
सप्ततारांकित
तेंडुलकर या नावाची चर्चा क्रिकेटविश्वात नेहमीच सुरू असते. यंदाच्या आयपीएल लिलावात ‘लिलावाच्या मैदानात प्रथमच उतरणाऱ्या अर्जुनचं काय होणार,’ याची उत्सुकता होती आणि अपेक्षेप्रमाणे मुंबई इंडियन्सनं त्याच्यासाठी जागा राखीव ठेवत त्याला संघात घेतलं.
तेंडुलकर या नावाची चर्चा क्रिकेटविश्वात नेहमीच सुरू असते. यंदाच्या आयपीएल लिलावात ‘लिलावाच्या मैदानात प्रथमच उतरणाऱ्या अर्जुनचं काय होणार,’ याची उत्सुकता होती आणि अपेक्षेप्रमाणे मुंबई इंडियन्सनं त्याच्यासाठी जागा राखीव ठेवत त्याला संघात घेतलं.
आंतरराष्ट्रीय स्तरावर १९८९ पासून तेंडुलकर नावाचा सिलसिला सुरू झाला. त्या वेळी १६ वर्षांचा कोवळा सचिन पाकिस्तान दौऱ्यावर गेला आणि तिथूनच क्रिकेटच्या देवत्वाकडे त्याला घेऊन जाणारी परिक्रमा सुरू झाली. सात वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेटच्या पंढरीत ही परिक्रमा थांबली पण ‘तेंडुलकर’ नावाचं माहात्म्य वेगळ्या रूपानं अजूनही कायम आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
एकीकडे भारताच्या इंग्लंडवरील दुसऱ्या कसोटीतील विजयाचा उदो उदो सुरू असताना, दुसरीकडे आयपीएलच्या लिलावाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. तसं पाहायला गेलं तर हा लिलाव केवळ काही महिन्यांत सुरू होणाऱ्या यंदाच्या आयपीएलपुरताच आणि शिल्लक असलेल्या काही मर्यादित जागांसाठीच होता, त्यामुळे स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल आणि देशी खेळाडूंमध्ये केदार जाधव, हरभजनसिंग असे खेळाडू सोडले तर फार वैशिष्ट्य नव्हतं; परंतु अर्जुन तेंडुलकरची मात्र मोठीच चर्चा होती. कारण, त्या नावाला असलेलं वलय. अर्जुनला तेंडुलकर हे नावच कदाचित पूरक आथवा मारक ठरत असावं. कारण, जेव्हा तो तेंडुलकर या नावानं मैदानाशी किंवा क्रिकेटशी निगडित होतो तेव्हा चर्चा तर होतेच.
सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा.
शिवधनुष्य पेललं
वडिलांची परंपरा पुढं चालवण्याचं प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं. अर्थात्, पुढची पिढी आपल्या वडिलांच्या क्षेत्रातच जाते असंही नाही; पण खेळ असो, अभिनय असो किंवा राजकारण, वडिलांच्या कार्याशी मुलांची तुलना ही होतेच. पण पित्यांच्या देदीप्यमान्य माहात्म्यामुळे मुलांची कारकीर्द झाकोळली गेल्याचीही अनेक उदाहरणं आहेत. तेंडुलकरांच्या अर्जुननं मात्र हे शिवधनुष्य पेलण्याचं धाडस केलं हे काही कमी नाही. कारण, क्षणोक्षणी त्याची तुलना वडिलांशी होत राहणार हे तेवढंच सत्य आहे. काय करतो अर्जुन?
अर्जुन तेंडुलकर नेमकं काय करतो? तर तो डावखुरा वेगवान गोलंदाज आणि आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीचा नेमका किती वेग आहे किंवा फटकेही किती आक्रमक आहेत हे दूरचित्रवाणीवरून कोणत्याही मोठ्या सामन्याद्वारे जोपर्यंत पाहिलं जात नाही, तोपर्यंत सर्वसामानान्यांना ते कळणारही नाही. त्यामुळे जेव्हा त्याचं टीव्हीवर ‘पदार्पण’ होईल तेव्हा खऱ्या अर्थान अर्जुनची ओळख होईल.
मुंबई संघातील निवड
वडिलांप्रमाणे अर्जुननंही मुंबईतील वयोगटाच्या संघात जेव्हा जेव्हा स्थान मिळवलं, तेव्हा तेव्हा दुसऱ्या बाजूनं टीकेचा सूर उमटलेला आहे. ‘अर्जुनपेक्षा अधिक गुणवत्ता असलेल्या खेळाडूंवर अन्याय झाला,’ असं अनेकदा माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत होतं. अगदी नुकत्याच झालेल्या ‘मुश्ताक अली राष्ट्रीय ट्वेन्टी-२०’ स्पर्धेचं उदाहरण देता येईल. प्राथमिक २० खेळाडूंच्या संघात अर्जुनला स्थान नव्हतं, कारण त्याअगोदर झालेल्या निवडचाचणीत अर्जुन फारशी चांगली करू शकला नव्हता. मात्र, जेव्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं प्रत्येक राज्याला दोन अतिरिक्त खेळाडूंची निवड करण्याची सूचना केली तेव्हा मुंबई निवड समितीचे अध्यक्ष सलील अंकोला यांनी अर्जुनची निवड केली आणि पुन्हा चर्चा सुरू झाली. सचिनबरोबर १९८९ मध्ये सलील अंकोलाचंही पदार्पण झालं होतं, त्यामुळे मैत्रीचा तो दाखला देण्यात येऊ लागला होता.
अर्जुनचं सर्वसामान्य वर्तन
मुंबईत सरावासाठी असो वा सामन्यासाठी असो, चांगल्या गाडीतून आणि अर्थातच सुरक्षारक्षकांसह अर्जुन आता मैदानावर येत असला, तरी तो मुंबईतील स्थानिक क्रिकेटमध्ये संघातील इतर खेळाडूंसह टेंटमध्येच वावरतो. लंचही तिथंच घेतो. संघातील सहकाऱ्यांमध्ये तो सर्वसामान्य खेळाडू म्हणूनच वावरतो. मुंबई संघातून बडोद्यात झालेल्या वयोगटाच्या एका स्पर्धेसाठी अर्जुननं संघाबरोबर ट्रेनमधून प्रवास केला होता. एकूण काय तर, सचिन त्याच्या मुलाला सर्वसामान्य खेळाडू म्हणून तयार करत आहे. भारताच्या गेल्या इंग्लंड दौऱ्यात अर्जुननं भारतीय संघाला, सराव गोलंदाज म्हणून नेटमध्ये गोलंदाजी केली होती, त्यानंतर तो स्टेडियमच्या बाहेर रेडिओही विकत होता.
अपेक्षित निवड
तसं पाहायला गेलं तर अर्जुनची निवड अपेक्षित होती. कारण, तो गेले कित्येक मोसम मुंबई इंडियन्स संघाबरोबर सराव करत आहे. अमिरातीत झालेल्या स्पर्धेतही तो संघाबरोबर होता. आता फक्त तो अधिकृतपणे संघाचा सदस्य झाला आहे एवढंच. आता आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली तर अर्जुनसाठी निश्चितच पुढचे दरवाजे उघडले जातील यात शंका नाही.
Edited By - Prashant Patil