‘गुंगा' पहलवान

शैलेश नागवेकर saptrang@esakal.com
Sunday, 31 January 2021

सप्ततारांकित
हेलसिंकी ऑलिंपिक स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी सन १९५२ मध्ये स्वतंत्र भारतासाठी पहिलंवहिलं पदक मिळवलं.  सुशीलकुमारनं तर ऑलिंपिकची दोन पदकं मिळवण्याचा पराक्रम केला. मात्र, भारताला हवी तेवढी उंची कुस्ती या खेळात गाठता आली नाही.

हेलसिंकी ऑलिंपिक स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी सन १९५२ मध्ये स्वतंत्र भारतासाठी पहिलंवहिलं पदक मिळवलं.  सुशीलकुमारनं तर ऑलिंपिकची दोन पदकं मिळवण्याचा पराक्रम केला. मात्र, भारताला हवी तेवढी उंची कुस्ती या खेळात गाठता आली नाही. मात्र, जेव्हा देशातल्या मल्लांबाबत बारकाईनं विचार केला जातो आणि शोध घेतला जातो तेव्हा काही रत्नं सापडतात. ‘गुंगा पहलवान’ म्हणून ओळख असलेला वीरेंदरसिंग हा त्यापैकी एक.

प्रजासत्तकदिनी जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांत वीरेंदरला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आणि या मल्लाची ओळख भारतीय कुस्तीक्षेत्राला नव्यानं झाली.

भारतीय कुस्तीतील पुरुष मल्लांबाबत आता जेव्हा बोललं जातं तेव्हा अर्थात् सुशीलकुमार, नरसिंह यादव, बजरंग पुनिया आदींचा आवर्जून उल्लेख केला जातो; पण मूकबधीर गटात असलेला वीरेंदरसिंग कुस्तीक्षेत्रापलीकडे कुणाला माहीतही नसतो. मात्र, पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रसिद्ध झालेली त्याची कामगिरी थक्क करणारी निश्चितच असते. गेल्या १२ वर्षांत त्यानं सात पदकं मिळवली आहेत आणि त्यातल्या चार पदकांचा रंग सोनेरी आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्वसामान्यांसाठी जशी ऑलिंपिक स्पर्धा होत असते तशी मूकबधीर खेळाडूंची डिफ्लेपिंक होत असते. मूकबधीरांसाठीची ही स्पर्धा सन १९२४ पासून सुरू झाली आहे. वीरेंदरसिंगनं या स्पर्धेत तीन सुवर्णपदकं आणि एक ब्राँझपदक मिळवलं आहे. मुख्य ऑलिंपिक असो, मूकबधीरांसाठीची डिफ्लेपिंक असो वा अपंगांसाठीची पॅरालिंपिक असो, शेवटी ही स्पर्धा जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंशी होत असते आणि अशा स्पर्धेत मिळवलेलं यश सर्वोच्च असतं म्हणूनच वीरेंदरसिंग महान आहे.

सप्तरंगचे आणखी लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा

‘दंगल’ ते ‘गुंगा पहलवान’
फोगटभगिनींवरचा आणि आमिर खानची भूमिका असलेला ‘दंगल’ हा चित्रपट खूप गाजला. त्यामुळे कुस्तीक्षेत्राबाहेरच्यांनाही या खेळाबाबत उत्सुकता निर्माण झाली. वीरेंदरचीही कहाणी चित्रबद्ध होण्यासारखीच आहे. सन २०१३ मध्ये या क्षेत्रातल्या त्याच्या एकूण प्रवासावर ४५ मिनिटांची डॉक्युमेंट्री तयार करण्यात आलेली आहे आणि सन २०१५ मध्ये तिला राष्ट्रीय फिल्म पुरस्कारही मिळालेला आहे, तरीही तो भारतीय कुस्तीत दुर्लक्षितच राहिला.

कुस्तीची परंपरा
मुळात वीरेंदरच्या घरातच कुस्ती आहे. त्याचे वडील अजितसिंग आणि काका सुरेंदरसिंग हे स्थानिक पातळीवरचे मल्ल. देशात होणाऱ्या हौशी मल्लांच्या अनेक ‘दंगलीं’मध्ये त्यांनी भाग घेतला होता. त्यामुळे वीरेंदरनं आखाड्यातली माती अंगाला लावली नसती तर आणि शड्डू ठोकला नसता तरच नवल होतं. वीरेंदरच्या वडिलांना अपघात झाल्यामुळे ते अनेक वर्षं काहीच करू शकत नव्हते, अशा वेळी केंद्रीय राखीव दलात नोकरी करणारे त्याचे काका सुरेंदर यांनी जबाबदारी स्वीकारली आणि वीरेंदरला दिल्लीतल्या बालव्यायामशाळा आखाड्यात प्रवेश घेतला. वीरेंदरला त्याचे काकाच मार्गदर्शन करायचे आणि पहिल्याच दंगलीत वीरेंदरनं ११ हजारांचं पारितोषिक मिळवलं. तिथूनच त्याच्या यशाचा प्रवास सुरू झाला.

माती ते मॅट
वीरेंदरनं ‘माती ते मॅट’ असा बदल केला; पण तिथंही तो बाहुबलीच ठरला. हरिद्वार इथं सन २००२ मध्ये झालेल्या राष्ट्रीय कॅडेट स्पर्धेत त्यानं सुवर्णपदक मिळवलं. त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठीचा मार्ग आता खुला झालाच होता; परंतु तो मूकबधीर असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला वगळण्यात आलं.  मात्र, ‘तो मूकबधीर असला तरी जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेसाठी आम्ही अशा मल्लांना अपात्र ठरवत नाही,’ असं आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघानं स्पष्ट केल्यावर भारतीय संघटनेला आपली चूक कळून चुकली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.

पहिलं सुवर्णपदक
निराश झालेल्या वीरेंदरला मूकबधीरांसाठी ऑलिंपिक होत असल्याचं दोन वर्षांनी समजलं. त्यानं पुन्हा जोरदार तयारी सुरू केली. मेलबर्नला झालेल्या त्या स्पर्धेसाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागणार होते. वडिलांनी आणि काकांनी सन २००५ मधल्या या स्पर्धेसाठी ७० हजार रुपये जमा केले. आपल्यासाठी खर्च करण्यात आलेल्या एकेका पैशाचा हिशेब वीरेंदरनं सुवर्णपदक मिळवूनच दिला. त्यानंतर देशाचा तिरंगा त्यानं मानानं फडकवतच ठेवला.

खरं तर वीरेंदरला मुख्य ऑलिंपिक स्पर्धेत खेळायचं होतं; पण त्याच्या कर्तृत्वाचा आवाज कुणालाच ऐकू गेला नाही. मात्र, जिथं जिथं संधी मिळाली तिथं तिथं त्याच्या कामगिरीचा आवाज दोन्ही कान शाबूत असलेल्या दुनियेत घुमत राहिला. अशा मल्लाचा पद्मश्री पुरस्कार देऊन होणारा गौरव हा, वीरेंदरवर त्या वेळी अन्याय करणाऱ्यांना चीतपट करणारा ठरला.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shailesh Nagvekar Writes about Gunga Pahalwan