तळपली भवानीदेवीची तलवार!

Bhavanidevi
Bhavanidevi

‘भवानीदेवी’, ‘तलवार’ हे इतिहासातले शब्द आपल्याला सुपरिचित आहेत. गेल्या काही दिवसांत हे शब्द पुन्हा कानी पडू लागले आहेत; पण आधुनिक संदर्भात! चेन्नईच्या सत्तावीसवर्षीय भवानीदेवीनं इतिहास घडवला असून, ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली ती पहिलीवहिली भारतीय तलवारपटू ठरली आहे. एकीकडे महिलांच्या क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीयांची होणारी पीछेहाट, दुसरीकडे कोमेजलेल्या ‘फुलराण्या’ (साईना नेहवालचे सुरुवातीलाच झालेले पराभव, तर प्रगती केल्यानंतरही पी. व्ही. सिंधूचं अपयश) अशा काहीशा निराशाजनक घटना घडत असतानाच भवानीदेवीनं सुखद धक्का दिला आहे. तलवारबाजी हा भारतीयांना तसा ‘खेळ’ म्हणा किंवा ‘क्रीडाप्रकार’ म्हणून आजच्या काळात परिचित नाही, पूर्वीची गोष्ट वेगळी. शिवाय, सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे. या दोन बाबींच्या पार्श्वभूमीवर भवानीदेवीसारखी खेळाडू टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरते हीच गौरवास्पद आहे. हंगेरीत झालेल्या विश्वकरंडक नेमबाजीत सांघिक स्पर्धेत यजमानांचा उपांत्यपूर्व सामन्यात पराभव झाला आणि कोरियाला उपांत्य फेरी गाठता आली. या निकालामुळे क्रमवारीत मोठे बदल घडले. टोकिया ऑलिंपिकसाठी आशिया आणि ओशियानातून उपलब्ध झालेल्या दोनपैकी एका जागा नव्यानं तयार झालेल्या मानांकनानुसार मिळणार होती. भवानीदेवी जागतिक क्रमवारीत पंचेचाळिसाव्या स्थानावर असल्यानं ती पात्र ठरली. आता तसं पाहायला गेलं तर या घडामोडीत तिचा थेट सहभाग नव्हता; परंतु पंचेचाळिसावं स्थान मिळवण्यासाठी तिनं घेतलेल्या मेहनतीचं हे फळ मिळालं आहे व ते तलवारीच्या धारेएवढंच लखलखतं आहे.

पूर्वीच्या काळी राजा-महाराजांच्या मनोरंजनासाठी तलवारबाजीचे खेळ व्हायचे; पण आता या खेळाला नव्यानं ‘राजमान्यता’ मिळवून दिली ती भवानीदेवीनं. सर्वसामान्य भारतीयांना चेन्नईची भवानीदेवी आणि तिची तलवारबाजी नवखी असली तरी ऑलिंपिक खेळांची जाण असलेल्या क्रीडारसिकांना ती नवी नाही. आज ना उद्या आपली भवानीदेवी क्रीडाक्षितिजावर चमकणार याची खात्री होती आणि त्या दिशेनं आता तिचा प्रवास सुरू झाला आहे.

भवानीदेवी या नावानं ती प्रसिद्ध असली तरी तिचं मूळ नाव चंदललावदा आनंदा सुंदररमण भवानीदेवी ऊर्फ भवानीदेवी असं आहे. तलवारबाजी या खेळात वापरल्या जाणाऱ्या तलवारीएवढंच मोठं! २००९ मध्ये मलेशियात झालेल्या राष्ट्रकुल चॅंपियन्सशिपमध्ये ब्राँझपदक जिंकल्यानंतर भवानीदेवीची सुरू झालेली यशोगाथा एकेक टप्पा पार करत राहिली. २०१० मधील इंटरनॅशनल ओपन, कॅडेट आशियन चॅम्पियन, २०१२ मध्ये राष्ट्रकुल, २०१४ मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील तेवीस वर्षांखालील गटात ब्राँझपदकाची कमाई ती करत राहिली. २०१९ मध्ये कॅनबेरा येथील सीनिअर गटाच्या राष्ट्रकुल नेमबाजीत भवानीदेवीनं सुवर्णपदाचा लक्ष्यभेद केला आणि खऱ्या अर्थानं आपल्या कर्तृत्वाची दखल घेण्यास भाग पाडलं. इथंच तिनं अव्वल ५० महिला तीरंदाजांमध्ये स्थान मिळवलं आणि ती एकेक पाऊल पुढं जात राहिली.

कौटुंबिक पार्श्वभूमी
भवानीदेवीचं कुटुंब तसं मध्यमवर्गीय. खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेलं. तिचे वडील सी. ए. रमण हे एका मंदिराचे पुजारी आणि आई सी. आनंदा ही कुटुंब सांभाळणारी. भवानीदेवी हे त्यांचं पाचवं आपत्य. आई कुटुंब सांभाळत असली तरी तिचं प्रोत्साहन भवानीदेवीसाठी सर्वात महत्त्‍वाचं ठरलं. ‘तलवारबाज होण्याच्या माझ्या स्वप्नपूर्तीसाठी वडिलांपेक्षा आईनं जास्त मदत केली,’’ असं भवानीदेवी सांगते. 

कशी हाती आली तलवार...?
‘मुरुगा धनुषकोडी मुलींच्या उच्च माध्यमिक शाळे’त शिकत असताना २००४ मध्ये भवानीदेवीनं तलवारबाजी या खेळात पहिलं पाऊल टाकलं. या नव्या शाळेत सहाव्या इयत्तेत प्रवेश केल्यानंतर खेळासाठी सहा पर्याय ठेवण्यात आलेले होते; पण इतर पाच खेळांसाठी इतरांनी अगोदरच आपलं नाव निश्चित केलेलं होतं. तलवारबाजी हा एकमेव खेळ शिल्लक होता, त्यामुळे तो स्वीकारण्याशिवाय भवानीदेवीपुढं पर्याय राहिला नव्हता. हा खेळ नक्की कसा आहे, कसा खेळला जातो याची काहीच माहिती तिला नव्हती. 

‘मुळात तमिळनाडूत हा खेळ नवा असल्यानं अनेकांना ‘फेन्सिंग’ हा उच्चारही करता येत नव्हता. मात्र, अगदीच नवा असलेला हा खेळ मला भावला. काही तरी वेगळं आहे हे जाणवलं आणि त्याविषयीची उत्सुकता दिवसागणिक वाढू लागली, इतर खेळांपेक्षा हा वेगवान खेळ असल्यानं मला तो आवडला,’’ असं भवानीदेवीनं एका मुलाखतीत म्हटलं आहे.

बांबूची तलवार
तलवारबाजी या खेळात खास पद्धतीच्या हेल्मेटपासून पोशाख आणि बुटांपर्यंतची तयारी खर्चिक असतेच, त्याचबरोबर काही वस्तू इलेक्ट्रिकच्या असतात. त्यात तलवार हा प्रमुख घटक असतो; पण सुरुवातीच्या काळात भवानीदेवीला कुठून मिळणार ही सर्व आयुधं? ती बांबूचीच तलवार तयार करून सराव करायची. तलवारबाजी हा खेळ बंदिस्त स्टेडियमधला; पण दक्षिण भारतात भवानीदेवीला कडक उन्हात सराव करावा लागायचा; पण तिनं कधी नकारात्मकता जवळपासही फिरकू दिली नाही. राष्ट्रीय स्तरावर कोणती स्पर्धा खेळायची असेल तर ती इतर मोठ्या खेळाडूंकडून तेवढ्यापुरती इलेट्रिक तलवार आणायची. २००४ पासून तिचा खरा प्रवास सुरू झाला. मध्य प्रदेशात होणाऱ्या स्पर्धेसाठी तिनं व्यावसायिक पद्धतीनं चेन्नईतील नेहरू स्टेडियमध्ये सराव करण्यास प्रारंभ केला.

सराव...शिक्षण आणि सराव
भवानीदेवीच्या लेखी शालेय शिक्षणाला जेवढं महत्त्व होतं, तेवढंच प्रेम तिचं तलवारबाजी या खेळावरही होतं. या दोन्ही गोष्टी जुळवून आणण्यासाठी तिनं रात्रंदिवस मेहनत घेतली. वाशहरपेट ते स्टेडियम असा बसप्रवास करण्यासाठी ती पहाटे लवकर उठायची. सकाळी सकाळी सराव केल्यानंतर शाळा आणि शाळा सुटल्यानंतर पुन्हा सरावाची शिकस्त असा क्रम तिनं अवलंबला होता. कधी कधी बस चुकली तर अनेक किलोमीटर पायी चालण्याशिवाय पर्याय नसायचा; पण भवानीदेवी कधी थकली नाही की हिरमुसली नाही. दहावी पूर्ण केल्यानंतर ती केरळमधील क्रीडा प्राधिकरणात दाखल झाली आणि २००७ मध्ये तुर्कस्तान इथं झालेल्या जागतिक ज्युनिअर तलवारबाजी स्पर्धेत ती सहभागी झाली.

मुळात हा खेळ तसा खर्चिक, त्यात परदेशांतील स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचं तर अधिक अर्थसाह्य हवंच. पुरेसे पैसे नसल्यामुळे परदेशातील अनेक स्पर्धांना मला मुकावं लागलं; पण आईनं कधी हार मानली नाही. तिच्या मैत्रिणी, कुटुंबातील इतर नातेवाईक यांच्याकडून ती पैसे उसने आणायची. आजही ती मला कोणत्याही प्रकारची मदत करायला सदैव पुढं असते.
- भवानीदेवी

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com