खेळाडूंना क्रिकेटची कौटुंबिक पार्श्वभूमी असली, तरी बहुतांश खेळाडूंनी केवळ अपार मेहनत घेऊन थक्क करणारी गुणवत्ता दाखवली. वेगवान कमलेश नागरकोटी त्यापैकी एक. या पठ्यानं स्पर्धेत ताशी १४९ किलोमीटर वेगानं चेंडू टाकले. अठराव्या वर्षी खांद्यामध्ये एवढी ताकद आली कोठून, याचं खरंच आश्‍चर्य वाटतं. त्याचे वडील लच्छमसिंग लष्करात अधिकारी होते. चार वर्षांपूर्वी ते लष्करातून निवृत्त झाले. अधिकाऱ्याचा मुलगा असल्यामुळं कमलेशला आर्मी स्कूलमध्ये शिकण्याची संधी मिळाली. त्यामुळं शिस्तही आली. कमलेशचा भाऊ विनोद क्‍लब क्रिकेट खेळायचा आणि खेळताखेळता प्रशिक्षणही द्यायचा. त्यामुळं कमलेशला क्रिकेटची गोडी लागली. एकदा आर्मी स्पोर्टस शिबिरात कमलेशला खेळत असताना सुरेंद्रसिंग राठोड या प्रशिक्षकानं पाहिलं आणि त्याच्यातली गुणवत्ता हेरली. त्यांनी त्याला संस्कार क्रिकेट अकादमीत दाखल केलं. याच अकादमीशी संलग्न असलेल्या प्रथितयश शाळेत शिकण्याची कमलेशची इच्छा होती; परंतु अधिक फी असल्यामुळं त्याचा हिरमोड झाला. मात्र, क्रिकेटमधल्या गुणवत्तेनं त्याला हात दिला. क्रिकेट प्रशिक्षक राठोड आणि शाळेतल्या इतर शिक्षकांनी प्राचार्यांशी भेट घालून दिली आणि फी माफ झालेल्या कमलेशनं आपल्याला हव्या त्या शाळेतून शिक्षण पूर्ण केलं. त्याची यशोगाथा इथवरच पूर्ण होत नाही, तर ध्येय गाठण्यासाठी मेहनत किती पराकोटीची असते, हे त्यानं दाखवून दिलं. राजस्थानमधला उन्हाळा भयंकरच असतो; पण त्या मोसमातही कमलेश तासन्‌तास सराव करायचा. कोणी सोबत असेल तर ठीक, नाही तर झाडाला चेंडू बांधून एकलव्याप्रमाणं एकटाच सराव करत असायचा. पाण्याची एक बाटली घेऊन ही स्वारी निघायची आणि पाणी संपलं, की पुन्हा पाणी घेऊन सराव सुरू व्हायचा. कोवळ्या वयात अशी मेहनत घेतल्यामुळंच तो तयार झाला आहे. गोलंदाजी-फलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षण असलेल्या कमलेशकडं मुख्य संघासाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं जात असतं. चांगल्या शाळेत जाण्यासाठी एके काळी फी भरणंसुद्धा दुरापास्त असलेल्या कमलेशला आता आयपीएलमधून तीन कोटी वीस लाख रुपये मिळणार आहेत. केवळ मेहनत हाच त्याचा यशाचा मार्ग असतो, हे यातून सिद्ध होतं.

कबड्डीपटूचा क्रिकेटवीर
या विश्वविजेत्या संघातला आणखी एक वेगवान गोलंदाज कोलकत्याचा ईशान पोरेल आणि यष्टीरक्षक फलंदाज हार्विक देसाई यांनाही सहजासहजी यश मिळालेलं नाही. हार्विक हा गुजरातमधल्या भावनगरचा रहिवासी. वडिलांचं कपडे शिवण्याचं दुकान. सोबत कपडेविक्रीचाही उद्योग; पण काहीशा खर्चिक झालेल्या या खेळाची साधनं देताना त्यांनाही आर्थिक गणितं जुळवावी लागत होती. क्रिकेट किटसाठी वर्षाकाठी २५ ते ३० हजार खर्च  होत होता; पण वडिलांनी त्याला नाराज केलं नाही. ईशान पोरेलची कहाणी वेगळीच. कबड्डीपासून क्रिकेटपर्यंत असा प्रवास त्यानं केला. त्याचे आजोबा सुभाषचंद्र सुवर्णपदक विजेत्या संघाचे खेळाडू होते. वडील चंद्रनाथही पश्‍चिम बंगाल संघातून कबड्डी खेळलेले. त्यामुळं लहानपणी ईशानलाही कबड्डीचं वेड; पण  एकदा अचानक क्रिकेटचा सामना पाहत असताना आता क्रिकेटच खेळायचं, हे त्यानं मनाशी पक्क केलं आणि त्याच ध्येयानं तयारी सुरू केली. विशेष म्हणजे घरच्यांनी त्याला रोखलं नाही. विश्वकरंडक स्पर्धेत पहिल्याच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याच्या पायाला दुखापत झाली. स्पर्धेतून बाहेर जाण्याची वेळ आली; पण त्यानं जिद्द सोडली नाही. संघाबरोबर राहून त्यानं तंदुरुस्तीसाठी प्रचंड मेहनत घेतली. पाकिस्तानविरुद्ध उपांत्य आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात पूर्ण तंदुरुस्त नसतानाही तो खेळला आणि त्यानं तशाही परिस्थितीत ठसा उमटवला. पृथ्वी असो, कमलेश असो, की ईशान- ही मुलं केवळ विश्वविजेतेपदामुळं लक्षात राहणार नाहीत, तर लहान वयात त्यांनी केलेला खडतर प्रवास इतर अनेक लहान मुलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

‘अभेद्य’ प्रशिक्षण
असे एकापेक्षा एक हिरे संघात असल्यावर संघाची कामगिरी शंभर नंबरी झाली नसती तर नवलच. सलामीला ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर संघाचा- ज्यात स्टीव वॉचा मुलगा आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख सदरलॅंड यांच्याही मुलाचा समावेश होता- त्यांनी शंभर धावांनी पराभव केला आणि तिथून त्यांनी मागं वळून पाहिलं नाही. अपराजित राहून विजेतेपद मिळवणं म्हणजे प्रतिस्पर्ध्यांना संधीच न देणारी कामगिरी असते. खेळाडूंनी मैदानावर शंभर टक्के गुणवत्ता आणि क्षमता सादर केली; पण त्यांना घडवणारा ‘द वॉल’ राहुल द्रविड याचं योगदान किती तरी पटीनं अधिक आहे. क्रिकेटबरोबर सभ्यताही जपणाऱ्या द्रविडकडून सर्वांनीच शिकण्यासारखं आहे. दोन वर्षांपूर्वी मुख्य संघासाठी प्रशिक्षकाचा शोध सुरू असताना अनिल कुंबळेबरोबर द्रविडचंही नाव घेतलं जात होतं; परंतु ‘मला प्रशिक्षणाचा कोणताही अनुभव नाही. त्यामुळं मी थेट मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीत जाणार नाही. युवकांचा प्रशिक्षक होऊन त्यांना घडवण्याचं काम करून मी माझी योग्यता सिद्ध करीन,’ असं द्रविडनं जाहीरपणे सांगितलं होतं. खेळातून निवृत्त झाल्यावर त्या खेळासाठी योगदान देण्याचं सर्वच जण बोलतात; पण त्याच वेळी आर्थिक फायदा आणि प्रसिद्धीचाही विचार करतात. या पार्श्‍वभूमीवर द्रविडची कामगिरी महत्त्वाची वाटते. त्याच्यासारख्या प्रगल्भ आणि व्यापक विचार असलेल्या व्यक्तीचं मार्गदर्शन मिळालेले खेळाडू केवळ मैदानावरच नव्हे, तर मैदानाबाहेरही तयार होतात. केवळ विजेतेपद एवढाच द्रविड यांच्या प्रशिक्षणाचा उद्देश नव्हता. पिढी घडवण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता आणि आहे. म्हणूनच द्रविड महान आहे. याआधीच्या १९ वर्षांखालील दोन स्पर्धांत भारतानं विजेतेपद मिळवलं, त्यावेळी डेव्ह व्हॉटमोर आणि भारत अरुण हे प्रशिक्षक होते. मात्र, द्रविड यांचीच अधिक चर्चा होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी खेळाडूंना केवळ तंत्र-मंत्र यांचेच धडे दिले नाहीत, तर दडपण झेलण्याचीही ताकद दिली. द्रविड आणि हे १९ वर्षापर्यंतचे खेळाडू दोन वेगवेगळ्या पिढ्यांतले. सोशल मीडियामुळं तर हे अंतर आता फारच वाढलेलं; पण द्रविड यांनी कुठंही हे अंतर जाणवू दिलं नाही आणि योग्य वेळी वास्तवाचीही जाणीवही करून दिली. आयपीएल लिलावाच्या वेळी खेळाडूंची उत्सुकता वाढणार आणि त्यांचं लक्ष तिथं असणार हे स्वाभाविक होतं; पण ‘आयपीएल लिलाव प्रत्येक वर्षी येतील; मात्र विश्वकरंडक एकदाच येतो,’ या एका वाक्‍यात राहुल द्रविडनं खेळाडूंना नेमकी दिशा दाखवली. अंतिम सामन्याआधी सर्वधिक चर्चा होत राहणार, त्याचं दडपणही येणार, त्यामुळं दोन दिवसांसाठी मोबाईलबंदी करण्याची शिस्तही द्रविड यांनी लावली. अर्थात असं असलं, तरी विजेतेपद मिळवल्यानंतर द्रविड मैदानात मुलाखत देत असताना त्याच्यामागं उभे राहून काही क्षण दंगा करण्याचं धाडसही हे खेळाडू करू शकले- कारण त्यांच्यासाठी द्रविड ‘रिंगमास्टर’ नव्हता, तर पालक होता. पिढी घडवणारा प्रशिक्षक कसा असावा, याचा मूर्तिमंत आदर्श द्रविडनं घालून दिला.

चिंता करायला लावणारी आकडेवारी
१९९८ पासून १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा खेळवण्यात येऊ लागली. भारतानं आतापर्यंत चार वेळा (महंमद कैफ, विराट कोहली, उन्मुक्त चंद आणि पृथ्वी शॉ) या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवलेलं आहे. यंदाच्या स्पर्धेचे खेळाडू वगळता २०१६ पर्यंत भारताकडून ११७ खेळाडू युवा विश्वकरंडक स्पर्धेत खेळले आहेत त्यापैकी केवळ ३४ खेळाडूंनाच मुख्य संघात स्थान मिळवता आलं आहे. या ३४ पैकी १४ खेळाडूंनाच पन्नासपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळता आले आहेत. विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग, युवराजसिंग, हरभजनसिंग अशा मोजक्‍याच खेळाडूंनी इतिहास घडवला. काही जण बऱ्यापैकी योगदान देऊ शकले, तर काही नावालाच राहिले. स्टुअर्ट बिन्नी आणि फैज फझल यांना तर १९ वर्षांखालील विश्वककरंडक स्पर्धेत खेळल्यानंतर मुख्य भारतीय संघात स्थान मिळण्यासाठी बारा वर्षं वाट पाहावी लागली. एकूणच पुढची वाट बिकट आहे. या स्तरावर विश्वविजेते होण्यासाठी जी मेहनत घेतली, त्यापेक्षाही अधिक मेहनत कदाचित इथून पुढं घ्यावी लागणार आहे. एक मात्र निश्‍चित, की राहुल द्रविडचं मार्गदर्शन आणि सल्ला पाठीशी राहिला, तर काहीच कठीण नाही. ३४ ही संख्या येत्या काळात झपाट्यानं वाढत जाईल- कारण भारत आता कसोटी-एकदिवसीय आणि ट्‌वेन्टी-२० मध्येही मोठी झेप घेत आहे. मागणी वाढत आहे. पुरवठा करण्याची क्षमता मात्र असणं अत्यावश्‍यक आहे.

स्वप्न आणि वास्तव
एकतर्फी कामगिरी करत विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर साहजिक या खेळाडूंचं पुढचं स्वप्न मुख्य भारतीय संघात स्थान मिळवण्याचं असणार. मात्र, स्वप्न आणि वास्तव यांच्यात फार मोठं अंतर असतं. ‘आता कुठं दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण किंवा क्रमांक मिळाला आहे- पुढच्या उच्चशिक्षणासाठी अजून तयार व्हायचं आहे,’ असाच सल्ला द्रविड या खेळाडूंना वारंवार देत होता- कारण त्यानं स्वतः हा प्रवास अतिशय जवळून अनुभवलेला आहे. आताच्या संघात पृथ्वी शॉ, कमलेश नागरकोटी, ईशान पोरेल, शुभमन गिल यांच्यासारखे काही खेळाडू मुख्य संघात खेळण्याच्या क्षमतेचे आहेत; पण त्यांना लगेचच संधी मिळणार नाही. त्यासाठी कदाचित शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्‍य रहाणे, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव यांना संघाच्या बाहेर जावं लागेल. ते शक्‍य नाही. एकेककरूनच हे खेळाडू शर्यतीत येऊ शकतील; पण त्यासाठी जी संधी मिळेल, तिच्यात सातत्य दाखवावंच लागेल. या विश्वविजेत्या खेळाडूंना प्रथम श्रेणी म्हणजेच रणजी-दुलीप, राष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्‌वेंन्टी-२० स्पर्धांत स्थान मिळेल; मात्र या स्पर्धांमध्ये भरीव कामगिरी करावीच लागेल. भारत अ संघांसाठीही त्यांचा प्राधान्यानं विचार होईल. ती संधीही मौल्यवान असेल. या पायऱ्या पार केल्या तरच मुख्य संघाचे दरवाजे उघडतील. या सर्व खेळाडूंनी स्वतः एक वेगळी उंची तयार केली आहे. ती उंची त्यांना सोडून चालणार नाही. अन्यथा ‘उन्मुक्त’ होण्याची वेळ येऊ शकेल. सहा वर्षांपूर्वी उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ असाच विश्वविजेता झाला होता. त्यावेळीही अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होते आणि उन्मुक्तनं शतकही केलं होतं. हाच उन्मुक्त आता रणजीतसुद्धा फार चांगली चमक दाखवू शकत नाही. परिणामी आयपीएलमध्येही त्याला कोणी आपल्या संघात घेतलेलं नाही. त्यामुळंच एकूण पुढची वाट दिसते तितकी सोपी नाही, हेही तितकंच खरं.  

यांना सापडली वाट
आतापर्यंत १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा खेळलेले आणि त्यानंतर मुख्य भारतीय संघात संघात स्थान मिळालेले ३४ खेळाडू ः विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग, हरभजनसिंग, लक्ष्मीरतन शुक्‍ला, महंमद कैफ, युवराजसिंग, रितेंदरसिंग सोधी, अजय रात्रा, पार्थिव पटेल, इरफान पठाण, दिनेश कार्तिक, सुरेश रैना. व्हीआरव्ही सिंग, रॉबिन उथप्पा, पियूष चावला, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, सौरव तिवारी, शिखर धवन, जयदेव उनाडकट, अभिवन मुकुंद, चेतेश्वर पुजारा, अंबाती रायुडू, स्टुअर्ट बिन्नी, लोकेश राहुल, मनीष पांडे, संदीप शर्मा, संजू सॅमसन, फैज फझल, मनदीपसिंग, रिशब पंत, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shailesh nagvekar write cricket u19 article in saptarang